– डॉ. राजू पाटोदकर, मुंबई.
————————
आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
खलनायक हा शब्द उच्चारताच आपल्या नजरेसमोर एक प्रमुख नाव येते ते म्हणजे हिंदी सिनेसृष्टीचे लोकप्रिय खलनायक प्राण (Actor Pran) यांचे. प्राण साहेब दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मनित झाल्यानंतर तमाम सिनेसृष्टीला आनंद झाला. आणि त्यातच त्यांच्या निधनाच्या बातमीने शोककळा पसरली. १२ जुलै हा त्यांचा स्मृतिदिन…. त्यानिमित्त ही शब्द सुमनांजली. (Remembering Hindi Cinemas Legendary Actor Pran)
————————
१०० वर्षाच्या भारतीय सिनेसृष्टीसाठी आपल्या ९४ वर्षाच्या आयुष्यातील ६० वर्षे दिलेला हा उमदा खलनायक म्हणजे आपल्या सिनेसृष्टीला लाभलेला एक अनमोल हिरा..प्रारंभीच्या काळातील कडवा व्हिलन अन् उत्तरार्धात अतिउत्तम चरित्र अभिनेता असा त्यांचा प्रवास.
१२ फेब्रुवारी १९२० दिल्लीत श्री. लाला केवलकिशन आणि रामेश्वरी यांच्या पोटी जन्मलेले प्राण, हे सिकंद परिवाराचे लाडके अपत्य. चार भाऊ, तीन बहिणी असा परिवार. सिकंद परिवार हा पंजाब मधील Bharowal गावचा, तिथे त्यांची जमीन वगैरे होती. वडील स्थापत्य अभियंता होते, त्यामुळे विविध ठिकाणी त्यांची बदली होत असे. आगरतळा, मेरठ, देहरादून, रामपूर असा बालपणचा त्यांचा प्रवास. प्राण यांनी आपली मॅट्रिकची परिक्षा रामपूरच्या रजा हायस्कूल मधून दिली व पास झाले. त्यांना उत्तम फोटोग्राफर व्हायचे होते म्हणून वडीलांच्या मित्राच्या ए दास ॲन्ड कंपनीत फोटोग्राफी शिकले. दरम्यान या कंपनीने आपल्या शाखा दिल्लीबरोबरच सिमला तसेच लाहोर येथे उघडल्या आणि प्राणसाहेब लाहोरला पोहोचले.
या काळात त्यांची भेट सुप्रसिद्ध फिल्मलेखक वली मोहंमद वली व पंचोली यांच्या समवेत झाली आणि “यमला जाट” हा पंजाबी चित्रपट १९४० साली त्यांना मिळाला. या चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीला एक सक्षम कलावंत दिला. पंचोली फिल्म सोबत चौधरी (१९४०) खजांची (४१) खानदान (४२) कैसे कौन (४५) अशा चित्रपटातून प्राण यांच्या भूमिका लोकप्रिय होऊ लागल्या. फोटोग्राफी कलेत निष्णात असलेल्या प्राणसाहेबांना लाईट, मेकअप, कॅमेरा लेन्स, अँगल यांचे ज्ञान होतेच, त्यामुळे सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर कसे दिसावे हे त्यांनी बखुबीने आत्मसात केले.
प्रारंभीचा संघर्ष
दरम्यानच्या काळात म्हणजे १८ एप्रिल १९४५ रोजी त्यांनी आपल्या वडीलांनी पसंत केलेल्या मुलीशी म्हणजे शुकिला अहलूवालिया यांच्याशी विवाह केला. दोन मुले व एक कन्या असे ३ अपत्य.
पुढे बॉलीवुडची महानगरी मुंबई येथे त्यांचे आगमन झाले. मुंबईत आल्यानंतरचा संघर्षाचा व उमेदवारीचा काळ प्राणसाहेबांना काहीसा कठीणच गेला. या काळात जागेचे भाडे देण्यासाठी त्यांना पत्नीच्या बांगड्या विकाव्या लागल्या.जिद्द कायम होती.संघर्ष सुरु होता. प्रयत्नांती परमेश्वर… या काळात त्यांना निर्मात्यांकडून भूमिका मिळत गेल्या. खामोश निगाहे (१९४६), मोहिनी (४७), बरसात की एक रात (४८), बडी बहन (४९), शीशमहल (५०), अफसाना (५१), बेवफा (५२), आह (५३), शीशे की दिवार (५४), आझाद (५५) असे विविध चित्रपट त्यांनी केले.
लोकप्रिय खलनायक
डोळ्याने रोखून पाहणे, आणि सिगारेट पिऊन वर्तुळाकार धूर बाहेर टाकणे अशी त्यांची खासीयत होती.
भारतीय सिनेसृष्टीचा लोकप्रिय खलनायक अशा शब्दात त्यांचे वर्णन १९५५ साली त्यांचे पहिले निर्माते दिलसुख एम. पंचोली यांनी केले होते. त्या शब्दास समर्थता देण्याचे काम पुढील कालखंडात प्राणसाहेबांनी केले. आपला खलनायक अजरामर करुन टाकला. त्यांचा कोणताही चित्रपट उदाहरणादाखल घेतला तरी प्राणसाहेबांच्या खलनायकी हुकमतीची साक्ष पटते.
प्राणसाहेबांच्या काही चित्रपटांचा उल्लेख या लेखात करणे अपरिहार्य आहे. यात प्रामुख्याने राम और श्याम, राजकुमार, गुमनाम, खानदान, जिस देश मे गंगा बहती है, देवदास, अंधा कानून अशा चित्रपटांचा उल्लेख करता येईल. देव आनंद, राज कपूर आणि दिलीप कुमार या सिनेसृष्टीच्या त्रिदेवासोबत आपल्या अभिनयाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या शिव्या खाण्यासाठी (कलेची दाद) प्राणसाहेबांनी सर्व भूमिकांचे अक्षरश: सोनं केले. जिस देश मे गंगा बहती है, मधील राका ही भूमिका चित्रपट गृहातील प्रेक्षकांचा थरकाप उडविणारी होती. तर राम और श्याम मधील जिजाजी जेव्हा दिलीप कुमार यांना हंटरने फोडतो त्यावेळी प्रेक्षकही दचकून जात. खलनायकी रंगविताना त्यांच्या अंगात तो खलनायक भिनत…असा जिवंत अभिनय असे म्हणूनच त्यांचे प्राण हे नाव आपल्या मुलासाठी ठेवण्याचे धाडस आजतागायत कोणत्याही माता पित्याने दाखविले नाही. अर्थातच प्राणसाहेबांच्या अप्रतिम खलनायकी अभिनयास एकप्रकारे मिळालेली प्रेक्षकांची ती दाद आहे.
आपल्या खलनायकी अदाकारीने प्रेक्षकांच्या मनात घर केल्यानंतर आपल्या चरित्र अभिनेत्याची इनिंग खेळण्यास प्राणसाहेब सज्ज झाले. त्यांनी मनोज कुमार यांच्या समवेत अलिखित करारच केला. उपकार या चित्रपटातला मलंगबाबा प्रेक्षकांना भावला. चित्रपटसृष्टीच्या नियमांनुसार प्रेक्षकांना जे आवडेल, भावेल ते देण्याचे काम सिनेसृष्टी करते. उपकारनंतर पुरब और पश्चिम, संन्यासी, दसनंबरी, बेईमान असे चित्रपट सुरु झाले व खलनायक प्राण एका वेगळ्याच म्हणजे चरित्र अभिनेत्याच्या रुपात प्रेक्षकांसमोर येऊ लागले.
AND प्राण
जंजीर या १९७३ साली प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील शेरखान तर प्रेक्षकांच्या काळजास भिडला. “यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी” म्हणत प्राण यांची अदाकारी प्रत्येक सिनेमानूरुप प्रेक्षकांपर्यंत पोहचू लागली. धर्मेंद्र, जितेंद्र, विनोद खन्ना, शशी कपूर, ऋषी कपूर, शत्रुघ्न सिन्हा आदि मातब्बर नायकांच्या सोबत अगदी तोडीस तोड अशी चरित्र अभिनेत्यांची भूमिका प्राणसाहेबांनी साकारली. धरम-वीर, अमर अकबर अन्थोनी, कालिया, मान गये उस्ताद, ज्वालामुखी, डॉन, बॉबी, नसीब, दोस्ती-दुश्मनी असे चित्रपट या दरम्यान प्रदर्शित झाले. कधी हिरोचा तर कधी हिरोईनचा पिता, करारी पोलीस अधिकारी अशा विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या.
त्या नंतरच्या कालखंडातही हिरो, हिरोईन बदलले पण प्राणसाहेबांचे नाव श्रेयनामावलीत “AND प्राण” म्हणून अजरामर झाले.
भूमिका कोणतीही असो, प्राणसाहेबांनी ती साकारली म्हणजे त्या भूमिके भोवती एक वेगळे वलय निर्माण व्हायचे. त्या भूमिकेतील सर्व बारकावे ते आत्मसात करायचे,
भूमिकेसाठीची वेषभूषा, रंगभूषा, चालढाल आणि बोली भाषा याचा सखोल अभ्यास करुन मग ती पडद्यावर साकारली जायची. त्यामुळेच त्यांच्या सर्व भूमिका पहाताना आपणास विविध गेटअप, वेगळा मेकअप पहावयास मिळाला. जवळपास ७० पेक्षा अधिक वेगवेगळे गेटअप त्यांनी केले आहेत. जंजीर- शेरखान, कालिया- जेलर रघुविर सिंह उपकार- मलंगचाचा, दस नंबरी – हवालदार, संन्यासी, क्रोधी – संन्यासी अशी बरीच उदाहरणे घेता येतील.
ऋषितुल्य व्यक्तीमत्व
सिनेपत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात “कसम” या चित्रपटाचे शुटिंग कव्हरेज करण्याची संधी मिळाली. फिल्मसिटीत एका खेडेगावाचा सेट उभारण्यात आला होता. त्यावेळी मला प्राणजींना भेटता आले. छोटीशी मुलाखत झाली. मला त्यांचे काम प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. सेटवर सर्वांसाठी ते अगदी ऋषीतुल्य व्यक्तिमत्व होते.
*गाजलेली गीते *
खलनायकी भूमिका असो वा चरित्र अभिनेत्याची भूमिका असो त्यांच्यावर चित्रीत झालेली गाणी प्रेक्षकांना प्रचंड भावली. ही गाणी केवळ प्राण यांच्यासाठीच होती अशीच भावना चाहत्यांची आहे. अगदी काही उदाहरणं सांगावयाची झाल्यास सर्वप्रथम लक्षात येते ते जंजीर चित्रपटातील “यारी है इमान मेरा.. यार मेरी जिंदगी” ही कव्वाली. तसेच कसोटी चित्रपटातील “हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है” हे गीत. या चित्रपटात त्यांची नेपाळी गुरखा ही भूमिका आहे. त्याचप्रमाणे उपकार चित्रपटातील मलंगबाबा व “कस्मे वादे प्यार वफा” हे गीत आज ही रसिकांच्या काळजास भिडते. मजबूर हा अमिताभ बच्चन समवेतचा चित्रपट. यातील ” मायकल दारु पिके दंगा करता है” या गाण्याच्या वेळी केलेली प्राण यांची धमाल अप्रतिमच. इशारोंको अगर समझो राज को राज रहने दो… ही धर्मा चित्रपटातील कव्वाली खूपच लोकप्रिय आहे. कव्वाली पाहताना क्षणोक्षणी प्राण यांची अनोखी अदाकारी प्रेक्षक अनूभवतात. तसेच जंगल मे मंगल मधील विविध गेटपच्या भूमिका प्रेक्षक कधीच विसरु शकत नाहीत. महत्वाचे म्हणजे किशोरदा यांच्या सोबतचे आके सिधी लगी तेरी तिरछी नजरिया वो बावरिया हे हाफ टिकीट चित्रपटातील गीत तर या सर्वांवर कडी आहे. प्राण यांनी आपल्यावर चित्रीत गीतात अक्षरक्ष: प्राण ओतला म्हणूनच ती सर्व गीतेही आजतागायत लोकप्रियतेच्या शिखरांवर आहेत.
पुरस्कारांची संपत्ती
२०१३ साली दादासाहेब फाळके या पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्राणसाहेबांना या क्षेत्रातील विविध पुरस्कारही मिळाले. त्या सर्व पुरस्कारांची यादी देणे शक्य नाही. २००१ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण दिले. तर राज्य सरकारने राजकपूर पुरस्काराने सन्मानित केले. या क्षेत्रातील बरेच पुरस्कार त्यांना मिळाले, पण सर्वात महत्वाचे म्हणजे रसिकांचे प्रेम हाच मोठा पुरस्कार अशी त्यांची भावना होती.
प्राणसाहेब केवळ कलावंत म्हणून जगले नाहीत तर कलावंतातील प्रेमळ माणूस म्हणून त्यांची ख्याती राहिली. आज जरी ते शरिराने आपल्यात नसले तरी आपल्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात कायमच्या स्मृती ठेवून गेले आहेत.
हेही वाचा – तेरे बिना जिंदगी से कोई…संजीव कुमार
Dr Raju Patodkar
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई येथे वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती) (वर्ग-1) या पदावर कार्यरत.
शिक्षण- पीएच.डी, एम.ए., (जर्नालिझम), एम.ए., (मराठी), एम.ए., (राज्यशास्त्र), एम.ए., (समाजशास्त्र), बॅचलर इन ड्रामा, हिंदी (पंडित), जीडीसीए, बी.कॉम, बी.जे., जवळपास दोनशे मराठी, हिंदी मालिका तसेच 25 मराठी चित्रपटात अभिनय. राज्यातील विविध वर्तमान पत्रातून लेखन. जवळपास 5 हजार लेख-मुलाखती प्रकाशित.
पी.एच.डी. विषय श्री. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील सामाजिक वास्तवाचा संवाद एक चिकित्सक अभ्यास. (1975 ते 2005)
भ्रमणध्वनी क्र.- 9892108365.