– प्रदिप भिडे, मुंबई 

‘‘खलनायकांची भूमिका रंगवताना तो त्यात इतका रमून जायचा की अनेकदा तो ‘जिवंत खलनायकच वाटायचा. त्यामुळे चित्रपटगृहातील प्रेक्षक त्याच्या नावाने बोटे मोडायचे. महिला प्रेक्षकवर्ग तर तो पडद्यावर दिसला की त्याला शिव्या द्यायच्या. परंतु तोच प्रेक्षकवर्ग सुरूवातीच्या श्रेय नामावलीत अगदी शेवटी ‘…. आणि प्राण’ असे जेंव्हा पडद्यावर नाव यायचे त्यावेळी टाळ्या वाजायच्या. प्रेक्षकांच्या हृदयात आपले अढळ स्थान निर्माण करणारा हा खलनायक म्हणजे प्राण (Actor Pran). कारण त्याच्या नसानताच अभिनयाचा प्राण भरलेला होता.’’ (Remembering the Legendary Actor of Hindi Cinema Pran)

अभिनेता जन्मावा लागतो असं म्हणतात. प्राण सिंकद हा तसा होता. साडेतीनशेहून जास्त चित्रपटातून एखाद्या हिरोच्या दिमाखात त्यानं लक्षावधी रसिकांची दिलं काबीज केली होती. हिरो-हिरॉइनच्या मार्गात एखाद्या पहाडासारखं उभं राहून तो त्यांच्या प्रेमाशी टक्कर द्यायचा. प्राण होता म्हणून त्यांच्या प्रेमातलं नाट्य गडद व्हायचं, प्राण होता म्हणून तो हिरो तिथं होता. प्रसंगी प्राणच्या सगळ्या दुर्गुणांकडं दुर्लक्ष करून वेळ पडल्यास हिरॉईननं प्राणच्या गळ्यातही वरमाला घालायचा कमी केलं नसतं इतका तो राजबिंडा होता. रूबाबदार होता. त्याच्याकडं आवाजाची जादू आणि जोडीला स्टाईल होती. हिरॉईनला प्राणच्या खर्‍या रूपाचं दर्शन होण्यापूर्वी तो ज्या पद्धतीनं तिच्याशी प्रेमाची ‘मस्का पॉलिशी’ करायचा ते अफलातून असायचं. म्हणून तर चित्रपटांच्या अभिनेत्यांच्या नामावळीत दिलीप-वैजयंती, शम्मी-शर्मिला, देव-हेमा यांच्यानंतर ‘आणि …प्राण’ असायचा.

Actor Pran

दिलीपकुमार माझं दैवत आहे. पण माझ्या या भावनेपोटी मी ‘राम और शाम’ पस्तीस वेळा पाहिला नाही. मी तो सिनेमा इतक्या वेळा पाहिला तो, काळीज चिरत जाणारा आवाज आणि चेहेर्‍यावर छद्मी भाव घेऊन हातातल्या आसुडानं रामच्या अंगावर निर्दयी फटके मारणार्‍या प्राणसाठी. प्राण होता म्हणून रामच्या यातना मनाला भयभीत करून गेल्या. प्राण होता म्हणून शामच्या जिगरबाजीनं अंगावर रोमाचं उभे राहिले. १९३८ साली सिमल्याच्या रामलीलेचा प्रयोग जर एखाद्यानं पाहिला असता तर मात्र प्राणचं मी जे काही वर्णन केलंय त्यावर कुणी विश्‍वासच ठेवला नसता. कारण रामच्या भूमिकेत मदनपुरी होते आणि सीतेची भुमिका प्राण यांनी केली होती. दिल्लीला जन्मलेले प्राण स्वातंत्र्यपूर्व काळात फोटोग्राफीचा षौक पुरा करायला लाहोरमध्ये जातात काय आणि तिथं एका पानाच्या ठेल्याबाहेर ज्या स्टाईलमध्ये ते पान खात उभे असतात त्यानं प्रभावित होऊन त्यांना सिनेमातली भूमिका मिळते काय? सगळंच विलक्षण होतं.

फाळणीनंतर मुंबईला आपली कर्मभूमी करणार्‍या प्राणना सुरूवातीला कुणीही भूमिका द्यायला तयार नव्हतं. पण कधी कधी नशीब टक्के टोणपे खायला भाग पाडतं. अजिबात धीर न सोडता ते प्रयत्न करत राहिले आणि त्यांना भूमिकांपाठोपाठ भूमिका मिळत गेल्या. त्यांची खलनायिका ६० ते ७० च्या दशकात इतकी बहराला गेली होती की लोकांच्या हृदयात धडकी भरायची. अनेकांनी आपल्या मुलाचं प्राण हे नाव ठेवणंही त्याचमुळे बंद केलं. प्राण यांची आणखी खासियत म्हणजे केवळ खलनायिकाचा रंग लावून ते आपलं आयुष्य जगले नाहीत. ६२ चं भारत-चीन आणि ६५ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर लाल बहादुर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’ ची ललकारी दिली. देशभक्तीपर चित्रपट बनायला सुरूवात झाली आणि त्यात अव्वल ठरला मनोजकुमार यांचा ‘उपकार’. उपकारमध्ये सुपर अव्वल ठरला प्राण यांचा मलंगचाचा. ही भूमिका प्राण यांच्या अभिनय कारकिर्दीतला टर्निंग पॉईंट ठरली. प्राण यांच्या आयुष्यातली सकारात्मक, भल्या माणसाची भूमिका, जिला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.

Actor Pran in his various roles

व्यक्तिगत आयुष्यात प्राण हे अत्यंत सहृदयी गृहस्थ होते. क्रीडाक्षेत्राची त्यांना खूप आवड होती. त्यांची स्वतःची फूटबॉल टीम होती. १९७५च्या आणीबाणीच्या काळात देव आनंद, आय. एस. जोहर आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या बरोबरीनं त्यांनी सरकारच्या दंडेलीविरूद्ध जोरदार आवाज उठवला होता. या उच्च कोटीच्या अभिनेत्याच्या मनात आपल्या प्रत्येक भूमिकेविषयी एखाद्या लहान मुलाचं कुतूहल दडलेलं असायचं. चित्रपटातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी त्यांच्या मनातलं एक विशाल दालन ते उघडून द्यायचे. त्या भूमिकेशी संवाद साधायचे. काय वेगळं करता येईल विचार करायचे. म्हणूनच ‘जिस देश मे गंगा बहती हैं’ या राजकपूर यांच्या चित्रपटात डाकूची भूमिका वठवताना त्यांचे हात सतत गळ्याकडं जायला लागले. जणू काही आपल्या हातानं त्या डाकूच्या गळ्याभोवतालचा फास आवळला जातोय हे अभावितपणे दाखवणारा आविर्भाव. राजकपूरनं त्यांना विचारलं की लकब तुम्ही का दाखवताय. प्राणनं जेंव्हा त्यामागची त्यांची भूमिका राजकपूर यांना सांगितली तेव्हा ते खूष झाले.

प्राण यांच्याविषयीच्या अनेक कहाण्या चित्रपटविश्‍वात लोकप्रिय आहेत. ‘डॉन’ या चित्रपटातल्या भूमिकेसाठी प्राण यांना अमिताभच्या मानधनाच्या तिप्पट मानधन मिळालं होतं. ‘बॉबी’ या चित्रपटाच्या वेळी राजकपूर यांची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळं प्राण यांनी फक्त एक रूपया मानधनावर त्यातली भूमिका केली होती. प्राण यांच्या अभिनय कारकिर्दीचा धावता आढावा घ्यायचं म्हटलं तरी त्यांच्या भूमिकांची व्याप्ती पाहून मन थक्क होतं. ६७ साली ‘उपकार’ मधला भल्या प्रवृत्तीचा मलंगचाचा केला त्याच वेळी ‘राम और शाम’, ‘पत्थर के सनम’ आणि ‘अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरीस’ मधले त्यांचे खलनायक लोकांना प्रचंड भावले. ६८ साली मेहमूद आणि किशोर कुमार यांच्या ‘साथीनं साधू और शैतान’ मधली बेहरूपीयाची भूमिका, तर त्याच वेळी ‘जॉनी मेरा नाम’ मधली त्यांची आगळीवेगळी भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.

सत्तरीच्या दशकात गुलझार यांच्या ‘परिचय’ मध्ये बाहेरून फणसासारखी काटेरी आणि आतून गर्‍यासारखी गोड अशी, आपल्या पोरक्या नातवंडांचा सांभाळ करणार्‍या आजोबांच्या ‘राजसाहेब’ या भूमिकेवर प्रेक्षक खूष झाले. त्याच दरम्यान अमिताभ यांच्या जंजीर मधली जिगरबाज शेरखानची भूमिकाही रसिकांना भावून गेली. ‘व्हिक्टोरिया २०३’ मध्ये तर अशोक कुमार यांच्या बरोबर तितक्याच तोडीचं काम करताना, साठी ओलांडलेले दोन अभिनेते सिनेमाचे हिरो होऊ शकतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. ‘साधू और शैतान’ आणि ‘लाखों में एक’ या चित्रपटात मेहमूदच्या बरोबरीनं त्यांनी धमाल उडवून दिली होती. प्राण यांनी इतके, चित्रपट केले की कुठल्या सिनेमात कुठली भूमिका कशी रंगवली याचे वर्णन करणं जवळजवळ अशक्यप्राय आहे.

Pran while receiving Padma Bhushan award
Pran while receiving Padma Bhushan award

अशोक कुमार आणि दिलीप कुमार हे प्राण यांचे जिगरी दोस्त. शम्मी, शशी, मनोजकुमार, किशोर, मेहमूद यांच्याबरोबरही त्यांची गाढी मैत्री होती. खलनायक ते चरित्रनायक असा अविस्मरणीय अभिनयप्रवास करणार्‍या प्राणसाहेबांची अभिनेता म्हणून ६० वर्षांची कारकीर्द झाली. त्र्याण्णव वर्षांच्या प्राणसाहेबांना अखेरीस ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर झाला आणि त्यांच्या मृत्यूपूर्वी दोनच महिने त्यांच्या घरी जाऊन तो पुरस्कार देण्याची वेळ सरकारवर आली. ज्यांच्या अभिनयाच्या झंझावातानं आणि उत्तुंग-रूबाबदार व्यक्तिमत्वानं आपण दिपून गेलो त्या प्राण साहेबांना अशा विकलांग अवस्थेत त्या पुरस्काराचा स्वीकार करताना पाहून माझी मानंही शरमेनं खाली गेली. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव सरळसरळ सांगून जात होते की हा पुरस्कार त्यांना कोण देतयं, कशासाठी देतंय हे पण त्यांना कळत नसावं. तो बेगडी आणि भावनाशून्य देखावा पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले.

आणि हे अश्रू ओघळत असताना क्षणार्धात प्राणसाहेबांच्या त्या अगणित व्यक्तिरेखा डोळ्यासमोरून जाऊ लागल्या. सिगरेट ओढण्याच्या त्यांच्या वेगवेगळ्या स्टाईल्स, बोलण्याच्या अनेक वेगवेगळ्या लकबी, आणि बंद गळ्याचा कोट घालून, दिलीप कुमारनं साकारलेल्या रामला उद्देशून घारे डोळे रोखून कडाडल्यासारखं म्हटलेलं ते वाक्य – ‘राम मरेगा. जरूर मरेगा. मगर इन कागजादपर दस्तखत करने के बाद!’ असे होते आपले प्राण – नसानसातून अभिनयाचा प्राण. सबकुछ लाजवाब!

Pradip Bhide
Pradip Bhide
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.