-अशोक उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Remembering Multi-talented Producer Director Vijay Anand. चेतन आनंद यांचे धाकटे बंधू विजय आनंद कोण्या एका खास नायिकेची कधीच शिफारस करीत नसत किंवा त्यांचा तसा आग्रहदेखील नसायचा. आपल्या वडीलभावाच्या हाताखाली सहायक म्हणून काम करीत असतानाच त्यांनी बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या होत्या. विजय आनंद यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झाले. सेंट झेवियर्स महाविद्यालयात असताना त्यांनी रंगभूमीवर काम केले होते. महाविद्यालयात अनेक एकांकिकांचे स्क्रिप्ट त्यांनी लिहिले होते. कथा-पटकथा लिहिण्याचा नाद लहानपणापासूनच होता. ‘टॅक्सी ड्रायव्हर’ ची कथा त्यांनीच लिहिली होती. ‘फंटूश’ मधील ‘ए मेरी टोपी पलट के आ’ हे गीत विजय आनंद यांच्या दिग्दर्शनाखालीच चित्रीत झाले होते. तसे या चित्रपटाचे मूळ दिग्दर्शक चेतन आनंदच होते. चेतन आनंद यांच्याबरोबर काम करीत त्यांनी दिग्दर्शनाचे काही बारकावे शिकून घेतले होते. देव आंनदच्या ‘नौ दो ग्यारह’ या १९५७ साली तयार झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय आनंद यांनी पार पाडले. याची कथा-पटकथा त्यांनी लिहिली होती. ‘नौ दो ग्यारह’चे चित्रिकरण महाबळेश्‍वर, पाचगणी, खंडाळा या भागात झाले होते.

      ‘नौ दो ग्यारह’च्या वेळी देव आनंद व कल्पना कार्तिक यांचे लग्न झाले होते. कल्पना कार्तिक, जीवन, शशीकला यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. एस.डी. बर्मन यांच्या संगितातील सर्वच गाणी लोकप्रिय होती. तरूणाईच्या ओठावर ‘हम है राही प्यार के हमसे कुछ न बोलिये’ चा बोलबाला होता. आशा- किशोरच्या आवाजातील ‘आँखो मे क्या जी, रुपहला बादल-बादल मे क्या जी, किसी का आँचल-आँचल मे क्या जी, अजब सी हलचल’ हे गाणं देखील गाजलं तर ‘आजा पंछी अकेला है सोजा निंदीया की बेला है’ची धुन, मस्ती काही औरच होती. किशोर-आशाच्या काही हीट गाण्यात या गाण्यांची नोंद करावी लागेल. ‘नौ दो ग्यारह’ला म्युझिकल हीट म्हणावे लागेल. विजय आनंद यांनी दिग्दर्शक म्हणून आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली होती.

      ‘नौ दो ग्यारह’नंतर नवकेतनच्या ‘काला बाजार’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी विजय आनंद यांच्यावर आली. चित्रपटगृहासमोर होणारा तिकिटांचा काळा बाजार, धान्याचा, औषधाचा अशा विविध वस्तूंच्या काळ्या बाजाराचे चित्रिकरण आनंद यांनी यात केले होते. काही ठिकाणी आपल्या दिग्दर्शनाची चमक त्यांनी दाखवली होती. ‘काला बाजार’ मध्ये विजय आनंद यांची एक छोटी भूमिकादेखील होती. वहिदा रहेमानचे बॉय फ्रेंड म्हणून ते येथे चमकले. हा मुलगा नंतर पॅरिसला जातो व तेथेच एका फेंच मुलीच्या प्रेमात पडतो. ‘काला बाजार’ या चित्रपटाची एक खास बाब म्हणजे तीन आनंद म्हणजे चेतन-विजय-देव या चित्रपटात पहायला मिळाले. देव आनंद तर नायकच होता, तर चेतन आनंद एका वकिलाच्या भूमिकेत यात पाहायला मिळाले. शेैलेंद्रची सर्वच गाणी लोकप्रिय ठरली. महंमद रफीच्या आवाजातील ‘खोया खोया चांद’ चा गोडवा अवीट होता, तर ‘सच हुए सपने तेरे झुमले ओ मन मेरे’ च्या वेळी आशा भोसलेंचा ठसका अवर्णनीय होता. ‘काला बाजार’ बॉक्स ऑफिसच्या सर्व कसोट्यांवर यशस्वी ठरला होता.

      नवकेतनचा पुढील चित्रपट मात्र विजय आनंदचे मित्र अमरजित यांना मिळाला. ‘हम दोनो’ चे दिग्दर्शन अमरजित यांनी केले, तर पटकथा संकलन या बाजू विजय आनंद यांनी सांभाळल्या. प्रत्यक्षात चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेमवर विजय आनंदची छाप होती. नवकेतनच्या ‘तेरे घर के सामने’ चे दिग्दर्शन विजय आनंद यांनी पार पाडले. ‘तेरे घर के सामने’ एक हलकी फुलकी प्रेमकथा होती. देव आनंद व नूतन यांच्या प्रणयरम्य भूमिकेने ‘तेेरे घर के सामने’ खूपच गाजला. महंमद रफीच्या आवाजातील १) ‘दिल का भँवर करे पुकार’ २) ‘तू कहाँ ये बता इस नशिली रात मे माने ना मेरा दिल दिवाना’ ३) ‘सुन ले तू दिल की सदा’ या गाण्यांनी सर्वत्र तुफान लोकप्रियता मिळवली होती. ‘एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने’ आणि ‘देखो रूठा ना करो बात नजरो की सुनो’ ही लता-रफी यांची द्वंद्वगीतं देखील खूपच गाजली. एकंदर ‘तेरे घर के सामने’ म्युझिकल हिट ठरला. सचिन देव बर्मन यांनी कर्णमधुर असेच संगीत दिले होते. ‘तेरे घर के सामने’पासून विजय आनंद यांचा दरारा सर्वत्र वाढतच होता. नवकेतन या बॅनरशिवाय इतरांच्या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांना मिळत होते. निर्माता नासिर हुसैन यांनी ‘तिसरी मंझिल’ च्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. ‘तिसरी मंझिल’ हा सन्पेन्स थ्रिलर होता. शम्मी कपूर, आशा पारेख, प्रेमनाथ यांच्या प्रमुख भूमिका व आर. डी. बर्मनचे संगीत हे ‘तिसरी मंजील’ची जमेची बाजू होती. ‘तिसरी मंझिल’ प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला. महंमद रफी, आशा भोसले यांच्या आवाजातील सर्वच गाणी हिट ठरली. ‘तिसरी मंजील’चे रहस्य शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात दिग्दर्शक विजय आनंद कमालीचे यशस्वी ठरले होते.

     नवकेतनच्या ‘तेरे घर के सामने’ नंतर ‘गाईड’ या देव आनंदच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे दिग्दर्शन विजय आनंद यांनीच पार पाडले. १९६५ च्या सुमारास प्रदर्शित झालेल्या ‘गाईड’ मध्ये देव आनंद, वहिदा रहेमान, किशोर साहू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. नामवंत लघुकथा लेखक आर. के. नारायण यांच्या ‘गाईड’ या कादंबरीवर चित्रपट होता. वहिदा रहेमानची दिलखेचक नृत्ये व मनमोहक अभिनय हे ‘गाईड’ चे खास आकर्षण. देव आनंदला ॲवार्ड प्रदान करणारा ‘गाईड’ एक हिट चित्रपट ठरला. चित्रपटाच्या उत्तरार्धातील देव आनंदची भूमिका खूपच गाजली. सचिन देव बर्मन यांनी एकापेक्षा एक अशी दहा हिट गाणी ‘गाईड’ मध्ये दिली ही होती. महंमद रफीची १) तेरे मेरे सपने अब एक रंग है. २) ’दिन ढल जाये होय रात न जाये तू तो न आये तरी याद सताये’ ही गाणी खूप गाजली होती. याशिवाय स्वतः सचिनदांनी गायिलेले टायटल साँग, वहाँ कौन है तेरा मुसाफीर जायेगा कहाँ व मेघ देे छाया देे आणि लताच्या आवाजातील ‘आज फिर जिने की तमन्ना है’ चा गोडवा अवर्णनीय असाच होता. सर्वच गाणी सरस होती.

      वैजयंतीमाला, तनुजा, अंजू महेंद्र, हेलन, फरियाल अशा पाच नायिकांबरोबरचा हिरे चोर अर्थात ‘ज्वेल थीफ’ असाच गाजला. अशोक कुमार यांची यात महत्त्वपूर्ण भूमिका होती. आशा भोसलेच्या मदभऱ्या आवाजातील, ‘रात अकेली है बुझ गये दिये आके मेरे पास’, आणि ‘बैठे है क्या उसके पास आईना मुझसा नही’ या दोन गाण्यांचे चित्रिकरण तनुजा, फरियाल, हेलन यांच्यावर विजय आनंद यांनी अगदी दिलखेचक असेच करून घेतले होते. ‘ज्वेल थीफ’ चा सस्पेन्स शेवटपर्यंत टिकवण्यात विजय आनंद कमालीचे यशस्वी झाले होते. शेवटी सर्वांना विमानात बसविल्यानंतर ‘एक था ज्वेल थीफ’ हे वाक्य खूप सुरेख घेतले होते. ‘ज्वेल थीफ’ मध्ये एकंदर सात गाणी होती.

      एकच एक विषय किंवा तेच कथासूत्र विजय आनंद कधीच ठेवत नसत. नेहमी काहीतरी वेगळे, परंतु प्रेक्षकांना आवडेल असे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. ‘ज्वेल थीफ’, ‘गाईड’ नंतर ‘जॉनी मेरा नाम’ हा चित्रपट पूर्णपणे वेगळा होता. ‘जॉनी मेरा नाम’ या चित्रपटाने विजय आनंद यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. नवकेतन हे देव आनंद यांचे बॅनर; परंतु या बॅनरखाली निर्माता म्हणून विजय आनंद यांनी ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्या चित्रपटात त्यांनी भूमिकादेखील केली होती. डॉक्टरांनी खेड्यात जाऊन जनतेची सेवा करावी हा संदेश यात होता. खंर तर ‘तेरे मेरे सपने’ खूपच चांगला चित्रपट होता; परंतु रसिकांना फारसा भावला नाही व विजय आनंद यांना १५ लाखांचा तोटा झाला. देव आनंद, मुमताज, विजय आनंद, हेमामालिनी, आगा यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. १) ए ‘मेंने कसम ली,  तुने कसम ली’ २) ‘जीवन की बगीया महकेगी महकेगी’ ही किशोर-लता यांची द्वंद्वगीतं गाजली. हेमामालिनीचे कामदेखील चांगलेच झाले होते. ‘तेरे मेरे सपने’ अयशस्वी ठरला तरी एक वेगळी कथा देण्यात विजय आनंद यशस्वी झाले होते.

      ‘तेरे मेरे सपने’ नंतर अनेक चित्रपटात विजय आनंद यांनी महत्त्वपूर्ण भूमिकादेखील पार पाडल्या होत्या. चेतन आनंद यांच्या ‘हकीकत’, ‘हिंदुस्थान की कसम’ मध्ये त्यांनी काम केले होते, तर ‘डबल क्रॉस’ मध्ये त्यांनी रेखाबरोबर दुहेरी भूमिका निभावली होती, तर ‘छुपा रूस्तुम’ मध्ये त्यांनी छोटी भूमिका केली होती. ‘कोरा कागज’ व ‘घुंगरू की आवाज’ मध्ये ते नायक होते. ‘चोर चोर’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आपटला. लीना चंदावरकर हिची यात नायिका म्हणून भूमिका होती, तर निर्माता, दिग्दर्शक, नायक, वितरक, पटकथा लेखक अशा सर्वच जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या. ‘चोर चोर’ नंतर मनःशांतीकरिता त्यांनी पुणे येथे आचार्य रजनीश आश्रमात स्थलांतर केले. १९७६, ७७, ७८ या तीन वर्षात त्यांनी आचार्य रजनीश यांची सर्वच शिकवण आत्मसात केली. केवळ पैसा मिळवणे या पलीकडे जीवनात अनेक गोष्टी करायच्या असतात, हे त्यांनी जाणून घेतले व रजनीश आश्रमात तीन वर्षे मनःशांती मिळविण्याचा प्रयत्न केला. काही दिवसानंतर विजय आनंद मुंबईत पतरले तेव्हा ‘ब्लॅकमेल’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला.

      ‘ब्लॅकमेल’ नंतर ‘राम बलराम’ आणि ‘राजपूत’ या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी पार पाडले. अमिताभ बच्चनच्या आजारपणामुळे ‘राम बलराम’ बराच काळ रखडला, तर ‘राजपूत’ च्या वेळी विनोद खन्नाचा चित्रपट संन्यास व हेमामालिनीचे मातृत्व यामुळे उशीर झाला. दोन्ही चित्रपट पाहताना कलावंताच्या चेहऱ्यावरचे हावभाव बरेच काही सांगून जात होते. कारकीर्दीच्या शेवटी शेवटी ‘मै तेरे लिए’ या चित्रपटाकरिता त्यांनी गाणी लिहिली होती. सुनील आनंद व मीनाक्षी शेषाद्री यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या.

विजय आनंद यांच्या चित्रपट कारकीर्दीवर नजर टाकल्यास लक्षात येते की, त्यांच्या चित्रपटात काही खास संदेश असा कधीच नसायचा. ‘तेरे मेरे सपने’ मध्ये त्यांनी काहीतरी वेगळे मांडण्याचा प्रयत्न केला परंतु यशस्वी ठरला नाही किंबहुना प्रेक्षकांनी ते स्वीकारले नाही. चित्रपट या माध्यमाचा करमणुकीकरिता त्यांनी चांगला उपयोग करून घेतला. देव आनंदच्या अनेक चित्रपटांना त्यांनी दिग्दर्शन दिले; परंतु कधीही त्यांना भाऊ म्हणून वेगळी वागणूक देव आनंदने दिली नाही. नायक म्हणून चित्रपटात येण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. ‘डबल क्रॉस’मध्ये, तसेच ‘कोरा कागज’ मध्ये त्यांनी दोन्ही वेगवेगळ्या भूमिका योग्य रीतीने पेलल्या होत्या; परंतु नायक म्हणून इतर निर्मात्यांनी त्यांना कधीच घेतले नाही.

दिग्दर्शक विजय आनंद यांचे ‘ज्वेल थीफ’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘नौ दो ग्यारह’, ‘तेरे घर के सामने’ व ‘तिसरी मंझिल’ हे सर्व चित्रपट रौप्यमहोत्सवीच काय, परंतु सुवर्णमहोत्सवी यश मिळविणारे ठरले. ‘जॉनी मेरा नाम’ व ‘तिसरी मंझिल’ हे दोन चित्रपट मात्र नवकेतन बॅनरचे नव्हते. विजय आनंद दिग्दर्शक म्हणून आपला वेगळा ठसा उमटविण्यात यशस्वी ठरले, हे तितकेच खरे. मेनास्ट्रिम हिंदी सिनेमाच्या ५ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांमध्ये विजय आनंदचा समावेश होतो.

हिंदी चित्रपटाच्या जुन्या गोल्डन इरा काळातील अशाच इतर दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

 

 

 

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment