स्मृतिदिन विशेष.. हिंदी सिनेमाचे रुबाबदार पोलीस इन्स्पेक्टर.. इफ्तेखार

-© विवेक पुणतांबेकर 

या सिनेविश्वात एखादी भुमिका लोकप्रिय झाली की त्या भुमिकेचा शिक्का कायमचा त्या अभिनेत्यावर/अभिनेत्री वर बसतो. काही काळानंतर आपल्याला त्याच भुमिकेत त्या अभिनेत्याला/अभिनेत्रीला पहायचा कंटाळा येतो. पण एक अभिनेते असे होते की त्यांना पोलीस इन्स्पेक्टरांच्या भुमिकेत पहायला प्रेक्षक आतुर असायचे. असे एकमात्र अभिनेते होते सय्यदाना इप्तेखार अहमद. आपले सर्वांचे लाडके इप्तेखार. आज त्यांच्या विषयी जाणून घेऊया. अनेकांना कल्पना नसेल की ते उत्तम अभिनेते तर होतेच पण ते स्वतः उत्तम चित्रकार तसेच गायक पण होते.

सुरुवातीच्या काळात नायक म्हणून सिनेमात आले होते. हे कुटुंब जालंधरचे. त्यांचे वडिल कानपूरच्या कंपनीत अधिकारी होते. पाच भावंडात इप्तेखार सगळ्यात मोठे. २६ फेब्रुवारी १९२२ ला जालंधर मधे जन्मलेल्या इप्तेखार यांचे शिक्षण कानपूर ला झाले. मॅट्रीक पास झाल्यावर लखनौ काॅलेज मधून चित्रकलेची पदवीका घेतली. गाण्याची आवड होतीच प्रसिध्द गायक सैगल चा प्रभाव त्यांच्या मनावर होता. सैगल सारखे आपण गायक व्हावे असे त्यांना सारखे वाटायचे. त्या काळी कलकत्ता येथे बहुसंख्य रेकाॅर्ड कंपन्या होत्या. त्यामुळे वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी कलकत्त्याचा रस्ता पकडला. त्यावेळी एच.एम.व्ही.कंपनीत संगीतकार कमल दासगुप्ता काम करत होते. १९४२ साली एम.पी.प्राॅडक्शनच्या त्यांनी दिलेल्या जवाब सिनेमातले काननदेवी ने गायलेले गाणे दुनिया तुफान मेल खूप लोकप्रिय झाले होते. कमल दासगुप्तांनी एच.एम.व्ही. साठी इप्तेखार यांची आॅडिशन घेतली. त्यात पास झाल्यावर त्यांच्या आवाजात दोन खाजगी रेकाॅर्डस् एच.एम.व्ही.ने काढल्या.  इप्तेखार कानपुर ला परतले. इप्तेखार यांचे व्यक्तीमत्व पाहून कमल दासगुप्ता प्रभावित झाले. त्यांनी इप्तेखार यांची अभिनेता म्हणून एम.पी. प्राॅडक्शन कडे शिफारस केली. कंपनी ने तार करुन इप्तेकार ना बोलावून घेतले. तो पर्यंत कानपूर च्या सईदा शी त्यांची एंगेजमेंट झाली होती. कलकत्त्याला आले खरे पण बराच काळ त्यांना काहीच काम नव्हते. या काळात त्यांच्या बिल्डिंगमधे रहाणार्‍या हॅना जोसेफ या ज्यू मुलीच्या प्रेमात ते पडले. सईदा बरोबर संबंध तोडून त्यांनी हॅना बरोबर लग्न केले. लग्नानंतर हॅना झाली रेहाना अहमद. इप्तेखार असलेला पहिला सिनेमा ‘तक्रार’ १९४४ साली आर्टस् फिल्म कंपनीने निर्माण केला. यात नायिका होती जमुना.

iftekhar

१९४५ साली एम.पी.प्राडक्शन चे दोन सिनेमे रिलिज झाले ज्यात इप्तेकार नायक होते. पहिला होता ‘घर’ ज्यात नायिका होती जमुना आणि दुसरा होता ‘राजलक्ष्मी’ यात नायिका होती काननदेवी. ‘राजलक्ष्मी’ हा तलत मेहमूदचा अभिनेता म्हणून पहिला सिनेमा होता. १९४७ साली इप्तेखार यांचे दोन सिनेमे रिलिज झाले. ‘ऐसा क्यूं’ आणि ‘तुम और मै’. १९४६ साली त्यांच्या मोठ्या मुलीचा सलमाचा जन्म झाला आणि १९४७ साली धाकट्या मुलीचा सईदाचा जन्म झाला. फाळणीनंतर त्यांचे बहुतेक नातेवाईक पाकिस्तानात निघून गेले. इप्तेखार यांनी मात्र भारतात रहाणे पसंत केले. जातीय दंगली मुळे कलकत्ता सोडून त्यांना मुंबईत यावे लागले. खारच्या एव्हरग्रीन हाॅटेल मधे काही काळ या कुटुंबाने वास्तव्य केले खरे पण काम न मिळाल्याने काही काळ उपासमारीची पाळी पण आली. मग पत्नीने रेहाना ने पाटणवाला कुटुंबात हाऊसकिपर ची नोकरी घरली. ते स्वतःछोटे मोठे रोल करत होते. तरीपण कुटुंबाचा खर्च भागणे कठीण होते. कलकत्याला असताना काननदेवींनी अशोक कुमारांशी ओळख करुन दिली होती. मुंबईत आल्यावर इप्तेखारांनी अशोक कुमारांची भेट घेतली. अशोक कुमारांनी बाॅंबे टाॅकिज च्या १९५० च्या ‘मुकद्दर’ मधे त्यांना काम दिले.इ प्तेखारांची चित्रकलेची आवड समजल्यावरअशोक कुमारांना त्यांच्या विषयी आपुलकी वाटायला लागली. ते स्वतः उत्तम चित्रकार होते आणि वयाने मोठे असुनही इप्तेखारांना चित्रकलेत गुरु मानत. इप्तेकारांच्या चित्रकलेचा नमुना १९६४ साली आलेल्या ‘दूर गगन की छाओमे’ सिनेमाच्या टायटल्स मधे पहायला मिळतो.

Rajesh Khanna, Nanda, Bindu, Iftekhar in "Ittefaq"
Rajesh Khanna, Nanda, Bindu, Iftekhar in “Ittefaq”

 

५० आणि ६० च्या दशकात सगाई, साकी, आबशार, आबोश, विराज बहू, मिर्झा गालिब,दे वदास, श्री ४२०, समुद्री डाकू, जागते रहो, अब दिल्ली दूर नही, दिल्ली का ठग, रागिणी, बेदर्द जमाना क्या जाने, कंगन, छबेली, कल्पना, कानून प्रोफेसर, रंगोली, बंदिनी, मेरी सूरत तेरी आंखे, दूर गगन की छाओमे, संगम, शहीद, तिसरी कसम, फूल और पत्थर, तिसरी मंझिल, हमराज, संघर्ष, आदमी और इंसान , इंतकाम सिनेमात अविस्मरणीय भुमिका केल्या. या नंतर आला ‘इत्तफाक’. यातल्या सी.आय.डी.इन्स्पेक्टर कर्वेंं या भुमिकेने त्यांचे आयुष्य बदलून टाकले. ‘धुम्मस’ या गाजलेल्या गुजराती नाटकावर आधारित हा सिनेमा एकाच सेटवर संकलनासह आठ दिवसात तयार झाला. इन्स्पेक्टरचा युनिफाॅर्म त्यांच्या व्यक्तीमत्वाला इतका शोभला की तश्याच भुमिकेचे सिनेमे भरभर मिळत गेले. खारमधे स्वतःचा फ्लॅट इप्तेकारनी घेतला. याचे सगळे श्रेय ते अशोक कुमारांना देत कारण अशोककुमारांच्या शिफारसी मुळेच बी.आर. फिल्मस् मधे इप्तेखारांचा प्रवेश झाला. त्यांच्या मोठ्या मुलीचा प्रेम विवाह १९६४ साली डेहराडून येथले धनीक विपिनचंद्र जैन यांच्या बरोबर झाला. लग्नानंतर डेहराडून ला स्थायिक झालेली मुलगी सलमा धरगुती कारणाने १९७९ साली मुंबईत परत आली. पुढली वीस वर्षे ती निर्माते एन.सी. सिप्पी यांची सेक्रेटरी म्हणून काम करत होती. १९७० आणि १९८० चे दशक इप्तेखार ना फारच भरभराटीचे गेले. शर्मिली, मेहबूब की मेहंदी, गॅम्बलर, कल आज और कल, हरे राम हरे कृष्ण, जवानी दिवानी, अचानक, जंजीर, मजबूर, दिवार, धर्मात्मा, शोले, कभी कभी, दुल्हन वोही जो पिया मन भाये, डाॅन, त्रिशूल, नुरी, काला पत्थर, कर्ज, दोस्ताना, राॅकी, साथ साथ, राजपूत, सदमा, इंकीलाब, जागिर, तवायफ, अंगारे आणि आवाम सारख्या सिनेमात अविस्मरणीय कामे केली.

Iftekhar death anniversary

 

पाच दशकात तीनशे हून अधिक सिनेमात त्यांनी कामे केली.१ ९९२ चा ‘बेखुदी’ आणि १९९३ चा ‘कालाकोट’ हे त्यांचे शेवटचे सिनेमे. इप्तेखारांचे पाकिस्तानात गेलेले त्यांचे कुटुंबीय त्यांच्या संपर्कात असे. त्यांचे बंधू इम्तियाज अहमद पाकिस्तानी टीव्ही चे गाजलेले कलाकार होते. दुसरे बंधू मुश्ताक अहमद पाकिस्तान इंटर नॅशनल एयरलाईन्स चे पायलट होते. नंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांचे सावत्र बंधू आणि त्याची बायको अमेरिकेत स्थायिक आहेत. त्यांची एकुलती एक बहीण कराचीत रहात होती. कानपूर मधल्या सईदाने कधीच लग्न केले नाही आणि ती रावळपिंडीला निघून गेली. त्यांच्या लहान मुलीला सईदा ला कॅन्सर झाला. पाच वर्षे कॅन्सरशी झुंझल्यावर ७ फेब्रुवारी १९९५ ला ती गेली. या घटनेचा फार मोठा धक्का इप्तेखारना बसला. आधीच मधुमेहाने त्रस्त झाले होते. त्यांची तब्येत खालावत गेली. मुलीच्या निधनानंतर २४ दिवसानी मालाड च्या सुचक हाॅस्पिटलमधे ४ मार्च १९९५ ला ते आपल्यातुन गेले. त्यांचे सिनेमे रसिकांच्या स्मरणात नेहमी रहातील.

 

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment