-डॉ.राजू पाटोदकर

 

२०२१ चा व्हॅलेंटाईन डे दोन दिवसांवर आलाय. पाश्चात्य संत व्हॅलेन्टाईन यांची आठवण म्हणून 14 फेब्रुवारी हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. प्रेमाचा संदेश देणारा हा दिवस. म्हणतात ना की, प्रेमाला भाषा नसते. अगदी खर आहे ते.आणि हो आपल्या बॉलीवूडसाठी तर प्रेम म्हणजे, काही विचारायलाच नको. अहो प्रेमाशिवाय पूर्ण होईल तो चित्रपट कसला. या चित्रपटांमध्ये दिल, दर्यादिल, दिल है के मानता नही, दिल चाहता है, दिल तो पागल है, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे अशी भन्नाट नावे असलेली चित्रपट आहेत. त्यात “दिल तो है दिल” पासून “न जाने कहॉ दिल खो गया” अशी दिलखेचक गाणी आहेत. तर यावेळी पाहुयात अशीच काही खास “दिल” ची गाणी.

 

दिल तो है दिल…

प्रेम कोणी, कधी, कोणावर, कशासाठी करावे याबद्दल बॉलीवूडमध्ये काहीच मापदंड नाहीत. असो आपल्याला काय करायचे. आता हेच पहा ना! एका चित्रपटात सिकंदर म्हणजे अमिताभ बच्चन याला राखी आवडत असते तर राखीचे प्रेम विनोद खन्नावर असते. दुसरी हिरोईन रेखा हिच्यावर मोहल्ल्यातील दादा अमजद खान जिवापाड प्रेम करत असतो. पण रेखाला अमिताभ आवडतो. तर अशा या मुकद्दर का सिकंदर चित्रपटातील हे गीत. “दिल तो है दिल, दिल का ऐतबार क्या किजिए, आ गया जो, किसी पर प्यार, क्या किजीए” या लता दिदीचा आवाज व अंजान यांच्या लेखनीतून उतरलेल्या या गीताला संगीत दिले कल्याणजी आनंदजी यांनी. एकूणच हे गीत मस्तच होते. प्रेमी युवांना चांगलेच भावलेले.

Dil To Hai Dil ...Muqaddar Ka Sikander
Dil To Hai Dil …Muqaddar Ka Sikander

 

मेरे दिल मे आज क्या है…

हे झाले त्या हिराईनच्या बाबतीत पण यश चोप्राजी निर्मित 1973 ला प्रदर्शित झालेल्या दाग या चित्रपटातील हिरो म्हणजे राजेश खन्ना तर वेगळेच म्हणत आपल्या प्रेमाचा इजहार करतो. “मेरे दिल मे आज क्या है, तु कहे तो मै बता दु” किशोरदांच्या आवाजातील हे उत्तम गीत आहे. हा चित्रपट यशजींचा असल्याने मनमोहक असे चित्रीकरण यात आलेच. आपल्या मनातील प्रेम भावना प्रेयसीला सांगण्यात गीतकार पूर्णत: यशस्वी झालेले दिसतात. अर्थातच यशजींचे चित्रपट म्हणजे प्रेम, दिल आणि निसर्गरम्य वातावरणाचे मनसोक्त दर्शन. एकूणच हा चित्रपट आणि गाणी दोन्हीही हिटच. या गीताचे गीतकार साहिर लुधियानवी तर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. यशजींच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात दिल ची गाणी आहेतच.

Mere Dil Mein Aaj Kya Hai...Daag
Mere Dil Mein Aaj Kya Hai…Daag

 

दिल क्या करे जब…

असो ज्युली या चित्रपटातील नायकाने मात्र आपल्या प्रेमाची साक्ष देण्यासाठी वेगळीच शक्कल लढविलेली दिसून येते. या चित्रपटात नायक विक्रम म्हणतो की, “दिल क्या करे जब किसीसे, किसीको प्यार हो जाये, जाने कहा कब किसीको प्यार हो जाये” क्या बात है! अत्यंत सुंदर असे हे गीत. अर्थातच किशोरदांचा आवाज आणि उत्तम चित्रीकरण यामुळे हे गीत तत्कालीन युवा वर्गाला प्रचंड भावले. त्या काळातील हॉट व हिट साँग म्हणूनही या गीताकडे पाहिले गेले. गीतकार आनंद बक्षी तर संगीतकार होते राजेश रोशन.

Dil Kya Karein...Julie
Dil Kya Karein…Julie

 

दिल विल प्यार व्यार…

अय्या..आमची ही हिरोईन मात्र चक्क या प्रेमाला वेगळ्याच शब्दात मांडते बर का. ती म्हणते की, “दिल विल प्यार व्यार, मै क्या जानु रे, जानू तो जानू बस इतना जानू की तुझे अपना जानू रे” शागिर्द या चित्रपटातील हे गीत असून सायरा बानू या अभिनेत्रीवर हे चित्रीत झालेले आहे. लता दिदींनी अतिशय सुरेखरित्या हे गीत गायले असून या गाण्यातील अय्याssss व बाकीच्याही हरकती प्रेक्षकांना आवडल्या. या गीताचे गीतकार मजरुह सुलतानपूरी असून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबध्द केले आहे. चित्रपटातील सर्वच गाणी गाजली.

Dil Vil Pyar Vyar...Shagird
Dil Vil Pyar Vyar…Shagird

 

है अपना दिल तो आवारा…

आता जर हिरोईनच अस म्हणत असेल तर हिरो तरी कसा मागे राहील. तो ही आमचा चॉकलेट हिरो! देव आनंद. त्यांनी “है अपना दिल तो आवारा, न जाने किसपे आयेंगा” या सोलवा साल चित्रपटात धमाल केली. तमाम प्रेमी युवकांना आवारा दिल सांगुन मोठी संधी दिली. ब्लॅक ॲन्ड व्हाईट असलेल्या या चित्रपटात वहिदा रहेमान, सुंदर, टुण टुण सारखे दिग्गज कलावंत होते. रेल्वेच्या बोगीत या गीताचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. हेंमत कुमार यांच्या आवाजातील या गीताचे बोल मजरूह सुलतानपुरी यांचे आहेत. संगीतकार सचिन देव बर्मन यांनी माऊथऑर्गनचा सुरेख उपयोग या गीतात केलेला दिसून येतो. देव आनंद यांच्या ज्वेल थीफ चित्रपटातील “ये दिल ना होता बेचारा, कदम ना होते आवारा” हे गीत सुध्दा युवा वर्गाच्या ओठावर अजूनही येते.

 

Hai Apna Dil to Awara...Solva Saal
Hai Apna Dil to Awara…Solva Saal

 

दिल खो गया…

दिल नावाचा एक चित्रपट 1990 ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने तमाम युवा वर्गाला अक्षरश: भारावून टाकले होते. इंद्रकुमार दिग्दर्शीत आणि आमिर खान, माधुरी अभिनीत या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या आवाज असलेले “मुझे निंद न आये, निंद न आये, मुझे चैन ना आये चैन ना आये, कोई जाये जरा ढुंढ के लाये, न जाने कहॉ दिल खो गया” हे ते ब्लॉक बास्टर गीत. हे ऐकतांना, पहातांना कळत नकळत आपणही त्यात गुंतत जातो. उत्तम चित्रीकरण, उत्तम गायन आणि त्याला साजेसा असा उत्तम अभिनय सर्वच काही जमून आल्याने आजही हे गीत तितकेच लोकप्रिय आहे.

Na Jane Kahan Dil Kho Gaya...Dil
Na Jane Kahan Dil Kho Gaya…Dil

 

दर्दे दिल, दर्दे जिगर…

प्रेमात एखाद्याचे दिल हरवले तर ते सापडेपर्यंत खुप काही घडून जाते. तर काही वेळा आपणच बदलून जातो.कर्ज चित्रपटात ऋषि कपूरने तिला पाहिल्यानंतर स्वत:त काय बदल झाला आहे हे फार छान सांगितले आहे. ” दर्दे दिल, दर्दे जिगर, दिल मे जगाया आपने, पहले तो मै शायर था, आशिक बनाया आपने” सुभाष घईंचा हा चित्रपट आहे. चित्रपट, गाणी, थिम, लोकेशन, चित्रीकरण छान भट्टी जमून आलेली होती. त्यामुळे गाणी हिट झाली. चित्रपटही हिट होताच. उपरोक्त गीत मोहम्मद रफी यांनी गायले असून गीतकार आनंद बक्षी तर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आहेत. उटीच्या निसर्गरम्य परिसरात याचे बरेच चित्रीकरण झालेले आहे.

Dard-e-dil...Karz
Dard-e-dil…Karz

 

न जाने मेरे दिल को…

जवळपास एक हजार आठवडे चालण्याचा महाविक्रम करणारा चित्रपट म्हणजे “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे”. 19 ऑक्टोंबर 1995 रोजी मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही तेथे सुरू आहे. या चित्रपटात काजोल या अभिनेत्रीवर चित्रीत झालेल लता दिदी व उदित नारायण यांच्या आवाजातील “न जाने मेरे दिल को क्या हो गया” हे एक सुपरड्युपर हिट गीत.

दिल दिवाना बिन सजना के…

दिल नंतर आणखीन एक युवा दिलो की धडकन ठरलेला चित्रपट मैने प्यार किया प्रदर्शित झाला. या चित्रपटातील हिरोईन भाग्यश्री म्हणते की, प्रेम वगैरे हे सर्व ठिक, पण ” दिल दिवाना बिन सजना के मानेना, ये पगला है, समझाने से समझे ना”. राजश्री प्रॉडक्शनचा हा चित्रपट, लता दिदींच्या आवाजाला तर तोडच नाही. सलमान व भाग्यश्रीवर अतिशय निसर्गरम्य लोकेशनवर हे गीत चित्रीत करण्यात आलेले आहे. गीतकार असद भोपाली यांचे बोल खुपच ह्दयस्पर्शी आहेत त्यास कर्णमधुर संगीताची जोड राम लक्ष्मण यांनी दिली आहे. हे गीत ऐकतांना तर आनंद मिळतोच पहाताना देखील तो द्विगुणीत होतो.

Dil Deewana...Maine Pyar Kiya
Dil Deewana…Maine Pyar Kiya

 

दिल चीज क्या है…

आता एक महत्वाचे गीत. चित्रपट-उमराव जान. साल-1981, गायिका-आशा भोसले, गीतकार-शहरयार, संगीतकार-खय्याम, दिग्दर्शक-मुझफ्फर अली आणि अभिनेत्री-रेखा. अर्थातच गीताचे बोल “दिल चीज क्या है, आप मेरी जान लिजिए, बस एक बार मेरा कहा, मान लिजिऐ”. या गीताबद्दल असे म्हणता येईल की, सर्वांनीच आपली जीव ओतून या गीताची निर्मिती केलेली आहे. म्हणूनच आजही हे गीत अतिशय लोकप्रिय असे आहे. गायिका, गीतकार, संगीतकार, कलाकार, छायाचित्रण कोणाचीही कोणाशी स्पर्धा नव्हती. प्रत्येकाने आपल्यातील दि बेस्टच देण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. वा! क्या बात है, बस एक बार आप ये गाना सुन और देख लिजिए.

Dil Cheez Kya hai...Umrao Jaan
Dil Cheez Kya hai…Umrao Jaan

बॉलीवूडमधील जवळपास प्रत्येक हिरो हिरोईनने दिल संदर्भातील गाणी केलेली आढळून येतील. प्रेम, प्रेमभंग, परत प्रेम जुळणे वगैरे वगैरे अशा शिवाय आपला हिंदी चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही. अर्थात काही अपवाद आहेत. असो यावेळी मुद्यामहून व्हॅलेंटाईन डे साठी काहीशी दिल जुळणारी गाणी निवडली. दिल तोडणे वाली पण भरपूर गाणी आहेत ती नंतर कधीतरी.. .. ..

ही काही गाणी -खास व्हॅलेन्टाईनसाठी

“दिल का हाल सुने दिलवाला, सिधी सी बात ना मिर्ची मसाला”, (श्री.420), “दिल की नजर से, नजरो की दिल से, ये बात क्या है, ये राज क्या है, कोई हमे बता दे” (अनाडी), “पल पल दिल के पास तुम रहती हो”, (ब्लॅकमेल), “दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन, (मौसम), ” दिल है के मानता नही, ये बेकरारी, क्यू हो रही है, ये जानता नही”, (दिल है के मानता नही), “दिल का आलम, मै क्या बताऊ तुझे, (आशिकी), “दिल तो पागल है, दिल दिवाना है, पहिली पहिली बार मिलाता है यही,” (दिल तो पागल है), “दिल ये दिल, दिवाना, दिवाना है ये दिल” (परदेस), “दिल मेरे तु दिवाना है, पागल है मैने माना है,” (सूर्यवंशम), ” दिल चाहता है, कभी ना बिते चमकीले दिन,” (दिल चाहता है), “दिल दा मामला है दिलबर” (हे बेबी).

…………………….

raju patodkar
Dr Raju Patodkar
+ posts

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई येथे वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती) (वर्ग-1) या पदावर कार्यरत.

शिक्षण- पीएच.डी, एम.ए., (जर्नालिझम), एम.ए., (मराठी), एम.ए., (राज्यशास्त्र), एम.ए., (समाजशास्त्र), बॅचलर इन ड्रामा, हिंदी (पंडित), जीडीसीए, बी.कॉम, बी.जे., जवळपास दोनशे मराठी, हिंदी मालिका तसेच 25 मराठी चित्रपटात अभिनय. राज्यातील विविध वर्तमान पत्रातून लेखन. जवळपास 5 हजार लेख-मुलाखती प्रकाशित.

पी.एच.डी. विषय श्री. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील सामाजिक वास्तवाचा संवाद एक चिकित्सक अभ्यास. (1975 ते 2005)

भ्रमणध्वनी क्र.- 9892108365.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.