– अरविंद गं. वैद्य

साहीरच्या शब्दकळेवर लुब्ध असणारे असंख्य आहेत. त्याची लेखणी जेवढी दाहक तेवढीच तरलही होती. सामाजिक भान असलेला हा कवी-गीतकार आपल्याच मस्तीत लिहीत राहिला. त्याने जरी ‘मै पल दो पल का शायर हूँ’ असे म्हटले असले तरी सहजासहजी विस्मरणात जाण्यासारखी ही असामी नव्हे. स्मरणरंजनात हा जास्त भावला, मनाला भिडला प्रसंगी रूतला अन्‌ खुपला तसा तो मांडण्याचा हा एक खटाटोप. यात जर काही ‘टोप’ आढळला तर तो साहिरचा आणि ‘खटास’ वाटली तर तो दोष अस्मादिकांचा.

साहीर लुधियानवीचे नाव नजरेसमोर आले, की त्याची असंख्य कसदार गीते जशी नजरेसमोर तरळतात तशीच कानात रूंजी घालू लागतात. अतिशय सकस आणि तरल काव्यही चित्रपटात लोकप्रिय होऊ शकते हे त्याच्या लेखणीने दाखवून दिले आहे.

      दुनियाने तजुर्बातो-हवादिस की शक्ल मे

      जो कुछ मुझे दिया है, वो लौटा रहा हूँ मै।

उर्दूतला हा शेर साहिरचाच आहे. हे केवळ अक्षर सत्यच नव्हे तर त्याच्या दृष्टीने पूर्ण सत्य असेच म्हणावे लागेल आणि कदाचित त्याच्या अमाप लोकप्रियतेचेही हे एक कारण असावे. त्याच्या समकालीन अन्य कवी-शायर यांना मिळाली नसेल एवढी लोकप्रियता त्याच्या वाट्याला आली. तीही त्याच्या जीवनाशी नाते सांगणाऱ्या लेखणीमुळेच. त्याच्या लेखणीला जशी अनुभवाची जोड होती तशीच वास्तवाची धारही होती. 1945 साली ‘तल्खिया’ हा त्याचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला अन्‌ शायर म्हणून तो अमाप प्रसिद्ध झाला. प्रसिद्ध उर्दू मासिक अदबे-लतीफ व शहाकाराचे संपादन ही त्याने केले. हिन्दुस्थानची फाळणी झाल्यानंतर साहीर पाकिस्तानात गेला पण तेथे त्याची घुसमट होऊ लागली. तेथे ना लेखन स्वातंत्र्य होते ना भाषण स्वातंत्र्य. त्यातही त्याचा सगळा ‘अदबी’ गोतावळा हिन्दू होता. साहीर अस्वस्थ झाला. त्या काळात लाहोरला तो ‘सवेरा’चे संपादन करीत असे. त्याने आपल्या स्वतंत्र प्रज्ञेला अनुसरून लेखणी चालवली तेव्हा पाक सरकारने त्याच्या अटकेचे वॉरन्ट काढले. मग साहिरला लाहोर सोडून दिल्लीला यावे लागले. ख्यातनाम कवी प्रकाश पंडितशी त्याचा खूप दोस्ताना होता. शाहराह आणि प्रीतलडीचे संपादनही ते करीत. साहीर हा जसा कवी होता तसाच संपादक ही असल्याने पत्रकारांचा एक गुण त्याच्यातही होता आणि तो म्हणजे त्याचा दिवस सकाळी दहाच्या पुढेच सुरू होत असे. चहा आणि सिगारेट या दोन्ही गोष्टीचे ‘आवर्तन’ उठल्यानंतर जे सुरू होई ते रात्री उशिरापर्यंत. सिगारेटचे ‘अग्निहोत्र’ कमी व्हावे म्हणून पठ्ठा एका सिगारेटचे दोन तुकडे करून पीत असे; परंतु दोन्ही तुकडे एका पाठोपाठ फस्त करण्याची त्या सवयही तशीच कायम होती. त्याला संवादासाठी कायम कोणी तरी हवे असे. त्यांची संख्या एक असो वा चार त्याची वाक गंगा सारखी वाहत असे. त्यावेळी जी मंडळी श्रवणानंदात सहभागी असत त्यांना मग साहीर जशा स्वतःच्या रचना ऐकवायचा तशाच इतरांच्या त्याला भावलेल्या रचनाही ऐकवायचा. स्मरणशक्तीची देणगी त्याला होती. बाल्यावस्थेत पाहिलेल्या इंद्रसभा आणि शाहबहराम या चित्रपटाचे सर्व संवाद ही त्याला पाठ होते. आपल्या लेखणीचा त्याला जबरदस्त अभिमान होता. ‘तल्खिया’ या त्याच्या काव्य संग्रहाच्या उर्दूत एकवीस आणि हिन्दीत अकरा आवृत्या प्रकाशित झाल्या होत्या यावरून साहित्यप्रेमीत तो किती लोकप्रिय होता याची कल्पना यावी.

      शायर, कवी वा गीतकार काही म्हणा लहरी असतात, मुडी असतात. साहिरही त्याला अपवाद नव्हता. छोट्याशा गोष्टीवरून चिडचीड करणे, घाबरणे, जवळच्या मित्रांना आपल्या रागाचे ‘लक्ष्य’ करणे हा त्याचा स्वभाव होता आणि त्याचे प्रियजन त्याच्या या ‘भावा’शी चांगलेच परिचित होते. जर त्याला मुशायऱ्यात सहभागी व्हायचे असेल तर तेव्हा त्याची होणारी घालमेल अगदी पाहण्यासारखी असे. आपली कोणती रचना मुशायऱ्यात सादर करावी? नज्म की गजल याचा निर्णय त्याला चटकन घेता येत नसे. साहीर अखेरपर्यंत अविवाहित राहिला. कदाचित विवाहाचा निर्णय त्याला घेता आला नसावा. त्याच्या काव्यात कायम डोकावणारी ‘ती’ पाहिली म्हणजे त्याचा प्रेमभंग झाला असावा, अशी खात्री पटते. त्यातही हा एवढा शालीन, की ‘चलो एकबार फिरसे अजनबी बन जाय हम दोनो’ असे म्हणून मोकळा होतो. हे सगळे असे का? त्याचे व्यक्तिमत्त्व असे कसे? याचा धांडोळा आपण घेऊ लागलो, की त्याचे आयुष्य ज्या प्रकारे व्यतीत झाले ज्या दुर्धर प्रसंगांना त्याला सामोरे जावे लागले. त्यामुळे तो असा बनला हे लक्षात येते.

A pic of Abdul Hayi "Sahir Ludhiyanvi"with his mother "Sardar Begum"
A pic of Abdul Hayi “Sahir Ludhiyanvi”with his mother “Sardar Begum”

      साहीरचे मूळ नाव अब्दुल हई. 1921 साली लुधियानातील एक जमिनदाराच्या घरात त्याचा जन्म झाला. त्याच्या आईखेरीज त्याच्या वडिलांना आणखी अकरा बायका होत्या. मात्र हा एकटाच पुत्र असल्याने त्याचे पालन-पोषण मोठ्या लाडात झाले. साहिरच्या वडिलांच्या विलासीवृत्ताला कंटाळून त्याच्या आईने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. प्रकरण जेव्हा कोर्टात गेले तेव्हा साहिरने मातेसमवेत राहण्याची इच्दा प्रदर्शित केली. त्याच्या या निर्णयाने त्याचे वडील खूप चिडले. आपण साहिरला ठार करू वा ते न च जमले तर त्याच्या आईपासून हिरावून घेऊ, अशी धमकी त्यांनी दिली. त्याच्या आईनेही त्याच्या संरक्षणासाठी काही लोकांची नियुक्ती केली. कोवळ्या वयात वाट्याला आलेला तिरस्कार, त्याच्यात भयही निर्माण करून गेला. साहीरने जीवन संघर्षात अनेक कटू अनुभव घेतले. पोट जाळण्यासाठी नाना उद्योग त्याने केले. बुद्धी आणि भावुकतेचा हा संघर्षच त्याला ‘साहीर’ बनवून गेला व त्याच्या मनातले सारे वादळ ‘तल्खिया’ बनून बाहेर पडले. शायर म्हणून साहीरचा उदय झाला तो काळ लक्षात घेतला तर असे दिसते की, त्यावेळी फिराक, फैज व मजाज हे लोकप्रियतेच्या शिखरावर होते. कलावंत ज्या काळात वाढत असतो. त्या काळाच्या, त्यातील प्रतिभावंताचा त्याच्यावर प्रभाव पडत असतो. साहीरही त्याला अपवाद नव्हता. फैज व मजाजचा प्रभाव प्रारंभी त्याच्या लेखणीवर होता, पण अनुभवाचे तेज धारण केलेली त्याची लेखणी आणि तिचे पाणी निराळेच आहो हे लोकांच्या लवकरच लक्षात आले. त्याची खाली दिलेली रचना तेच दर्शवते.

      मै उन अजदार का बेटा हूं जिन्होने पैहम

      अजनबी कौम के साये की हिमायत की है

      गद्र की साअते-नापाक से लेकर अब तक

      हर कडे वक्त मे सरकार की

      खिदमत की है

      न कोई जादा, न मंजिल,

      न रौशनी, न सुराग

      भटक रही है खलाओ मे जिंदगी मेरी

      इन्ही खलाओ मे रह जाऊंगा कभी खोकर

      मै जानता हूँ मेरी हम नफस मगर यूंही

      कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है

      कि जिंदगी तिरी जुल्फो की नर्म छाओं मे

      गुजरने पाती तो शादाब हो भी सकती थी

      ये तीरगी जो मिरी जिस्म का मुक्कदर है

      तिरी नजर की गुआओ मे खो भी

      सकती थी

      ‘कभी कभी’ वरून काहींना त्या चित्रपटाची आठवण येईल; परंतु येथे उपरोक्त रचना निराळ्या हेतुने दिली आहे. साहीरने जीवनात आलेले कटू अनुभव अगदी जशेच्या तसे मांडल्यानेच त्याला वजन प्राप्त झाले आहे. या काव्याला शृंगारची वेलबुट्टी न चढवता अगदी सरळपणे त्याची लेखणी वाचकाच्या हृदयाचा ठाव घेते.

साहीर हा रोमॅन्टिक शायर आहे. प्रेमात आलेल्या अपयशाने तो एवढा अस्वस्थ होता की तिलाच त्याने सवाल केला.

      मेरे ख्वाबों के झरोको को सजनेवाली

      तेरे ख्वाबों मे कही मेरा गुजर है कि नही

      पूछ कर अपनी निगाहो से बता दे मुझको

      मेरी रातों के मुक्कदर मे सहर है कि नही

Khayyam and Sahir
Khayyam and Sahir

कवी आणि गीतकार अशी साहीरची दोन रूपे आहेत. गीतकार म्हणून तो आम जनतेच्या अधिक जवळ आला तर कवी म्हणून चोखंदळ रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला. मनाशी उजळणी केली तेव्हा लक्षात आले की त्याची ‘मेरी मेहबूब कही और मिलाकर मुझे’ ही रचना वाचनात आली तेव्हाच तो माझ्या भावजीवनाचा एक भाग बनला. ‘ताजमहाल’वरची त्या कविता तिरकस असली तरी अप्रतिम होती. प्रेमाचे नयनरम्य प्रतिक असलेल्या ताजमहलच्या छायेत त्याची प्रेमभावना उंचबळून येत नव्हती. आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी ते स्थळ जणू त्याला नकोच होते. म्हणूनच तो लिहून गेला…

      ये चमन जार,

      ये जमना का किनारा ये महल

      ये मुनक्कश दरो-दिवार, ये मेहराब, ये ताक।

      इक शहनशाहने दौलत का सहारा लेकर,

      हम गरीबो की मुहब्बत का उडाया है मजाक।

      मेरी मेहबूब कही और मिलाकर मुझसे।

साहिरने ‘ताजमहाल’ विषयीच्या साऱ्या प्रणयरम्य कल्पनाना दिलेला तो जबरदस्त हादरा होता. ज्या कारागिरांनी शहाजहांचे हे संगमरवरी स्वप्न प्रत्यक्षात आणले त्यांनीही आपल्या आयुष्यात प्रेमनगरीत कधी ना कधी वास्तव्य केलेच असेल. त्यांच्या प्रेमाचे स्मारक कोठे आहे? ह्यांच्या मजारवर कुणी दिवा तरी लावते का? हा त्याचा सवाल काळजात घर करून गेला.

      मेरे मेहबूब! उन्हे भी तो

      मोहब्बत होगी,

      जिनकी सन्नाईने बख्शी है

      इसे शकले-जमील।

      उनके प्यारो के मकाबिर रहे बे-नामो-नमूद,

      आज तक उनपे जलाई न किसीने कंदील।

साहीर खरेच अफलातून कवी होता. त्याचीही एक नज्म पुन्हा त्याचे वेगळेपण दर्शवून जाते. मेहबुबा भेटली की कोणाच्या चित्रवृत्ती फुलून याव्यात. नव्हे ते नैसर्गिकच आहे पण याचे सगळेच जगा वेगळे.

      चंद कलिया निशात की चुनकर

      मुद्दतो महरे-यास रहता हूँ

      तेरा मिलना खुशी की बात सही

      तुझसे मिलकर उदास रहता हूँ।

एकीकडे असं लिहितांनाच साहीरने जेव्हा चित्रपट गीतकार म्हणजून ‘बाजी’त ‘अपने पे भरोसा है तो दाव लगा ले’ असं गीता दत्तच्या आवाजात ठणकावुन सांगितले असले तरी कुठे तरी त्याला उचित असावे. ‘फनकार’ या शीर्षकाखाली केलेल्या एका रचनेत म्हणूनच तो म्हणतो की, ‘मैने जो गीत तेरे प्यार की खातिर लिखे आज उन गीतों की बाजार मे ले आया हूँ।’

सचिन देव बर्मन यांचे संगीत लाभलेल्या ‘बाजी’द्वारे साहीरने चित्रपटासाठी गीतलेखन करण्याची बाजी जिंकली अन्‌ पुढचे जवळपास एक तप तो मग तमाम रसिकांच्या भाव जीवनात वादळे उठवीत राहिला. साहीरचा आशावाद तरूणाईच्या त्या काळात अगदी आपला वाटायचा. हा माणूस नेमके आपल्या मनातले भाव कसे शब्दात पकडतो याचे अप्रूप वाटायचे. ‘रात भर का मेहमाँ अंधेरा किसके रोके रूका है सवेरा’ असा दुर्दम आशावाद त्याची लेखणी ‘सोने की चिडीया’त प्रकट करायची तर ‘फिर सुबह होगी’ ही आस जागवायची.

      जिस सुबह की खातिर जुग-जुग से हम

      भरभरकर …..है

      जिस सुबह के अमृत की धुन मे हम

      जहर के प्याले पिते है

      इन भुकी प्यासी रूहो पर इक दिन तो

      करम फर्मापूजी

      वो सुबह कभी तो आयेगी

 ‘बाजी’ पाठोपाठ देवानंदचा ‘जाल’ आला आणि त्या जाळ्यात प्रेक्षक स्वतःहून गुरफटते. ‘ये रात, ये चांदनी फिर कहह्र-ं सुन जा ादिल की दास्ताँ’ हे हेमंतदाच्या धीर-गंभीर आवाजातले गाणे कानसेनाना जीवन गाणेच वाटले.

      पेडो की शाखो पे सोई सोई चांदणी

      तेरे खयालो मे खोई चांदनी

      और थोडी देर मे थक के लौट जाएगी

      रात ये बहार की फिर कभी न आयेगी

      दो चार पल और है ये समाँ

      सुन जा दिल की दास्ताँ!

      असे टिपूर चांदण्याचे मनोहारी आणि अतिशय तरल वर्णन साहीर लिहून जातो तेव्हा तमाम रसिकांतर्फे त्याला सलाम करावा वाटतो. याच ‘जाल’मध्ये ‘पिघला है सोना दूर गगनपर, फैल रहे है शाम के साये’ हे लताबार्इंच्या आवाजातले गाणेही त्याच जातकुळीतले आहे. बावनकशी शब्दरचना कशाला म्हणतात त्याचाच हा नमुना होय. एखादा चित्रकार ब्रशच्या एका फटकाऱ्याने कॅनव्हासवर जसे सहज चित्र रेखाटून जातो अगदी तसाच निसर्ग चित्रांची सगळी अदा साहीर आपल्या शब्दकळेद्वारे साकार करायचा. ‘पर्वते के पेडो पर शाम का बसेरा है… सुरमई उजाला है, चम्पई अंधेरा है’ हे लाजवाबच होते.

Sahir at song recording with Music Director Ravi, Lata and Usha Mangeshkar
Sahir at song recording with Music Director Ravi, Lata and Usha Mangeshkar

      साहीरच्या नसानसांत कविता भरलेली होती. स्त्री जातीचे दुःख व्यक्त करताना ‘औरत ने जनम दिया मर्दो को, मर्दो ने उसे बाजार दिया’ हे तो परखडपणे लिहून जायचा. ‘टॅक्सी ड्रायव्हर’ मधले ‘जाये तो जाये कहाँ समझेगा कौन यहाँ’ हे तलतच उदास हळवं गीत त्याकाळी आमचं अगदी लखते जिगर होत. लिहिणारा साहीर, गाणारा तलतसारखा मखमली स्वराचा बादशाह आणि ते संगीतबद्ध करणारा सचिनदा. त्रिपुराचा एकेकाळचा राजपुत्र. अशी शाही मंडळी एकत्र आल्यावर गाणे अमर होणार हे सांगायला कुडमुड्या ज्योतिषी कशाला हवा तब्बल पाच दशके उलटून गेली तरी हे गाणे आजही रसिकांच्या मनावर आपली मुद्रा कायम ठेवून आहे. ‘नौजवान’मध्ये लताचे ठंडी हवाये, ‘सजा’मधले ‘तुम न जाने किस जहाँ मे खो गये’, ‘देवदास’मधले ‘जिसे तू कबूल करले वो तोहफा कहाँ मे लाऊँ। मुनीमजी’ मधला किशोरकुमारने ‘जीवन के सफर मे राही मिलते है बिछड जाने कोज गाणी किती आठवावीत; परंतु सचिनदा-साहीर जोडीने आपलं सर्वोत्तम काम केले ते ‘प्यासा’तं.

      तंग आ चुके कशमकशे जिंदगीसे हम,

      ठुकरा न दे जहाँ को कही बेदिलीसे हम’

ही गजल ‘प्यासा’तला गुरूदत्त गातो तेव्हा अंगावर सरसरून काटा येतो. ‘जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्या मिला, जिन्हे नाज है हिंद पर वो कहाँ है।’ हा त्याचा टोकदार सवाल ही असाच अस्वस्थ करतो.

      ‘जला दो इसे, फूंक डालो ये दुनिया

      मेरे सामने से हटालो ये दुनिया

      तुम्हारी है तुम ही समझलो ये दुनिया

      ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।

      ‘प्यासा’ ही एका कवीची कथा होती. जीवन कहाणी होती. त्यातील सगळ्या रचना बारकाईने पाहिल्या तर लक्षात येते की, हा विजय म्हणजे साहीर तर नव्हे. साहीरने त्या पात्रात आपले सर्व अनुभव ओतले आहेत असेच कायम वाटत राहते. विजयचं मन आणि त्याच्या अवती-भोवतीची सामाजिक स्थिती यांचे नेमके चित्रण करायला गुरूदत्तने साहिरची योजना किती अचूक केली होती ते यावरून लक्षात येते.

      साहीरच्या शब्दांना न्याय देणारा आणखी एक संगीतकार म्हणून रौशनचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘बरसात की रात’ हे त्यांचे चित्र, मुधबालामुळे जसे देखणे झाले तसेच साहीरच्या रचनामुळेही. ‘झिनत’ मधल्या ‘आहे न भरी शिकवे न किये’ या कव्वाली नंतर ‘बरसात की रात’ मधील ‘ना तो कारवाँ की तलाश है’ या कव्वालीने तरूणांना पार खुळे करून टाकले होते. ‘ये इश्‍क इश्‍क है इश्‍क’चा गजर तरूणांना बेभान करून गेला. पावसाळ्या रात्री भिजलेल्या मधुबालाचे सौंदर्य अक्षरबद्ध करायला साहीरशिवाय कोणाची लेखणी समर्थ होती? त्याचे शब्द हे त्या रचनेत शब्द वाटत नाहीत तर चक्क डोळेच वाटतात.

      डर के बिजली से अचानक

      वो लिपटना उसका

      और फिर शर्म से बलखाके सिमटना उसका

      कभी देखी न सुनी ऐसी

      तिलिस्मात की रात

      जिंदगी भर नही भुलेंगी

      वो बरसात की रात।

      साहीरचे शब्द, रफीचा आवाज, पडद्यावर ओलीचिंब मधुबाला म्हणजे समसमा संयोगच. हा मणिकांचन योगच म्हणावा लागेल. पडद्यावर एवढे दृष्ट लागण्यासारखे लावण्य आणि लावण्यखणी शब्दकळा यांचे अद्भुत मिश्रण पुन्हा पाहावयास मिळाले नाही. ‘बरसात की रात’ म्हणून दर मौसमात रसिकांच्या अंगावर एक सुखद शिरशिरी उठवून जातो. ‘ठोकळा’ भारतभूषण आम्ही तेव्हा पडद्यावर मधुबालामुळेच सहन केला हे मान्य करायलाच हवे. साहीरची स्वतःची ‘ताजमहाल’ ही कविता निराळे भाव दर्शवते; परंतु ‘ताजमहाल’ चित्रपटासाठी लिहिताना मात्र तो ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ असंच लिहितो. ‘बाबर’ मधलं ‘तुम एकबार मुहब्बत को इम्तेहान तो लो’, ‘बहुबेगम’साठी ‘हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक’ आदी मुस्लिम पार्श्‍वभूमी लाभलेल्या चित्रपटासाठी साहीर आपली उर्दू शब्दकळा भरभरून वापरतो; परंतु याच साहीरने ‘चित्रलेखा’ साठी ‘संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे’ आणि ‘मन रे तू काहे न धीर धरे’ अशी अभिजात हिन्दीतील रचनाही तेवढ्याच समर्थपणे सादर केली. ‘चंद्रकांता’ मधले ‘मै ने चांद और सितारो की तमन्ना की थी मुझको रातो की सियाही के सिवा कुछ ना मिला’ हे गाणे आम्ही कॉलेज जीवनात हॉटेलमध्ये बसून खूप तन्मयतेने ऐकत असू. ओ.पी. नय्यरच्या ‘नया दौर’साठी त्याने ‘साथी हात बढाना, माँग के साथ तुम्हारा मैने माँग लिया संसार’ (त्यातील टांग्याच्या घोड्याच्या टापा आजही कानात घर करून आहेत) ‘आना है तो आ’ आणि तारूण्यातील सळसळत्या उत्साहाला आमंत्रण देणारे ‘रेशमी सलवार कुडता जाली का’, ‘रूप सहा नही जाये नखरेवाली का…’ तर आजही बेभान करते. ‘धूल का फूल’ मधले ‘तू हिन्दू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है, इन्सान बनेगा’ ही त्याची रचना त्याचे पुरोगामित्व अधोरेखित करते.

      आठवणीचे कढ अनावर होत आहेत. साहीर हे जग सोडून गेल्याला तब्बल चोवीस वर्षे उलटून गेली आहेत. अगदी तारीखवार सांगायचे तर 25 ऑक्टोबर 1980 साली तो हे जग सोडून गेला पण रसिकांसाठी त्याची शब्दकळा, काव्याच्या रूपात, चित्रपट गीतांच्या रूपात आजही अजरामर आहे. अक्षर वाङ्मयात आपले स्थान निर्माण करून तो गेला. जीवनाचे पुस्तक आपल्यासमोर ठेवून तो गेला असला तरी त्याची गाणी आनंदाच्या क्षणी, कातरवेळी सोबत करीतच राहतील.

 

***

Arvind G Vaidya
+ posts

Leave a comment