– शिरीष कणेकर

हॉलीवूडला जशी मर्लिन मनरो तशी आपल्या बॉलीवूडला मधुबाला. नाही, फरक आहे. मनरोचा चेहरा सुंदर होताच, (पण एलिझाबेथ टेलर, सोफिया लॉरेन, ग्रेस केली त्यांच्याइतका नाही) पण तिच्या देहयष्टीने तिला प्रेक्षकांची जानेमन बनवले होते. ती प्रत्येक अमेरिकन पुरुषाची फँटसी होती. मधुबालाच्या काळात फिगरला आजच्या इतकं व आजच्या सारखं महत्व नव्हतं. ‘झिरो फिगर’ हे शब्दही कोणी ऐकले नव्हते. एरवी नलिनी जयवंत पासून अमिता पर्यंत अनेक गोड चेहऱ्यांच्या गुटगुटीत नायिका आल्याच नसत्या. त्यात नुकसान आपलंच झालं असतं. 

मधुबालाला व्हीनस म्हणत. सौंदर्यदेवता. तिच्या चेहऱ्यावरून नजर हटेल तेंव्हा ना अन्य गोष्टीकडे लक्ष जाईल? ती मीना कुमारी पेक्षा प्रमाणबद्ध होती. मुख्य म्हणजे तिला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव होती. समोरचा बघताक्षणी कसा घायाळ होते हे जाणून होती. शिवाय कोणी म्हटलंच आहे की ‘हुस्न आया तो नजाकत आही जाती है’. म्हणून ‘संगदिल’ मध्ये  दिलीप कुमार तिच्याकडे पाठ फिरवून संवाद बोलायला लागला की या सौंदर्याच्या खाणीचं डोकं तापायचं. ‘माझी उपेक्षा?’ प्यारे की हर चीझ प्यारी होती है. म्हणून दिलीप कुमारच्या नाठाळ पणाचीही आम्हाला गंमतच वाटत आलेय. दिलीप कुमार व मधुबाला या प्रणय पाखरांना पडदयावर एकमेकांवरून जीव ओवाळून टाकतांना पाहून काळजापाशी ठंडक पोहोचायची तशी माफ करा पण दुसऱ्या कोणत्याही जोडीनं पोहोचवलेली नाही. राज कपूर-नर्गिसनं नाही की अमिताभ-रेखानं नाही. देव आनंद-मधुबाला यांनी निराला, नादान, आराम, जाली नोट, अरमान, मधुबाला, शराबी व काला पानी असे ८ चित्रपट एकत्र केले पण त्यांची केमिस्ट्री जमली नाही. पडद्यावरचा सर्वात देखणा पुरुष व पडद्यावरची सर्वात देखणी स्त्री यांना एकमेकांवर प्रेम करतांना पाहण्यात प्रेक्षकांना का रुची वाटली नाही हे अनाकलनीय आहे. “अच्छा जी मैं हारी चलो “म्हणत ती देव आनंदची मनधरणी करते तेंव्हा मन आसुयेने भरून येते. “टुटी फुटी गाडी अनाडी चलया (लता-सी. रामचंद्र) मधुबाला ‘निराला’ मध्ये म्हणते ते बघा. बघतच रहाल.

Madhubala death anniversary

मधुबालाच्या अदा लाजवाब आहेत. मुख्य म्हणजे त्या तिला विलक्षण शोभतात. (बिघडणारी गाडी ढकलणाऱ्या साळकाया माळकायातील एक किमी काटकरची आई आहे) ‘महल’ मध्ये ती साक्षात अप्सरा दिसते. त्या गूढरम्य वातावरणात तिचं खानदानी मुस्लिम सौंदर्य जास्तच खुललंय. म्हणूनच “आएगा आनेवाला”, “मुश्किल है बहोत मुश्किल”, “दिलने फिर याद किया” ही लताच्या तोंडची खेमचंद प्रकाशची गाणी जास्तच अंगावर यायची. अशोक कुमार नायक असतांना मधुबाला ‘बसंत’ सारख्या चित्रपटात बाल कलाकार होती. पुढे मोठी झाल्यावर ती अशोक कुमारची नायिका झाली. ‘हावडा ब्रीज’ मध्ये तिनं धमाल करून सोडली होती. ओ.पी. च्या ठसकेबाज गाण्यावर ती रंगात आली होती. “ऐसी मोहब्बत से हम बाज आए” (निराला), “प्रीतम आन मिलो” (मिस्टर अँड मिसेस ५५ ), “इश्क में जो कुछ न होता था ” (साकी), “दो दिनके लिए मेहमान यहाँ ” (बादल) या दुखी गाण्यात मधुबाला मूर्तिमंत कारुण्यमूर्ती दिसते. वीणा व नसीम बानो कदाचित मधुबालापेक्षा सुंदर असतीलही पण ते निर्जीव पुतळ्यांचे सौंदर्य त्याला ताज्या, टवटवीत गुलाबाची सर कशी येणार? 

मधुबाला १४ फेब्रुवारी १९३३ रोजी जन्मली व अवघी ३६ वर्षाची असतांना २३ फेब्रुवारी १९६९ रोजी देवाघरी गेली. तिचं मूळ नाव मुमताज जहाँ देहलवी. ती ११ भावंडातली पाचव्या नंबरची होती. तिच्या ह्रदयाला छिद्र होतं. त्याकाळी तो असाध्य रोग मानला जायचा. तिच्या नाकातोंडातून रक्त यायचं. ती सेटवर बेशुद्धही व्हायची. काही तासांनी तिला ऑक्सिजन द्यावा लागे. पण या सगळ्याची तिनं वाच्यता केली नाही. ‘मुघल-ए-आझम’ मध्ये जड साखळदंड तिला उचलवत नसत पण तोंडातून तक्रारीचा शब्द काढला नाही. त्याकाळचा विख्यात ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ बालिगा व माझे वडील डॉ कणेकर मधुबालाला उपचारार्थ इंग्लंडला घेऊन जाणार होते. कुठं बिनसलं कळायला मार्ग नाही. ती गेली असती तर कदाचित आजही आपल्यात असती. पण जख्ख म्हातारी, सुरकुतलेली, कंबरेत वाकलेली, कान फुटलेली, जाड काचेचा चष्मा लावणारी, मान डुगडुगणारी अशी मधुबाला आपण डोळ्यापुढे आणू शकत नाही, आणू इच्छित नाही. मधुबाला मस्त डाय यंग!

dilip kumar and madhubala

दिलीप कुमारशी तिचं लग्न होऊ शकलं नाही. तिथंच तिची घसरण सुरु झाली. “माझी मुलगी तुझ्या बहिणीच्या साड्या धुवायला येणार नाही” अशी अतार्किक दर्पोक्ती मधुबालाचा बाप अताउल्लाह खान यानं दिलीप कुमार पाशी केली. ‘नया दौर’ च्या शूटिंगसाठी मधुबालाला दिलीप कुमार समवेत ४० दिवसांसाठी भोपाळला जाऊ देण्यास अताउल्लाह खानने मनाई केली. संपलं. मधुबाला ‘नया दौर’ मधून व दिलीप कुमारच्या आयुष्यातून बाहेर पडली. किशोर कुमारला धर्म बदलायला लावून त्याच्याशी केलेलं लग्न हा फुसका बार ठरला. 

अखेरच्या काळात तिची अवस्था केविलवाणी झाली होती. सौंदर्य झडलं होतं. देहाची लक्तरे झाली होती. डोकं सैरभैर झालं होतं. खोलीतला आरसा तिने हटविला होता. दिवे काढून टाकले होते. दारंखिडक्यांना काळे पडदे लावून घेतले होते. ती स्वतःला पाहू इच्छित नव्हती व दुसऱ्या कुणी आपल्याला पहावं असं तिला वाटत नव्हतं. मरणाआधीच  तिनं स्वतःला मारलं होतं. 

एकदा तिनं वहिदा रेहमानला घरी बोलावून घेतलं व स्पष्ट बजावलं “माझ्या युसुफला सोड, त्याला नादी लावू नकोस, पुढल्या महिन्यात आम्ही लग्न करणार आहोत.” वहिदा रेहमान काही न बोलता तिथून पळाली.

दिलीप कुमारनं सायराशी लग्न केल्यानंतर त्याला मधुबाला एकदा अपघातानं भेटली. वेड्यासारखं कडुशार हसत ती दिलीप कुमारला म्हणाली ” चलो आखीर आपको आपकी शहजादी मिलही गयी. ” 

आत्ताआत्तापर्यंत दिलीप कुमार नियमितपणे मधुबालाच्या कबरीवर जात होता. आता तो ‘गंगा जमना’त शेवटी म्हणतो तसं झालंय. “खतम होई गवा. सबकुछ खतम होई गवा” 

shirish kanekar
Shirish Kanekar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.