-रा . कों . खेडकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Remembering the Popular Actor of Indian Cinema Bhagwan Aabaji Palav aka Bhagwan Dada. मा. भगवान यांना जेमतेम इयत्ता चौथी पर्यंतचे शिक्षण असताना केवळ स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर स्वतः च्या प्राॅडक्शनखाली त्यांनी २८ चित्रपटांची निर्मिती केली. ४० चित्रपटाचे दिग्दर्शन केले. ५०० पेक्षा जास्त चित्रपटातून भूमिका साकारल्या.’ अलबेला ‘ हा संगीतमय सुपरहिट चित्रपट देवून त्यांनी राजकपूर, किशोर कुमार,  व्ही.शांताराम, आचार्य अत्रे, बाबूराव पटेल, अशोक कुमार, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन आदी दिग्गजांचीं प्रशंसा मिळवली. अशा ‘ अलबेला ‘ अभिनेत्याची ही जीवनगाथा……

सामान्य कुटुंबातील मा. भगवान पालव फारसे शिकलेले नव्हते. १ आॅगस्ट १९१३ साली त्यांचा मुंबईत जन्म झाला. वडील खाजगी कंपनीत नोकरीला असल्याने परिस्थिती बेताची होती. घरी पैलवान माहोल होता. व्यायाम करून शरीर कमवणं, कुस्ती खेळणं हा त्यांचा पिढीजात छंद होता. आपल्या मुलानेही घराचा पारंपारिक छंद जोपासावा असं वडीलांनां वाटे परंतु भगवानचे लक्ष ना शाळेत होते ना पैलवानकीत. वडील काम सांभाळून फावल्या वेळात नाटक कंपनीसाठी छोटी मोठी कामं करीत. घरात नाट्यकलाकारांचीं ये जा असायची. त्यांच्या येण्याजाण्याने भगवानची त्यांच्याशी ओळख झालेली. ही नाट्यकर्मी आपल्या नाटकांचें पास भगवानच्या घरी द्यायचे. भगवानने या संधीचा फायदा उठवत कित्येक नाटकं पाहिली. भगवान संवेदनशील असल्याने त्यांना नाटक आणि चित्रपट जवळचे वाटायचे…पैलवानकी पेक्षा कलाक्षेत्र त्यांना मनापासून आवडायचं.  किशोरावस्थेत त्यांनां नाटकासोबत इंग्रजी चित्रपट पाहण्याचा छंद जडला. इंग्रजी चित्रपटातले साहसी प्रसंग, हाणामारीची शैली, घोडेस्वारी, तलवारबाजी त्यांना विशेष आवडे. पडद्यावरील नायकात ते स्वतः ला पाहतं. आपणही असे टाळ्या घेणारे स्टंट करावेत, मारधाड करावी , लोकांना हसवावे ,त्यांचें मनोरंजन करावे , सामान्य माणसाचे दुःख घटकाभर विसरायला भाग पाडावे अशा स्वप्नांचे इमले ते रचायचे . चित्रपट पाहण्याचा छंद उत्तरोत्तर वाढतच गेला. मा. विठ्ठल, नंदराम ही पैलवान मंडळी चित्रपटाचे नट असायचे. या नटांचा विशेष प्रभाव भगवानदादावर पडला.  चित्रपटात काम करण्याच्या वेडापायी त्यांनी अनेक स्टुडिओचे उंबरठे झिजविले, पण पदरी निराशाच पडायची. अशा वादळी अशांततेच्या दिवसात वसंतराव पैलवानाच्या  ओळखीने चित्रपटात काम मिळेल अशी आशा होती परंतु काम मिळाले नाही पण स्टुडिओतील वावर वाढला. तेथील पडेल ती कामं करता करता चित्रपटातील असंख्य तंत्राचे जुजबी ज्ञान त्यांच्या जिज्ञासूवृत्तीने अवगत केलं. एका निर्मात्याला त्यांची एका इंग्रजी चित्रपटातील विनोदवीराची अदा..अभिनय.. आवडला व महत्प्रयासाने त्यांना त्यांच्या आवडीच्या प्रांतात १९३० साली प्रवेश मिळाला. “बेवफा आशिक” चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटात पहिलं पाऊल ठेवलं. त्यातले स्टंट प्रेक्षकांना बेहद आवडले. या चित्रानंतर त्यांना थोडी प्रसिद्धी मिळाली पण कारकिर्दीला हवा तसा वेग येत नव्हता. पुढे काही महिन्यांनी त्यांना “जलन” नावाचा चित्रपट मिळाला. या चित्रपटात त्यांनी बऱ्यापैकी काम करत आपली नाममुद्रा उमटविली. या दोन चित्रपटानंतर यशाची कवाडे त्यांच्यांसाठी खुली झाली.. एव्हाना आत्मविश्वास वाढला होता. या मनोबलानंतर आपणच चित्रपट निर्मिती करावी या विचारानं उचल खाल्ली…

सन १९३५ ला बाबुरावांना घेऊन त्यांनी ” बहादुर किसान” नावाचा चित्रपट काढला. दुसऱ्या वर्षी १९३६ साली ” क्रिमिनल” पडद्यावर आणला. लेखन, दिग्दर्शन, संकलन आदी सर्व बाजू  मा. भगवान यांनीच सांभाळल्या. अल्पशा ब्रेक नंतर पैशाची जुळवा जुळव करून त्यांनी ” जय गौरी”,  “वनमोहीनी “सारखे इतर भाषेतले चित्रपट काढले. दोन्ही चित्रपटांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. चित्रनिर्मितलं सातत्य राहावं म्हणून त्यांनी हे दोन्ही चित्रपट केले परंतु त्यांचं खरं प्रेम हिंदी चित्रपटांवर होतं. १९३८ साली भावाच्या आग्रहाखातर त्यांनी “सुखी जीवन” चित्रपट केला. या चित्रपटापासूनच त्यांचं सुखी जीवन सुरू झालं , असं म्हणावयास हरकत नाही. या चित्रपटसृष्टीने त्यांना अमाप पैसा, प्रतिष्ठा मिळवून दिली. पुरेसा आत्मविश्वास  नि आर्थिक बाळाच्या जोरावर त्यांनी १९४२ साली स्वतःची भगवान प्रोडक्शन ही कंपनी काढली. या होम प्रोडक्शन द्वारे त्यांनी सलग सहा- सात चित्रपट काढले. चित्रपटांच्या निर्मितीनंतर “जागृती “नावाचा स्टुडिओ उभारला. सारं काही व्यवस्थित सुरू होतं. भरभराटीचे दिवस होते. याच काळात “भेदी बंगला” नामक सस्पेन्स चित्रपट काढून त्यांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. “भेदी बंगला” चित्रपटापासून राज कपूर आणि भगवान दादाचे वाद संवाद व्हायचे. राज कपूर कधी चिमटे काढायचे तर कधी हृदयापासून मौलिक सल्ले द्यायचे. दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून वावरायचे.  मा. भगवान यांचे चित्रपट खास करून स्लम एरियात लागायचे. येथील प्रेक्षकांना भगवान दादाचे चित्रपट आवडायचे कारण त्या चित्रपटात उपेक्षितांचे वास्तव दर्शन असायचं. उच्चभ्रू वस्तीत भगवान दादाच्या चित्रपटाला मागणी नसायची. मा. भगवान दादाला आपले कच्चे दुवे लक्षात आले. आपला चित्रपट उच्चभ्रू लोकांनीही स्वीकारावा असं त्यांना मनोमन वाटायचं पण योग काही जुळून येत नव्हता. राज कपूरचे टोमणे आणि सी. रामचंद्र यांची मोलाची साथ यातून अजरामर असा”अलबेला ” चित्रपट आला अन् भारतीय चित्रपटाच्या इतिहासात सन १९५० रोजी एक सुवर्णपान अवतरलं. भगवान दादा, गीता बाली, सी. रामचंद्र, मोहम्मद रफी, लता मंगेशकर या दिग्गजांच्या परीशस्पर्शाने ” अलबेला ” या सुपरहिट संगीतमय चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घालत इतिहास रचला . ” भोली सुरत दिल के खोटे” , ” श्याम ढले खिडकी तले”  या गाण्यांनी अख्खा भारत भगवान दादाच्या ठेक्यावर नाचायला लागला. भगवान दादा आता सेलिब्रिटी म्हणून नावारूपाला येत होते. अपेक्षेपेक्षा जास्त पैसा हाती आल्यावर त्यांची जीवनशैली बदलली. चेंबूरला स्वतःचा” जागृती” स्टुडिओ,  एक आलिशान बंगला, सेवेला चार चाकी सहा गाड्या. सारं जीवन ऐश्वर्या संपन्न झालेलं. म्हणतात ना… भगवान देता है तो छप्पर फाडके… इथे साक्षात भगवान ने भूतलावरील भगवानला सहस्त्र हाताने भरभरून दिलं होतं.

मा. भगवान यांनी सी. रामचंद्र यांना” सुखी जीवन” चित्रपटाद्वारे पहिली संधी दिली. भूमिकेशी एकरूप होऊन ती व्यक्तिरेखा साकारायची. आपला अभिनय जिवंत वाटावा या इच्छाशक्तीतून त्यांनी ललिता पवारच्या तोंडावर सणसणीत थप्पड मारली. या शॉर्ट मुळे ललिता पवार यांच्या डोळ्याला कायमची दुखापत झाली… अखेर पर्यंत ती तशीच होती.

मा. भगवान यांनी हिंदीसह मराठी , तामिळ, भोजपुरी, पंजाबी, सिलोनी चित्रपटात काम करून भाषा वैविध्य जपत अखिल भारतात ओळख निर्माण केली . व्हि. शांताराम हे मा. भगवान दादाचे आदर्श होते. त्यांच्या दिग्दर्शनाची शैली भगवान दादांना खूप आवडे. किशोरकुमारांच्या आग्रहाखातर १९५६ साली ” भागमभाग ” चित्रपटाची निर्मिती केली गेली. त्यात किशोर कुमार, शशिकला यांनी अभिनय केला.

मराठीत दादा कोंडके आणि सुषमा शिरोमणी यांनी भगवान दादांना सन्मानाने वागवून त्यांच्या नृत्याचा सुयोग्य वापर केला. गीता बाली ते श्रीदेवी सारख्या आघाडीच्या नायीकांच्या गाण्यात भगवानदादा ने सप्तरंग भरले.

यश सहजासहजी मिळत नाही. मिळालं तर टिकवून ठेवणं त्याहून अवघड. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. मावळत्या दिनकराची त्यांना तमा नसते. प्रेक्षकांची अभिरुची बदलली…भगवान दादाच्या चित्रपटाकडे प्रेक्षक पाठ फिरवू लागले… पैशाची कमतरता भासू लागली… सततचं आजारपण, चलतीच्या काळातल्या काही वाईट सवयी यामुळे त्यांचं आर्थिक गणित बिघडलं… प्रशस्त बंगला, गाड्या विकाव्या लागल्या… अभिनेत्यापासून सुरू झालेला प्रवास फक्त गाण्यातील काही सेकंदापूरता मर्यादित झाला… ज्यांना पडत्या काळात मदत केली त्यांनीही बिकट परिस्थितीत मदतीचा दिला नाही… आयुष्याच्या सायंकाळी त्यांनी सामान्य माणसासारखे दिवस व्यतित केले… उच्च शिक्षित असते तर पैशाचं जीवनाचं योग्य व्यवस्थापन करता आलं असतं… परिणामी उतरत्या काळातले दिवसही मजेत गेले असते… गरिबी, श्रीमंती, सेलिब्रिटीपण अनुभवलेले भगवान दादा आयुष्याच्या पडद्यावर खूप काही शिकले..

आपल्याच वर्तनाचा त्यांना शेवटी शेवटी पश्चाताप होत राहिला… आपल्या अजरामर ठेक्याने बिगबी अमिताभ बच्चन पासून गोविंदापर्यंतच्या बड्या अभिनेत्यांना वेड लावणाऱ्या या ” अलबेला ” अभिनेत्याने..” दर्द जवानीका सताये बढ..बढके..” म्हणत ४ फेब्रुवारी २००२ रोजी या भूतलावरून निवृत्ती घेतली…

हिंदी चित्रपटाच्या गोल्डन इरा काळातील इतर दर्जेदार लेखांसाठी क्लिक करा 

 

R.K.Khedkar
R.K. Khedkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.