– अरविंद गं वैद्य

(ज्येष्ठ सिनेसमीक्षक अरविंद गं वैद्य यांनी गायक मुकेश यांच्या निधनाच्या बातमीनंतर १९७६ साली त्वरित लिहिलेला व दैनिक मराठवाड्यात प्रकाशित झालेला व नंतर अरविंद वैद्य यांच्या ‘छोड गये बालम’ या पुस्तकातील लेख आज खास नवरंग रुपेरीच्या वाचकांसाठी पुन्हा प्रकाशित करीत आहोत)

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

मानवी मनातील सुख-दुःखाबाबतच्या संवेदना पत्रकारितेच्या व्यवसायात बथ्थड होतात की काय, अशी शंका गेले काही दिवस सारखी मनात येत होती. कारण हर्ष किंवा दुःख या दोहोंपैकी कुठल्याही एका भावनेची अभिव्यक्ती करणारे एखादे वृत्त दैनिकाच्या कार्यालयातील दूरमुद्रकावर येताना पाहिले म्हणजे या अनुभवाचे आपण पहिले साक्षीदार आहोत, या जाणिवेचा केवढा अभिमान वाटायचा; परंतु शनिवारी प्रसिद्ध पार्श्वगायक मुकेश (Playback Singer Mukesh) यांच्या निधनाचे वृत्त दूरमुद्रकावर आले अन् हा सारा अभिमान फोल असल्याचे क्षणार्धात जाणवले आणि आपले मन आपण समजतो तितके बथ्थड झालेले नाही याची साक्षही त्यानंतर मनावर आलेल्या विषण्णतेच्या सावटाने पटली. (Remembering the Legendary Singer of Hindi Cinema, Mukesh)

वस्तुतः आज तू या जगात नाहीस; पण तुझ्या सुरांनी आमच्याशी जे अनामिक नाते जोडले होते ते कसे विसरता येईल! कारण तुझ्या आवाजाचे वैशिष्ट्यच असे होते की, जनसामान्यांना तो जवळचा वाटायचा. मला वाटते राज कपूरला पडद्यावर लोकप्रियता मिळवून देण्यात तुझा वाटा सिंहाचा आहे. कारण ‘राज’ने पडद्यावर साकार केलेल्या सामान्य माणसाच्या कलेवरात तुझा आवाज घुमला तेव्हाच तो प्रेक्षकांना जिवंत वाटला हे सत्य डोळ्याआड करून चालणार नाही. ‘फिर सुबह होगी’ तले साहिरच्या लेखणीला पडलेल्या दुर्दम्य आशावादाची झलक दाखविणारे स्वप्न तुझ्याच गोड स्वरांनी जनसामान्यांच्या गळी उतरवले. तीच गत साहिरच्या लेखणीच्या तिखट फटकाऱ्याची. ‘चिनी अरब हमारा, रहने को घर नहीं सारा जहाँ हमारा’तील वेदनेला जिवंत स्वरूप देण्याची किमया तुझाच स्वरू करू शकला. खरं म्हणजे ‘तू कहे अगर मैं जीवनभर गीत सुनाता जाऊ’ असं आपल्या अनोख्या ‘अंदाज’मध्ये सांगणाऱ्या मुकेश नामक विश्वासार्ह माणसानं आपलं ते वचन पाळलं नाही अशी तक्रार आम्हा रसिकांची आहे.

अर्थात आम्हाला याचीही पुरेपूर खात्री आहे की, आपल्या खास अनुनासिक स्वरात तू ‘जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ’ या मर्यादेची जाणीव करून देशील; पण ती जाणीव वास्तव असली तरी मन तू गेलास हे मान्य करीत नाही. कारण दैनंदिन जीवनातील संघर्षातून सामान्य माणसाला आपलं स्वत्व विसरायला लावण्याचे सामर्थ्य तुझ्या सुरात होते. आज नेमकी तीच गोष्ट दुर्मिळ झाली आहे.

तू गेलास खरा; परंतु तुझ्या असंख्य लोकप्रिय गीतांनी मनात फेर धरलाय. शंकर-जयकिशन व तू मिळून एक अख्खी पिढी झपाटून टाकलीय. किशोरच्या ‘यॉडलिंग’ वर दिल टाकणाऱ्या आजच्या तरुणांनाही ‘यहुदी’तले तुझे ‘ये मेरा दिवानापन है’ ऐकले की तुझ्या स्वरांच्या शक्तीची साक्ष पटते. तसा तू गायनातील सर्वच विभागात निपुण होता असंही नव्हे. वस्तुतः तू मधल्या पट्टीतला गायक; पण स्पष्ट शब्दोच्चार, स्वरातील स्वाभाविकता व समोर असेल ते गीत त्यातील भावनांशी समरस होऊन गाणे या तुझ्या अनोख्या पद्धतीमुळे रसिकांच्या हृदयाच्या तारा छेडल्या जात.

गेली पस्तीस वर्षे आम्ही मनोभावे श्रोत्यांची भूमिका तुझ्यासंदर्भात कटाक्षाने पार पाडली आहे; पण आज मात्र आमची पाळी आहे. कारण ‘कभी जो कह न पाये बात अब होटों पे आयी है’ मात्र ‘अदालत उठ चुकी अब करेगा कौन ‘सुनवाई’ असे म्हणून तू आमची बोळवण करू नकोस. कारण तुझा अखेरचा ‘राम राम’ स्वीकारताना एवढे हितगुज करण्याचा आमचा हक्क आहे असे वाटते.

ओहरे ताल मिले नदी के जलमें (अनोखी रात), माँझी नय्या ढूंढे किनारा (उपहार), अशी लाटांवर लहरत येणारी गीतं असोत की ‘रुक जा ओ जानेवाली रुक जा’ (कन्हैया), रुबी ओ रुबी (चाहत) अशी उडत्या चालीची गीते असोत तुझा आवाज आपल्या वैशिष्ट्यांसह सुमारे दोन तपे रसिकांना मोहवून टाकीत होता. मात्र तू रमला खरा विरहगीतात. तुझ्या आवाजातील ‘दर्द’ अशा वेळी खरी बहार आणायचा अन् त्या गाण्याचं अक्षरश: सोनं व्हायच. कारण तुझे शांत आणि दर्दभरे स्वर थेट काळजात भिडत.

‘माशूका’ नामक चित्रपटात तू पडद्यावर आलास अन् गेलास; परंतु नंतर तब्बल ३५ वर्षे पडद्यामागे राहूनही रसिक तुझ्यावर ‘आशिक’ होते, हाही विलक्षण प्रकार म्हणावा लागेल. तू एका गाण्यात म्हणाला आहे की, ‘तुम जो हमारे मीत न होते, गीत ये मेरे गीत न होते ते शब्दश: खरं आहे. रसिकांशी तुझे नाते एवढे अतूट होते म्हणूनच तुझ्या गीतांच्या ‘बरसात’ मध्ये रसिकांना चिंब भिजायला झाले, की कोण उत्साह येई आणि तुझ्या सुरांची ही बरसात आता बंद झाल्यानेच ‘इस वीराने में एक दिन घुट के मर जायेंगे हम’ या ‘ये मेरा दिवानापन’च्या पुढील ओळी आठवल्या म्हणजे जीव कासावीस होतो. खैर. तुझी नवनवी गीते आता आम्हाला ऐकायला मिळणार नाहीत; परंतु जेव्हा जेव्हा तुझी गीतं कानांवर पडतील तेव्हा ती निश्चितच हे जीवन सुसह्य करतील असा विश्वास वाटतो.

कारण आमची अवस्था तर ‘खंजर तुम्हारी याद का इस दिल पे चल गया! आँखोंसे आँसुओं का जनाजा निकल गया।’ अशी झाली आहे. या नश्वर जगातील व्यवहार पार पाडताना तुझी आठवण आमच्या हृदयात कशी कायम राहील हे मरहूम ‘बशिर बद्रच्या शब्दांत थोडासा फेरफार करून सांगायचे झाल्यास मी म्हणेन की, ‘उजाले तेरे यादों के हमेशा साथ रहेंगे। न जाने जिंदगी की कौन सी गली में शाम हो जाये।’

हिंदी सिनेमाच्या अशाच जुन्या जमान्यातील गोल्डन इरा काळातील अधिक लेखांसाठी क्लिक करा

Arvind G Vaidya
+ posts

Leave a comment