-© नयना पिकळे

(शम्मी कपूर स्केच सौजन्य- श्रीकांत धोंगडे)

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

शम्मी कपूरवर लिहिणार का?” असं विचारताच मी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. कारण मी स्वतःहून शम्मीवर नसतेच लिहू शकले . कसं असतं ना? दिलीप कुमारची बातमी कळताच जवळ जवळ 3-4 महीने लेखन पूर्णपणे बंद असलेल्या मला शांतच बसवेना . दिलीप कुमारवर संपूर्ण लेख एका बैठकीत लिहून संपवला आणि मगच शांत झाले. आणि तीच मी, शम्मी कपूर, देव आनंद, आशा भोसले आणि तलत ह्या माझ्या “Forever Favourites” वर आजही लिहुच नाही शकत . कुठून सुरुवात करू , काय लिहू हेच सुचत नाही . म्हणूनच शम्मी कपूरसाठीच्या लेखाची विचारणा होताच मी विचार बदलायच्या आधीच हो म्हणाले. चला तर प्रयत्न करते ..(Remembering Hindi Cinema’s Popular Actor Shammi Kapoor)

सुप्रसिद्ध रंगमच कलाकार आणि अभिनेता पृथ्वीराज कपूर आणि त्यांची पत्नी रामशरनी कपूर ह्यांच्या तीन मुलांतील मधला होता शमशेरराज कपूर म्हणजेच आपला सर्वांचा लाडका शम्मी कपूर . त्याचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ साली मुबंईत झाला . शालेय शिक्षण मुंबईच्या न्यू एरा स्कूल मध्ये आणि नंतर रुईया कॉलेजमध्ये एडमिशन . वडिलांनंतर मॅट्रिकची परीक्षा पास होऊन कॉलेजात जाणारा शम्मी हा कपूर खानदानातला पहिला मुलगा. एरोनॉटिकल इंजिनीअर बनायचं शम्मीचं स्वप्न होतं . पण शेवटी अंगात सळसळणाऱ्या अभिनयाचं खानदानी रक्त वरचढ ठरलं. लवकरच शम्मीने कॉलेज सोडलं आणि वडिलांच्याच पृथ्वी थिएटरमध्ये महिन्याला ५० रुपये पगारावर जुनिअर आर्टिस्ट म्ह्णून लागला .

नायक म्हणून शम्मीचा पहीला चित्रपट होता नायिका चाँद उस्मानी सोबत १९५३ सालचा “जीवन ज्योत”. अतिशय देखणा चेहरा, निळे डोळे आणि राजबिंडं रुबाबदार व्यक्तिमत्त्वं होतं त्याचं . सुरुवातीला त्याने मधुबाला, नूतन, सुरैय्या, नलिनी जयवंत ह्या त्याकाळी स्टारपदावर असणाऱ्या नायिकांबरोबर चित्रपट केले आणि तरीही त्याचे सुरुवातीचे काही चित्रपट फ्लॉप गेले.

त्या काळचा शम्मी आपल्या डोळ्यांसमोर असलेल्या त्याच्या आजच्या प्रतिमेपेक्षा अगदी वेगळा होता. त्याच्यावर वडिलांचा आणि मोठा भाऊ राजकपूर ह्यांचा खूप प्रभाव होता . त्यांच्या सारखं दिसावं म्हणून तो काडेपेटीतल्या काड्या विझवून त्यांच्या काजळीनं बारीक तलवारकट मिशा काढायचा. तरुण वयात शम्मीचे नूतन , मधुबाला आणि असे अनेक crush झाले पण शेवटी त्यानं लग्न गीता बालीशी केलं. शम्मी आणि गीता कसे एकत्र आले याचा किस्साही गमतीशीर आहे . “मिस कोका कोला” चित्रपटाच्या वेळी रानीखेतला शुटींग चालू होतं. शम्मी एका वाघाच्या मागावर होता, पण तो वाघ काही केल्या शम्मीला परत दिसेना . एके दिवशी रात्री जेवणानंतर हॉटेल वर परतताना अचानक समोरच्या जीपमध्ये असलेली गीता बाली अतिशय उत्साहित होऊन शम्मीला खाणाखूणा करू लागली. पाहिलं तर समोरच्या झाडीत वाघाची चाहूल लागली होती .

त्याच वेळी, त्याच क्षणी शम्मी चक्क गीताच्या निडर, निरागस स्वभावाच्या प्रेमात पडला . पण गीता होती शम्मी पेक्षा २ वर्षांनी मोठी. शिवाय घरच्यांची काय प्रतिक्रीया असेल ही काळजी. शम्मीने कितीही प्रयत्न केले तरी ती काही केल्या प्रतिसाद देईना . शेवटी चार महिन्यांनी अचानक एक दिवस ती म्हणाली “लग्न करते तुझ्याशी, पण आजच्या आज करत असलास तरच” शम्मी एका पायावर तयारच होता . दोघेही लगेच मुंबईतल्या बाणगंगा परिसरातल्या देवळात २४ ऑगस्ट १९५५ च्या मध्यरात्री विवाहबद्ध झाले. घाई गडबडीत शम्मी सिंदूर घेऊन जायलाच विसरला आणि त्याने गीता बालीची मांग लिप्स्टिकने भरली .

विशेष म्हणजे त्यावेळी शम्मीचा सिनेसृष्टीत जम बसायचा होता तर गीता अभिनेत्री म्हणून सुप्रसिद्ध होती. त्याकाळचा शम्मी स्वभावाने जेवढा लाजरा बुजरा तेवढीच गीताबाली बिनधास्त. शम्मी मोजून मापून वागणार बोलणार, तर गीता बोलघेवडी. Opposites Attract म्हणतात ते उगीच नाही. शम्मीच्या आयुष्यात गीताने प्रवेश केला आणि शम्मीच्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल झाला. आज जो “या ssssss हु” वाला शम्मी आपल्याला माहित आहे त्याला घडविण्यात गीता बालीचा सर्वात मोठा वाटा आहे . संवाद फेक कशी करायची , नृत्याच्या स्टेप्स , चालायची, उभं राहायची स्टाईल हे आपण गीताकडे पाहून शिकलो असं शम्मीने एका मुलाखतीत अभिमानाने कबुल केलेलं.

दोघांच्या लग्नाआधीचे शम्मीचे रेल का डिब्बा (1953) , ठोकर (1953) लैला मजनू (1953), शम्मा परवाना (1954) आणि लग्नानंतरचे तुमसा नाही देखा (1957), दिल देके देखो (1959) , जंगली (1961) हे सिनेमे पहिले की हा फरक लगेच कळतो. शम्मीच्या करकीर्दीतला हा दूसरा टप्पा अतिशय यशस्वी ठरला .

मला स्वतःला मात्र
“कहता है दिल तुम हो मेरे लीये”
“बेकरार है कोई आ sss मेरे दिलदार आ”
“तूने मेरा यार ना मिलाया”
“चल दिया कारवाँ”
ह्या सर्व गाण्यातून दिसणारा, बारीक मिशी असलेला हळवा, लाजरा बुजरा आधीचा शम्मी सुद्धा खूप आवडतो.

शम्मीचा १९५७ सालचा “तुमसा नहीं देखा” हा पहीला हीट चित्रपट. या चित्रपटामुळे शम्मी रातोरात असंख्य तरुणींच्या हृदयाची धडकन बनला . यानंतर आलेल्या दिल तेरा दीवाना , प्रोफेसर , चायना टाऊन , ब्लफ मास्टर , राजकुमार , कश्मीर की कली , जानवर चित्रपटांमुळे त्याची कारकीर्द बहरली आणि त्याची रोमॅंटिक प्ले बॉय इमेज बनली ती कायमचीच .

शम्मी कपूर म्हणजे निळ्या डोळ्यांच्या निरागसतेचं अजब रसायन . खानदानी देखणेपण , ऊंची पुरी देहयष्टी . हीरो मटेरियल तर खच्चून भरलेलं . जोडीला गाणी प्रेक्षणीय कशी करायची ह्याची आगळी कला अवगत होतीच . शरीराला आळोखे पिळोखे देत , मान वेडीवाकडी करत , मनसोक्त धिंगाणा घालत संपूर्ण पडदाच तो कॅप्चर करायचा . राजबिंडा आणि रांगडा ह्यांच अनोख मिश्रण म्हणजेच शम्मी कपूर ….

“या हू SSSS चाहे कोई मुझे जंगली कहे”
“तुमसे अच्छा कौन है”
“अय्यैय्या सुक्कू सुक्कू”
“आजा आजा मै हूँ प्यार तेरा”
“झुमता मौसम मस्त महिना”
“दिल तेरा दिवाना है सनम”
ही गाणी म्हणणारा शम्मी म्हणजे उत्साहाने दुथडी भरून वाहणारा चैतन्याचा झराच ..
आणि
“गोविंदा आला रे आला“ हे गाणं तर कहरच .. रस्त्यावर बेभान होऊन नाचणाऱ्या शम्मीच्या प्रत्येक हावभावातून गोविंदाचा नटखटपणा पुरेपूर अनुभवायला मिळतो.

आजही शम्मी कपूरची गाणी नुसती ऐकण्यापेक्षा बघायला जास्त आवडतात ती ह्याचसाठी . बरं हे वाचून कुणी म्हणेल की शम्मी कपूर म्हणजे फक्त धुसमुसळेपणा आणि धांगडधिंगा की काय ? तर तसं मात्र अजिबात नाही . कारण अभिनयातही तो तितकाच versatile होता .
अनेक हळुवार प्रणयी गाणी सुद्धा त्याने आपल्या अभिनयाने फुलवली .

“चोरी चोरी इक इशारा हो गया है”
“हम और तुम और ये समाँ”
“ए गुलबदन ए गुलबदन”
“इशारों इशारों मे दिल लेने वाले”
“दिवाना हुआ बादल”
“है दुनिया उसीकी जमाना उसीका”
“जवानियाँ ये मस्त मस्त बिन पिये”
ह्या गाण्यातून घडणारं अभिनेता शम्मीचं दर्शन जितकं विलोभनीय तितकीच कारुण्याची छटा असलेली
“एहसान तेरा होगा मुझपर”
“आवाज देके हमे तुम बुलाओ”
“ऐ दिल अब कहीं न जा”
ही गाणी देखील काळीज हेलावणारी.

शिवाय
“मै जागू तुम सो जाओ”
सारखं तरल अंगाई गीत . प्रत्येक गाणं शम्मीच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे लोकप्रिय झालं .

“दिलके झरोखेमें तुझको बिठाकर” हे ब्रह्मचारी चित्रपटातल गाणं तर अतिशय खास . ह्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळचा किस्सा – शम्मीने रफीला म्हटलं की जर ह्या गाण्याचा मुखडा आणि अंतरा मध्ये अजिबात pause न घेता एका श्वासात म्हटला तर गाण्याचा इफेक्ट जबरदस्त होईल आणि रफीने सुद्धा गायला सुरुवात केली ..
“ कल तेरे जलवे पराये भी होंगे,
लेकिन झलक मेरे ख्वाबों में होंगे
फूलों की डोली में होगी तू रुखसत,
लेकिन महक मेरी सांसों में होगी
दिल के झरोखे में तुझको बीठाकर
यादोंको तेरी मैं दुल्हन बनाकर
रख दूंगा मैं दिलके पास
मत हो मेरी जाँ उदास ..

गाणं ऐकून शम्मीने आनंदाच्या भरात रफीला मिठी मारली तेव्हा मात्र रफी म्हणाला “ऐसी जिद फिर कभी ना करो, गलतीसे अगर साँस बंद हो गई तो तुम्हारे लिये गाएगा कौन?”
पण शम्मीच्या ह्या जिद मुळे आणि रफीच्या अनोख्या दमछाक प्रयोगामुळे गाणं अफाट झालं होतं . रफीला ह्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला .
तलत , हेमंतकुमार , मुकेश मन्नाडे ह्यांनी शम्मीसाठी काही अपवाद गाणी सोडली तर बहुतेक गाण्यात शम्मीला साथ मिळाली रफीच्या आवाजाची. रफीची आठवण निघाली की शम्मी म्हणायचा “वो तो मेरी आवाज थी”.

शम्मी कपूरची आता यशस्वी कारकीर्द सुरू झालेली , त्याचा चाहता वर्ग तयार झालेला. गीता बाली आणि शम्मीच्या कपूरच्या सांसारला जेमतेम दहा वर्ष होत होती आणि दुर्दैवाने १९६५ मध्ये देवीच्या आजाराचं निमित्त होऊन गीता बालीचं निधन झालं. त्यावेळी तिसरी मंझिल चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. ह्या अनपेक्षित धक्क्यामुळे शम्मीची मानसिक अवस्था खूपच नाजुक झाली. त्याला त्यातून सावरायला जवळजवळ तीन महिने लागले आणि तिसरी मंजिलचं चित्रीकरणही त्यामुळे थोडं लांबल .

गीता बालीच्या मृत्यूनंतर आणि तिसरी मंजिल नंतर शम्मी कपूरच्या कारकिर्दीचा तिसरा टप्पा सुरू झाला म्हणायला हरकत नाही . हयानंतर चित्रीकरणाच्या वेळी झालेल्या काही लहानसहान अपघातांमुळे त्याच्या बेधुंद नाचण्याला काही प्रमाणात खीळ बसला . तरीही ह्या काळातले त्याचे चित्रपटही गाजले . ब्रह्मचारी , अंदाज , राजकुमार , चायना टाऊन , बदतमीज , लाट साहब , अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरिस , प्रिन्स हे शम्मीचे ह्या काळात गाजलेले चित्रपट . त्याच्या नाचण्यामुळे आजवर दुर्लक्षित झालेल्या त्याच्या अभिनयाची झलक ह्या नंतरच्या चित्रपटातून पाहायला मिळते .
१९६९ मध्ये शम्मी कपूरने भावनगरच्या राजघराण्यातल्या नीला देवी बरोबर दूसरा विवाह केला . ह्या नंतरच्या काळात आलेले प्रेमरोग , रॉक डान्सर , नसीब , हीरो , बेताब , इजाजत , विधाता सारख्या काही चित्रपटातून शम्मीने केलेल्या सहाय्यक भूमिका देखील लोकप्रिय ठरल्या .

असं म्हणतात की भारतात इंटरनेटचा वापर सर्वात पहिल्यांदा शम्मी कपूरने केला. तो इंटरनेट चालवणाऱ्या एका संघटनेचा पहिला अध्यक्ष होता. लंडन मधल्या एका कंपनीकडून त्याने खास भारतात एक इंटरनेटची लाइन घेतली होती.

आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने अनेक पुरस्कार पटकावले . त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे
ब्रह्मचारी (१९६८) – उत्तम अभिनेता – फिल्मफेअर पुरस्कार
विधाता (१९८२) -सहाय्यक अभिनेता – फिल्मफेअर पुरस्कार आणि
फिल्मफेअर लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार (१९९५ )

शेवटी शेवटी मात्र किडनी खराब झाल्यामुळे त्याला आठवड्यातून तीनदा डायलेसिस कराव लागायचं . पण अशा परिस्थितीतही तो कायम हसतमुख सकारात्मक रहायचा . “देवाने मला आयुष्यात भरभरून दिलं आहे” असंच त्याचं नेहमी म्हणणं होतं .
किडनीच्या आजारमुळेच शेवटी १४ ऑगस्ट २०११ रोजी शम्मी कपूरचं निधन झालं .

पण मृत्यूने सुद्धा शम्मीला फक्त शरीरापासून वेगळं केलं असणार . शम्मी मध्ये मुरलेलं खानदानी राजेपण हिरावून घ्यायला मृत्यु सुद्धा नक्कीच धजावला नसणार ..

१४ ऑगस्ट २०११ च्या दिवशी शम्मीच्या स्वागताला अख्खा स्वर्गलोक उपस्थित असणार .. इंद्र आपल्या ऐरावताला सजवून स्वतः जातीने शम्मीच्या स्वागतासाठी तिथे हजर असणार आणि त्या ऐरावतावर दिमाखात बसून


“आगे पीछे हमारी सरकार,
यहाँ के हम है राजकुमार “

म्हणत वाजत गाजत शम्मी कपूरने स्वर्गात सुद्धा Grand Entry घेतलेली असणार ह्यात शंकाच नाही.

हिंदी सिनेमाच्या अशाच जुन्या जमान्यातील गोल्डन इरा काळातील अधिक लेखांसाठी क्लिक करा

Nayana Pikle
+ posts

सौ नयना सतीश पिकळे

शिक्षण -
बी एस्सी रसायनशास्त्र
एम ए संस्कृत (वेदांत)
मोबाईल - ९९६७०५३९६७

एच एस बी सी बॅन्केत नोकरी (१९९२-२००३)

बी ए संस्कृतच्या खाजगी शिकवण्या .

मराठी विश्वकोशासाठी नोंदी करणे .

यशोवाणी संस्थेतर्फे अंध मुलांसाठी आॅडियो बुक्सचे रेकाॅर्डींग करणे .

सांगितिक कार्यक्रमांसाठी स्क्रीप्ट लिहिणे आणि निवेदन करणे.

सिने-संगीत व सिनेमा विषयक लेखन करणे .

Leave a comment