– अजिंक्य अशोक उजळंबकर
————————
आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
‘Qayamat Se Qayamat Tak’ and ‘Sairat’ Comparison between two Superhit Musical Love Stories. २९ एप्रिल १९८८ व २९ एप्रिल २०१६.. म्हणाल तर केवळ दोन तारखा आहेत. परंतु या दोन तारखांच्या/वर्षांच्या अवतीभोवती ज्यांचे कुमारवय व तारुण्य घुटमळले आहे तेच जाणतात या तारखांचे माहात्म्य. १९८८ साली ‘अकेले है तो क्या गम है, चाहे तो हमारे बस में क्या नहीं’ हे प्रेमगीत पडद्यावर गाणारे हँडसम राज आणि सुंदर रश्मी म्हणजे जणू “मी आणि तूच” असे ज्यांना भासत होते..त्यांच्याच पुढच्या पिढीला २८ वर्षांनी असंच सेम वाटत होतं ‘याड लागलं गं याड लागलं’ हे गीत पडद्यावर गात असलेल्या आर्शी आणि परश्या ला बघून.
एक पिढी बदलून पुढची पिढी आली पण प्रेमाची भाषा तीच. कुमार वयातलं, तारुण्याकडे दिमाखात वाटचाल सुरु झाली असतानाचं ते वेडं प्रेम. घरच्यांच्या विरोधामुळे राज आणि रश्मी ने जसा एकमेकांच्या अलिंगनात दम सोडला होता तसाच शेवट आर्शी आणि परश्याचा पण झाला..त्याच कारणाने. जातीपातीच्या सामाजिक बंधनाला न जुमानणाऱ्या तरुणाईच्या या दोन सिनेमांनी इतिहास घडविला, जे साल वेगळे असले तरी योगायोगाने एकाच दिवशी प्रदर्शित झाले. ‘कयामत से कयामत तक’ ने त्याकाळी हाणामारीच्या दृष्टचक्रात अडकलेल्या हिंदी सिनेमाला रोमँटीक म्युझिकल लव्ह स्टोरीचा नवा आशेचा किरण दाखविला होता… तर ‘सैराट’ ने घडविलेला इतिहास अजून ताजाच असल्याने रसिकांना लक्षात आहेच. या दोन्ही सिनेमांमध्ये नुसत्या प्रदर्शन तारखांचेच नाही तर इतरही बरीच साम्य आहेत.
क्यूएसक्यूटी प्रदर्शित झाला तेंव्हा आमिर होता २३ वर्षांचा तर जुही होती २१ वर्षांची. सैराट प्रदर्शित झाला तेंव्हा आकाश होता २२ वर्षांचा तर रिंकू होती अवघी १५ वर्षांची. म्हणजे पडद्यावरील भूमिकांना अनुसरून दोन्ही जोड्या त्यांच्या कुमार वयात अथवा तारुण्यात नुकताच प्रवेश केलेल्या अशा होत्या. दोन्ही जोड्या रसिकांसाठी फ्रेश होत्या, नवीन होत्या. परंतु तरीही या दोन्ही जोड्यांनी त्या त्या काळातील सिनेरसिकांना व खास करून प्रेमी युगलांना अक्षरशः वेड लावले.
दोन्ही सिनेमांच्या यशात मुख्य भूमिका बजावली ती सुपरहिट संगीताने. क्यूएसक्यूटी लागला तेंव्हा इंटरनेट, मोबाईल तर सोडाच पण लँडलाईन महाग होते. गाण्यांच्या एलपी रेकॉर्ड चा काळ संपत आला होता, ज्यांची जागा ऑडिओ कॅसेट्स घेत होत्या. ८० लाख ते १.२५ कोटींच्या घरात क्यूएसक्यूटी च्या कॅसेट्सची विक्री झाली होती. ८० च्या दशकातला बेस्ट सेलिंग म्युझिक अल्बम चा मान त्याला मिळाला होता. सैराट च्या संगीताबद्दल तर काही बोलायलाच नको. झिंगाट या गाण्याने यु-ट्यूब वर नुकताच एक मोठा विक्रम नोंदवला आहे. या गाण्याला आतापर्यंत ३० कोटींपेक्षाही अधिक वेळा पाहिले गेले आहे. ‘सैराट झालं जी’ ला ९ कोटींच्या वर, ‘याड लागलं गं’ ला ३ कोटींच्या वर व ‘आताच बया का बावरलं’ गाण्याला ४ कोटींच्या वर रसिकांनी पाहिलं आहे. आनंद-मिलिंद या संगीतकार जोडीला ब्रेक देणाऱ्या क्यूएसक्यूटी सिनेमाची सर्व सुरेल गीते मजरुह सुलतानपुरी यांची होती. सैराट च्या संगीताने अजय-अतुल यांना ब्रेक जरी दिला नसला तरी एका कमालीच्या उंचीवर नेऊन ठेवले हे मात्र तितकेच खरे.
दोन्ही चित्रपटांच्या दिग्दर्शकांबद्दलही असेच साम्य. क्यूएसक्यूटी ने मन्सूर खान हा एक प्रतिभासंपन्न तरुण दिग्दर्शक हिंदी सिनेमाला दिला तर सैराट ने नागराज मंजुळे या नावाला पहिले मोठे व्यावसायिक यश देऊन, मराठी सिनेमाला सामाजिक विषयांची जाण असणारा तरुण प्रतिभाशाली दिग्दर्शक दिला.
क्यूएसक्यूटी ला त्यावर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये ११ नामांकनं मिळाली होती त्यापैकी ९ पुरस्कार त्याने पटकावले. शिवाय दोन राष्ट्रीय पुरस्कार क्यूएसक्यूटीने जिंकले होते. सैराट ने एकूण ११ मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्स वर स्वतःचे नाव नोंदवले व रिंकू राजगुरू ला राष्ट्रीय सन्मान मिळाला. दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर आपापल्या काळातले कमाईचे व जास्तीत जास्त काळ सिनेमागृहात टिकून राहण्याचे सर्व रेकॉर्ड्स मोडीत काढून नवे मानांक प्रस्थापित केले होते. त्याची आकडेमोड इथे करण्यात अर्थ नाही.
शोधली तर अजून बऱ्याचशा समान गोष्टी दोन्ही सिनेमांमध्ये आढळून येतील पण या काही प्रमुख आहेत. माझ्या मते हे दोन्ही सिनेमे अजरामर होण्यामागे खरे कारण थोडे वेगळे आहे. कुमारवयातून तारुण्यात प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रेम कहाणीचा, कौटुंबिक व सामाजिक विषमतेमुळे झालेला करुण अंत रसिकांना चटका लावून गेला हे ते प्रमुख कारण. ३४ वर्षांपूर्वी सुद्धा व ६ वर्षांपूर्वी पण.
संगीतमय प्रेम कहाणीचा दुःखद शेवट रसिकांना रडवतो मात्र निर्मात्याला आनंद देऊन जातो हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.
जणू काही या दोन बाबी बनल्याच आहेत ‘एक दुजे के लिए’. हो कि नाही ?
हेही वाचा – राजा हिंदुस्तानी ..संगीतमय प्रेमकथेची २५ वर्षे
