-डॉ.राजू पाटोदकर

“होरी खेले रघुविरा अवध मे,” रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे” “होली के दिन दिल खिल जाते है” “मल दे गुलाल मोहे, आयी होली आयी रे” “होली आयी, होली आयी,देखो होली आयी रे” “होली आयी रे कन्हाई, होली आयी रे”, “आज ना छोडेंगे, बस हमजोली खेलेंगे हम होली” अशी हिंदी सिनेमातील धमाल होळी गाणी आणि त्याच्या जोडीला आपल्या मराठीतील “होळीच सोंग घेऊन लावू नको लाडी गोडी, रंग नको टाकु माझी भिजेल कोरी साडी” हे गीत.

होळी निमित्ताने नवरंग रुपेरी च्या वाचकांसाठी ही मेजवानी….होळीची ही काही खास लोकप्रिय गाणी….

नवरंग रुपेरीच्या सर्व वाचकांना होलिकोत्सवाच्या रंगबिरंगी शुभेच्छा. हॅप्पी होली!!

होली के दिन
होळीचा सण आला की अगदी हमखास आपणास ऐकायला मिळते ते ब्लॉकब्लास्टर चित्रपट शोले या चित्रपटातील “होली के दिन दिल खिल जाते है, रंगो मे रंग मिल जाते है” हे गीत. पहा काय गंमत असते, 15 ऑगस्ट 1975 ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 15 ऑगस्ट 2021रोजी सेहेचाळीस वर्ष पूर्ण होतील. या 46 वर्षात या चित्रपटाची व गीताची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी आदी मातब्बर कलावंतांवर चित्रीत झालेले हे गीत आणि त्यापूर्वी गब्बर सिंगचे सांभाला विचारणे “कब है होली? कब.. कब.. कब” आजही रसिक प्रेक्षक विसरले नाहीत. होलीचे अस्सल चित्रण या गीतात असून आर.डी.चे संगीत लाजवाबच. छेडछाड, रंगांची उधळण, मौजमस्ती, धम्माल अशा कॉम्बिनेशनचे हे गीत आहे. या गीताच्या लोकप्रियतेचे बरेचशे श्रेय इतरांसोबत नृत्यदिग्दर्शक पी.एल.राज यांना जाते.

रंग बरसे भिगे
शोलेच्या होळी गीतातील अमिताभ बच्चन यांच्या नृत्याची छोटीसी झलक प्रेक्षकांना आवडली होती. त्यानंतर 1981 ला प्रदर्शित झालेल्या सिलसिला या चित्रपटातील “रंग बरसे भिगे चुनरवाली, रंग बरसे, अरे कैने मारी पिचकारी तोरी भिगी अंगीया”, हे गीत व नृत्य तर रसिकांनी डोक्यावर घेतले. अमिताभ, रेखा आणि जया बच्चन असे दिग्गज व अतिमहत्वाचे कलावंत यात होते. अगदी सहजतेने होळीचा प्रसंग या चित्रपटात आला. या होळीचा उत्तम उपयोग करुन घेण्यात दिग्दर्शक यशजी प्रचंड यशस्वी ठरले. दस्तुरखुद्द बच्चन साहेबांनी हे आपल्या पिताश्रींचे म्हणजे डॉ.हरिवंशराय बच्चन यांचे गीत गायलेले आहे. अर्थातच शिव हरी यांच्या संगीताला तोड नाही. मुळातच अत्यंत दमदार असेच हे गीत असल्याने ते लोकप्रिय होणारच होते. यातील लोकसंगीताचा बाज हा महत्वाचा आहे. शब्दानुरूप अभिनय, प्रसंग, छेडछाड आणि नृत्य सगळी भट्टी जमून आलेली. मुख्य म्हणजे जया बच्चन आणि संजीव कुमार यांनी या गीतात काही ठराविक प्रसंगी केलेला मुद्राभिनय म्हणजे कमालच. छायाचित्रण मस्तच.

होरी खेले रघुविरा
सिलसिला नंतर बऱ्याच वर्षांनी बागबान या चित्रपटात परत एकदा अमिताभ बच्चन यांच्यावर होळीचे गीत चित्रीत करण्याचा दिग्दर्शक रवि चोप्रा यांचा प्रयत्न यशस्वी ठरला. या चित्रपटात हेमा मालिनी समवेत बच्चन यांनी “होरी खेले रघुविरा, अवध मे, होरी खेले रघुविरा”, हे गीत सुरेखरित्या सादर केलेले आहे. यातही स्वत: ते गायले असून सोबत अलका याज्ञिक व उदित नारायण आहेत. रिटायर्ड बँक ऑफीसर आपल्या मुळ गावी येतो आणि सुदैवाने होळीचा सण असतो. तेंव्हा आपल्या जुन्या मित्रांसह, मुले, नातवंडासह धमाल करीत होळी व होळीची मस्ती करतो. एकुणच या गीतासाठी छान भट्टी जमलेली आहे. शोलेतील छोटीशी अदाकारी सिलसिलाचे गीत आणि बागबानचे हे गीत. बसss बच्चन साहब तो छा गये.. ..

होली आयी, होली आयी
कभी कभी एखाद्या नटाचे नशिबच चांगले असते. कळत नकळत त्याच्या सुरूवातीच्या काळात खुप चांगल्या भूमिका, एखादे चांगले गीत त्याला मिळते आणि त्याच्या कारकिर्दीतील ते हिट ठरते. अनिल कपूर याचा मशाल हा असाच एक चित्रपट. 1984 ला प्रदर्शित झालेल्या यशजींच्या या चित्रपटात होळीचे एक मस्त गीत आहे. “होली आयी, होली आयी,देखो होली आयी रे, खेलो खेलो रंग है, कोणी अपने संग है, भिगा भिगा अंग है” रति अग्निहोत्री अनिल कपूर या चित्रपटात चांगले वाटले. एकुण चित्रपट हिटच. अभिनय सम्राट दिलीप कुमार यांचा हा महत्वाचा चित्रपट अस म्हटल तर वावगे ठरणार नाही. या गीतात सईद जाफरी, वहिदा रहेमान, दिलीप कुमारजी यांचे नृत्य पहातांना मजा येते. विशेष म्हणजे पंडित ह्दनाथ मंगेशकर यांचे संगीत तर वेगळीच अनुभूती देते. “जांभूळ पिकल्या झाडाखाली” हे जैत रे जैत मधील गीत आणि हे होळीचे गीत एकत्र ऐका यातील गंमत लक्षात येईल.

आयी होली आयी रे
अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता पिता असलेला राकेश रोशन. क च्या बाराखडीवर चित्रपटाची निर्मिती हे एक वैशिष्ट्य. असो! कामचोर हा त्यांनी निर्माण केलेला उत्तम चित्रपट. जयाप्रदा हिरोईन. या चित्रपटातील “मल दे गुलाल मोहे, आयी होली आयी रे, चुनरी पे रंग सोहे, आयी होली आयी रे” हे गीत पहातांना बऱ्याच मंडळींच्या जुन्या आठवणी जागृत होतात. कारण एकूणच सिच्युऐशन तशी आहे. निता मेहता आणि सुरेश ओबेरॉय यांच्यावर या गीताची सुरूवात होते आणि मग हिरो हिरोईनला आपले सुखी क्षण आठवतात असे काहीसे या चित्रपटाच्या गाण्याप्रसंगी होते. इंदिवर यांचे गीताचे बोल खुप काही सांगुन जातात. हे गीत होळी गीत जरी असले तरी याची नजाकत जरा वेगळीच आहे. एकदा अनुभव घ्यायलाच हवा.

ओ मेरी पहले ही तंग
होळी गीतांपैकी उत्तम प्रकारचे गीत असलेले एक गीत ज्यात होळीची छेडछाड, होळीची धम्माल, रंगांची उधळण सुरेखरित्या दाखविलेली आहे असे एक गीत म्हणजे सावन कुमार टाक यांच्या सौतन या चित्रपटातील “ओ मेरी पहले ही तंग थी चोली, उपर से आ गयी बैरान होली” हे गीत. राजेश खन्ना टिना मुनिम यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले हे गीत आहे. होळीचे बेधुंद वातावरण, नृत्य, संगीत या गीतात आहे. उत्तम चित्रीकरण झाल्यामुळे हे गीत पहातांना आनंद मिळतोच पण संगीतकार उषा खन्ना यांच्या सुरेल संगीतात ऐकतानांही तोच आनंद घेऊ शकतो असे हे गीत आहे. 1983 ला सौतन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपट सुपरहिट झाला आजही जवळपास 38 वर्षानंतरही काका उर्फ राजेश खन्नाची अदाकारी त्यांच्या चाहत्यांना सुखावून जाते असे हे होळी गीत आहे. याखेरीज “आज ना छोडेंगे, बस हमजोली खेलेंगे हम होली” हे कटीपतंग चे तर “अपने ही रंग मे रंग ले मुझको याद रहेगी होली रे” हे आखीर क्यु ?चे गीतही राजेश खन्ना यांचे होळी गीत म्हणून लोकप्रिय आहे.

होली आयी रे कन्हाई
या गेल्या तीस चाळीस वर्षातील चित्रपटांबरोबरच त्यापूर्वीच्या काही चित्रपटात होळीची गाणी आहेत. त्यातील 1957 ला प्रदर्शित झालेल्या मदर इंडिया या चित्रपटाने एक वेगळीच क्रांती घडविली. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्वाचा चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाते. नर्गिस यांच्या अविस्मरणीय भूमिका असलेला हा चित्रपट आहे. यातील शमशाद बेगम यांच्या आवाजातील “होली आयी रे कन्हाई, राग छलाके सुना दे जरा बासुरी” हे गीत उत्तम होळी गीत म्हणून आजही तितकेच लोकप्रिय आहे. अर्थातच संगीतकार नौशादजी, गीतकार शकील बदायुनी आणि दिग्दर्शक मेहबूब खान यांना याचे श्रेय आहेच. लोकसंगीताचा यथायोग्य वापर आहे आणि उत्कृष्ट असे चित्रीकरण, सुरेख नृत्य असा संगम असलेले हे गीत आहे.

अरे जा रे हट नटखट
शांताराम बापूंच्या नवरंग या चित्रपटातदेखील “अरे जा रे हट नटखट, ना छु रे मेरा घुंघट,” हे एक सुरेख होळी गीत आहे. नवरंग या नावातच रंगांची उधळण, रंगांची बरसात, रंगाचे महात्म सगळे काही आहे. 1959 ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील चित्रीकरणाचे तंत्रही खुप छान आहे. शांताराम बापूंची ख्यातीच तशी होती. या गीताचे गायक व संगीतकार सी.रामचंद्र उर्फ अण्णा सोबत आशा भोसले तसेच गीतकार भरत व्यास आणि कलावंत संध्या आणि महिपाल असे ग्रेट कॉम्बिनेशन गीत पाहुन व ऐकुन अनुभवनेच योग्य.

आली रे होली
होळीच्या मौज मस्तीचा निर्माते, दिग्दर्शकांनी छान उपयोग केलेला आहेच. पण काही चित्रपटातून या होळीच्या सणाचा उपयोग काहीसा आगळा वेगळा झालेला दिसून येतो. सुनिल दत्त अभिनीत जख्मी या चित्रपटातील “जख्मी दिलो का बदला चुकाना, आये है दिवाने दिवाने, आली रे आली रे होली” हे गीत पहातांना ही बाब प्रखरतेने जाणवते. गाण्याचे बोलच बरेच काही सांगून जातात. असो एक मात्र की, किशोरदाच्या आवाजातील हे गीत ऐकायला देखील चांगले वाटते. एक प्रकारची उर्मी या गीतात आहे. चित्रीकरण देखील चांगलेच झालेले असल्याने गाणे लक्षवेधी ठरले.

अंग से अंग लगाना
सनी देओल, जुही चावला आणि खलनायक शाहरुख खान पहा कसे मस्त कॉम्बिनेशन. विचार कसला करता? 1993 ला प्रदर्शित झालेला डर हा चित्रपट. कsssकsssकsss किरण हा डायलॉग. आठवले ना या चित्रपटातील होळीचे “अंग से अंग लगाना सजन हमे ऐसे रंग लगाना, गालो से ये गाल लगाके नैनो से नैना मिलाके होली आज मनाना, सजन हमे ऐसे रंग लगाना” हे गीत. विनोद राठोड, अलका याज्ञिक यांच्या आवाजातील हे गीत आहे. या गीतात अनुपम खेर आणि तन्वी आझमी यांनीही छान धमाल केलेली आहे. आपल्याला आवडलेल्या मुलीच्या घरी जरी तिला तो आवडत नसला तरीही होळीच्या रंगांचा सहारा घेत तोंडाला रंग फासून जाणारा पागल प्रेमी असलेला शाहरुख ढोल पिटतो. आणखी म्हणजे सनी देओल यात नाचलेला आहे हेही एक वैशिष्ट्य आहे. कधीतरी पहा नक्कीच मजा येईल. असे हे होळी गीत आहे.

ही झाली काही प्रातिनिधीक होळी गीते. याखेरीज कोहीनूर, बिरादरी, अंतिम न्याय, दाता, मस्ताना, काजल, बनारस, मंगल पांडे या चित्रपटांतूनही उत्तम अशी होळी गीते आहेतच. पाहुयात ती गाणी पुढच्या होळीला.. ..
एक मात्र खर की, या सर्व गाण्यात आपले मराठमोळी “होळीच सोंग घेऊन लावू नको लाडी गोडी, रंग नको टाकु माझी भिजेल कोरी साडी” याची गोडी काही न्यारीच. तेव्हा हे गीत सुध्दा ऐकाच…

………………………………..

raju patodkar
Dr Raju Patodkar
+ posts

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई येथे वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती) (वर्ग-1) या पदावर कार्यरत.

शिक्षण- पीएच.डी, एम.ए., (जर्नालिझम), एम.ए., (मराठी), एम.ए., (राज्यशास्त्र), एम.ए., (समाजशास्त्र), बॅचलर इन ड्रामा, हिंदी (पंडित), जीडीसीए, बी.कॉम, बी.जे., जवळपास दोनशे मराठी, हिंदी मालिका तसेच 25 मराठी चित्रपटात अभिनय. राज्यातील विविध वर्तमान पत्रातून लेखन. जवळपास 5 हजार लेख-मुलाखती प्रकाशित.

पी.एच.डी. विषय श्री. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील सामाजिक वास्तवाचा संवाद एक चिकित्सक अभ्यास. (1975 ते 2005)

भ्रमणध्वनी क्र.- 9892108365.

Leave a comment