-डॉ. राजू पाटोदकर, मुंबई.
बॉलीवूड मधील सुपरहिट चित्रपटांचा बादशहा म्हणून प्रकाश मेहरा (Film Director Prakash Mehra) यांचे नाव घेतले तर ते नक्कीच समर्पक ठरेल. १७ मे हा त्यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्त सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण आदरांजली. (Remembering Super Hit Film Director Prakash Mehra) जंजीर, खून पसीना, हेरा फेरी, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, नमक हलाल, शराबी, जादूगर असे एकापेक्षा एक हिट सुपरहिट चित्रपट देणारे प्रकाश मेहरा यांचा जन्म १३ जुलै, १९३९ रोजी उत्तर प्रदेशातील बिजनौरमधे झाला. त्यांचे बालपण गांधी गल्ली, फतेहपुरी आणि चांदणी चौकमधील आपल्या आत्याच्या घरी गेले.कालांतराने त्यांचे आगमन बॉलीवूडनगरी म्हणजे मुंबईला झाले.पोटापाण्यासाठी ते चित्रपट क्षेत्रात प्रोडक्शन असिस्टंट म्हणून काम करू लागले.
१९६८ हे वर्ष प्रकाश मेहरा यांचे जीवनात नवा प्रकाश घेऊन आले. शशी कपूर यांचा डबल रोल असलेला एक महत्त्वाचा चित्रपट ‘हसीना मान जाएगी’ हा त्यांनी दिग्दर्शित केला.त्यानंतर संजयखान, मुमताज चा (१९७१)‘मेला’, धर्मेंद्र, आशा पारेख यांचा(१९७२) ‘समाधी’ आणि राजेंद्रकुमार, राखी गुलजार, जया बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला (१९७२)‘आन बान’ हे तीन चित्रपट दिग्दर्शित केले.
जंजीर
असे म्हणतात ना की, एखाद्याच्या नशिबात जे असते ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.. अथवा ज्याच्या नशिबात जे असते ते त्याला मिळते… तसेच ‘जंजीर’ या चित्रपटात बाबत झाले. दोन-तीन मातब्बर नटांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आणि शेवटी हा चित्रपट त्यावेळचा नवखा कलावंत अमिताभ बच्चन यांच्याकडे आला.१९७३ यावर्षी प्रदर्शित झालेल्या’जंजीर’ ने बॉलिवूड नवा सुपरस्टार आणि सुपरस्टार निर्माण करणारा दिग्दर्शक दिला. अमिताभ बच्चन आणि प्रकाश मेहरा दोघेही सुपर डुपर हिट..
त्यानंतर प्रकाश मेहरा आणि अमिताभ बच्चन यांची जोरदार घोडदौड सुरू झाली. या जोडीने ‘खून पसीना’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘लावारिस’, ‘नमक हलाल’, ‘शराबी’ आणि ‘जादूगर’ हे सात उत्तम चित्रपट दिले.
चित्रपटातील वेगळेपण
आपल्या चित्रपटात काहीतरी वेगळेपण देण्याची प्रकाश मेहरा यांची आगळीवेगळी खासियत होती. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाकडे पाहिले तर ही बाब आपल्या पटकन लक्षात येते. ‘हसीना मान जाएगी’ मधे शशी कपूरना स्त्री वेषात दाखवून एक गीत चित्रित केले. जंजीर मधील प्राण यांच्यावर चित्रीत सुपर डुपर हिट -यारी है इमान मेरा हे गीत, अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील व स्त्री वेषातील लावारिस मधील मेरे अंगने में हे गीत, मुकद्दर का सिकंदर – सलामे ए इश्क मेरी जान, नमक हलाल मधील पग घुंगरू बांध मीरा, दे दे प्यार दे- शराबी, चढ गया उपर रे -दलाल, पान बिडी सिगरेट तंबाखू ना शराब -ज्वालामुखी अशी बरीच उदाहरणे आहेत.
प्रकाश मेहरा हे उत्तम गीतकार होते. १९५८ च्या ‘पूर्णिमा’ या चित्रपटात एक गीत त्यांनी कल्याणजी-आनंदजी यांच्यासाठी लिहिले होते. तसेच लिहिलेले शराबी या चित्रपटातील मंजिले अपनी जगह और रास्ते अपनी जगह..
या गीतास’फिल्मफेअर’चे सर्वोत्कृष्ट गीताचे पारितोषिक मिळाले. एकूणच असे म्हणता येईल की आपल्या चित्रपटातील संगीतासाठी ते अतिशय जागृत असत. संगीतकारांशी त्यांचे केवळ व्यावसायिक नव्हे तर भावनिक देखील नातेसंबंध होते. याचे प्रतिसाद चित्रपटातून देखील उमटलेले आपल्या लक्षात येतात. कल्याणजी-आनंदजी असो की बप्पी लहरी असो या संगीतकारांनी त्यांच्या चित्रपटातून जे अप्रतिम, अवीट, कर्णमधूर असे संगीत दिले त्याला तोड नाही. प्रकाश मेहराजींनी पुढे १९९१ ला अनिल कपूर व माधुरी दीक्षित यांना घेऊन ‘जिंदगी एक जुआँ’ तर १९९६ ला पुरु राजकुमारला (राजकुमार यांचा पुत्र) घेऊन ‘बाल ब्रह्मचारी’ हे चित्रपट निर्माण केले. मात्र दोन्ही चालले नाहीत. मात्र ‘दलाल ‘ (१९९३) हा चित्रपट मिथुन चक्रवर्ती व आयशा जुल्का ला घेऊन केला. हा चित्रपट बऱ्यापैकी चालला.
प्रकाशजींची प्रत्यक्ष भेट
या अवलिया निर्माता- दिग्दर्शकाची भेट घेण्याचा योग मला सिने पत्रकार असताना आला. मुंबई गोरेगाव येथील फिल्म सिटी मध्ये १९८७ मध्ये मोहब्बत के दुश्मन या चित्रपटाची शूटिंग सुरू होते. हेमा मालिनीजी, राजकुमारजी यांच्यावरील एक प्रसंग चित्रित होत होता. त्या ठिकाणी मी शूटिंग कव्हरेज साठी गेलो, असता प्रकाश यांची अल्पशी भेट झाली. परंतु त्यांची मुलाखत मला घेता आली नाही. याची खंत आजही वाटते.
२१ चित्रपटांचे दिग्दर्शन
प्रकाशजींनी आपल्या कारकिर्दीत २१ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यातील ‘हसीना मान जाएगी’, ‘समाधी’, ‘जंजीर’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘ज्वालामुखी’, ‘लावारिस’, ‘नमक हलाल’ आणि ‘शराबी’ दलाल, हे काही मोजके चित्रपट व्यावसायिकदृष्टया सुपरहिट ठरले.
मराठी चित्रपट निर्मिती
१९९२ ला त्यांनी ‘सगळे सारखेच’ हा मराठी चित्रपटही निर्माण केला. यात अनंत जोग, अश्विनी भावे, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, ज्योत्स्ना पडळकर, भगवान दादा यांच्या भूमिका होत्या. प्रदीप दीक्षित यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हॉलिवूडमधील चित्रपट निर्मितीसंस्थेच्या संयुक्त सहकार्याने चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न प्रकाशजींनी केला. अमेरिकी अभिनेता फ्रॅन्क यंदोलिनोला व हॉलिवूड अभिनेता चार्ल्स ब्रॉन्सन यांना घेऊन ते ‘दि गॉड कनेक्शन’ हा चित्रपट निर्माण करणार होते. तसेच भूतपूर्व जगज्जेता मुष्टियोद्धा महंमद अली (कॅशिअस क्ले) आणि अमिताभ बच्चन यांना घेऊनही एक चित्रपट निर्माण करण्याचीही त्यांची इच्छा होती. पण काही कारणास्तव ती प्रत्यक्षात साकारली गेली नाही. असो.
विविध मानसन्मान
रसिक प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादा सोबतच प्रकाश मेहराजींना या क्षेत्रातील बरेच मानसन्मान प्राप्त झाले. यात प्रामुख्याने२००६ आणि २००८ मधे अनुक्रमे दिग्दर्शकांच्या संघटनेतर्फे (आयएमपीडीए) आणि निर्मात्यांच्या संघटनेतर्फे (इम्पा) ‘जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कुटुंबाशी नाते व काहीशी कौटुंबिक पार्श्वभूमी, संघर्ष आपल्या चित्रपटातून दाखवणारे प्रकाशजी हे प्रत्यक्षातही भावनाशील होते. त्यांच्या चित्रपटातून याचा प्रत्यय आपणास आलेला आहेच. कुटुंब प्रधान नायक, त्याचे आपल्या कुटुंबाप्रती असलेले भावनिक नाते अशा बऱ्याच बाबी त्यांच्या चित्रपटातून दिसून येत. प्रत्यक्ष जीवनात देखील ते असेच होते. शेवटच्या काळात पत्नीचे निधन आणि त्यानंतर आलेल्या काही कौटुंबिक अडचणी यांना तोंड देत त्यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी कर्मभूमी मुंबई येथे निधन झाले.
………………………………..
प्रकाशजी निर्मित -दिग्दर्शित चित्रपट१- हसीना मान जाएगी
२-मेला
३- समाधी
४- आन-बान
५-जंजीर
६- मुकद्दर का सिकंदर
७-हेरा फेरी
८-हाथ की सफाई
९-ज्वालामुखी
१०-लावारिस
११-नमक हलाल
१२-शराबी
१३-जादूगार
१४- खून पसीना
१५- जिंदगी एक जुआँ
१६-बाल ब्रह्मचारी
१७- दलाल
१८- घुंगरू
१९- एक कुंवारा एक कुंवारी
२०- आखरी डाकू
२१- देशद्रोही
२२- इमानदार
२३-जख्मी
२४-जुल्म
२५-मोहबत के दुश्मन
२६-खलिफा
२७-सगळेच सारखे (मराठी)
————————————–
Dr Raju Patodkar
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई येथे वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती) (वर्ग-1) या पदावर कार्यरत.
शिक्षण- पीएच.डी, एम.ए., (जर्नालिझम), एम.ए., (मराठी), एम.ए., (राज्यशास्त्र), एम.ए., (समाजशास्त्र), बॅचलर इन ड्रामा, हिंदी (पंडित), जीडीसीए, बी.कॉम, बी.जे., जवळपास दोनशे मराठी, हिंदी मालिका तसेच 25 मराठी चित्रपटात अभिनय. राज्यातील विविध वर्तमान पत्रातून लेखन. जवळपास 5 हजार लेख-मुलाखती प्रकाशित.
पी.एच.डी. विषय श्री. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील सामाजिक वास्तवाचा संवाद एक चिकित्सक अभ्यास. (1975 ते 2005)
भ्रमणध्वनी क्र.- 9892108365.