बच्चन आणि भोसले. दोन्ही आडनावे इंग्रजी भाषेतील बी ने सुरु होणारी. एक आहे बीग बी आणि दुसरा स्मॉल बी. स्मॉल बी मधील भोसलेंचा बी म्हणजे आपले मराठमोळे नाव सुदेश भोसले (Singer Sudesh Bhosle). आपल्या मिमिक्री कलेत बीग बींचा आवाज सुदेश इतका हुबेहूब काढतात की कित्येकदा स्वतः अमिताभ बच्चनही गोंधळून जातात. “ये गाना मैने कब गाया?” ही पहिली प्रतिक्रिया दिली होती अमिताभ यांनी सुदेश यांनी गायलेले ‘हम’ चित्रपटातले सुपरहिट ‘जुम्मा चुम्मा दे दे’ ऐकल्यावर! आज सुदेशजींचा वाढदिवस. (Birthday Wishes to Singer Sudesh Bhosle)
सुदेशजींवर कलेचे संस्कार घरातच झाले. आई सुमनताई भोसले व आजी दुर्गाबाई शिरोडकर दोघीही सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका तर वडील एन.आर. भोसले चित्रकार. सुदेश यांना बालपणापासूनच आवाजात लवचिकतेचे वरदान आहे व हिंदी सिनेमांची व संगीताची प्रचंड आवड असल्याने विविध कलाकारांचे आवाज काढण्याचा, त्यांच्या आवाजात गाणी म्हणण्याचा जणू त्यांना छंदच होता.
पुढे तो छंद इतका वाढला कि तो त्यांची ओळखच बनला. तसे तर सर्वच कलाकारांची मिमिक्री ते छान करतात पण अमिताभ यांच्या इतकाच हुबेहूब आवाज ते के. एल. सैगल, अशोक कुमार, आर.डी. बर्मन, राजकुमार, एस.डी. बर्मन, संजीव कुमार व अनिल कपूर यांचा काढतात. संजीव कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या शूटिंग पूर्ण झालेल्या चित्रपटांसाठी संजीवजींच्या आवाजातले राहिलेले डबिंग मग सुदेशजींनी पूर्ण केले. ‘तेजाब’ च्या प्रदर्शनाच्या वेळी सुद्धा अनिल कपूर यांच्या व्यस्ततेमुळे चित्रपटाचे सेन्सॉर थांबले होते तेंव्हा सुरुवातीच्या काही रिळांमध्ये सुदेश यांचा आवाज वापरण्यात आला. आर.डी. बर्मन, आशा भोसले तसेच लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीसोबत सुदेशजींनी खूप स्टेज शोज केले.
ग्रेट मिमिक्री कलाकार असलेले सुदेशजी एक चांगले अभिनेते व स्वतःचा वेगळा आवाज असलेले गायकही आहेत. ‘झलझला’ या १९८८ साली आलेल्या चित्रपट त्यांना पार्श्वगायनाची प्रथम संधी दिली ती आर.डी. बर्मन यांनी. त्यानंतर आजपर्यंत सुदेशजींनी बरीच गाणी गायली. २००८ साली त्यांना ‘मदर टेरेसा मिलेनियम अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले.

१ जुलै १९६० रोजी जन्मलेले सुदेशजी आज ६१ वर्षांचे झालेत.
अशा अवलिया व प्रतिभासंपन्न गायकास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Birthday Sudesh Bhosle!