-©विवेक पुणतांबेकर.

दर वर्षी ९ जुलै आली की गुरु दत्त (Actor Director Guru Dutt) ची आठवण हमखास येते. ९ जुलै १९२५ रोजी गुरु दत्त यांचा जन्म झाला.  त्या गुरूदत्त यांच्या आठवणीना उजाळा द्यायचा हा लहानसा प्रयत्न. (Remembering Iconic Director of Hindi Cinema Guru Dutt known for his classic films) 

शिवशंकर आणि वासंती पदुकोन यांचा विवाह झाला तेव्हा वासंती फक्त १२ वर्षाच्या होत्या. त्यांचे पहिले आपत्य गुरुदत्त. लहानपणापासून अतिशय जिद्दी, अभ्यासात हुशार पण एकदा एखादी गोष्ट डोक्यात आली, की पुर्ण केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. नाचाची अतिशय आवड होती. त्यांचे आईवडील शिक्षक. नोकरीच्या निमित्ताने १९३० ते १९४३ कलकत्त्याला रहात होते. साहजिकच बंगाली संगीत आणि बंगाली समाजाचा संस्कार याचा प्रभाव गुरूदत्त वर पडला. मँट्रिक झाल्यावर एका खाजगी कंपनीत काही काळ टेलिफोन ऑपरेटर म्हणून त्यांनी नौकरी केली. त्याच वेळी स्कॉलरशिप मिळाल्याने उदय शंकर अँकँडमित नाच शिकायला प्रवेश घेतला. नाचाची पदवी घेतली. पुण्याच्या प्रभात फिल्म कंपनीत डांस डायरेक्टर म्हणून नोकरी स्विकारली. पगार होता महिना ३५ रुपये.

त्यांचे रुम पार्टनर होते देव आनंद. ते प्रभात मधे हिरो होते. त्यांचा पगार होता महिना ७५ रुपये. या दोघांची मैत्री जमली. दोघे एकाच सायकलवरून स्टुडियोत येत. लाखाराणी सिनेमात गुरू दत्त एका भुमिकेत प्रथम पडद्यावर आले. यात एका गाण्यात ते नाचले होते. यानंतर प्रभात चा सिनेमा आला हम एक है. यात हिरो देव आनंद आणि डान्स डायरेक्टर गुरु दत्त होते. इथेच त्यांची मैत्री रहमान बरोबर झाली. प्रभात मधे असताना गुरू दत्त विजया देसाई या अभिनेत्रीच्या प्रेमात पडले. तिला लग्नाची मागणी घालायला तिच्या घरी गेल्यावर तिच्या घरच्यांनी अपमानित करुन गुरू दत्त ना हाकलून दिले. कालांतराने विजया देसाईंना पश्चाताप झाला कारण गुरू दत्त एक नामवंत दिग्दर्शक बनले होते. विजया देसाईंनी गुरु दत्त ची पत्रे शेवट पर्यंत जपून ठेवली होती.

प्रभात सोडतानाच देव आनंद नी गुरू दत्त ना वचन दिले की मी सिनेमा निर्माता बनलो की दिग्दर्शन तू करायचे. मधल्या काळात अमिया चक्रवर्ती, ग्यान मुखर्जी या दिगदर्शकांकडे गुरुदत्त सहाय्यक म्हणून काम करु लागले. १९५१ साली नवकेतन बँनर ने बाझी हा रहस्यमय सिनेमा निर्माण केला ज्याचे दिग्दर्शन गुरू दत्त नी केले. आगळी वेगळी कथा , सचिन देव बर्मन यांचे मधुर संगीत यामुळे बाझी तुफान चालला आणि फिल्म इंडस्ट्री ला गुरु दत्त हा हुशार दिग्दर्शक मिळाला. बाझी च्या वेळी गीता रॉय बरोबर गुरू दत्त चे सूर जुळले आणि दोघांनी लग्न केले. बाझी चे फोटोग्राफर होते व्ही.के.मुर्ती. त्याची फोटोग्राफी गुरू दत्त ना खूप  आवडली .तिथेच त्यांनी सांगितले या पुढे तूच माझा फोटोग्राफर असशील. बाझी च्या यशानंतर गुरुदत्त नी बाझ हा स्वातंत्र्य लढ्यावर आधारलेला सिनेमा आपल्या गुरूदत्त फिल्म बँनर खाली निर्माण केला. बाझी पासून गीताबाली बरोबर सूर जुळल्यामुळे तिला नायिकेचा रोल दिला. संगीतकार  ओ.पी. नय्यर आणि गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना घेऊन शुटिंग सुरु केले. मजरूह सुलतानपुरींच्या ओळखीने लेखक अब्रार अल्वी सेटवर आले. घरी कोकणी बोलत असल्याने उर्दू बोलणे कठीण जात असे. यामुळेच गुरू दत्त नेहमी मजरूह चा सल्ला घेत. एका सीन वर अब्रार नी टिप्पणी केली. गुरु दत्त त्या वेळी काहीच बोलले नाहीत. पण मनात त्यांनी ठरवले की पुढचा सिनेमा अब्रार कडूनच लिहून घ्यायचा. बाझ प्रेक्षकांना आवडला नाही. गुरू दत्त कर्जबाजारी झाले. त्यामुळे ओ.पी. नय्यर यांच्या मानधनातले पाच हजार रूपये येणे बाकी राहिले.

ओ.पी. कपूर नावाचे फायनान्सर होते त्यांना ही गोष्ट समजली. ते ओ.पी. नय्यर ना घेऊन गुरूदत्त कडे गेले. संगीतकार म्हणून ओ.पी. कसे वाटले ?? गुरु दत्त ना विचारले. गुरू दत्त म्हणाले वादच नाही पण सिनेमा चालला नाही.. कपूरनी सांगितले दुसरा सिनेमा काढ मी फायनान्स देतो. ओ.पी. नय्यर ना संगीतकार म्हणून घे आणि दहा हजार अँडव्हास देतो त्यातून नय्यर चे बाकी पैसे दे. गुरु दत्त तयार झाले. अब्रार अल्वीच्या कथेवर रहस्यमय सिनेमा निर्माण करायला घेतला आर पार. एके दिवशी ओ.पी. नय्यर ना बरोबर घेऊन रिदम हाऊस ला गेले. पाश्चात्य गायक बिंग क्रॉसबी च्या रेकॉर्डस् खरेदी केल्या आणि त्याच चाली वापरून संगीत द्यायला सांगितले. मजरूह सुलतानपुरी नी वेगळ्या ढंगाने गाणी लिहीली. सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपर हिट झाला. गुरु दत्त श्यामा यांचा अभिनय सरस होताच पण गुरु दत्त चे दिग्दर्शन , अब्रार चे मुंबई स्टाईल चे संवाद यामुळेच हा सिनेमा अविस्मरणीय ठरला. आर पार च्या यशानंतर गुरु दत्त नी मिस्टर अँंड मिसेस ५५ हा सामाजिक विनोदी सिनेमा निर्माण केला. सुरवातीला नायिकेचा रोल वैजयंतीमाला ला ऑफर केला होता. पण तिने नाकारता. २०११ साली एका मुलाखतीत तिने कबुली दिली की रोल नाकारून मुर्खपणा केला. मग हा रोल मधुबाला ने केला. मधुबाला , गुरुदत्त आणि ललिता पवार यांच्या सुंदर अभिनयाने हा सिनेमा यादगार झाला.

यात नायक व्यंगचित्रकार दाखवला होता आणि ती व्यंगचित्रे नामवंत व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनी काढली होती. ओ.पी. नय्यर यांचे मधुर संगीत या सिनेमात होते. यातले एक गाणे प्रीतम आन मिलो ओ.पी. नय्यर ची पत्नी सरोज ने लिहिले होते. बॉक्स ऑफिस वर हा सिनेमा यशस्वी झाला. प्यासा चा विषय गुरुदत्त च्या डोक्यात अनेक वर्ष होता. आपल्या प्रभात फिल्म कंपनीतल्या अनुभवावर त्याने एका चित्रकाराची गोष्ट लिहीली होती कश्मकश. ती त्यांनी आपला मित्र साहिर ला दाखवली. साहिर नी एक सुधारणा केली. चित्रकाराऐवजी नायक कवी दाखवला. प्यासा हे नाव साहिर नी सुचवले. तेलगू सिनेमा मिसी अम्मा गुरुदत्त नी हिंदीत करावा असा वितरकांचा आग्रह होता म्हणून गुरू दत्त आपल्या साथीदारासह हैद्राबादला गेले तिथे त्यांनी मिसी अम्मा पाहिला पण त्यांना आवडला नाही. (नंतर तोच सिनेमा मिस मेरी नावाने ए.व्ही.एम ने काढला.)

तिथेच त्यांची भेट रोजरू मलाई या लोकप्रिय  सिनेमात काम केलेल्या वहिदा रहमान बरोबर झाली. काही महिन्याने तिला मुंबई ला गुरु दत्त नी बोलावून घेतले. त्याच वेळेस इंदर राज आनंद यांच्या सी.आय.डी. कथेवर सिनेमा निर्माण करायचा गुरु दत्त ने निर्णय घेतला. देव आनंद, शकीला आणि वहिदा रहमान ला निवडले. दिग्दर्शन मात्र आपला शिष्य राज खोसलाकडे सोपवले. ओ.पी.नय्यर ने मधुर संगीत दिले. त्याची ‘लेके पहला पहला प्यार’ ची चाल जी अनेकांनी नाकारली होती ऐकता क्षणीच गुरूदत्त ने संमंत केली. हे गाणे सिनेमाचे मुख्य आकर्षण ठरले. गुन्हेगारी वातावरण हुबेहुब दाखवण्यासाठी गुरुदत्त स्वतः आपल्या इन्स्पेक्टर मित्राच्या सहाय्याने लँमिंग्टन रोड पोलीस स्टेशन च्या लॉकअप मधे चार दिवस राहिले. त्यांनी केलेल्या निरिक्षणामुळे तसेच वातावरण सी.आय.डी. त दाखवले गेले. याच वेळी प्यासा सिनेमा पण सेटवर नेला. प्यासा त साहिर च्या तहलखिया या काव्यसंग्रहातल्या रचनानां संगीतकार एस.डी बर्मन नी अप्रतिम चाली रचल्या. दिलिप कुमार ना प्रमुख भुमिकेसाठी निवडून पटकथा लिहीली पण त्यांनी अटी घालायला सुरुवात केली. मानधन दिड लाख मागितले. गुरू दत्त एक लाख द्यायला तयार झाले. नायिकेच्या भुमिकेत मधुबाला, संगीतकार नौशाद अश्या अनेक अटी सांगितल्या. गुरु दत्त ना अटी पसंत नव्हत्या. शेवटी दिलिप कुमार तयार झाले पण शुटींगला आलेच नाहीत. गुरूदत्त नी संध्याकाळ पर्यंत वाट पाहिली शेवटी स्वतः मेकअप करुन कँमेरा समोर उभे राहिले. (प्यासा चा प्रिमीयर शो पहाताना दिलिप कुमार पस्तावले एक अविस्मरणीय भुमिका निसटली)

प्यासातले ‘जिन्हे नाझ है हिंदपर’ गाणे रेडलाईट एरियात शूट करायचे होते. त्या साठी टेलीफोटो लेन्स वापरली गेली. मनासारखा झाला नाही म्हणून सत्तर टक्के प्यासा गुरूदत्त नी रिशूट केला. वितरक नाराज झाले. पण गुरूदत्त नी त्यांना सांगितले की आधी सी.आय.डी.पुर्ण करतो त्यात तुमचे पैसे वसूल होतील. सी.आय.डी रिलीज झाला, सिल्वर ज्युबिली झाल्यावर मगच प्यासा रिलीज झाला. एस.डी.बर्मन आणि साहिर ही जोडी मात्र प्यासा नंतर साहिर च्या ईगो मुळे कायमची फुटली. प्यासा यशस्वी झाला. गुरुदत्त नी डाव जिंकला. लहरी गुरूदत्त नी अनेक सिनेमे अर्धवट सोडले त्यात सैलाब, ढंढोरा, राज, ( हा नंतर राज खोसलाने वह कौन थी नावाने काढला) नीलकमल आणि गौरी यांचा समावेश होता. फायनान्सर ची नाराजी दूर करायला अब्रार अल्वी च्या कथेवर ‘कागज के फूल’ लॉंच केला. गौरी च्या वेळी वापरलेले सिनेमास्कोप तंत्र वापरायला ट्वेंन्थिएट फॉक्स सेंच्युरी कडून लायसन्स घेतले. अशोक कुमार ना प्रमुख भुमिकेसाठी निवडले पण तारखा जुळेनात. अनेकांचा गैरसमज आहे की हा दिगदर्शक आणि नायिकेच्या संबंधावर आधारित सिनेमा गुरू दत्त च्या जीवनावरचा आहे. तसे नाही. महेश कौल आणि वीणा यांच्या संबंधावर आहे. महेश कौल ना प्रमुख भुमिका ऑफर केली पण त्यांनी नाकारली. पण सुरेश सिन्हाचे सासरे सर बी.बी.रॉय चा रोल स्वीकारला. मुळात हा सिनेमा दिग्दर्शक आणि त्याची पत्नी यांच्या संबंधावर आधारित होता.

शशिकला ला दिग्दर्शकाच्या पत्नीचा रोल दिला. ९ दिवसाचे शूटींग झाले. एके दिवशी गीता दत्त सेटवर आली. रागाने तिने थयथयाट केला कारण शशिकलाचा गेटअप गीतासारखा होता. नाईलाजाने गुरुदत्त ला कथा बदलावी लागली. ‘वक्त ने किया’ गाण्यात पँरलल बीम इफेक्ट व्ही.के. मुर्ति ने अतिशय परिणामकारक साधला. कैफी आझमीच्या अप्रतिम गीतामुळे शेवट बदलून गुरूदत्त नी दिग्दर्शकाचा दाखवलेला अंत ह्रदयस्पर्शी होता. आज ज्याला सर्वोत्तम क्लासिक सिनेमा मानतात तो कागज के फूल प्रेक्षकांनी इतका झिडकारला की ब्रॉडवे सिनेमात तिन दिवसानी दुसरा सिनेमा लावला. कागज के फूल च्या अपयशाने गुरूदत्त नैराश्यात गेले. या पुढे आपण दिग्दर्शन करायचे नाही असे गुरुदत्त नी ठरवले. मुस्लिम जीवनावरचा चौदवी का चांद दिगदर्शित करायला एम.सादिक ना बोलावले. संगीतकार रवि आणि गीतकार शकील ना पहिल्यांदाच गुरुदत्त फिल्मस मधे बोलावले. रवि ने आपल्या करियरमध्ये सर्वोत्तम संगीत चौदवी का चांद ला दिले. दिग्दर्शन जरी एम. सादिक नी केले तरी गाणी गुरुदत्तनी शूट केली.

तंग आर्थिक स्थिती मुळे मुगले आझम चे सेट उसने आणून शूटींग केले. गुरुदत्त, वहिदा, रहमान, जॉनी वॉकर यांच्या सरस अभिनयाने सजलेला हा सिनेमा विकला जात नव्हता कारण हिंदू मुस्लिम तणाव खूप होता. शेवटी हा सिनेमा कमिशन बेसीस वर विकला. देशभर हा सिनेमा तुफान धंदा करून गेला. यातल्या दिल की कहानी रंग लायी है या मिनू मुमताज च्या गाण्यावर मुंबईतील इंपेरियल थिएटरमधले प्रेक्षक इतके बेभान झाले की पैसे उधळून थिएटर चा पडदा फाटला. बिमल मित्रा ची साहब बिबी गुलाम ही कादंबरी बंगालीत खुप गाजली. त्यावर बंगाली सिनेमा तयार झाला ज्यात उत्तम कुमार आणि सुमित्रादेवी ने अभिनय केला. यावर हिंदीत ‘साहिब बिबी और गुलाम’ सिनेमा गुरुदत्त नी तयार करायला घेतला. दिग्दर्शन अब्रार अल्वीकडे सोपवले. मीना कुमारी बरोबर करार करताना तिने एक वर्षभर तंगवून तारखा देताना अट घातली शूटींग सीन बाय सीन करायचे. मीना कुमारी ची अट गुरुदत्त नी मान्य केली. मुंबई कायमची सोडून चाललेल्या हेमंतकुमार ना रोकले. संगीत त्यांना द्यायला सांगितले. कलकत्त्याजवळ एका हवेलीत हा सुंदर सिनेमा शूट झाला. रिलिज झाल्यावर आधी चालला नाही. पण ऑस्कर ला पाठवल्यावर जबरदस्त चालला.

ऑस्कर मिळू शकले नाही. घरचे वातावरण बिघडत चालले. वहिदा गुरु दत्त फिल्मस सोडून गेली. बहारे फिर भी आयेगी सुरू केला. परत एकदा ओ.पी. नय्यर गुरु दत्त जोडी जमली. १०ऑक्टोबर १९६४ च्या रात्री नैराश्याचा झटका आला. झोपेच्या गोळ्या खाऊन गुरू दत्त या जगातून गेले. हतबल झालेली गीता दत्त २० जुलै १९७२ ला गेली. मोठा मुलगा वरूणने पण आत्महत्या केली. पाच वर्षापूर्वी धाकटा मुलगा तरुण गेला. त्यांचे जवळजवळ सगळे सहकारी काळाच्या पडद्याआड गेले. उरल्या त्या फक्त आठवणी 

हेही वाचा – दिलीप कुमार … अभिनयाचा अखेरचा मुगल सम्राट गेला… 

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment