स्मृतिदिन विशेष …विनोद वीर राजेंद्रनाथ

-विवेक पुणतांबेकर 

 

विनोद वीर पोपटलाल उर्फ राजेंद्रनाथ. हिंदी सिनेमात विनोद वीरांनी एक जमाना गाजवला होता. प्रत्येकाचे वैशिष्ट्य होते. फारच थोडे असे होते की ते आपल्या फिल्मी नावाने ओळखले गेले. त्यातलेच एक राजेंद्रनाथ मल्होत्रा. त्यांचे वडील कर्तारसिंग मल्होत्रा मध्यप्रदेशातील रेवा संस्थानात इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस होते. त्यांनी एकूण तीन लग्ने केली. प्रथम पत्नीपासून एक मुलगा होता. द्वितीय पत्नीपासून प्रेमनाथ, दोन बहिणी त्यातली क्रिष्णा राज कपूरची पत्नी, यानंतर राजेंद्रनाथ चा जन्म झाला (८ जून १९३१) आणि सहाव्या दिवशी त्यांच्या आईचे निधन झाले. मग कर्तारनाथांनी तिसरा विवाह केला. मल्होत्रा (डिंपलचा सेक्रेटरी), नरेंद्र नाथ, (खलनायक), उमा (प्रेम चोप्राची पत्नी), सख्खी आणि सावत्र अशी एकूण १३ भावंडे मल्होत्रा कुटुंबात गुण्यागोविंदाने एकत्र वाढली. राजेंद्रनाथ लहानपणापासून हूड. जाडजूड असलेल्या वडिलांना मोटा मोटा म्हणून चिडवणारा. वडीलांनी हूडपणाकडे दुर्लक्ष केले. लहानपणी राजेंद्रनाथ ला मुलींसारखा नट्टापट्टा करून मुलींचे कपडे घालण्याचा शौक होता.

वडिलांची सतत बदली होत असल्याने राजेंद्रनाथ चे शालेय शिक्षण टिकमगड, जबलपूर,  रायपूर, विलासपूर, नागपूर अशा अनेक ठिकाणी झाले. शालेय शिक्षण पुर्ण केल्यावर रावी येथल्या कॉलेज मधे सायन्स साईडला राजेंद्रनाथ नी प्रवेश घेतला. इंटर सायन्स ला असताना वडिल रिटायर्ड झाले. मोठा भाऊ शंभूनाथ व्यवसायात लागला. प्रेमनाथ मुंबईला सिनेविश्वात जाण्यासाठी निघून गेला. राजेंद्रनाथ ने पण मुंबईत जायचा निश्चय केला. वडिलांच्या विरोधाला न जुमानता मुंबई चा रस्ता पकडला. साल होते १९४९. तो पर्यंत प्रेमनाथ मुंबईत स्थिरावले होते.  परळ ला के.ई.एम. हॉस्पिटलसमोर रहात होते.राजेंद्रनाथ त्यांच्या रहात.त्याच बिल्डिंगमध्ये अभिनेता किशन धवन आणि डान्स डायरेक्टर सत्यनारायण रहात होते आणि दोघेही सिनेमात काम मिळवण्यासाठी धडपड करत होते. प्रेमनाथ सह राजेंद्रनाथ पण पापाजींच्या नाटकात आणि इप्टा च्या नाटकात कामे करू लागले. प्रेमनाथ आपल्या भावासाठी शब्द निर्मात्यांकडे शब्द टाकत. अगदीच मामुली रोल राजेंद्रनाथ ला मिळू लागले.त्यांनापहिला  ब्रेक एच.एस.रावल च्या पतंगा सिनेमात मिळाला. राजेंद्र नाथांचे स्ट्रगल सुरु होते. प्रेमनाथ चे मधुबाला बरोबर अफेयर सुरु होते. पण ती एकाच वेळी दिलिपकुमार आणि आपल्याला खेळवते आहे हे लक्षात आल्यावर प्रेमनाथ बाजूला झाले. या नंतर प्रेमनाथनी बीना रॉय बरोबर लग्न केले. बीना रॉयनी राजेंद्र नाथला ममतेने वागवले. एके दिवशी प्रेमनाथचे डोके सणकले आणि त्यांनी राजेंद्रनाथ ला घरातून हाकलले. बीना भाभीला खूप वाईट वाटले. पण नाईलाज होता. घर सोडायच्या काही रक्कम गुपचुप राजेंद्रनाथ ला दिली. त्यातूनच त्यांनी एक सेकंड हँंड स्कूटर घेतली. प्रेमनाथ च्या फिल्म कंपनीचे ऑफिस शिवाजी पार्क ला होते. तिथे राजेंद्रनाथ नी आपला मुक्काम हलवला.

comedian rajendranath with rajendra kumar

कडकी सुरु झाली. जेवणाची सोय करायची कशी?? यावर पण राजेंद्रनाथना एक युक्ती सुचली. आठवडाभराचे टाईमटेबल तयार केले. ओळखीच्यांची नावे लिहून ब्रेकफास्ट, लंच, डिनर असे टाईमटेबल आखून त्या त्या वेळी त्या त्या माणसांकडे जाऊन आपला अन्नाचा प्रश्न त्यांनी सोडवला.  २८ माणसांना ऊल्लू बनवून जेवण, चहा नाश्ता उकळले. फक्त आपल्याला पोसणारी मंडळी किमान पंधरा दिवस रिपीट होणार नाहीत याची दक्षता घेतली. यश जोहर पण स्ट्रगल करत होता. त्याच्याच पैशाने पेट्रोल भरुन त्याला लिफ्ट देण्याचे काम पण राजेंद्र नाथ करत. पेट्रोल संपले की ट्राम मधून भटकंती करताना एकाच तिकीटांवर अनेक वेळा प्रवास करणे, डबलडेकर बसमधे तिकीट न काढता प्रवास करणे. ओळखीच्या माणसाला मी सिनेमा साईन केला आहे अशी थाप मारून पैसे उकळून ५-६ महिने त्याला तोंडच न दाखवणे असे आचरट उद्योग सुरुच असत. पैसे बुडवणे हा हेतु नसे. (तसे बुडवले पण नाहीत). पण परिस्थितीच तशी होती. त्यामुळे नाईलाज होता. जशी राजेंद्रनाथ ची परिस्थिती होती तशीच शम्मी कपूर ची होती. या दोघांची मैत्री होती. पर्शियन बेकरीत हे दोघे जात. पैसेच नसायचे. मग हे दोघे मोठमोठ्या आवाजात ओरडत. जरा वेळाने राजकपूर, प्रेमनाथ इथे येणार आहेत. लोक जमा होत आणि विचारत तुम्हाला कसे माहीत?? मग शम्मी कपूर सांगायचे मी राजकपूर चा भाऊ आणि राजेंद्रनाथ सांगायचे मी प्रेमनाथ चा भाऊ. लोक त्यांना वेगवेगळ्या डिश ऑफर करत. त्याचा मनसोक्त आस्वाद घेऊन अजून कसे राजकपूर, प्रेमनाथ आले नाहीत असे सांगून फोन करायच्या निमित्ताने सटकून जात. शंभर वेळा तरी ही युक्ति या दोघांनी वापरली.

comedian rajendra nath with shammi kapoor
Comedian Rajendra Nath with Shammi Kapoor

ऑपेरा हाऊसवर जातला हे दोघे लिफ्ट मागत. एकदा एका डॉक्टरांनी लिफ्ट दिली तर त्यांचे सामान शम्मी ने पळवून आणले. फक्त धमाल करायची एव्हढाच उद्देश या आचरटपणात होता. हळूहळू साईड हिरो ची कामे राजेंद्रनाथ ला मिळत गेली. आपच कधीच हिरो बनू शकणार नाही याची जाणीव त्यांना झाली. आय.एस.जोहर ने राजेंद्रनाथ मधले टँलंट ओळखले आणि हम सब चोर है मधली विनोदी भुमिका त्यांना दिली. यानंतर एच.एस रवेलच्या शरारत मधे रोल मिळाला. शम्मी कपूरमुळे फिल्मालय संस्थेत राजेंद्रनाथ ची एंट्री झाली. नासिर हुसेन दिग्दर्शित दिल देके देखो सिनेमात त्यांना काम मिळाल. या कामाचे खूप कौतुक झाला. बिमल रॉयनी उसने कहा था सिनेमात येत रोल दिला. १९६१ साली नासिर हुसेन नी जब प्यार किसीसे होता है साठी त्यांना बोलावले. या दोघांनी मिळून पोपटलाल हे पात्र निर्माण केले. गेटअप ठरवला. हा सिनेमा सुपरहिट झाला. हा सिनेमा राजेंद्रनाथ साठी माईलस्टोन ठरला. ही भुमिका इतकी लोकप्रिय झाली की इतर निर्माते त्यांना बोलवायला लागले. दिल देके देखो आणि जब प्यार किसीसे होता है साठी प्रत्येकी अडीच हजार रुपये मानधन मिळाले. हे दोन्ही सिनेमे यशस्वी झाल्यावर त्यांचा रेट वाढला आणि प्रत्येक सिनेमाला दहा हजार रुपये त्यांना मिळायला लागले. नासीर हुसैन चे ते लाडके विनोदी नट बनले. फिर वोही दिल लाया हूं, लाटसाब, जवां मोहोब्बत, जानवर या सिनेमात शम्मीकपूर नी राजेंद्रनाथ ची शिफारस केली. स्टार बनल्यावर पण शम्मी कपूर त्यांना विसरले नाहीत.

पहाता पहाता राजेंद्रनाथ आधाडीचे विनोदवीर बनले आणि त्यांचे मानधन एक लाख रुपयै झाले. यानंतर राजकपूर, शशीकपूर, पासून अनेक दिग्गज कलाकारां बरोबर तसेच अनेक नामवंत दिग्दर्शकांच्या हाताखाली राजेंद्रनाथ नी भुमिका केल्या. कधीही कोणत्याही आधीच्या विनोदवीराची कॉपी केली नाही. जॉनी वॉकर प्रमाणे स्वतः ची स्टाईल निर्माण केली. स्वतः चे कपडे स्वतः डिझाइन करत. कधीही आपले म्हणणे दिग्दर्शकावर थोपवले नाही. अनेकदा ते आपले संवाद स्वतः लिहीत. त्यांच्यावर लॉरेल हार्डी, चार्ली चँप्लिन आणि पीटर सेलर्स चा प्रभाव होता. त्यांनी कुठल्याही स्री कलाकारासह जोडी जमवली नाही. चरित्र अभिनेता धुमाळ यांच्या बरोबर जास्तीत जास्त कामे केली. या जोडीला अनेक निर्मात्यांनी रिपीट केले. कधीच द्विअर्थी संवाद म्हणले नाही. (© विवेक पुणतांबेकर) चेहरा, बावळट भाव आणि थोडा आचरटपणा हेच त्यांचे भांडवल होते. सिनेविश्वात स्थिरावल्यावर १९६९ साली त्यांच्या आयुष्यात आली गुलू. दोघांच्या वयात २१ वर्षाचे अंतर होते. या साठी गुलूच्या घरून विरोध होता. तरीही दोघांनी लग्न केले. गुलूची आई सहा महिने बोलत नव्हती. कालांतराने विरोध मावळला. गुलू बरोबरचा त्यांचा संसार सुखद झाला. मोठा मुलगा युवराज ब्रिटिश एयरवेज मधे नोकरी करायचा. मुलगी राखी कॉम्प्युटर डिझायनर आहे.

comedian rajendra nath

गंमत म्हणजे राजेंद्रनाथ झुरळाला फार घाबरायचे. बंधन सिनेमात हातावर झुरळ फिरते असा शॉट घ्यायचा होता. इतके घाबरले की आठवडाभर झोपले नाहीत. १९७० पासून सिनेविश्वातले वातावरण बदलायला लागले. ब्लँक अँंड व्हाईट जमान्यात सर्व कलाकार, तंत्रज्ञ एकमेकांशी मिळून मिसळून रहात. रंगीत जमन्यात जास्त व्यावसायिकपणा आला. सहकलाकारांना ताटकळत ठेवण्याची सुरुवात झाली. भुमिका सांगितली एक आणि प्रत्यक्षात वेगळीच पडद्यावर यायची. एडिट होऊन रोल कमी करणे, पैसे बुडवणे या प्रकाराला राजेंद्रनाथ विटून गेले. १९७५ साली सिने निर्मितीत उतरले पण सिनेमा अर्धवट सोडावा लागला. सुनील दत्त आणि नर्गिस ने जवानांसाठी केलेल्या स्टेज शो मधे ते परत पोपटलाल च्या भुमिकेत आले. मग मनहर उदास बरोबर देशात तसे विदेशात दौरे करत फिरले. यातून त्यांचे नैराश्य कमी झाले.

९० च्या दशकात हम पाँच मालिकेत ते पुन्हा पोपटलाल बनले. अतिरेक होऊ नये म्हणून मालिकेतून बाहेर पडले. फौजी मालिकेत शहारूख खान बरोबर त्यांनी काम केले. राज कपूर च्या प्रेमरोग आणि बीवी ओ बीवी मधे त्यांना काम करायची संधी मिळाली. दोनशे सिनेमात कामे करूनही फार अवॉर्डस पण मिळाली नाहीत. त्याचा कधीच लोभ धरला नाही. फिल्म तीन बहूरानीयाँ , होली आयी रे आणि जब प्यार किसीसे होता है मधल्या त्यांच्या भुमिका विसरणे केवळ अशक्यच. ७५ वर्षाचे आयुष्य लाभून १३ फेब्रुवारी २००८ ला राजेंद्रनाथ आपल्यातून गेले. राजेंद्रनाथ हे नाव प्रेक्षकांच्या लक्षात रहावे ही त्यांची अंतिम इच्छा होती.

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.