-नयना पिकळे 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Remembering Vasant Desai, one of the finest music director of hindi cinema  बहुतांशी हिन्दी फिल्मी गीतांवर प्रामुख्याने उर्दू भाषेचा प्रभाव जाणवत राहतो . पण आपल्या शुद्ध हिन्दी भाषेच्या वापराने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे काही गीतकार संगीतकार देखील हिन्दी सिनेसृष्टीला लाभले. अशी चटकन आठवणारी एक प्रसिद्ध जोडी म्हणजे गीतकार भरत व्यास आणि संगीतकार वसंत देसाई (Music Director Vasant Desai). गीतकार भरत व्यास ह्यांच्या हिन्दी भाषेवरील जबरदस्त प्रभुत्व सिद्ध करणाऱ्या अतिशय लोभस सात्विक हिन्दी रचना आणि त्यांना साजेशा शास्त्रीय चालींनी अलंकृत करणारे संगीतकार वसंत देसाई. 

दोघेही भारतीय संस्कृतीचे चाहते आणि शास्त्रीय संगीताचा आवर्जून आग्रह धरणारे ….
आणि म्हणूनच दोघांचे सूर चांगलेच जुळले …..
दोघे जणू एकमेकांसाठीच बनले होते .

भरत व्यास आणि वसंत देसाई ह्यांचा स्वत:चा असा खास वेगळा ठसा गाण्यांवर असतो की कोणताही संगीतप्रेमी गाणी ऐकून सहज ओळखू शकतो की हे अमुक अमुक गाणं भरत व्यास आणि वसंत देसाई खेरीज दुसऱ्या कुणाचं असूच शकत नाही .

उदाहरणार्थ …..
“निर्बल से लडाई बलवान की” – तुफान और दिया (१९५६)
“मै गाऊ तू चूप हो जा” – दो आँखे बारह हाथ (१९५७ )
“हौले हौले घुंघट पट खोले” – गुंज उठी शहनाई (१९५९)
“कल्पना के घन बरसते” – अमर ज्योती (१९६७)

ही आणि अशी अनेक गाणी दोघांनी कायमची रसिकांच्या मनावर कोरून ठेवली आहेत . यातील अनेक चित्रपट दुय्यम अभिनेता अभिनेत्री असणारे पौराणिक किंवा B ग्रेड होते . तरीही ह्या गाण्यांची अवीट गोडी मात्र आजही टिकून आहे हे विशेष .

तर असे हे वसंत देसाई ….. त्यांचा जन्म कोकणातील कुडाळ येथील सोनवड गावात १९१२ साली ९ जून रोजी झाला . संगीताची आवड असल्यामुळे नाटकातून कामे करणे , हर्मोनियम वाजवणे ह्यामुळे संगीताशी त्यांचा लहानपणापासूनच परिचय होता. पुढे कोल्हापुरात त्यांची व्ही. शांताराम ह्यांच्याशी ओळख झाली ज्याचे रुपांतर जीवश्च कंठश्च मैत्रीत झाले जे अगदी शेवटपर्यंत टिकले. त्या वेळी व्ही. शांताराम यांनी प्रभात फिल्म्सची स्थापना केलेली होती . व्ही. शांतारामनी सुरुवातीला वसंत देसाईंना काही दिवस प्रभात मध्ये शिपायाची नोकरी दिली खरी पण वसंत देसाईंची संगीताची , नाटकांची आवड पाहून त्यांना एका मूकपटात भूमिका देऊ केली. सुरुवातीच्या काही चित्रपटात वसंत देसाईंनी गाणी देखील म्हटली आहेत .

१९३२ मध्ये आलेल्या “अयोध्येचा राजा” या प्रभात फिल्म्सच्या पहिल्या बोलपटात वसंत देसाईंनी एक नांदी म्हटली आहे .१९३९ मध्ये व्ही. शांताराम यांनी आदमी (मराठी चित्रपट “माणूस” चा हिंदी रिमेक) काढला तेव्हा आधी त्यांनी वसंत देसाईंना नायकाची भूमिका द्यायचे ठरविले होते …पण वसंत देसाईंच दुर्दैव म्हणा किंवा आपलं सुदैव म्हणा , ती भूमिका शाहू मोडक यांना मिळाली आणि अंगापिंडाने तगडे आणि देखणे वसंत देसाई हिरो होता होता राहिले.

वसंत देसाईंचे संगीतावरचे प्रेम पाहून प्रभातचे त्या काळचे मुख्य संगीतकार गोविंदराव टेंबे यांनी वसंत देसाईना आपले सहाय्यक म्हणून घेतले आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले …..हळू हळू वसंत देसाई प्रभात फिल्म्स मध्ये एवढे रमले की व्ही. शांताराम खालोखाल किंवा त्यांच्या एवढेच प्रभात फिल्म्सचे ते आधार स्तंभ होते म्हटले तर वावगं ठरू नये .
पण प्रभात फिल्म्स पेक्षा वसंत देसाईंची बांधिलकी व्ही. शांताराम यांच्याशी होती .
कारण १९४२ मध्ये जेव्हा व्ही. शांताराम यांनी प्रभात फिल्म्स सोडून राजकमल संस्थेची स्थापना केली तेव्हा वसंत देसाई देखील प्रभात सोडून व्ही. शांताराम कडे आले .

 

राजकमल मध्ये १९४३ सालच्या “शकुंतला” चित्रपटासाठी त्यांनी स्वतंत्र रित्या सर्व प्रथम संगीत दिले आणि त्यानंतर डॉ कोटणीस की अमर कहानी , अमर भूपाळी (मराठी चित्रपट) , झनक झनक पायाल बाजे , तुफान और दिया , अशी त्यांची गाडी सुसाट वेगाने धावू लागली . मास्टर विनायकांच्या घरी वसंत देसाईंची लता मंगेशकरशी पहिल्यांदा ओळख झाली .
१९४५ सालच्या “बडी माँ” मधलं “माता तेरी चरणो में” हे लताच हिंदी चित्रपटातील पाहिलं गाणं मानलं जातं . पण या गाण्यात लता बरोबर चित्रपटात भूमिका करणाऱ्या ईश्वरलाल यांचा आवाज देखील आहे.

१९४६ मधील “जीवन यात्रा” चित्रपटातील बालगीत
“चिडिया बोले चूं चूं चूं
मैना बोले हुं हुं हुं”

हे लताने म्हटलेलं हिंदी चित्रपटातील दुसरं गीत आणि एकटीने (सोलो) म्हटलेलं पाहिलं गीत म्हणून ओळखलं जातं …. तर लताच्या ह्या पहिल्या सोलो हिंदी चित्रपटातील गीताला संगीत द्यायचा मान वसंत देसाईंनाच जातो .

त्यावेळी काहीशा बालिश भोळ्या पद्धतीने गाणं गाणारी ही मुलगी पुढे भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवणार आहे हे कुणाला खरं वाटल नसत. वसंत देसाईंना मात्र तेव्हाच लताच्या आवाजाचा पोत आणि गाण्याची पट्टी ऐकून लता ही नक्की काय चीज आहे आणि तिची भरारी कुठवर असणार आहे याचा तेव्हाच अंदाज आला असावा. कारण गायिकेच्या बाबतीत वसंत देसाईंच पारड नेहेमीच लताच्या बाजूने झुकेलेलं असे .

मध्यंतरी ६० च्या दशकाच्या सुरुवातीला काही काळ जेव्हा रफी आणि लता मध्ये गाण्यांच्या Royalty Issue वरून वितुष्ट आल होतं तेव्हा अनेक संगीतकारांनी नाईलाजाने रफी बरोबर युगल गीते गायला आशा भोसले किंवा सुमन कल्याणपूर च्या आवाजाचा वापर केला. पण वसंत देसाईं मात्र अशा वेळी देखील लताच्या बाजूने खंबीर पणे उभे राहिले . रफी ऐवजी तलत महमूद , मन्नाडे आणि महेंद्र कपूर यांच्या आवाज त्यांनी वापरला पण लताला अंतर दिलं नाही.
कारण त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यातील असंख्य नाजूक आणि अवघड जागा लता ज्या सहजतेने आणि सामर्थ्याने गाऊ शकते ती सहजता इतर कोणातंच नाही असं त्यांचं स्पष्ट प्रामाणिक मत होतं.

व्ही. शांताराम बरोबर असलेली वसंत देसाईची बांधिलकी एका बाजूने त्यांच्या कारकिर्दीसाठी जरी मारक ठरली (कारण इतर ठिकाणी खूप कमी गेले ते) तरी दुसरीकडे त्यांना त्यांच्या कलाविष्काराला पूर्ण वाव देणारी , मोकळीक देणारी ठरली . दोघांनी मिळून जवळ जवळ २५ वर्षे उत्कृष्ट संगीत दिले. वसंत देसाई यांच सर्वाधिक लोकप्रिय गाणी जरी व्ही. शांताराम यांच्या चित्रपटात ऐकायला मिळाली असली तरी त्या व्यतिरिक्त देखील वसंत देसाईंनी काही चित्रपटातून संगीत दिले आणि ती गाणी सुद्धा तेवढीच गाजली.

जसे की “गुंज उठी शहनाई” आणि “गुड्डी” चित्रपटांच्या सर्वच गाण्यांना अफाट लोकप्रियता मिळाली.
त्याचप्रमाणे खालील चित्रपट जरी जास्त चालले नाहीत पण त्यातील काही गाणी मात्र आजही रसिकांच्या स्मरणात आहेत , जशी की …..

“तडप तडप के कटी उम्र आशियाने में” – दो फूल (१९५८)
“ओ दिलदार बोलो इक बार क्या मेरा प्यार पसंद है तुम्हें” – स्कूल मास्टर (१९५९)
“टीम टीम टीम तारों के दीप जले” – मौसी (१९५८)
“तेरा खत लेके सनम पाँव कही रखते है हम” – अर्धांगिनी (१९५९)

त्यांनी सिने संगीतात अनेक आगळे वेगळे प्रयोग यशस्वी रित्या केले आहेत.
१९४४ मधीत “पर्बत का डेरा” मध्ये जोहरा बाई अम्बालेवाली यांनी गायलेल्या “जो दर्द बनके जमाने पे” या गाण्यात वसंत देसाईनी हिंदी संगीतात सर्वप्रथम echo effect वापरला .
तसच “डॉ कोटणीस की अमर कहानी” मध्ये जयश्री यांच्या आवाजात (व्ही शांताराम यांची पहिली पत्नी) एक चायनीज धाटणीच गाणं “मै हुं प्यारी नयी दुल्हन” रसिकांना दिलं .
“रेल गाडी झुक झुक झुक झुक” – आशीर्वाद (१९६८) अशोक कुमारच्या आवाजातील एक अनोखा बाज असलेलं , हिंदी सिनेमातील पाहिलं rap song म्हणून ओळखलं जाणार गाणं आपल्याला दिलं .

तसच छोटे मोहक आलाप आणि संगीतात पार्श्वभूमीवरील परिणामकारक कोरस ही त्यांची खासियत होती .
“ऐ मलिक तेरे बंदे हम” – दो आंखे बारह हाथ (१९५७) यातील रोमांचित करणारा कोरस आणि
“तेरे सूर और मेरे गीत” – गुंज उठी शहनाई (१९५९) आणि
“बोले रे पपीहरा” – गुड्डी (१९७१) मधील विलोभनीय आलाप.

शास्त्रीय संगीत आणि लोकगीतांवर भर देताना वसंत देसाईंनी …..
संतूर , तबला , ढोलक , शहनाई , बासुरी , सितार आणि अन्य वैशिष्ट्य पूर्ण वाद्यांच्या नेहेमीच अतिशय कलात्मक आणि प्रभावी वापर केला ….

“तेरी शहनाई बोले सून के जिया मोरा डोले” – गुंज उठी शहनाई (१९५९) मधील उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचे प्रसिद्ध शहनाई वादन ,
“हो उमड घुमड कर आयी रे घटा” – दो आँखे बारह हाथ (१९५७) ड्रम आणि एकताऱ्याचा अप्रतिम वापर .
“सैंय्या झुठो का बडा सरताज निकला” – दो आँखे बारह हाथ (१९५७) मध्ये रावण हत्ता ह्या अनोख्या वाद्यप्रकाराचा प्रभावी वापर
“नैन सो नैन नाही मिलावो” – झनक झनक पायल बाजे (१९५५) संतूर चा उत्कृष्ट उपयोग.

“झनक झनक पायल बाजे” च संगीत तर एवढं लोकप्रिय झालं की त्याकाळी फक्त चित्रपटातील नृत्य आणि गाण्याच्या वेगळ्या रेकॉर्ड्स HMV ने काढल्या होत्या .
ह्या चित्रपटासाठी वसंत देसाईंनी प्रचंड मेहनत घेतली होती …. त्यांनी संपूर्ण भारत भर फिरून वेगवेगळ्या प्रांतातील लोकगीते आणि वाद्यांचा अभ्यास केला .
देशभरातील विविध प्रतिभावान वाद्य वाजविणाऱ्यांना एकत्रित करून मुंबईत आणले होते .
काश्मीरहून प्रसिद्ध संतूर वादक शिवकुमार शर्मा , बनारसचे तबला वादक समताप्रसाद , कलकत्त्याहून खोळ हे तेथील लोकप्रिय वाद्य वाजविणारे सुदर्शन जी …..

ह्या साऱ्याचा परिणाम म्हणूनच “झनक झनक पायल बाजे” ची गाणी अफाट लोकप्रिय झाली … प्रत्येक गाणं म्हणजे संग्रही ठेवण्यासारखं उत्कृष्ट पैलू पाडलेलं एक अनमोल रत्नंच जणू …..
१) “ऋतू बसंत आयी” – लता आणि मन्ना डे यांची जुगलबंदी असलेलं हे गीत म्हणजे एक अत्युत्कृष्ट रागमाला आहे आणि यात यमन , बसंत बहार , मेघ मल्हार , पहाडी आणि खमाज रागांचा अप्रतिम वापर केलेला आहे .
२) “मेरे ऐ दिल बता” – राग भैरवी
३) “मुरली मनोहर कृष्ण मुरारी” – राग भैरवी
४) “नैन सो नैन नाही मिलाओ” – राग मालगुंजी
५) “जो तुम तोडो पिया” – राग भैरवी
६) “सैय्या जाओ जाओ मोसे न बोलो” – राग देस
७) “झनक झनक पायल बाजे” – राग अडाणा

या व्यतिरिक्त इतर चित्रपटातूनही कितीतरी रागाधारित सुरेख गीते त्यांनी दिली आहेत ….
“पिया ते कहाँ गयो” राग आसावरी (तुफान और दिया) -१९५६
“कल्पना के घन बरसते” – अमर ज्योती (१९६७) मधील रूपक ताला वरील हे गीत
“बडे भोले हो” – अर्धांगिनी (१९५९) राग यमन कल्याण
“बादलो बरसो नयन की कोर से” – संपूर्ण रामायण (१९६१) राग मल्हार
“रैन भयी सो जा रे पंछी” – राम राज्य (१९६७) राग भीमपलासी

उत्कृष्ट आणि दर्जेदार संगीत देणाऱ्या वसंत देसाईंनी परछाई (१९५२) , नवरंग (१९५९) , सेहरा (१९६३) , गीत गाया पत्थरोने (१९६४) आणि गुड्डी (१९७१) सारख्या काही चित्रपटांना पार्श्वसंगीतही दिलेले आहे .
सदैव शास्त्रीय संगीत आणि भारतीय लोकगीतांचा आग्रह धरणारे आणि आपल्या तत्वांमध्ये कोणतीही तडजोड न करता अतिशय दर्जेदार आणि लोकप्रिय संगीत देणारे वसंत देसाई खरंच एक महान संगीतकार होते .

उत्तम आरोग्य असलेल्या आणि कोणतंही व्यसन नसलेल्या वसंत देसाईंचा एक संगीत कार्यक्रम करून परतताना स्वतःच्याच बिल्डींगच्या लिफ्ट च्या अपघातात १९७५ साली २२ डिसेंबर म्हणजे आजच्याच दिवशी वयाच्या ६३ व्या वर्षी अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला …..

आज ते नसले तरी त्यांनी संगीत दिलेली असंख्य गाणी मात्र कायम सिने रसिकांच्या स्मृतीत राहतील .

हिंदी सिनेमाच्या अशाच जुन्या जमान्यातील गोल्डन इरा काळातील अधिक लेखांसाठी क्लिक करा

 

Nayana Pikle
+ posts

सौ नयना सतीश पिकळे

शिक्षण -
बी एस्सी रसायनशास्त्र
एम ए संस्कृत (वेदांत)
मोबाईल - ९९६७०५३९६७

एच एस बी सी बॅन्केत नोकरी (१९९२-२००३)

बी ए संस्कृतच्या खाजगी शिकवण्या .

मराठी विश्वकोशासाठी नोंदी करणे .

यशोवाणी संस्थेतर्फे अंध मुलांसाठी आॅडियो बुक्सचे रेकाॅर्डींग करणे .

सांगितिक कार्यक्रमांसाठी स्क्रीप्ट लिहिणे आणि निवेदन करणे.

सिने-संगीत व सिनेमा विषयक लेखन करणे .

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.