— डॉ. राजू पाटोदकर, मुंबई.

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

लोकनाट्य,सामाजिक नाटक, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट आणि समाजसेवा अशा वेगवेगळ्या माध्यमांद्वारे आपल्या अभिनयाचा व समाजकार्याचा अमिट ठसा जनसामान्यांवर उमटविले महान कलावंत, ज्यांना आपण प्रेरणादायी कलावंत असे म्हणू शकतो. ते म्हणजे “निळूभाऊ फुले” (Actor Nilu Phule) आज १३ जुलै हा त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त स्व.निळूभाऊंना ही शब्द सुमनांजली..( One of the Finest and Popular Actor of Marathi Cinema Nilu Phule)

————————

साखर कारखाना चेअरमन, गावचे पाटील, सरपंच, पुढारी अशा टिपिकल भूमिका साकारताना निळूभाऊंनी त्या सर्व भूमिका अक्षरशः जिवंत केल्या. या भूमिका पाहताना प्रेक्षक कळत-नकळत याचे साधर्म्य असलेले आपापल्या भागातील पुढारी शोधत आणि लागले त्यांना ते दिसले देखील.म्हणूनच निळूभाऊंनी साकारलेल्या या विविध भूमिका प्रेक्षकांना जवळच्या वाटल्या. निळूभाऊंच्या उत्तुंग अशा अभिनयातून त्या प्रेक्षकांच्या मनामध्ये कायमचं घर करून राहिल्या.

“लक्ष्मी” हा रविंद्र महाजनी आणि रंजना यांच्यासोबतचा एक चित्रपट. यात निळूभाऊंनी साकारलेली साखर कारखान्याचे चेअरमन ही भूमिका मला अतिशय आवडली होती. रंजना त्यांची बहीण असते. गावच्या पाटलाचा मुलगा म्हणजे रविंद्र महाजनी हे कृषी पदवीधर होऊन गावात येतात. निळूभाऊ आपल्या बहिणीचे लग्न त्यांच्याशी ठरवतात. मग गावातील परंपरा, रीतिरिवाज जपताना पाटील मोठे? का चेअरमन मोठे? या भांडणात ते हे लग्न मोडतात. घराच्या चौकटीत येऊन जोरात ओरडतात की, हे लग्न मोडले..निळूभाऊंचा अप्रतिम असा अभिनय पहायला मिळाला. या व अशा प्रकारच्या बऱ्याच भूमिका निळूभाऊंनी आपल्या जिवंत अभिनयानं साकारल्या.

निळूभाऊंचा जन्म फुले घराण्यातला. घरची गरीबी. त्यामुळे शिक्षण अर्धवट. पुण्यातील एका आर्मी मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना माळी काम करण्याची नोकरी वयाच्या १७ व्या वर्षी मिळाली. पगार ८० रुपये महिना. गरीबीमुळे जरी शिकता आले नसले तरी शिक्षणाची आवड होती, त्यामुळे त्याकाळात ते भरपूर वाचन करत, तशातच एस. एम. जोशी, राम मनोहर लोहिया, सानेगुरुजी, जयप्रकाश नारायण यासारख्या समाज सुधारकांच्या विचारांचा पगडा त्यांच्या मनात बसला. यांच्या प्रगत विचारांनी भाऊंचे मन भारावून गेले. समाजातील अत्याचार, विविध विषमता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि ते राष्ट्र सेवादलात सामील झाले. १९५२ मध्ये पुणे राष्ट्र सेवादलाच्या कला पथकाचे प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली. या कलापथकाद्वारे पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले ‘पुढारी पाहिजे’ तसेच व्यंकटेश माडगूळकर यांचे “बिन बियांचे झाड” “कुणाचा कुणाला मेळ नाही” अशा विविध लोकनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. शंकर पाटलांचे “लवंगी मिरची कोल्हापूरची” तसेच कथा असलेल्या कांद्याची आदी राष्ट्र सेवादलाच्या कला पथकाची वगनाट्य, लोकनाट्य त्याकाळात गाजू लागली. अमृत गोरे लिखित “कथा अकलेच्या कांद्याची” या वगनाट्य चे २००० पेक्षा अधिक शो निळूभाऊंनी केले. पुढील काळातही भाऊंनी सूर्यास्त, सखाराम बाईंडर, जंगली कबूतर, लग्नाची बेडी, राजकारण गेलं चुलीत या नाटकातून आपल्या अभिनयानी रसिकांना मंत्रमुग्ध केले. राष्ट्रसेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन मोहीम, सामाजिक कृतज्ञता निधी अशा विविध माध्यमातून, नाट्य प्रयोगातून निळूभाऊ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले.

कथा अकलेच्या कांद्याची या वगनाट्याचा च्या तुफानी यशानंतर १९६८ ला अनंत माने यांनी निळूभाऊंना आपल्या “एक गाव बारा भानगडी” या चित्रपटात ‘झेले अण्णा’ या भूमिकेसाठी करारबद्ध केले. या चित्रपटाने निळूभाऊंचा रूपाने सिनेसृष्टीला एक सशक्त कलावंत दिला. १९६८ एक गाव बारा भानगडी पासून सुरू झालेला हा चित्रपट प्रवास (२००९) गोष्ट छोटी डोंगराएवढी या चित्रपटात पर्यंत झाला. या मधल्या काळात जवळपास २५० विविध चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या. सुरुवातीच्या काळातील करारी खलनायक तर पुढील काळात उत्तम असे चरित्र अभिनेते म्हणून ते गाजले. पिंजरा, फटाकडी, पुढचं पाऊल,लक्ष्मी, एक होता विदूषक, बिनकामाचा नवरा, झुंज तुझी माझी, तसेच सामना, सिंहासन, जैत रे जैत अशा कितीतरी चित्रपटांची नावे आपणास घेता येतील. मराठी चित्रपटातून करारी, कडवा खलनायक साकारताना निळूभाऊंनी केलेल्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. यातील बऱ्याच चित्रपटातून ते महिलांच्या तिरस्काराचे धनी झाले. कारण महिलांवर अन्याय अत्याचार करणारा खलनायक अशा त्या भूमिका होत्या. निळूभाऊंच्या अभिनयाची कॉपी ,नक्कल आजही अनेक नकलाकार करतात आणि त्याद्वारे निळूभाऊ साकारताना बाई वाड्यावर या… हा डायलॉग विशिष्ट लकबीने सादर करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवितात. अर्थातच या सर्व टाळ्या, प्रेक्षकांचे प्रेम हे निळूभाऊंसाठी असते. असे हे महान कलावंत भाऊ. त्यांनी कधीही आपण मोठे असल्याचा खोटा अभिमान बाळगला नाही. शेवटपर्यंत सर्वांशी ते आपलेपणाने, प्रेम भावनेनेच वागले.

नवोदितांचे पालकत्व

“झुंज तुझी माझी” या चित्रपटाचे अभिनेते तथा माजी सहसचिव एकनाथ उर्फ अनिल मोरे यांनी निळूभाऊ बद्दल बोलताना सांगितले की, निळू फुले हे प्रेरणादायी कलावंतच होते, यात काहीच दुमत नाही. भाऊ म्हणजे अनुकरणीय असे अफलातून व्यक्तिमत्व. विचार वेडा, माणूस वेडा, ग्रंथ वेडा, विचार आणि कृतीचा सुंदर संगम म्हणजे निळूभाऊ असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. नवोदित कलाकारांसाठी ते परमेश्वरच. नवोदितांचे ते पालकत्वच स्विकारत.

अशाच भावना या चित्रपटाचे निर्माते हेमंत जामकर यांनीही व्यक्त केल्या ते म्हणतात की ,भाऊ म्हणजे आमच्या नवोदितांसाठी एक मोठा आधार. अनेक विषयाचे ज्ञान आणि त्याबद्दलची आपले स्पष्ट मत ही भाऊंची खासियत. मी जरी नवोदित निर्माता असल्याने चित्रपटातील अनेक बारकावे भाऊंनी मला व्यवस्थित समजून सांगितले. शूटिंगच्या दरम्यान ही त्यांनी कुठलाही बडेजावपणा दाखविला नाही. अतिशय साधेपणाने राहिले. माझे वडील राजकारणी होते. माजी मंत्री होते. भाऊंनी आमच्या घरी येऊन त्यांच्याशी खूप सविस्तर चर्चा केली. राजकारणातील विविध विषयावर भाष्य केले. निळूभाऊ हे माझ्यासाठी पितृतुल्य व्यक्तिमत्व होते.

निसर्गप्रेमी निळूभाऊ

केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टीतही भाऊंना प्रचंड मानसन्मान होता. त्यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या सोबत “वो सात दिन”, कुली या चित्रपटातील सहकलावंत आशालता यांनी सांगितले की, निळूभाऊ म्हणजे ग्रेटच. ते कधीच ऍक्टर म्हणून वागले नाहीत, वावरले नाहीत. अतिशय साधेपणाने सेटवर आणि इंडस्ट्रीत असणारा एक महान कलावंत म्हणजे निळूभाऊ. निळूभाऊ निसर्गप्रेमी होते हे सर्वांना माहीत आहे. त्यांना झाडांची नावे, गुणधर्म त्याचा उपयोग तोंडपाठ. त्यांनी मला पांगारा, बहावा ही झाडे दाखवली त्याची नावे सांगितली. शेती, झाडे, पाने, फुले हा भाऊंचा आवडता विषय. विशेष म्हणजे औषधी वनस्पतींच्या बाबत निळूभाऊंचा मोठा अभ्यास होता. वनौषधी त्यांना चांगल्याच माहिती होत्या. हा एक त्यांचा गुण शूटिंगच्या दरम्यान आम्हाला पहावयास मिळाला. निळू भाऊ सोबत काम करताना सहकलाकार हा नेहमीच कम्फर्ट असायचा.भाऊ त्या सहकलाकाराला तसे बनवायचे. हा त्यांचा मोठेपणा त्यांच्या सोबत काम केलेल्या प्रत्येकास अनुभवयास आला.

अमिताभ व भाऊ

कुली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा हा किस्सा. कुली चित्रपटातील एका कलावंताने मला सांगितलेला आहे. श्री. अमिताभ बच्चन यांना झालेल्या या चित्रपटातील अपघातानंतर काही दिवस त्यांच्या आजारामुळे चित्रपटाचे चित्रीकरण थांबले होते. आजारातून बरे झाल्यानंतर या चित्रपटाच्या शूटिंग बंगलोर येथे पुन्हा सुरू झाले. शूटिंगचा पहिला दिवस. बच्चन साहेब सेटवर आले, मोठ्या जल्लोषात निर्माते-दिग्दर्शक यांनी त्यांचे स्वागत केले. हार तुरे वगैरे अत्यंत भारावलेला, भावपूर्ण, आनंदी असा प्रसंग होता. सेटवर सर्वांना बच्चनजी बोलत होते. त्यांचे लक्ष थोडे लांब एका झाडाखाली बसलेल्या निळूभाऊंकडे गेले. बच्चन साहेब स्वतः त्यांच्याकडे आले. थोडे वाकून भाऊंचा आशीर्वाद घेतला. त्यांना निळूभाऊंनी आलिंगन दिले. त्या क्षणापासून सेटवरील प्रत्येकाला निळूभाऊंच्या मोठेपणाची महती अधिक तीव्रतेने कळाली. एवढा मोठा कलावंत असूनही अत्यंत साधेपणाने ते सेटवर वावरत.

अजरामर भूमिका

डॉ.जब्बार पटेल यांच्या सिंहासन चित्रपटातील पत्रकार दिगू टिपणीस, एक गाव बारा भानगडी चित्रपटातील (कर्नाटकी हेल) झेले अण्णा, सामना चित्रपटातील करारी साखर कारखाना चेअरमन, पिंजरा चित्रपटातील तमासगीर बाईचा अगतिक नवरा, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी मधील चोरटा, सामना चित्रपटातील हिंदुराव पाटील, सासुरवाशीण मधील घर जावई, थापाड्या, हमाल दे धमाल मधील दारूड्या बाप, सोनाराने कान टोचले हऱ्या नाऱ्या जिंदाबाद या चित्रपटातील नायक. सौ दिन सास के मधील जावाई, महेश भट यांच्या सारांश मधील गजानन चित्रे हा पुढारी, कुली चित्रपटातील नाथू मामा अशा बऱ्याच भूमिका मिळवली सहजतेने साकारल्या.

समाजरत्न

खरोखरच निळूभाऊ हे महाराष्ट्रासाठी एक कलावंत, महान कलावंत तर होतेच. त्यापुढेही ते समाजातील एक आदरणीय असे व्यक्तिमत्व होते. म्हणूनच निळूभाऊंकडे केवळ एक कलावंत म्हणून न पाहता समाजरत्न म्हणून देखील पाहावे, कारण त्यांची समाजसेवेची संकल्पना, समाजसेवेचे विचार अतिशय प्रभावी व तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण असे होते. सामाजिक कृतज्ञता निधी सारख्या विविध सामाजिक उपक्रमातून त्यांनी समाजाप्रती आपली भावना व्यक्त केलेली आहे. निश्चितच त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे. अगदी प्रारंभीच्या काळात म्हणजे माळी काम करताना मिळणाऱ्या ८० रुपयाच्या पगारातून ते दहा रुपये नियमितपणे दरमहा समाजासाठी, राष्ट्रसेवा दलासाठी देणगी म्हणून देत. ते बोलके नव्हे तर ते कर्ते सुधारक होते.

असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले निळूभाऊ यांना ही भावपूर्ण आदरांजली….

हेही वाचा – अद्वितीय निर्माते दिग्दर्शक…बिमल राॅय

raju patodkar
Dr Raju Patodkar
+ posts

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई येथे वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती) (वर्ग-1) या पदावर कार्यरत.

शिक्षण- पीएच.डी, एम.ए., (जर्नालिझम), एम.ए., (मराठी), एम.ए., (राज्यशास्त्र), एम.ए., (समाजशास्त्र), बॅचलर इन ड्रामा, हिंदी (पंडित), जीडीसीए, बी.कॉम, बी.जे., जवळपास दोनशे मराठी, हिंदी मालिका तसेच 25 मराठी चित्रपटात अभिनय. राज्यातील विविध वर्तमान पत्रातून लेखन. जवळपास 5 हजार लेख-मुलाखती प्रकाशित.

पी.एच.डी. विषय श्री. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील सामाजिक वास्तवाचा संवाद एक चिकित्सक अभ्यास. (1975 ते 2005)

भ्रमणध्वनी क्र.- 9892108365.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.