पत्थर के फूल आणि रविना टंडन ची ३० वर्षे!

– अजिंक्य उजळंबकर 

 

३० वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजेच १९९१ साली ‘पत्थर के फूल’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने हिंदी सिनेसृष्टीला नवी नायिका दिली रवीना टंडन. १९७० व ८० च्या दशकातील प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक रवी टंडन आणि त्यांची पत्नी वीणा टंडन यांची कन्या म्हणजे रवीना. ‘मैने प्यार किया’ च्या २ वर्षानंतर आलेला ‘पत्थर के फूल’ हा गाजला त्याच्या सुपरहीट संगीतामुळे. नायक सलमान खान आणि संगीतकार राम-लक्ष्मण या जोडीचा ‘मैने प्यार किया’ नंतर आलेल्या या दुसऱ्या सिनेमाच्या गाण्यांनी सुद्धा ९० च्या सुरुवातीला तरुणाईला वेड लावले होते. ‘मैने प्यार किया’ प्रमाणेच राम-लक्ष्मण यांनी लता मंगेशकर व एस.पी. बालसुब्रमण्यम या जोडीकडून अफलातून गाणी काढून घेतली होती. 

याच दिवशी संजय दत्त-सनी देओल अभिनीत ‘योद्धा’ व धर्मेंद्र-विनोद खन्ना जोडीचा ‘फरिश्ते’ सुद्धा प्रदर्शित झाला होता. १९९१ साली सलमानच्या खात्यात एकूण ५ चित्रपट जमा झाले होते व सर्वच्या सर्व म्युझिकल हिट्स होते. सनम बेवफा, साजन, कुर्बान, लव्ह व पत्थर के फूल ही ती ५ नावे. सर्वच सिनेमांची गाणी एकदम हिट! थोडक्यात सलमानचा जादू महाविद्यालयीन तरुणाईवर ‘सर चढ के बोल रहा था’ असे हे वर्ष होते. वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी-९१ ला आलेला सावन कुमार दिग्दर्शित ‘सनम बेवफा’ अजून चित्रपटगृहात जोरदार कमाई करतच होता तितक्यात फेब्रुवारी महिन्यात ‘पत्थर के फूल’ येऊन धडकला. सिंगल स्क्रीनचा तो काळ असल्याने एखादा मोठ्या बॅनरचा चित्रपट किमान पहिले एक-दोन आठवडे तरी दोन किंवा तीन सिनेमागृहात लागण्याची पद्धत तेंव्हा होती. ‘पत्थर के फूल’ संदर्भातील आणखी एक विशेष बाब म्हणजे ९० सालच्या ऑक्टोबर महिन्यात निधन झालेले अभिनेते विनोद मेहरा यांचा हा अखेरचा सिनेमा ठरला. चित्रपटात सलमान खान यांच्या वडिलांच्या भूमिकेत असलेल्या विनोद मेहरा यांचे सिनेमाचे शूटिंग आटोपल्यानंतर निधन झाले मात्र त्यांच्या आवाजातील डबिंग मात्र बाकी होते. अखेर मराठी अभिनेता सचिन खेडेकर यांनी त्यांच्या आवाजात ते पूर्ण केले. 

रवीनाला ‘पत्थर के फूल’ साठी त्या वर्षीचा बेस्ट न्यू-कमर चा फिल्मफेअर अवॉर्ड जरी मिळाला असला तरी तसे पाहता चित्रपटात तिच्या भूमिकेला विशेष महत्व नव्हते. राम-लक्ष्मण यांच्या हिट गाण्यांवर माकड उड्या मारणाऱ्या सलमान सोबत एक डान्सिंग डॉल पलीकडे रवीनाला चित्रपटात स्थान नव्हते. रवीना तेंव्हा केवळ १७ वर्षांची होती आणि तिचे परमभाग्य म्हणजे तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी तिला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आवाज लाभला होता. लतादीदींचे तेंव्हाचे वय होते ६२ वर्षांचे! परंतु “कभी तू छलीया लगता है, कभी दिवाना लगता है” या गाण्यात लतादीदींचा अल्लड आवाज असा काही लागला आहे की बस्स! अथवा “तुमसे जो देखतेही प्यार हुवा” या गाण्याच्या अखेरीस आपल्या अल्लड आवाजात लता दीदी जेंव्हा एका दमात “कभी लिंकिंग रोड, कभी पेडर रोड” अशा तब्बल १०-१२ रस्त्यांची नावे घेतात ते ऐकल्यावर  १७ वर्षांची तरुण गायिकाच गातेय की काय असे वाटते! पत्थर के फूल ची सर्वच गाणी एकाहून एक सरस होती. 

Salman Khan and Raveena Tandon in Patthar Ke Phool
Salman Khan and Raveena Tandon in Patthar Ke Phool

देव कोहली व रवींद्र रावल यांच्या गीतरचनेला राम-लक्ष्मण यांनी दिलेले हिट संगीतच खरंतर ‘पत्थर के फूल’ चा सर्वात मोठा प्लस पॉईंट होता कारण सलमानचे वडील सलीम खान यांनी लिहिलेल्या कथेमध्ये एकतर नावीन्य शून्य होते व दिग्दर्शक अनंत बलानी यांचे दिग्दर्शनही फारसा प्रभाव टाकू शकले नव्हते. परंतु सुपरहिट संगीताने या चित्रपटाची डुबती नैय्या वाचवली. 

रवीना टंडन हिचे या चित्रपटापासून करिअर सुरु झाले. ९० च्या दशकात व त्यानंतरही रविनाच्या खात्यात बरेच हिट चित्रपट जमा झाले खरे परंतु दुर्दैवाने तिच्या अभिनयासाठी ओळखले जाणारे सिनेमे त्यात अगदीच बोटावर मोजण्याइतके कमी आहेत. सत्ता, दमन, अक्स, शूल, दोबारा इत्यादी काही ती नावे. यापैकी कल्पना लाजमी यांच्या दमन ने तिला सर्वोत्कृष्ट नायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. दिग्दर्शक वडिलांकडून मिळालेला सिनेमाचा वारसा तिने तसा यशस्वीरीत्या पुढे नेला असे म्हणता येईल. 

आज ‘पत्थर के फूल’ ला आणि त्यायोगे रवीना टंडन च्या करिअरला ३० वर्षे झाली त्या निमित्ताने ही एक आठवण. 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.