— © नयना पिकळे 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

नावात काय असतं असं विचाराल तर मी तरी म्हणेन की नावात खूप काही असतं. आता बघा ना संपूरनसिंह माखनसिंह कालरा म्हटलं तर लगेच कोणीतरी हट्टाकट्टा, लष्करी थाटाचा, पिळदार मिश्या असलेला, जरब बसवणारा माणूस आपल्या डोळ्यांसमोर येतो. पण गुलजार म्हटलं की मात्र लगेच एक तरल स्वप्नाळू भावविश्व असलेली जिवाभावाची व्यक्ति भेटल्याचा आनंद होतो. पण संपूरनसिंह माखनसिंह कालरा म्हणजेच आपले सर्वांचे आवडते गुलजार बरं का. आहे की नाही गंमत ? तर अशा ह्या गुलजारची कवी, गीतकार, लेखक, संकलक, पठकथाकार, दिग्दर्शक, निर्माता अशी अनेक रुपे आहेत आणि हे प्रत्येक रूप जितकं देखणं तितकंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. (Hindi Cinema’s Legendary Lyricist Gulzar)

१९६३ सालच्या बंदिनी चित्रपटाचे संगीतकार होते एस डी बर्मन. बंदिनीची सगळी गाणी गीतकार शैलेन्द्र ह्यांची. फक्त एक गाणं सचिनदांनी गुलजार ह्यांच्याकडून लिहून घेतलं, ते होतं

“मोरा गोरा अंग लैले

मोहे शाम रंग दैदे”

आणि ते एकच गाणं गुलजार काय चीज आहेत हे दाखवून द्यायला पुरेसं होतं. पाहायला जावं तर रचनाशैली शैलेन्द्रचीच वाटावी अशी. त्यामुळे बंदिनीच्या इतर गीतांमध्ये अगदी चपखलपणे मिसळून जाणारं आणि तरीही स्वतःचं अनोखेपण अबाधितपणे जोपासणारं असं हे गीत.

ह्या गाण्यामुळे बंदिनीचे दिग्दर्शक बिमल रॉय ह्यांनी खुश होऊन गुलजारना आपला सहाय्यक बनवला आणि गुलजार ह्यांची हिन्दी सिनेसृष्टीतील कारकीर्द सुरू झाली म्हणायला हरकत नाही. ह्या नंतरचं गुलजारचं प्रत्येक गाणं त्यांचं वेगळेपण हळुहळु उलगडणारं असंच होतं. रसिकांवर त्याच्या काव्याची भुरळ पडू लागली.

आशीर्वाद, खामोशी, आनंद, सीमा , मेरे अपने, गुड्डी , अनुभव, कोशिश, परिचय, चुपके चुपके, मौसम, आंधी, खुशबू , किनारा, खट्टा-मीठा, घर, थोडीसी बेवफाई, घरौंदा, गोलमाल, खूबसूरत, बसेरा, नमकीन, इजाजत, सदमा, लेकिन, सत्या, पहेली, गुरु, ईश्कियाँ, हैदर, द स्काय इज पिंक (हा त्यांचा लेटेस्ट चित्रपट).

ही नामावली म्हणजे गुलजार ह्यांनी रचना लिहिलेल्या चित्रपटांची अगदी छोटीशी झलक. ह्या प्रत्येक चिटपटातील गाणी गुलजारचं वेगळेपण मनावर ठसवतं. रचना गुलजारची म्हटल्यावर ती इतरांपेक्षा हटके, आगळीवेगळी असणार हे ठरलेलंच आहे.

जागेपणी स्वप्नात रमणारा हा स्वप्नाळू कवी . म्हणूनच त्यांच्या अनेक रचनांमध्ये स्वप्नांनी महत्त्वाचं स्थान पटकावलेलं आढळतं. आपल्या कल्पनांना शब्दरूप देऊन त्यांनी आणखी मोहक बनवल्या.

मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने (आनंद–१९७१)

एक दिन सपने मे देखा सपना (गोलमाल-१९७९)

सुरमई अँखियो मे नन्हा मुन्ना एक सपना देजा रे (सदमा–१९८३)

सपने मे मिलती है (सत्या–१९९८)

नुसती स्वप्नच नाही तर ज्या डोळ्यांनी स्वप्न पहिली जातात त्या डोळ्यांचंही गुलजारना विलक्षण आकर्षण होतं .

हमने देखी ही इन आँखो की महकती खुशबू (खामोशी-१९७०)

आप की आँखो में कुछ महके हुए से ख्वाब हैं (घर–१९७८)

आँखो में हमने आप के ( थोडीसी बेवाफाई–१९८०)

रोज रोज आँखो तले एक ही सपना चले (जिवा–१९८६)

नैना ठग लेंगे (ओंकारा–२००६)

अतिशय तरल उत्कट कल्पनाविश्व असलेला हा कवी . प्रत्येक ओळीतून जाणवणारी संवेदना , भावनांची पखरण सार काही मनाला मोहवणारं.

गुलजारच्या अनोख्या कल्पना, उपमा सर्वच त्यांच्यातील मनस्वी कलावंताची साक्ष देतात. त्यांच्या काव्यातील ताजेपणा टिकवून ठेवतात.

हवाओं पे लिखदो हवाओं के नाम (दों दुनी चार–१९७०)

आज कल पाँव जमीं पर नही पडते मेरे (घर–१९७८)

पानी पानी रे खारे पानी रे (माचिस–१९९६)

निसर्ग तर गुलजार ह्यांचा आवडता सांगाती . पण त्यातही संध्यासमयाने त्यांना नेहमीच भुरळ पाडली. प्रसन्न, उदास, गूढ, रिक्त अशी संध्येची असंख्य रूप त्यांना जणू एखाद्या युवतीप्रमाणेच भासली असावीत असं वाटतं.

वो शाम कुछ अजीब थी (खामोशी-१९७०)

खाली हाथ शाम आयी (इजाजत–१९८८)

सुरमई शाम इस तरह आयी (लेकिन–१९९१)

आपल्या अनेक मानसिक आंदोलनांची साक्षीदार , आपलं मनोगत जाणणारी, आपल्या कैक भावनांना अचूक वाचा फोडणारी व्यक्ति म्हणजे गुलजार.

कधी त्यांच्या रचनेतील साधेपणा मनाला स्पर्शून जातो तर कधी त्यातील गूढ अनाकलनीय तरीही हवहवेसे आर्त भाव मनाला एक हुरहूर लावतात.

बस एक चूप सी लगी है (सन्नाटा–१९६६)

जब भी ये दिल उदास होता है (सीमा–१९७१)

दिल ढूँढता है फिर वही (मौसम–१९७६)

रुके रुके से कदम रुक के बार बार चले (मौसम–१९७६)

थोडा है थोडे की जुरूरत है (खट्टा मीठा–१९७७)

दिल हुम हुम करे (रुदाली–१९९३)

दिल तो बच्चा है जी (ईश्कियाँ–२०१०)

त्यांच्या प्रत्येक गीतातून जाणवणारी त्यांची प्रगल्भता, आयुष्यातील प्रसंगांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन स्थिमित करतो. रुक्ष, खडतर आयुष्यातील चढ उतारांना आपल्या कल्पनांचे साज लेवून त्यांना आपल्या शब्दप्रतिभेच्या ओलाव्याने आपल्या मनात रुजवणारे फुलवणारे गुलजार. रखरखीत कोरड्या आयुष्यातील जिवंतपणा नेमका शोधणारा हा मनस्वी कवी.

जीवन से लंबे है बंधू (आशीर्वाद–१९६८)

तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही (आंधी–१९७५)

तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूँ मैं (मासूम-१९८३)

ऐ जिंदगी गले लगा ले (सदमा-१९८३)

कतरा कतरा मिलती है (इजाजत–१९८८)

त्यांच्या काही रचनांतून मानवी मनाच्या एकटेपणाच्या विविध छटा दिसतात. त्यांच्या काव्यात खूपदा एकटेपणालाच वाचा फुटते आणि ते आपल्या व्यथा आपल्या समोर मांडते .

कोई होता जिसको आपना (मेरे अपने–१९७१)

एक अकेला इस शहर मे (घरौंदा–१९७७)

जाने क्या सोचकर नही गुजरा (किनारा–१९७७)

हजार राहें मूडके देखी (थोडीसी बेवाफाई–१९८०)

यारा सिली सिली (रुदाली–१९९३)

गुलजार ह्यांच्या रचनांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण चित्रपट एखाद्या गाण्यावर पूर्णपणे तोलून धरायचं सामर्थ्य त्यांच्या काव्यात आहे . एकाच गाण्यातून संपूर्ण चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना अगदी स्पष्टपणे लक्षात येते. जणू संवादच काव्य होऊन अवतरतं आणि काव्यातूनच चित्रपट पुढे सरकत जातो.

इक था बचपन (आशीर्वाद–१९६८)

तुम पुकारलो (खामोशी-१९७०)

मेरा कुछ सामान (इजाजत–१९८८)

छोड आये हम वो गलियाँ (माचिस–१९९६)

आयुष्यातील विविध प्रसंगांना अनुरूप असं वास्तववादी , खूपदा पद्यापेक्षा गद्याशी जवळीक साधणारं आणि आजवर कुणालाही न सुचलेल्या पण तरीही आपल्या मनात आधीपासूनच होत्या अशा प्रत्येकाला वाटायला लावणाऱ्या कल्पना ह्यांनी गुलजार ह्यांचं काव्य नटलेलं असतं.

त्यांच्या गहिऱ्या, गहन रचना जितक्या लोकप्रिय झाल्या, गाजल्या तितक्याच हलक्या फुलक्या रचना देखील रसिकांना भावल्या.

सारे के सारे गामा को लेकर गाते चले (परिचय–१९७२)

लकडी की काठी काठी पे घोडा (मासूम-१९८३)

ओ पापड वाले पंगा ना ले (मकडी–२००२)

सारखी काही निरागस बालगीते

घर जाएगी तर जायेगी (खुशबू–१९७५)

मम्मी ओ मम्मी तू कब सास बनेगी (खट्टा मीठा–१९७७)

गोलमाल है भाई सब गोलमाल है (गोलमाल–१९७९)

सारे नियम तोड दो (खूबसूरत–१९८०)

सारख्या हलक्याफुलक्या विनोदी रचना

अब के सजन सावन में (चुपके चुपके–१९७५)

सून सून सून दीदी तेरे लिये (खूबसूरत–१९८०)

आऊंगी इक दिन आ जाऊ (बसेरा–१९८१)

आंकी चली बांकी चली (नमकीन–१९८२)

अशा खुसखुशीत रचना आजही परत परत ऐकाव्याश्या वाटतात.

बोले रे पपिहरा (गुड्डी–१९७१)

ना जिया लागे ना (आनंद–१९७१)

मुझे जाँ न कहो मेरी जाँ (अनुभव–१९७२)

चुपके चुपके चल री पुरवैय्या (चुपके चुपके–१९७५)

गुलमोहर गर तुम्हारा नाम होता (देवता–१९७८)

सारखी हळुवार प्रेमगीते त्यांनी ज्या तरलतेने रचली तितक्याच उत्कटतेने

झिर झिर बरसे सावनी अँखिया (आशीर्वाद–१९६८)

बीती ना बिताई रैना (परिचय–१९७२)

मै एक सदी से बैठी हूं (रुदाली–१९९३)

सारखी विरह गीते देखील रचली.

काही लोकगीतांच्या धर्तीवर असलेली तर काही आजच्या आयटम सॉन्गसच्या व्याखेत चपखल बसणाऱ्या रचना देखील त्यांनी केल्या .

गोली मार भेजे मे (सत्या–१९९८)

चल छैंय्या छैंय्या (दिलसे–१९९८)

छलका छलका रे कलसी का पानी (सथिया–२००२)

कजरारे कजरारे तेरे कारे कारे नैना (बंटी और बबली–२००५)

बिडी जलायले (ओंकारा–२००६)

नमक इस्क का (ओंकारा–२००६)

पण ह्या सर्वच्यासर्वच रचनांमध्ये तो खास गुलजार टच अगदी ठसठशीतपणे जाणवतो.

आतापर्यंत गुलजार ह्यांना अनेक पारितोषिक मिळालेली आहेत. त्यांच्या “धुवाँ” नावाच्या कथा संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. अनेक नॅशनल फिल्म पुरस्कार, एकवीस वेळा गीतरचना आणि संवाद लेखनासाठी फिल्मफेअर पुरस्कार, पद्मभूषण आणि सिनेसृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा दादा साहेब फाळके पुरस्कार. त्यांना ग्रॅमि अवॉर्ड देखील मिळालेलं आहे .

अशा अष्टपैलू हरहुन्नरी कलावंताचा आज म्हणजे १८ ऑगस्टला जन्मदिवस आहे. गुलजारना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!

त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून ह्या पुढेही अशीच उत्तमोत्तम काव्य रचना होत राहो हीच आज इश्वरचरणी प्रार्थना !! 

हिंदी चित्रपटांच्या गीतसंगीतांवर आधारित अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी क्लीक करा

Nayana Pikle
+ posts

सौ नयना सतीश पिकळे

शिक्षण -
बी एस्सी रसायनशास्त्र
एम ए संस्कृत (वेदांत)
मोबाईल - ९९६७०५३९६७

एच एस बी सी बॅन्केत नोकरी (१९९२-२००३)

बी ए संस्कृतच्या खाजगी शिकवण्या .

मराठी विश्वकोशासाठी नोंदी करणे .

यशोवाणी संस्थेतर्फे अंध मुलांसाठी आॅडियो बुक्सचे रेकाॅर्डींग करणे .

सांगितिक कार्यक्रमांसाठी स्क्रीप्ट लिहिणे आणि निवेदन करणे.

सिने-संगीत व सिनेमा विषयक लेखन करणे .

2 Comments

  • Mangesh Kulkarni
    On August 18, 2021 10:57 pm 0Likes

    गुलजार यांचे विषयी किती सुंदर लिहिले आहे तुम्ही. गुलजार यानी आपणा सर्वांचे आयुष्य गुलजार केले आहे

  • Dr R S Inamdar
    On August 19, 2021 8:13 am 0Likes

    Excellent

Leave a comment