-© नयना पिकळे

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Remembering the legendary Actor Dilip Kumar on his first death anniversary. 
“ओ दूर के मुसफिर
हमको भी साथ ले ले रे
हम रह गये अकेले” ..
काळ कुणासाठी थांबत नाही हे खरंय.
एका वर्षाचा काळ किती सर्रकन सरला ह्याचंच हे उदाहरण. दिलीपकुमारला जाऊन आज एक अख्खं वर्ष होतय. त्या निमित्ताने लिहीलेला लेख …..

 

अभिनयाचा बादशाह, अभिनय सम्राट, अभिनयाचा महामेरू म्हणजे फक्त आणि फक्त तो एकच चेहरा. अभिनय ह्या शब्दालाच जणू त्याने नवीन अर्थ बहाल केला ….

तो म्हणजेच यूसुफ खान ..

पेशावरहून त्याचं कुटुंब १९३०च्या काळात भारतात देवळाली, नाशिक, पुणे असं करत करत एकदाचं मुंबईत आलं. सुरुवातीला काही काळ त्याने फळं विकली होती, कँटिन आणि ड्रायफ्रूटचं दुकान सुद्धा चालवलं.

त्याचं पूर्ण नाव होतं महम्म्द युसूफ सरवर खान.

हिमांशु रॉय यांचा ‘ज्वार भाटा” (१९४४) हा त्याचा पहिला चित्रपट. चित्रपटाची नायिका होती हिमांशु रॉय ह्यांची पत्नी आणि त्याकाळची प्रसिद्ध अभिनेत्री देविका राणी. तिने लगेच यूसुफ खानचं नाव बदलून त्याला दिलीप कुमार हे पडद्यावरच नाव दिलं. देविका राणीच्या पारख्या नजरेने हे रत्न टिपून त्याला हिमांशु रॉय ह्यांच्या बॉम्बे टॉकीज मध्ये महिना ३६ रुपयांच्या नोकरीची, जी त्याकाळच्या मनाने खूप मोठी होती अशी ऑफर दिली. कारण बहुतेक पहिल्याच भेटीत देविका राणीने दिलीप कुमार मधलं स्टार potential हेरलं होतं. त्यावेळी दिलीप कुमार होता केवळ २१ वर्षांचा.

तर अशा प्रकारे देविकाराणीने युसूफ खानला दिलीप कुमार बनवला आणि त्यानंतर दिलीप कुमारने समस्त रसिकांना आपल्या अभिनयाने दीपवलं आणि लाखों करोडोंच्या आयुष्याचा तो एक अविभाज्य भाग बनला ..

पण दिलीप कुमारचा पहिलाच चित्रपट “ज्वार-भाटा” सडकून आपटला आणि त्याला सर्व बाजूंनी प्रखर टीका सहन करावी लागली. तशात त्या काळचे प्रसिद्ध टीकाकार ‘फिल्म इंडिया’ मासिकाचे संपादक बाबुराव पटेल ह्यांनी ज्वार भाटाच्या ह्या नवोदित अभिनेत्या बद्दल लिहिले की “बाॅम्बे टॉकीजचा हा नवीन हिरो जेल मधून उपासमारीने पळून आलेला कैदी वाटतो, तो अतिशय एनिमिक आणि किडकिडीत दिसतो”.

पण ह्याने निराश न होता दिलीप कुमारने जणू हे आव्हान स्वीकारलं. त्याने एकामागून एक हॉलीवूड मूव्हीज बघायचा सपाटा लावला. हॉलिवूडच्या अभिनेत्यांच्या अभिनयाचा अभ्यास केला, निरीक्षण केलं. त्याकाळच्या हिन्दी सिनेसृष्टीतील सुपर स्टार अशोक कुमार कडून सुद्धा अभिनयाच्या बाबतीतील काही गोष्टी समजून घेतल्या आणि स्वतःत आमूलाग्र बदल घडवून आणला.

आणि ह्याचाच परिणाम असा झाला की ज्या बाबुराव पटेलांनी त्याच्यावर टीका केलेली त्यांनीच दिलीप कुमारच्या “शहीद” चित्रपटातल्या भूमिकेच तोंड भरून कौतुक सुद्धा केलं.

आणि त्यानंतर जुगनू, अंदाज, आन अशी दिलीप कुमारची सिनेसृष्टीतली यशस्वी घोडदौड सुरू झाली .

मी लहान असताना दिलीप कुमारचा जो सर्वात पहिला चित्रपट पाहिलेला तो होता ‘अनोखा प्यार’. पहिल्यांदा टीव्ही घरी आला तेव्हा पहिल्या रविवारी संध्याकाळी पाहिलेला पहिला चित्रपट होता तो. चित्रपट कळण्याचं वय नव्हतं ते. पण तरीही नर्गिस आणि नलिनी जयवंत बरोबरचे दिलीप कुमारचे सीन्स, चांदण्या जादुभरल्या रात्री गायलेली गाणी अनेक वर्ष अंधुक अंधुक आठवत होती . त्या रात्रींना जादू भरलं म्हणतात हे सुद्धा नंतर कळलेलं म्हणा. शेवटी हल्लीच काही वर्षांपूर्वी नेट वर परत एकदा तो चित्रपट पाहिला आणि आठवणींना उजाळा दिला.

त्यानंतर मात्र अंदाज मध्ये, आन मध्ये, तराना, बाबुल, अमर, देवदास, उडन खटोला, आझाद, कोहिनूर, यहुदी, नया दौर, मधुमती, मुघल ए आझम आणि त्यानंतरच्या जवळजवळ प्रत्येक चित्रपटामध्ये तो जास्त जास्त आणि जास्तच आवडतच गेला ….

पडद्यावरचं त्याचं वावरणं, त्याची देहबोली, त्याच्या आवाजातली जादू, डोळ्यातला दर्द, त्याचं हसणं, रडणं, प्रेम करणं सगळं सगळंच खरं होतं …. आणि त्यामुळे त्याची प्रत्येक भूमिका, त्याचा प्रत्येक चित्रपट मनावर कोरला गेला.

म्हणूनच अंदाज मधल्या शंकेखोर राजकपूरपेक्षा साधा सरळ दिलीपकुमार जास्त भावतो ….
तराना मधल्या डॉ मोतीची असहाय्यता आणि त्याचं तराना वरचं प्रेम मनाला भीडतं …
अमर चित्रपटात निगेटिव्ह रोल असूनही त्याच्या बद्दल तिरस्कार न वाटता सहानुभूतीच वाटते ..

देवदास मध्ये तर “कौन कंबख्त है जो बर्दाश्त करने के लिए पीता है. मैं पीता हूँ के बस साँस ले सकू” असं म्हटल्यावर आज इतक्या वर्षांनी सुद्धा अश्रु आवरत नाहीत.

असं वाचलंय की देवदास चित्रपटातल्या भूमिकेचा त्याच्यावर इतका परिणाम झाला की त्याचा nervous breakdown झाला आणि डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्याने काही हलके फुलके चित्रपट केले. ज्या पैकी दोन होते आझाद आणि कोहिनूर.

मजा म्हणजे आझाद आणि कोहिनूर हे माझे दोन्ही अतिशय आवडते चित्रपट. कारण ह्यात दिलीप कुमारचा रोल त्याच्या नेहेमीच्या हळव्या, ट्रॅजिक इमेज पेक्षा खूपच वेगळा आहे. आणि गंमत म्हणजे दोन्ही चित्रपटात त्याची नायिका आहे मीना कुमारी जिला tragic queen म्हणून ओळखलं जातं.

म्हणजे tragic king आणि tragic queen ह्यांनी एकत्र येऊन हिन्दी सिनेसृष्टीला दोन उत्कृष्ट सदा बहार चित्रपट दिले आहेत. हयात त्यांची भूमिका नेहेमीपेक्षा वेगळी, अतीशय lively, हसरी, खेळकर अशी आहे .. आणि दोन्ही चित्रपट प्रचंड गाजले. आहे ना गंमत ?

शहीद, मेला, जुगनू, अंदाज ह्या सुरुवातीच्या काही चित्रपटांनी दिलीप कुमारला हिन्दी सिनेसृष्टीत आपला जम बसवायला, आपली ओळख निर्माण करायला मदत केली.

तर तराना, दाग, आन, अमर, उडन खटोला, देवदास, नया दौर, मधुमती वगैरे चित्रपटांनी त्याला स्टार बनवलं. ह्याच सुमाराला राज, दिलीप आणि देव हे त्रिकुट सुद्धा जन्माला आलं.

त्या नंतर आलेले मुघल-ए-आझम, राम और श्याम, संघर्ष, गोपी, बैराग, शक्ति, क्रांति, मशाल, कर्मा, सौदागार हे सुद्धा दिलीप कुमारचे काही गाजलेले चित्रपट .

ह्यातली प्रत्येक भूमिका दिलीप कुमारने जीवंत केली आहे, आपल्या अभिनयाने कायमची अजरामर केलेली आहे.

मुगल-ए-आझम! Larger than Life canvas असलेलं भारतीय सिनेसृष्टीला पडलेलं आणि प्रत्यक्षात साकारलं गेलेलं एक अद्भुत असं स्वप्न ! ह्यात दिलीप कुमारच्या सलीम ला तोड नाही .. वडिलांच्या विरुद्ध बंड पुकारणारा सलीम , तेही समोर वडिलांच्या भूमिकेत दिग्गज अभिनेता पृथ्वीराज कपूर असताना ती भूमिका आपल्या खिशात घालणं म्हणजे खायचं काम नाही.
दुर्गा खोटे सारख्या वात्सल्य पूर्ण आईच्या जोधाबाईच्या प्रेमात तितकाच किंवा कांकणभर जास्त भावुक हळवा होणारा सलीम आणि अनारकलीच्या म्हणजे साक्षात स्वर्गीय अप्सरा मधूबालाच्या प्रेमात वेडा झालेला, तिच्यासाठी राज्य सुद्धा सोडायची तयारी असलेला सलीम… एकाच चित्रपटात दिलीप कुमारने अतिशय सहजपणे ज्या वेगवेगळ्या छटा दाखवल्या त्याची तुलनाच नाही होऊ शकणार.

शक्ति चित्रपटात तर अमिताभ आणि दिलीप कुमार ह्या दोन अभिनय सम्राटांचं एकमेकांसमोर येणं म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच .. प्रत्येक सीन मध्ये दिलीप कुमार आणि अमिताभला सारख्याच ताकदीने एकमेकांसमोर उभे राहिले आहेत ..कोण डावं कोण उजवं ठरवताच नाही येत.

खरंतर दिलीप कुमारचा अभिनय ह्याबद्दल लिहिण्याची माझीच काय कुणाचीच योग्यता नाही. पण तरीही सांगावसं वाटतं की दिलीप कुमारचा अभिनय नेहमीच जितका उत्कट तितकाच वास्तववादी होता. कधीच कुठे आक्रसताळेपणा नाही की अभिनय जास्तं इम्प्रेसिव्ह करण्यासाठी कुठे ओव्हरएक्टिंग नाही.

तो नुसता पडद्यावर आला तरी पडदा जिवंत होतो .. प्रेक्षक जणू hypnotise होतात आणि त्यात त्याचे संवाद, हसणं, बोलणं, रडणं असेल तर मग मात्र रसिकांना केवळ मंत्र मुग्ध होणं ह्यापालिकडे काहीही काम उरत नाही.

अर्थात अभिनयातले हे सगळे बारकावे, तसंच दिलीप कुमारची अभिनेता म्हणून महत्ता, वगैरे मी थोडी मोठी झाले तेव्हाच कळली.

अगदी लहान असताना मात्र ते तोंडात गवताची काडी चघळणं, तोंडातल्या तोंडात प्रेमाचे डायलॉगस पुटपुटणं जरा विनोदीच वाटायचं . Emotional भूमिका असेल तेव्हा त्याच्या कपाळावरची एक शिर नकळत पणे तडकायची. लहान वयात सुद्धा त्याच्या अभिनयातले हे बारकावे जाणवल्या शिवाय राहायचे नाहीत. पण तेव्हा वाटायचं की हा प्रत्येक चित्रपटात जास्त वेळ फक्त रडून का घालवतो ?

पण त्याच्या अभिनयाची पद्धतच अनोखी होती .. ह्या सिनेसृष्टीने आजवर अनेक नायक नायिका दिल्या. आणि त्या प्रत्येकांनी आपली अशी वेगळी शैली, वेगळी स्टाइल बनवली. आपली अशी एक खास इमेज बनवली.

आपल्या उत्कट भावुक अभिनयामुळे दिलीप कुमार बनला Tragedy King.
अतिशय संयत controlled अभिनय हा त्याचा प्लस पॉइंट होता. त्याचं दुख त्याची वेदना त्याच्या चेहऱ्यावरच्या बदलत्या हावभावांमुळे कळायची, त्याच्या अस्पष्ट कुजबुजण्यातून त्याचा प्रणय खुलायचा, त्याच्या डोळ्यांच्या आतच तरळणारे अश्रु त्याच्या वेदनेला बोलक करायचे. त्याचा प्रचंड बोलका चेहरा त्याचं पुढचं काम सोप्पं करायचा. त्यामुळे त्याला नक्की कधी काय सांगायचं आहे हे न बोलताही प्रेक्षकांना अचूक कळायच. म्हणूनच त्याचा अभिनय काळजाला भिडायचा, त्या भूमिकेशी आपली wave length क्षणात जुळायची.

आपल्या साधारण ५ दशकांच्या कारकि‍र्दीत अगदी स्वर्णलता, नलिनी जयवंत ह्या नायिकांपासून लीना चांदवरकर पर्यन्त सर्व नायिकांबरोबर दिलीप कुमारने नायक म्हणून भूमिका केलेल्या आहेत..

सर्वात जास्त म्हणजे ८ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा फिल्म फेअर पुरस्कार मिळवणारा दिलीप कुमार हा हिन्दी सिनेसृष्टीतला एकमेव अभिनेता ..
आपल्यापेक्षा चक्क २२ वर्षांनी लहान असलेल्या सायराबानू ह्या अभिनेत्री बरोबर विवाह केला.

पडद्यावरच्या आयुष्यात दिलीप कुमारने जितक्या ट्रॅजिक भूमिका केल्या प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा अशा अनेक ट्रॅजिक प्रसंगांना त्याला सामोरं जावं लागलं.

पण दिलीपकुमार आणि सायराबानू ह्यांच्या पन्नास वर्षांच्या संसारात ते दोघंही नक्कीच एकरूप झालेले असणार. एकमेकांची सुख दुःख वाटून घेतली असणार. कित्येक प्रसंगी एकमेकांसोबत अगदी घट्ट उभे राहिले असणार. खरंच ह्या महामेरूच्या आजवरच्या शांत स्वस्थ समाधानी आयुष्यात सायराबानूचं स्थान फारच मोठं आहे.

आणि तरीही वाटतं की खरच सगळं सगळं दुःख त्याला आपल्या सायरा बरोबर वाटून घेता आलं असेल का ? की काहीतरी आपल्या उरातच कवटाळून शेवटपर्यंत तो जगला असेल ?

त्यातलंच सर्वांना माहीत असलेलं आणि त्यावर असंख्यांनी लिहिलेलं प्रकरण म्हणजे मधुबाला. आजच्या दिवशी ह्या प्रकरणाबद्दल काहीही जास्त लिहावसं वाटत नाहीये . फक्त राहून राहून हेच समाधान वाटतं आहे की शेवटी आज कितीतरी वर्षांनी काळाने दोघांची कायमची भेट घडवून आणली.

आज आता ह्या क्षणी मधुबाला आणि दिलीपकुमार दोघंही एकमेकांचा हात हातात घेऊन सुखात आनंदात गात असतील ..

“दिल मे समा गये सजन
फूल खिले चमन चमन
प्यार भी मुस्कुरा दिया
मस्ती भरी हवा चली
हसने लगी कली कली
तुमसे मुझे मिला दिया” ….

हिंदी चित्रपटाच्या गोल्डन इरा काळातील इतर दर्जेदार लेखांसाठी क्लिक करा 

Nayana Pikle
+ posts

सौ नयना सतीश पिकळे

शिक्षण -
बी एस्सी रसायनशास्त्र
एम ए संस्कृत (वेदांत)
मोबाईल - ९९६७०५३९६७

एच एस बी सी बॅन्केत नोकरी (१९९२-२००३)

बी ए संस्कृतच्या खाजगी शिकवण्या .

मराठी विश्वकोशासाठी नोंदी करणे .

यशोवाणी संस्थेतर्फे अंध मुलांसाठी आॅडियो बुक्सचे रेकाॅर्डींग करणे .

सांगितिक कार्यक्रमांसाठी स्क्रीप्ट लिहिणे आणि निवेदन करणे.

सिने-संगीत व सिनेमा विषयक लेखन करणे .

Leave a comment