-© नयना पिकळे 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Remembering the finest actress, popularly known as the Tragedy Queen, Meena Kumari on her birth anniversary. महजबीन बानो म्हणजेच आपल्या सर्वांना माहीत असलेली मीनाकुमारी हिन्दी सिनेसृष्टीतील अतिशय मोजक्या सर्वोत्कृष्ट प्रथितयश अभिनेत्रीपैकी एक. गोबरे गाल, लोभस चेहरा, चाफेकळीसारखं नाक आणि डोळ्यात अतिशय गोड लाजरी मिश्किल छटा .. अरेच्चा काही चुकतय का लिहिताना ? ट्रॅजडी क्वीन मीनाकुमारीचे डोळे असे गोड मिश्किल छटा वगैरे असलेले कसे असू शकतात ? ते तर कारुण्याने काठोकाठ भरलेले, मूकपणे एखाद्याला आपली व्यथा सांगणारेच हवेत ना ? .. पण नाही .. विश्वास बसत नाहीये? तर मग तिचा  शम्मी कपूर सोबतचा मेमसाहीब-१९५६, किशोर कुमार बरोबरचे नया अंदाज-१९५६ आणि शरारत-१९५९, जेमिनी गणेशन (म्हणजे आपल्या रेखाचे वडील) सोबतचा मिस मेरी-१९५७ आणि  दिलीप कुमार सोबतचे आझाद-१९५५ आणि कोहिनूर-१९६० हे चित्रपट एकदा तरी बघाच. कारण तुम्ही ट्रॅजेडी क्वीन म्हणून जिच्या अभिनयाची वाखाणणी करता ना तिचं हे अवखळ चंचल मनमोहक रूप आणि हलका फुलका अभिनय देखील मंत्रमुग्ध करणारा तिच्या प्रेमात पाडणारा असाच आहे ..

अर्थात कारण हा अभिनयाचा वारसा तिला आई आणि वडील दोन्ही बाजूने मिळाला होता .. मीनाकुमारीच्या आईचं मूळ नाव होतं प्रभावती देवी. प्रभावती देवीनी अलीबक्ष नावाच्या पारशी रंगभूमीशी संबंधित असलेल्या हार्मोनियम वादकाशी विवाह केला आणि त्या इक्बाल बानो झाल्या. ह्या प्रभावती देवीच्या आई हेमसुंदरी गुरुदेव रविंद्रनाथ टागोर ह्यांची पुतणी होत्या आणि त्या देखील एक उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना होत्या .. तर मग घराण्याचा असा उज्वल इतिहास असणाऱ्या महजबिन बानो म्हणजेच मीनाकुमारीच्या रक्तात अभिनय भिनलेला नसला तरच नवल ….

अगदी लहान म्हणजे अवघी सहा वर्षांची असताना विजय भट्ट ह्यांच्या लेदरफेस-१९३९ नावाच्या चित्रपटात बाल कलाकार म्हणून मीनाकुमारीने काम केलं आणि त्या दिवशी हिन्दी सिनेसृष्टीला एक असं अमूल्य रत्न मिळालं ज्याच्या तेजाने आजही सगळ्यांच्या नजरा दिपून जात आहेत. लेदरफेस चित्रपटानंतर अधुरी कहानी-१९३९, पूजा-१९४० अशा सुरुवातीच्या काही चित्रपटांतून तिने महजबीन याच नावाने भूमिका केल्या आणि नंतर एक ही भूल-१९४०, गरीब-१९४२, प्रतिज्ञा-१९४३, लाल हवेली-१९४४ वगैरे चित्रपटात मात्र ती बेबी मीना ह्या नावाने ओळखली जाऊ लागली .

अशातच प्रकाशित झाला विजय भट्ट ह्यांचा बैजू बावरा-१९५२ चित्रपट. कथा संगीत आणि अभिनय सर्वांचाच उत्कृष्ट त्रिवेणी संगम असलेल्या ह्या चित्रपटामूळे मीनाकुमारी नावाच्या अमूल्य रत्नाला तिच्या तोलामोलाचं कोंदण मिळालं  .. बैजू बावरा तिचा पहीला गाजलेला चित्रपट ठरला आणि ती फिल्म फ़ेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराची मानकरी ठरली ..

लागोपाठ बिमलदांच्या परिणीता-१९५३ (नायक त्या काळचा सुपरस्टार अशोक कुमार) या चित्रपटासाठीही तिला फिल्मफेअर मिळालं. त्याच सुमारास प्रकाशित झालेला फुटपाथ हा ट्रॅजडी किंग दिलीपकुमार सोबतचा तिचा पहीला चित्रपट. बिमलदांचाच दो बिघा जमीन-१९५३ हा हा ठरला पाहुणी कलाकार म्हणून मीनाकुमारीचा पहीला चित्रपट (ह्याला देखील Cannes International Award मिळालं) हयात तिच्या वाट्याला “आ जा री आ निंदिया तू आ” हे अतिशय सुरेख अंगाई गीत आलेलं आहे. आणि अशाप्रकारे मीनकुमारीची यशस्वी घोडदौड सुरू झाली.

बैजू बावरा, परिणीता आणि दो बिघा जमीन हे चित्रपट तर गाजलेच पण ह्या व्यतिरिक्त  हलाकू-१९५६, शारदा-१९५७, यहुदी-१९५८, चार दिल चार राहें–१९५९, चिराग कहाँ रोशनी कहाँ-१९५९, दिल अपना और प्रीत पराई-१९६०, भाभी की चुडीया-१९६१, जिंदगी और ख्वाब-१९६१, प्यार का सागर-१९६१, आरती–१९६२, मैं चूप रहूंगी-१९६२, दिल एक मंदिर-१९६३, गझल-१९६४, काजल-१९६५, बहु बेगम्-१९६७, हे आणि इतर असंख्य चित्रपट आले, गाजले आणि मीनाकुमारीचं रसिकांच्या हृदयातील स्थान बळकट करत गेले .

मीनाकुमारीचा अभिनय, तिचे हावभाव, तिची देहबोली सारं काही खूपच नैसर्गिक होतं. अतिशय संयत अभिनय आणि काळजाचा ठाव घेणारी नजर. तिचे बोल ओठातून नाही तर काळजातून उमटत असत. तिच्या सहज सुंदर अभिनयात इतरांच्या डोळ्यात सहज पाणी आणण्याची ताकद होती. असं म्हणतात की तिला चित्रपटात दुखाचे प्रसंग चित्रित करताना कधीच डोळ्यातून अश्रु येण्यासाठी ग्लिसरीन वापरावं नाही लागलं. तिची वेदना सांगायचे तिचे थरथरणारे ओठ आणि काठोकाठ भरलेले डोळे. जिथे चेहत्यावरील नस न नस बोलकी असते तिथे शब्दांचं काय काम ?

खरंतर मीनाकुमारीचा प्रत्येक चित्रपट उत्कृष्ट अभिनयाने नटलेला, प्रचंड ताकदीचा आणि आवर्जून पाहण्यासारखा आहे आणि तरीही साहिब बीबी और गुलाम आणि पाकिजा ह्या २ चित्रपटांना मीनाकुमारीच्या सिनेकारकीर्दीतील सुवर्णस्तंभ म्हणणं योग्य ठरेल. कारण आज हेच चित्रपट तिची ओळख ठरले आहेत.

साहिब बीबी और गुलाम-१९६२

बिमल मित्रांच्या साहिब बीबी और गुलाम नावाच्याच कादंबरीवर आधारित हा चित्रपट. १००/१५० वर्षांपूर्वीचा काळ . रिती रिवाज पाळणारं खानदानी घराणं . जिथे स्त्रीने फक्त नवनवीन दागिने घालून मिरवणं म्हणजेच तिच्या सुखाची परिसीमा मानली जाते . तिच्यात आणि घरातल्या महागड्या शोपीस मध्ये काहीच फरक नाही . .. जिथे माणूस म्हणूनच स्त्रीला काडीची किंमत नाही तिथे तिचं मन, तिचे विचार, तिचा हक्क ह्या सगळ्या कल्पने पलीकडच्या गोष्टी झाल्या .

आणि ह्या अशा खानदानातील “छोटी बहु” आपलं स्त्रीत्वं जपण्यासाठी, पत्नीत्वाच्या हक्कासाठी सर्व सीमा ओलांडते, आपलं सर्वस्व पणाला लावते, आपल्या संस्कारांच्या विरोधात जाऊन पतीला आपलंसं करण्यासाठी दारूलाही जवळ करायला कचरत नाही .. आणि ह्या सर्वाचा परिणाम फार भयानक होतो .. तिला ह्याची किंमत शेवटी आपल्या आयुष्याची आहुति देऊन चुकती करावी लागते ..  हा चित्रपट अक्षरश: अंगावर येतो .. आजही त्यातील प्रसंग आणि गाणी आठवली की अंगावर सरसरून काटा येतो .. ह्या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला हे वेगळं सांगायला नकोच . शिवाय Berlin  International Film Festival साठी आणि Oscar साठी सुद्धा हा चित्रपट nominate झाला होता .

पाकिजा-१९७२

साहिब बीबीच्याच ताकदीचा पण पूर्णपणे वेगळा विषय असलेला पाकीझा हा मीनाकुमारीच्या सिने करकीर्दीतला दुसरा सुवर्णस्तंभ. साहिब बीबी मधली नायिका खानदानी घराण्यातील छोटी बहु होती जी आपल्या पतीला त्या “दुसऱ्या स्त्री” च्या जाळ्यातून सोडवून आपल्याकडे खेचून आणू पाहत होती . तर पाकिझा मधली साहिबजान स्वतः ती “दुसरी स्त्री” आहे . २ टोकाच्या २ भूमिका. पण मीनाकुमारीने त्या आपल्या अभिनयाच्या ताकदीने कायमच्या अजरामर करून ठेवल्या आहेत. पाकीझा मधील साहिबजानच्या नशिबात आहे कोठ्यावरील कलंकित आयुष्य. तिला तिथून बाहेर पडायची संधी मिळते तेव्हाही ती मनातून धास्तावलेलीच आहे .. पांढरपेशा (?) so called सुरक्षित समाजातील आपल्या स्थानाबद्दल साशंक असलेली, तो समाज आपल्याला सामावून घेईल का अशी शंका असलेली, आपल्या कलंकित आयुष्याची झळ आपल्या प्रियकराला लागू नये म्हणून स्वतः आतल्या आत होरपळणारी, आणि तरीही “त्याच्या” प्रेमाच्या प्रतीक्षेत स्वतःला हरवून बसलेली अशी ही साहिबजान .. हा चित्रपट देखील तुम्हाला काही तास किंवा काही दिवस नाही तर कायमचाच भारावून टाकतो.

पाकीझा रिलीज झाला ४ फेब्रुवारी १९७२ ला आणि ३१ मार्च १९७२ रोजी वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी मीनकुमारी हे जग सोडून गेली. मृत्यु पश्चात तिला पाकीझासाठी आपलं बारावं आणि शेवटचं फिल्मफेअर nomination मिळालं. पाकीझा चित्रपटामुळे रसिक मनावर मीनकुमारीची ट्रॅजडी क्वीन म्हणून जी प्रतिमा कोरली गेली ती कायमचीच. ह्याच दरम्यान कधीतरी मीनकुमारीचं प्रत्यक्ष आयुष्य सुद्धा ट्रॅजिक बनत गेलं ..

मीनाकुमारी आणि कमाल अमरोही ..

दोघांची साल १९३८ पासून ओळख होती. तमाशा-१९५२ चित्रपटाच्या सेटवर दोघांची ओळख झाली. त्याच सुमारास कमाल अमरोहींचा महल-१९४९ प्रचंड गाजलेला. त्यांनी मीनाकुमारीला घेऊन अनारकली चित्रपट करायचे ठरवले. पण त्याच दरम्यान महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या मीनाकुमारीच्या गाडीला अपघात झाला ज्यात  तिच्या डाव्या हाताची करंगळी तुटली. ( कोणत्याही चित्रपटात नीट पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की मीनाकुमारीने अतिशय चलाखपणे प्रत्येक प्रसंगात आपला डावा हात पदराने झाकलेला असतो . फक्त आझाद चित्रपटात अगदी बारकाईने पाहिलं तर काही गाण्यांमध्ये तिच्या डाव्या हाताला करंगळी नसल्याचं लक्षात येतं). तर ह्याच अपघातानंतर मीनाकुमारी आणि कमाल अमरोही दोघे नकळतपणे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी निकाह केला .

पण दोघेही जितके मनस्वी वृत्तीचे तितकेच उत्कट आणि काहीसे whimsical देखील. आणि म्हणूनच विवाहानंतर अगदी काही काळातंच त्यांचे वाद होऊन त्यांच्यातील बेबनाव वाढत गेला. पण मीनकुमारीला घेऊन पाकिझा बनवणं हे अगदी आधीपासून कमाल अमरोहींचं स्वप्न होतं आणि दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्यावरही त्यांनी मीनकुमारीला नायिका म्हणून घेऊन ते स्वप्न पूर्ण केलंच. हा प्रसंग दोघांमधील मनस्वी कलाकाराचं दर्शन घडवतो.

दोघांमधील दुरावा जितका वाढत गेला तितकीच मीनाकुमारी मद्याच्या आहारी गेली. मीनाकुमारीच्या मृत्यूचं कारण होतं Liver Cirrhosis. सुरुवातीला रात्री झोप लागावी म्हणून डॉक्टरांनी थोडीशी ब्रॅंडी पिण्याची परवानगी दिली होती खरी, पण हळुहळु आपलं दुःख विसरण्यासाठी मीनकुमारी कायमचीच मद्याच्या आहारी गेली .

मीनाकुमारीने उर्दू भाषेतून “नाज” ह्या टोपण नावाने उत्तम शायरी आणि काव्यरचना केलेल्या आहेत. त्यातील काहींना संगीतकार खय्याम ह्यांनी चाल लावून तिच्याच आवाजात प्रसिध्द केल्या तर गीतकार गुलजारने सुद्धा तिच्या काही कविता “तनहा चाँद” ह्या नावाने प्रसिद्ध केल्या. तिने काही कथा देखील लिहिलेल्या आहेत. त्याचबरोबर सुरुवातीच्या काही चित्रपटात तिने आपल्या आवाजात गाणी देखील गायलेली आहेत. पाकीझा चित्रपटासाठी देखील तिने एक गाणे गायले होते पण ते गाणे पाकीझा मध्ये न वापरता नंतर

पाकीझा रंग-बरंग नावाच्या आल्बम मध्ये प्रकाशित करण्यात आले .

विनोद मेहता ह्यांनी मीनाकुमारीच्या मृत्यूनंतर लगेचच १९७२ मध्ये “Meena Kumari: The Classic Biography” हे पुस्तक लिहिले. मधुप शर्मा ह्यांचे “आखरी आधाई दिन” हे पुस्तक सुद्धा मीनाकुमारीच्या आयुष्यावर आधारित आहे .

ह्या वर्षी २०२२ मध्ये मीनाकुमारीला जाऊन पन्नास वर्षे झाली. दुखाच्याच प्रेमात असलेली, मृत्युची प्रतिक्षेत जगणारी अभिनेत्री असंच मीनाकुमारी बद्दल म्हणावं लागेल. वेदनेचा, व्यथेचा graceful चेहरा म्हणजे मीना कुमारी. तिचे चित्रपट आणि आयुष्य ह्यांचं समांतर निरीक्षण केलं तर ती चित्रपटातील भूमिका जीवंत करते की प्रत्यक्ष जीवनातही तीच भूमिका जगते हेच कळेनासं होतं .

“अजीब दास्ताँ है ये

कहाँ शूरू कहाँ खतम

ये मंजिले है कौनसी

न वो समझ सके न हम ”

म्हणत आयुष्याच्या प्रवासात, मंजिल शोधत शेवट पर्यन्त भटकत राहिलेली महजबीन नावाच्या ह्या तनहा चाँदची वेदना लाखों करोंडों रसिकांच्या मनात कायम ठसठसत राहील …

हिंदी चित्रपटाच्या गोल्डन इरा काळातील इतर दर्जेदार लेखांसाठी क्लिक करा 

Nayana Pikle
+ posts

सौ नयना सतीश पिकळे

शिक्षण -
बी एस्सी रसायनशास्त्र
एम ए संस्कृत (वेदांत)
मोबाईल - ९९६७०५३९६७

एच एस बी सी बॅन्केत नोकरी (१९९२-२००३)

बी ए संस्कृतच्या खाजगी शिकवण्या .

मराठी विश्वकोशासाठी नोंदी करणे .

यशोवाणी संस्थेतर्फे अंध मुलांसाठी आॅडियो बुक्सचे रेकाॅर्डींग करणे .

सांगितिक कार्यक्रमांसाठी स्क्रीप्ट लिहिणे आणि निवेदन करणे.

सिने-संगीत व सिनेमा विषयक लेखन करणे .

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.