स्मृतिदिन-सिनेमा ते टीव्ही दोन्हीकडे अधिराज्य गाजवणारे धुरंदर रामानंद सागर

© पी. विनीता

दूरदर्शन नेटवर्क वर पहिली अति लोकप्रिय मालिका रामायण सादर करणार्‍या रामानंद सागर यांचा जीवन प्रवास अनेक वैविद्यपूर्ण घटनांनी भरलेला आहे. त्यांचा जन्म काश्मिरमधल्या प्रतिष्टित चोप्रा कुटुंबात झाला. त्यांचे पणजोबा लाला शंकरदास चोप्रा मूळचे पेशावरचे पण नंतरच्या कालखंडात काश्मिर ला स्थलांतरीत झालेले. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर काश्मिरमधल्या चोप्रा परिवारात नगरशेठ हा मान मिळवलेले होते. त्यांचे आजोबा लाला गंगाराम व्यापारी होते. वडील दिनानाथ चोप्रा ताज पेशावरी या टोपणनावाने कविता लिहीत. रामानंद यांचा जन्म २९ डिसेंबर १९१७ ला लाहोर जवळच्या असल गुरु के या गावात झाला. 

चोप्रा परिवाराच्या पुरोहिता ने सुचवल्यामुळे त्यांचे नाव चंद्रमौळी ठेवले होते. मातुल घरात मुलगा नव्हता. यामुळे त्यांच्या आजीने त्यांना लहानवयात दत्तक घेतले व त्यांचे नाव रामानंद ठेवले. आई वडिलांचा लहान वयात झालेला विवाह यशस्वी झाला नाही. सासरचा जाच खूप होता. या नंतर आणखी एक भाऊ जन्मला. यानंतर आईचे मानसिक संतुलन बिघडत गेले. अवघ्या विशीतच ती निधन पावली. यानंतर वडिलांनी दुसरा विवाह केला. प्रसिध्द निर्माता दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा रामानंद सागर यांचा सावत्र भाऊ (दोधांच्या वयात ३५ वर्षाचे अंतर). आई वडिलांच्या प्रेमाला रामानंद पारखे झाले. मातुल घरी पण फारसे सुख मिळाले नाही. लहानपण तणावाच्या वातावरणात गेले त्याचा परिणाम त्यांच्या भावनात्मक लिखाणातून जाणवत राहिला.

       वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा श्रीनगर च्या प्रताप काॅलेज च्या मासिकात गद्यकाव्य लिहीले प्रीतम प्रतिक्षा. संपादकाला खूप आवडले. पण रामानंद यांनी लिहीलेले आहे की नाही याची खात्री नसल्याने शेवटी तळटीप टाकली की कदाचित मूळ लिखाण नसावे. जगण्यासाठी घडपड सुरु होती. यासाठी शिपाई , ट्रक क्लीनर, साबण विक्रेता अश्या विविध नोकर्‍या करत शिक्षण घेणे सुरुच ठेवले. संस्कृत आणि पर्शियन भाषेत सुवर्णपदक मिळवून पंजाब विद्यापीठातून १९४२ साली पदवी मिळवली. लाहोरच्या मिलाप वर्तमानपत्रात वार्ताहर ते उपसंपादक म्हणून नोकरीला असताना ३२ कथा, लघुकथा, कादंबरी, नाटक असे सातत्याने लिखाण रामानंद चोप्रा, रामानंद बेदी या नावाने केले. (बेदी हे त्यांच्या आजोळचे नाव). काही काळ रामानंद काश्मिरी या नावाने पण लिखाण केले. सिनेमाची मोहमयी दुनिया त्यांना खुणावत होती. यासाठी मुंबईत आले. पहिल्यांदा समुद्र पाहिल्यावर इतके भारावले की यापुढे आपले नाव रामानंद सागर असेच लावायला लागले व शेवटपर्यंत त्याच नावाने ओळखले गेले.

            १९४२ साली क्षयरोगाने ते आजारी पडले. या जीवघेण्या आजाराशी झुंझताना आलेल्या अनुभवावर आदाब ए मशरिक या मासिकात त्यांनी लिहिलेले क्षयरोग्याची डायरी हे लिखाण फार गाजले. १९३६ साली रायडर्स आॅफ रेलरोड या मूकपटाच्या वेळी क्लॅपरबाॅय म्हणून सिने विश्वात त्यांनी प्रवेश केला. १९४१ —४२ साली पुण्याच्या शालिमार स्टुडिओ निर्मित कोयल सिनेमात प्रमुख भुमिका केली. त्यांनी अभिनय केलेला कृष्ण सिनेमा अर्धवट राहीला. १९४३ साली मेहबूबखान आणि सादत हसन मंटो आणि कृष्णचंदर यांच्या आग्रहाने रामानंद मुंबईत आले. अभिनेता सज्जन च्या घरी मालाड ला रहायला लागले. पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटर मध्ये त्यांना लेखक म्हणून नोकरी मिळाली. पृथ्वीराज यांच्या तिहेरी भुमिका असलेले गौरा नाटक त्यांनी लिहिले. इथेच त्यांची राजकपूर बरोबर मैत्री झाली. बरसात सिनेमाची पटकथा आणि संवाद रामानंद सागर यांनी लिहीले. बरसात च्या तुफान यशानंतर रामानंद सागर पटकथाकार म्हणून प्रसिध्द झाले. १९४८ साली फाळणीच्या पार्श्वभुमिवर त्यांनी लिहिलेले और इन्सान मर गया हे पुस्ताक खूप गाजले. १९५० साली त्यांनी स्वतःची सागर आर्टस् ही सिनेमा कंपनी स्थापन केली. पण पहिल्या दोन सिनेमात इतका तोटा झाला की परत पटकथा लेखन सुरु करावे लागले. असेच एकदा मद्रास च्या जेमिनी स्टुडिओचे मालक एस.एस.वासन यांच्याशी त्यांची ओळख झाली. वासन नी एका तामिळ सिनेमावर आधारित कथेवर पटकथा लिहायला सांगितली. हा सिनेमा होता इन्सानियत. दिलीप कुमार आणि देवानंद यांच्या एकत्र भुमिका असलेला हा एकमेव सिनेमा. इन्सानियत च्या यशानंतर रामानंद सागर यांनी मागे वळून पाहिलेच नाही.


         

आपल्या कारकिर्दीत त्यांनी एकूण २५ सिनेमे निर्माण केले. त्यातले १५ सिनेमे बाॅक्स आॅफिसवर यशस्वी झाले. यात घूंगट, जिंदगी, आरझू, आंखे , गीत,  ललकार, जलते बदन, प्रेम बंधन, सलमा सारख्या गाजलेल्या सिनेमांचा समावेश आहे. १९६४ सालच्या शम्मीकपूर अभिनीत राजकुमार सिनेमाची पटकथा आणि संवाद त्यांनी लिहीले होते. त्यांचे वाचन दांडगे होते. बाबुराव चांदिवाले यांच्यासारखे उत्कृष्ट संकलक त्यांना लाभले होते. बाबुराव चांदिवाले माझ्या काॅलनीत रहात होते. वडिलांचे चांगले मित्र होते. गणपतीत बाबुराव यांच्या घरी रामानंद सागर आवर्जून येत. एका गणपतीत रामानंद सागर यांच्याबरोबर बाबूराव चांदीवाले यांच्या घरी रामानंद सागर यांच्या पंगतीत शेजारी बसून जेवायचे भाग्य मला लाभले होते. चांदिवाले काकांनी सांगितले की आरझू च्या अजी रुठकर अब कहां जाईयेगा गाण्याचे एडिटिंग स्वतः राजकपूर नी केले होते. रामानंद सागरांनी आग्रह करुन पण एडिंटिंगचे श्रेय घ्यायाला राजकपूर नी नकार दिला. आंखे सिनेमातल्या अॅक्शन सीन च्या एडिटिंगवर खूश होऊन रामानंद सागर यांनी चांदिवले काकांना दहा हजार रुपये बक्षिस दिले होते. मुळात हा सिनेमा राजकुमार साठी लिहिला होता. राजकुमारची आणि रामानंद सागर यांची मैत्री इन्सानियत सिनेमापासून होती. आंखे चे स्क्रिप्ट घेऊन रामानंद सागर राजकुमारच्या घरी पोहोचले. राजकुमार ला स्क्रिप्ट आवडले नाही. दहा लाख रुपये मानधन रामानंद सागर देणार होते. राजकुमार ने आपल्या कुत्र्याला बोलावून विचारले क्या इनकी फिल्म हम साईन करे?? ते मुके जनावर काय बोलणार? गर्विष्ट राजकुमारने सांगितले हमारे कुत्तेको तुम्हारी कहानी पसंत नही. हम तुम्हारी फिल्म नही करेंगे. रामानंद सागर काहीच न बोलता बाहेर पडले. त्यानंतर कधीच त्यांनी राजकुमार बरोबर संबंध ठेवले. (ही आठवण रामानंद सागर यांच्या मुलाने लिहिलेल्या पुस्तकात आहे).

    आंखे चे आऊटडोअर शूटिंग मध्यपूर्वेत झाले. पण फिल्म खराब झाली, सगळे आऊटडोअर शूटिंग रद्द करावे लागेल अशी परिस्थिती. नाईलाजाने रामानंद सागरांनी तसा निर्णय घेतला. पण चांदिवाले काका यांनी आपल्या कौशल्याने फ्रेम आणि फ्रेम सुटी करुन कौशल्याने संकलन केले. आज सिनेमा पहाताना जाणवत नाही सलग चित्रण वाटते. या नंतर खुश झालेल्या रामानंद सागरांनी चांदिवाले काकांना मध्यपूर्वेची सफर घडवून आणली. १९७५ साली भारतीय सिनेजगतावर अंडरवर्ल्ड चे वर्चस्व दिसायला लागले. यामुळे अनेक निर्माते अस्वस्थ झाले. यात रामानंद सागर पण होते. १९७६ साली चरस सिनेमाच्या शूटिंगसाठी रामानंद सागर परदेशी गेले. तिथे पहिल्यांदा त्यांनी रंगीत टीव्ही पाहिला. या माध्यमाच्या प्रेमात ते पडले आणि टेलिव्हिजन माध्यमात उतरायचा निर्णय त्यांनी घेतला.

 

अनेकांना त्यांचा हा निर्णय निव्वळ मूर्खपणा वाटला. एक तर त्या वेळी भारतात दूरदर्शन चे फक्त एक चॅनेल ते सुध्दा कृष्णधवल होते. रंगीत टीव्ही येण्याची शक्यता त्या वेळी नव्हतीच. स्वित्झर्लंड ला हाॅटेल मधल्या खोलीत रामानंद सागरांनी आपला निर्णय तिनही मुलांना सुभाष , आनंद आणि प्रेमसागरना सांगताना सांगितले प्रभू रामचंद्र यांच्यावर , भगवान श्रीकृष्णांवर आणि दुर्गामातेवर भव्य कार्यक्रम निर्माण करायची माझी महत्वाकांक्षा आहे. या साठी सिनेमा नव्हे तर हेच माध्यम प्रभावी आहे. हिंदी सिनेसृष्टी आपले साम्राज्य टिकवून होती. टीव्ही सारख्या माध्यमाला तुच्छ लेखत होती. पौराणिक कार्यक्रम करायला कोणीच उत्सुक नव्हते. पण रामानंद आपल्या विचारावर ठाम होते. त्यांनी रामायण आणि श्रीकृष्णांवर माहितीपत्रके छापून घेतली. यात कार्यक्रमाच्या व्हिडीओ कॅसेटस् काढायच्या योजनांची सविस्तर माहिती दिली होती. मुलाला प्रेम सागरला विमानाची राऊंड टूर तिकीटे काढून देऊन परदेशात रहाणार्‍या मित्रांकडे पाठवून या कामाला पैसे उभारायची विनंती केली. काही जणांनी अविश्वास दाखवला. काहीजणांनी शांतपणे आपल्या सेक्रेटरीला सांगून प्रेम सागर ना बाहेरचा रस्ता दाखवला. जीवलग मित्रांनी रामानंद सागर नी हा विचार डोक्यातून काढून टाकावा असा सल्ला दिला. कोणीच रामानंद सागर यांची संकल्पना स्वीकारायला तयार नव्हते. एक महिनाभराच्या व्यर्थ खटपटीनंतर हताश होऊन प्रेम सागर मुंबईत परतले.

      
कालांतराने एशियाड स्पर्धेच्या निमित्ताने नॅशनल नेटवर्क जोडले गेले. रंगीत टेलिव्हिजन चे आगमन झाले. प्रायोजित मालिका सुरु झाल्या. नवभारत टाईम्स चे लेखक शरद जोशी आणि प्रेम सागर यांनी सोमदेव भट यांच्या वेताळ पंचविशी या पौराणिक कथेवर विक्रम और वेताल या मालिकेची निर्मिती सुरु केली. मुलांसाठी आणि कुटुंबासाठी असलेल्या या मालिकेला प्रसारणासाठी  रविवारी संध्याकाळची वेळ दिली गेली. पण विक्रम और वेताल मालिका विलक्षण लोकप्रिय झाली. पहिल्यांदाच स्पेशल इफेक्ट चा वापर दूरदर्शन मालिकेत केला गेला. रामानंद सागर यांच्या स्वप्नांनी परत झेप घेतली. रामायण या ड्रिम प्रोजेक्टवर परत काम सुरु झाले. विक्रम और वेताल च्या प्रमुख पात्रांना रामायण मध्ये घ्यायचे ठरले. अरुण गोविल (विक्रम)ला रामाची भूमिका, दिपीका चिखलियाला (राजकन्या) सीतेची भुमिका, सुनील लाहीरी (राजपुत्र)ला लक्ष्मणाच्या भुमिकेत, दारासिंग ला(वीरवर) ला हनुमानाची भुमिका द्यायचे नक्की करुन इतर पात्रांचा शोध सुरु झाला. महत्वाची गोष्ट म्हणजे अंडरवर्ल्ड चा कसलाही त्रास होणार नव्हता. याच कालखंडात ऋषिकेश मुखर्जी, जे.ओमप्रकाश, एन.सी.सिप्पी या सारख्या मातबर निर्मात्यांनी सिनेमा निर्मिती कमी केली होती किंवा थांबवली होती.

 

      सर्वप्रथम माहिती आणि नभोवाणी विभागाकडून मालिकेसाठी परवानगी मिळवणे आवश्यक होते. सरकार दरबारी दोन गट होते. एका गटाचे म्हणणे होते रामायण सारखी मालिका धार्मिक तेढ निर्माण करेल. तर  दूरदर्शन च्या अधिकार्‍यांना वाटत होते की रामायण ही भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. हा आपला अमूल्य  ठेवा लोकांसमोर आलाच पाहिजे. दिल्लीतल्या राजकारणी मुसद्यांना ही मालिका प्रसारित करणे अडचणीचे वाटायला लागले होते. माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री विठ्ठलराव गाडगीळ यांना तीव्रतेने वाटत होते की या मालिकेच्या प्रसारणाचा फायदा हिंदुत्ववादी संघटना घेतील. तर एकीकडे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे मत होते की रामायण, महाभारत राष्ट्रीय ठेवा आहे आणि त्यांच्या प्रसारणाने भारताची प्रतिमा निश्चित उंचावेल. दिल्लीतले राजकारणी आणि दूरदर्शन च्या मध्यवर्ती कार्यालय मंडी हाऊस मधले अधिकारी यांच्यात उंदिर मांजरांचा खेळ सुरु होता. थेट नकार ही देत नव्हते. काहीतरी खुसपट काढून काड्या घालायचे उद्योग सुरु होते. यात अनेक महिने गेले. रामानंद सागर मंडी हाऊस च्या खेट्या मारत होते. अनेक तास त्यांना थांबवून ठेवले जात असे. अनेक दिवस दिल्लीच्या अशोक हाॅटेल मध्ये रामानंद सागर यांना मुक्काम करावा लागला. तासन तास फोन ची प्रतिक्षा करुनही उडवाउडवीची उत्तरे मिळत. एका राजकारण्याला भेटायला सकाळी बंगल्यावर गेले असताना वेळ नाही असे सांगणारा राजकारणी बायकोबरोबर बंगल्याच्या आवारात फेर्‍या घालत होता. मालिकेचे भवितव्य अंधारमय दिसू लागले. त्यात भरीस भर म्हणजे चार पायलट एपिसोड च्या ऐवजी एकच सादर करा असा सल्ला दिला. पायलट कॅसेट द्यायच्या वेळी एका शिपायाने त्यांना सांगितले अधिकार्‍यांची अशी भावना आहे की रामानंद सागर यांचे लिखाण दर्जेदार नसते तसेच भाषा सुधारण्याची गरज आहे. एका अनुभवी सिध्दहस्त लेखकाचा इतका अपमान कोणीच केला नसावा.

        याच काळात प्रशासनात मोठे बदल झाले. रामायण विरोधी अधिकारी इतरत्र बदलले गेले. १९८६ च्या नोव्हेंबर महिन्यात गाडगीळांचे खाते बदलले आणि एका रात्रीत हा बदल झाला. नवे माहिती प्रसारण राज्यमंत्री अजितकुमार पांजा यांना सिनेविश्वाबद्दल आदर होता. रामानंद सागर यांना अनुकुल परिस्थिती निर्माण झाली. अशातच एक दिवशी एक साधु नटराज स्टुडिओत रामानंद सागरना भेटायला आला. नेहमी भेटायला येणार्‍यांचे स्वागत त्यांची पत्नी करत असे. त्या दिवशी रामानंद सागर यांनी त्या साधूचे स्वागत केले. विचारले काय सेवा करु? त्या तेजपुंज साधूने सांगितले की आपल्या हिमालयातल्या गुरुंनीं निरोप सांगितला आहे. एकाएकी अधिकारवाणी ने तो सांगू लागला.को ण आहेस तू? स्वतःला समतोस काय?? मी हे करणार नाही, मी ते करणार नाही. काय चालले आहे?? रामायण वर कार्य करतो आहेस. चिंता कशाला करतोस??आध्यात्मिक जगात एक विभाग आहे. तो या सगळ्याची चिंता करेल. भारताचे नाव उज्वल करायचे आहे तुला. तू तुझे काम कर. असे सांगून दक्षिणाही न घेता तो साघु निघून गेला. या घटनेने हुरुप येऊन रामानंद सागर रामायण च्या तयारीला लागले.
   
  तरीसुध्दा एक झारीतला शुक्राचार्य होताच माहिती आणि नभोवाणी खात्याचा सेक्रेटरी भास्कर घोष. लगेच शूटिंग सुरु करायचा आदेश त्याने दिला खरा पण तो अरेरावी वृत्तीचा होता. जास्तीचे २६ आठवडे वाढवून द्यायला त्याने नकार दिला. मधेच ही सिरीयल बंद करता यावी हा त्याचा हेतू होता. तसे प्रयत्नही त्याने केले. पण रामानंद सागरांनी माहिती आणि नभोवाणी खात्याचे मंत्री एच.के.एल.भगत यांना भेटून हा अडथळा दूर केला. भास्करची अरेरावी सुरुच होती. मूळ कथेला बगल देऊन हिंदूंचे महत्व कमी करायच्या त्याच्या सूचनेला रामानंद सागरांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. इतकेच नाही तर मालिकेची टेप प्रसारणाच्या थोडी आधी पाठवायचे चातुर्य दाखवले ज्यामुळे भास्कर ला काहीच बदल करणे शक्य नव्हते. या सगळ्या अडचणींवर मात करत रामानंद सागर यशस्वीपणे ही सिरियल सादर करु शकले.

        पहिला भाग सादर करायला जेमतेम नऊ दिवस राहीले होते. स्टुडिओ मिळवणे, सेट उभा करणे , शूटींग एडिटिंग करणे जवळ जवळ अशक्य कोटीतले काम होते. विक्रम और वेताल च्या वेळचे कलादिग्दर्शक हिराभाई पटेल ज्यांनी वाडिया मुवीज मध्ये कलादिग्दर्शक म्हणून काम केलेले पहाडासारखे मागे उभे राहीले. गुजरात मधल्या उंबरगाव मधला बंद पडलेला वृंदावन स्टुडिओ हिराभाईंच्या ताब्यात होता. तिथेच चित्रण करायचे ठरले. सर्व सामुग्री या स्टुडिओत उपलब्ध होती. याच स्टुडिओत इतिहास घडायचा होता. मालिका प्रसारित झाल्यावर या स्टुडिओला इतकी प्रसिध्दी मिळाली की बीबीसी ला पण या स्टुडिओची दखल घ्यावी लागली. संशोधन, लिखाणाची जबाबदारी रामानंद सागरांनी स्वतः घेतली. आनंद सागर क्रिएटिव डायरेक्टर होते. मोती सागर एडिटिंग करत. सुभाष सागर प्राॅडक्शन संभाळत आणि प्रेम सागर तांत्रिक बाजू संभाळत. सगळ्या टीम ने सहकार्य दिले. वाडिया ब्रदर्स कडे मेकअप डिपार्टमेंट संभाळणारे सावंत दादा आणि त्यांची टीम  मेकअप करायला सतत तयार असे. एखादा सीन रामानंद ना रात्री ३ वाजता सुचला की काही वेळातच कलाकार शूटिंग ला तयार होत असत. २५ जानेवारी १९८७ ला पहिला भाग देशभर प्रसारित झाला. रामानंद सागर आणि त्यांच्या टीम ने त्यांच्या बेडरुम मध्ये शांतपणे भाग पाहिला. काही क्षणातच टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेक अडथळे पार करुन रामायण मालिकेचे प्रसारण सुरु झाले. प्रचंड लोकप्रियता लाभली. रविवारी सकाळी रामायण चे प्रक्षेपण सुरु असताना रस्ते ओस पडलेले असायाचे. सलग ७८ आठवडे हा थरार जनतेने अनुभवला. एकही आठवडे एकही कलाकार आजारी पडला नाही. काही वेळा प्रसारणाच्या काही मिनीटेच आधी टेप टीव्ही स्टेशनवर पोहोचायची पण प्रसारणात कधीच खंड पडला नाही. आपल्यावर प्रभू रामचंद्रांची कृपा असल्याने हे शक्य झाले अशी रामानंद सागर यांची भावना होती.

       रामायण सिरियल मधली सगळी पात्रे लोकप्रियतेचा उच्चांक ओलांडून गेली. दहा कोटी लोक ही सिरियल पहात. त्या दशकातली सर्वात जास्त पाहिली गेलेली सिरियल म्हणून लिमका बुक आॅफ रेकाॅर्ड मध्ये नोंदली गेली. ५४ देशांमध्ये ही सिरियल विकली गेली. रामानंद सागरांनी मुद्दाम नावाजलेले कलाकार घेतले नाहीत. प्रत्येक भाग सोमवार ते गुरुवार चित्रित करत. शुक्रवारी एडिटिंग होत असे व रविवारी सकाळी मुंबईला टेप पाठवली जात असे. राजकीय मिरवणुका, आंदोलने या सिरियल च्या वेळात अजिबात होत नसत. इतकेच नाही तर अनेकांनी आपली लग्ने सुध्दा या वेळात पुढे ढकलली होती. लोक टीव्हीला हार घालून मालिका पहायला बसायचे. ३१ जुलै १९८८ ला रामायण चा अंतिम भाग प्रसारीत झाला.

          यानंतर रामानंद सागर यांनी श्रीकृष्णावरची सिरियल निर्माण केली. ती लोकप्रिय झाली पण रामायणा इतकी लोकप्रियता नाही मिळाली. लव कुश , अलिफ लैला सारख्या सिरियल्स निर्माण करणार्‍या रामानंद सागरांचा भारत सरकार ने २००० साली पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला. १९६० सालच्या पैगाम सिनेमाच्या संवाद लेखनासाठी आणि १९६९ सालच्या आंखे सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी त्यांना फिल्मफेअर अवाॅर्ड मिळाली होती. सेवानिवृत्ति नंतर शांतपणे जीवन जगणारे रामानंद सागर १२ डिसेंबर २००५ ला वयाच्या ८८ व्या वर्षी आपल्यातून गेले. 

P. Vinita
+ posts

1 Comment

  • Atul Shah
    On December 12, 2020 2:10 pm 0Likes

    भास्कर घोष हे सागरिका घोष चे वडील.पुढे काही सांगायची गरज आहे का ?

Leave a comment