– मंगला भोगले

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

मैं नाचू चांद सितारों पर, शोलों पर और शरारों पर…….. हम ऐसी कला के दीवाने छा जाए नशीली बहारों पर…..छा जाए नशीली बहारों पर………..ती सिने रसिकांची ‘जानेमन ‘ होती. तीने बेभान होऊन नाचावे, मायबाप प्रेक्षकांनी नोटा घेऊन तिकीटांच्या खिडक्यांवर झुंबड उडवावी. ‘तुम संग प्रीत लगायी रसिया मैंने (नयी दिल्ली – १९५६) आणि ‘अरे कोई जाओ री पिया को बुलाओ री ‘ (पटरानी – १९५६) या संगीतकार शंकर जयकिशन च्या बेफाम गाण्यांवर ती दिलफेक नाचली. कधी ती ‘जादुगर सैंय्या छोडो मोरी बैंय्या (नागिन १९५४) म्हणत डोलू लागली तर ‘बागड बम बम बाजे डमरू नाच रे मयूर ‘ (कठपुतली – १९५७) करीत पिसारा फुलवू लागली. गंगा जमुना ( १९६१ ) मध्ये ती म्हणते देखिल —– खूब नचाओ हमको, नाचे धन्नो और दुनिया तमाशा देखे………खरोखरच धन्नो बेफाम नाचली आणि आपल्या अदाकारीने सर्व रसिकांना घायाळ करून गेली. मोठे डोळे, गोल बोलका चेहरा, मंजूळ बोलणे, अभिनयाची उत्तम समज व जाण, पायात भिंगरी घेऊन नाचता नाचता तिने अभिनयाचे शिखर कधी पादाक्रांत केले ते कळलेच नाही. हि अदाकारा कोण असावी याचा अंदाज रसिक प्रेक्षकांना आला असेलच ?? जी हां…. First Female Superstar Of Indian Cinema.. वैजयंती माला…एक खुबसूरत अदाकारा, देखणी नृत्यांगना. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी तामिळ सिनेसृष्टीत पदार्पण करणारी वैजयंती माला १३ ऑगस्टला आपला ८५ वा जन्म दिवस साजरा करत आहे. आपल्या तमाम सिने रसिकांकडून मनःपूर्वक शुभेच्छा …. (Legendary Actress of Golden Era of Hindi Cinema Vyjayanthimala)

वैजयंती माला चा जन्म १३ ऑगस्ट १९३६ साली तामिळ अय्यंगार ब्राह्मण कुटुंबात झाला. तिचे वडिल श्री मध्यंमधती रामन आणि आई वसुंधरा देवी. वैजयंती मालाचा सांभाळ मात्र तिची आजी यदुगिरी देवी ने केला. अभिनेत्री झाल्यावर तिचे सर्व व्यवहार आजीच सांभाळत असे. अभिनयाचा वारसा वैजयंती मालाला तिच्या आईकडून मिळाला. तिची आई ४० च्या दशकात तामिळ सिनेसृष्टीत गाजलेली अभिनेत्री होती. वयाच्या ७ व्या वर्षी वैजयंती माला ने रोम मध्ये पोप पाॅल यांच्या समोर आपला पहिला शास्त्रीय नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर केला आणि पुढे करतच राहिली.

वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी ‘वझकई’ या तामिळ सिनेमात तिने काम केले. नंतर याचाच रिमेक तेलगु भाषेत झाला. दाक्षिणात्य सिनेमात आपल्या नृत्यकौशल्याने ती लोकप्रिय झाली. तिचे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण ‘बहार’ (१९५१ ) या सिनेमा द्वारे झाले. याचे पटकथा लेखक होते राजेंद्र कृष्ण, त्यांच्या सल्ल्यानुसार वैजयंती माला ने आपले हिंदी उच्चार सुधारायला हिंदी शिक्षक नेमला यामुळे तिचे हिंदी उच्चार कायम निर्दोष राहिले.

‘बहार’ सिनेमात करण दीवान सोबत ‘सैंय्या दिल में आना रे, आके फिर ना जाना रे, छम छम छम’ या शमशाद बेगम च्या गीतावर ती सहज डोलून गेली. तिच्या थिरकत्या पावलांनी तिला ‘Twinkle Toes’ या पुरस्काराने सम्मानित केले. ‘बहार’ नंतर १९५४ साली आलेल्या ‘नागिन’ या सिनेमाने वैजयंती मालाला हिंदी सिनेसृष्टीत मानाचे स्थान मिळवून दिले. हेमंतदा चे संगीत दिग्दर्शन आणि राजेंद्र कृष्ण यांचे बोल असलेल्या या सिनेमाने तब्बल १३ अविस्मरणीय गाणी दिली. १९५५ साली आलेला बिमल राॅय दिग्दर्शित दिलिप कुमार, वैजयंती माला, सुचित्रा सेन अभिनित ‘देवदास’ सिनेमा …..संगीतकार सचिन देव बर्मन आणि गीतकार साहिर लुधियानवी ह्या द्वयीने अतिशय अजरामर अशी गीते ह्या सिनेमातून दिली.

‘वो ना आएंगे पलटकर, जिन्हें लाख हम बुलाए’ मुबारक बेगम यांचे हे गीत थेट काळजाला भिडते. ‘देवदास’ आता परतणार नाही हे माहित असूनही त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली चंद्रमुखी वेडया आशेवर जगते. भाबडेपणी त्याच्या वर प्रेम करत रहाते. त्याच्या प्रेमासाठी आपला पेशा बंद करून एखाद्या जोगिणी प्रमाणे जीवन व्यतीत करणारी चंद्रमुखी—— , वैजयंती माला ने ही भूमिका अक्षरशः जिवंत केली. ती जगली चंद्रमुखी बनून. परिणामस्वरूप ह्या सिनेमा ला ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळवून दिला. १९५८ मध्ये वैजयंती माला आपल्या अभिनय क्षेत्रात परमशिखरावर होती.

‘नया दौर ‘मधली रजनी ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ म्हणत अतिशय सुरेख नाचली. कठपुतली, सितारों से आगे, नज़राना, साधना, संगम, ज्वेल थिफ मधली वैजयंतीमाला अतिशय प्रभावी होती. भावनोत्कट तसेच संघर्षमय प्रसंगातील तिची अदाकारी रसिक प्रेक्षकांना मोहवून गेली, तीने सादर केलेली नृत्य गीते, ‘होठों पे ऐसी बात मैं दबा के चली आयी, मन डोले मेरा तन डोले, दैय्या रे दैय्या रे चढ़ गयो पापी बिछुआ, मैं का करू राम मुझे बुढ्ढा मिल गया आजही रसिकांच्या पसंतीची आहेत. ‘आशा’ सिनेमा तील सी. रामचंद्र यांचे संगीत दिग्दर्शन असलेले ‘इना मिना डिका ‘ हे गीत हिंदी सिनेसृष्टीतील पहिले Rock & Roll गीत. ह्या गीताला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.

वैजयंती माला ने हिंदी सिनेसृष्टीत दोन दशकं राज्य केलं. आघाडीच्या सर्व नायकांसोबत तिने काम केले. राजेंद्र कुमार, राज कुमार, सुनिल दत्त, मनोज कुमार, किशोर कुमार, उत्तम कुमार पण दिलिप कुमार, राज कपूर आणि देव आनंद सोबत तिची जोडी रसिकांनी अधिक पसंत केली. धर्मेन्द्र सारख्या पुढच्या पिढीच्या नायकाला ही तिच्या विषयी ‘देखा है तेरी आंखों में प्यार ही प्यार बेशुमार ‘वाटावं इतक रूप आणि तारूण्य तीने टिकवलं. ‘झेप’ या मराठी सिनेमाची निर्मिती तिने केली. वसंत देसाई संगीतकार असलेल्या ‘ संत सखू ‘ या मराठी नृत्य नाट्यातली तिची भूमिका ही खूप गाजली.

१९६८ मध्ये श्री चमनलाल बाली यांच्याशी वैजयंती माला विवाहबध्द झाली आणि तीने सिनेविश्व सोडले. विवाहानंतर ती चेन्नई इथे स्थायिक झाली. वैजयंती माला राजनीति आणि सिनेसृष्टीत अगदी परमोच्य शिखरावर होती पण आपल्या कलेशी, नृत्याशी मात्र ती स्वतःला वेगळं ठेवू शकली नाही. भरतनाट्यम चे कार्यक्रम ती देशात परदेशात सतत करत राहिली .

तिची नृत्य शाळा हेच तिचे सर्वस्व आहे. म्हणतात ना… काही करण्याची आपल्यात जिद्द असेल तर त्याला वयाची मर्यादा रहात नाही .. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वयाच्या ८२ व्या वर्षी वैजयंती माला ने दिमाखदार असा भरतनाट्यम चा कार्यक्रम केला, तेवढ्याच तन्मयतेने, मनोभावे आणि अदाकारी ने…..सलाम तिच्या कलेला आणि मेहनतीला …..<

वैजयंती माला म्हणजे एक सर्व गुण संपन्न कलाकार …भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात वैजयंती माला हे नाव अतिशय अभिमानाने घेतले जाते.

“मैं क्यों ना नाचू आज कहों जी मेरा जिया लहराया…..”

Mangala Bhogle
+ posts

Leave a comment