-अरविंद गं वैद्य 

‘इतनीसी भूल और उसकी इतनी बड़ी सजा’ हा त्याचा ‘देवदास’ मधला रक्त गोठविणारा संवाद कोण विसरेल? ‘चले आज तुम यहाँ से हुयी जिंदगी पराई’ हा त्याचा काळजाला डागण्या देणारा आक्रोशही त्याच जातकुळीतला. ‘फुटपाथ’मधील ‘शामे गम की कसम’ या तलतच्या गीताला पडद्यावर न्याय देताना त्याने डोळ्यातून व्यक्त केलेली आर्तता आजही काळजात घर करून आहे. मी दिलीप कुमार (Actor Dilip Kumar) नामक पडद्यावरील शोकात्म भूमिकांच्या राजाचा उल्लेख करतोय हे एव्हाना बुजुर्ग रसिकांनी ओळखलं असेल. (Tribute to the Legendary Actor of hindi cinema Dilip Kumar)

तब्बल पाच दशके या असामीने पडद्यावर गाजविली  आहे आणि तेव्हापासून दर्द, एकाकीपणा व मृत्यु यांचे वणवे त्याने रसिकांच्या हृदयात पेटते ठेवण्याचे अवघड काम केले आहे. फिल्मी दुनियेत तो आज पडद्याचा ‘शहेनशहा’ नसता तरी या धवल पडद्याने त्याच्या अभिनयाचे सप्तरंग पाहिले आहेत आणि अभिनयाची ही खाशी मेजवानी रंसिक अद्याप विसरलेले नाहीत. अगदी त्याच्याच भाषेत अन् स्टाईलीत सांगायचं तर ‘ना! ना!! हम वो कहर भूल ही नहीं सकते और भूले भी क्यों?”

जिवंतपणी आख्यायिका होण्याचं भाग्य ज्या हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या लोकांना लाभलं त्यात दिलीपचा समावेश करावा लागेल. अभिनय क्षेत्रातील त्याचा ‘नया दौर’, ‘ज्वार भाटा’ पासून ४४ वर्षापूर्वी सुरू झाला अन् पाहता पाहता या तुफानाने रसिकांना आपल्या आवर्तात लपेटून घेतले. त्या काळी मिलन, देवदास, जुगनू, जोगन, मेला अशा अनेक चित्रपटांतून त्याने स्वतःच्या दुःखात बुडालेल्या मनातील सलत्या भावनांशी हितगुज करणाऱ्या अंतर्मुख नायकाची प्रतिमा यशस्वीपणे उभी केली. ढगळ पांढरी पैंट, पांढरा शर्ट, चप्पल तर कधी अचकन व फरकप परिधान करीत दिलीपने या भूमिका जीव तोडून रंगवल्या व प्रेक्षकांना झपाटून टाकले. शिकस्त, हलचल, दाग, फुटपाथ, पैगाम व नया दौर या चित्रातून त्याने त्यावेळच्या तरुणांशी संवाद साधला, नव्हे त्या काळातील तरुणांच्या गळ्यातील तो ताईतच बनला. त्याच्या ४४ वर्षाच्या चित्र कारकीर्दीत तो चढून गेलेल्या यशोसोपानाचे रहस्य कमीत कमी चित्रपट व सर्वोत्तम ते देण्याचा कटाक्ष यातच आहे. नाही तर आजची ‘स्टार पिलावळ’ एका रात्रीत ‘नट’ बनताच दहा दहा चित्रात काम करतात. दिलीपपासून त्यांना खूप काही शिकता येईल. अर्थात या स्टार पिलावळीचे बाप जिथे काही शिकले नाहीत तिथे ही पिलावळ कार्य शिकणार कपाळ? अभिनयाचा हा प्रपात रसिकांना चिंब भिजवीत असताना ही मंडळी नर्मदेतील गोटयाप्रमाणे कोरडीच राहिली. त्याच्या अभिनय कारकीदींवर नजर टाकली तर ही असामी स्वतः भोवतीची रुपेरी चौकट मोडून उजळ, रसरशीत व ताठ व्यक्तिरेखांच्या रूपाने रसिकांच्या मनात चिरंतन स्थान टिकवून आहे.

संवाद फेकीचा खासा ‘अंदाज’

दिलीपची संवादफेकीची ही स्वतः ची अशी पद्धत आहे. खर्जातील आवाज उच पट्टीपर्यंत खेचण्याची दिलीप स्टाईल न्यारीच आहे. आपल्या हळुवार शब्दातून तेवढ्याच नजाकतीने सतत काही तरी सुचविण्याच्या आविर्भावातून एक व्यक्तिमत्व उभे करण्याची किमया त्याला साधली आहे. मिताभिनय व भावदर्शनासाठी चेहरा आणि हात यांच्या नेटवया, किमान व बोलक्या हालचाली कशा कराव्यात हे त्याने अचूकपणे दाखवून दिले नव्हे अन्य नटांसाठी वस्तुपाठच दिला. भावदर्शनासाठी दोन्ही हात जोडून तो कधी याचकासारखा नायिकेसमोर उभा ठाकला, तर मुठी आवळून एक हात उंचावत ‘सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं’ असा दिलासा त्याने आपल्या चाहत्यांना दिला. अंधालाही आपल्या संवादफेकीवर व आवाजाच्या बळावर थिएटरपर्यंत खेचून आणण्याची ताकद असलेले मला वाटत या चित्रसृष्टीत दोनच अभिनेते आहेत. पैकी एक आहे आजचा रसिकांचा लाडका नटसम्राट व गोळीबंद आवाजाचा धनी अमिताभ बच्चन व दुसरा दिलीप, आवाजाच्या प्रतवारीत दिलीप हा अमिताभपेक्षा डावा असला तरी ही कमजोरी त्याने आवाजाला आरोह-अवरोहाची सुरेख साथ देऊन भरून काढली आहे.

संमोहन

दिलीपकुमारचे वर्णन पडद्यावरील संमोहन असेच करावे लागेल. कॅमेऱ्यासमोर हा नट जेव्हा परकाया प्रवेशाचा अफलातून प्रवेश सादर करतो तेव्हा हात नकळत टाळांसाठी एकत्र येतात. ‘आर्क’ लाईटच्या प्रकाशात त्याच्या अभिनयाचे ‘जोहर’ अधिकच उजळून निघाले आहेत. या संमोहन प्रयोगात तो नेहमीच यशस्वी झाला. असे मात्र नव्हे. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे तर ‘कर्मा’तील जुगलबंदीत नसिरुद्दीन शहाने त्याला मात दिली हे कबूल करायलाच हवे. मात्र ‘शक्ती’त आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर शवागारात तिच्या पार्थिवाचे दर्शन घेताना त्याने मुद्राभिनय व अल्प संवादाच्या परिणामकारक फेकीद्वारे रसिकांच्या अंगावर अक्षरश: रोमांच उभे केले. याच चित्रात प्रेक्षकांच्या जीव की प्राण असलेल्या अमिताभ समवेतची अभिनयाची एक चकमक तर त्याने अफलातून जिंकली. शोकमग्न दिलीपचा हात दाबून अमिताभ न आवरणारे रडे आवरू पाहतो तेव्हा त्याच्याकडे गुडघ्यावर कोपर ठेवून तिरक्या मानेने पाहत त्याने जो ‘नेव कटाक्ष’ दिला, तो तर संस्मरणीय होय, ‘लीडर’मध्ये दिलीप मोतीलाल जुगलबंदी अशीच रंगली. ‘जहाँ देखो वहां मिलावट, रोटी में मिलावट, तेल में मिलावट, यहाँ तक के प्यार में मिलावट’ हा त्याचा ‘लीडर’ची जातकुळी स्पष्ट करणारा संवाद काय वा ‘तुम अपने दूध का हिसाब मांग रही हो’ असे राणी जोधाबाईला ठणकावणारा त्याचा सलीम आजही मनःपटलावर त्याच्या सर्व हरकतीसह याद आहे. नव्हे त्याच्या अभिनयाचे हे पडद्यावरील ‘क्षेत्र’ माझ्यासारख्या चित्रपंढरीच्या वारकऱ्याने मोठ्या भक्तिभावाने | ठेवले आहेत. ‘अमीर और गरीब का काहे का झगडा सेठ, झगडा तो हात और मशीन का है’ यंत्र युगातले दाहक सत्य व जाहत मिर्झा हा संवाद लेखक लिहून गेला. तेव्हा ही नया दौर ची नांदी उरली आणि हेच शब्द त्याच्या मुखातून निघताच त्याला संमोहन अस्त्राचे रूप लाभले. अख्ख्या फिल्मी दुनियेवर आपल्या या अस्त्राच्या जोरावर त्याने गारूड केलं हे मात्र चिरंतन सत्य होय.

दीदार

चित्रपटातील या संमोहन अस्त्राची पहिली झलक पाहायला मिळाली, ती ‘दाग’मध्ये, मला अजूनही आठवतं, १९५३ साल असावं. औरंगाबादेतील ‘सादिया’ या चित्रपटगृहाचा शुभारंभ दिलीपच्या याच चित्रपटाने झाला होता. वडिलांच्या सोबत अगदी पहिल्या दिवशी हे चित्र पाहिलं होतं. त्यावेळी माझं वय होतं अवधं दहा वर्षाचं. या चित्रपटातील दारुड्या शंकरची मध्यवर्ती भूमिका दिलीपने रंगवली होती. त्याचा अभिनय अन् तलतच ‘ऐ मेरे दिल कही और चल गम की दुनिया से दिल भर गया’ हे गाणं यांचा आजही एक अमीट असा ठसा. कायम आहे. तलतच्या रेशमी स्वराशी आणि दिलीपशी मग एक अतूट नातेच जुळले. खरं म्हणजे तलत हा दिलीपसाठी प्रथम गायला ते ‘आरुजू ‘तील ‘ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल जहाँ कोई न हो’ हे गीत; पण आमच्या कानावर ते फार उशिरा पडलं. त्या आधी ‘अंदाज’ पाहिल्याचे अंधुक आठवतं; परंतु त्यावेळी बालसुलभ मनाला भावले ते ‘ये मेरी लाडली, लाडो को तू रानी’ हे लताचे त्यातील गीत. दिलीपच्या त्यातील अदाकारीचे अप्रूप वाटले ते पुढे कॉलेज जीवनात पुन्हा एकदा ‘अंदाज’ पाहिला तेव्हा त्याचा ‘आन’ पाहिला आणि हा इसम डायलॉगबाजीबरोबरच तलवारबाजीही छान करतो हे पाहून आनंद वाटला. पक्षीराज फिल्मसूचा ‘आझाद’ हा त्याचा चित्रपट तर तेव्हा खूपच आवडला होता. बाबुराव अर्नोळकरांच्या धनंजय, झुंजार व काळा पहाड ऊर्फ चंद्रवदन आदी तीन नायकांच्या भोवती गुंफलेल्या रहस्यकथा त्यावेळी नुकत्याच हातात आल्या होत्या. आधाशीपणे ते वाड्मय मी वाचून हातावेगळे करीत असे. दोन चेहरे घेऊन समाजात वावरणाच्या अशाच तरुणाची भूमिका मला वाटते दिलीपने ‘आझाद’ मध्ये रंगवली होती. ‘कितना हसी है मौसम’ हे सी. रामचंद्र यांचे गीत पडद्यावर दिलीपने गायल्याचे आठवते. ‘अपलम चपलम चपलाई रे’ हे त्रावणकोर सिस्टर्सनी सादर केलेले गाजलेले नृत्यही याच चित्रपटात होते. तर सांगायचा मुद्दा असा की, त्याची ही हलकी-फुलकी भूमिकाही त्यावेळी खूप आवडली होती. पुढे त्याने मीनाकुमारी समवेतच ‘कोहिनूर’ या पोशास्त्री चित्रात असेच धमाल काम केले होते. ‘मधू वन में राधिका नाचे रे’ हे रफीचे गीत पडद्यावर सादर करताना तो सतार बाजवतोय असे दृश्य होते. याचा परिपूर्णतेसाठीचा अट्टहास एवढा की वासाठी तो सतार वादन शिकला. आपण पडद्यावर जे काही करू से परिपूर्ण असले पाहिजे असा त्याचा प्रथमपासूनच कटाक्ष, अगदी दुसरे उदाहरण द्यायचं तर गंगा जमना’तील ‘नैन लड गयी है’ या गाण्याच्या वेळवे त्याचे नृत्य आठवा. नया दौर एवढा जोश त्याने स्वतः निर्माण केलेल्या या एकुलत्या एक चित्रपटात दाखविला होता.

देवदास

त्याच्या अदाकारीने शिखर गाठले ते ‘देवदास’ मध्ये. ‘ऐसे भी दिन आयेंगे’ हे तलतच्या आवाजातील या चित्रपटातील गीत अन ते सादर करताना दिलीपच्या पारदर्शी चेहऱ्याने दाखविलेल्या कारुण्य, दुःख व विरहाच्या छटा म्हणजे जणू ढगाआडचा चंद्रच हे चित्र तर मी अगदी पंढरीच्या वारकऱ्याच्या निष्ठेने पाहिले. म्हणजे असे की, जेव्हा जेव्हा थिएटरला लागले तेव्हा तेव्हा पडद्यावरचे हे दाहक दुःख अगदी समरस होऊन पाहिले अति मद्यप्राशनात अगदी मरणासन्न अवस्थेत असलेला देवदास बैलगाडीतून पारोच्या घराकडे निघालेला अंधारी रात्र गाडीतील मिणमिणता कंदील सारखान्याने हेलकावतोय जगू देवदासची ‘जीवन’ वित असल्याची जाणीव करून देतोय, अखेर त्याची शुद्ध हरपते अन् दिवाही विझतो. बैलगाडी मुक्कामी पोहोचते तेव्हा ही निजधामास गेलेला असतो. शरदबाबूंचा पराभूत व पिचलेला नायक दिलीपने खर तर स्वरसम्राट सँगलपेक्षाही प्रभावीपणे उभा केला होता. पारो चांद पे भी दाग है असे म्हणून पारो (सुचित्रा सेन) च्या कपाळावर काठीचा वार करून जखम करणारा देवदास (दिलीप) आणि त्याच्या प्रेमासाठी वेश्या व्यवसाय सोडून त्याच्याशी एकनिष्ठ राहणारी यांत आहे. मात्र अलीकडे म्हणजे गेल्या दहाहाला मिळत नाही याची खंत जरूर आहे.

बुंदिया सावन की

दिलीपने लतासमवेत ‘मुसाफिर मध्ये ‘बरसन लागी बुंदिया सावन की ही शास्त्रीय अंगाने जाणारी चीजही तेवढ्याच ताकदीने पेश केली होती. अर्थात म्हणून काही तो प्रत्येक चित्रात गात बसला नाही. कारण त्यांच्या लेखी संख्यात्मक बाढीपेक्षा गुणात्मक प्रगतीला अधिक महत्त्व होते.

आमने सामने

तर सांगायचा मुद्दा हा की पडद्यावरच्या आपल्या या हीरोला प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा होती. किती वर्षांनी म्हणजे अगदी अलीकडे म्हणजे १९८७ साली ती पूर्ण झाली. माझे मित्र व नवरंग रुपेरी चे संस्थापक अशोक उजळंबकर सुद्धा सोबत होते. स्वारी जळगावचा कार्यक्रम आटोपून येथील एका पंचतारांकित हॉटेलात उतरली आहे. असे कळताच तिकडे धावलो. सकाळी दहा ते बारा अशी दोन तास प्रतीक्षा केल्यानंतर दिलीपचा ‘दिदार झाला. त्याचा मूडही मोठा छान होता. पत्रकार आहोत, बोलू इच्छितो असे म्हणताच तो झटकन उठला अन् खास अंदाजमध्ये व्यवस्थापकांना आर्जवी स्वरात म्हणाला, ‘अरे भाई आपको जरा जहमत देता हूँ, जरा लॉन पर कुर्सिया लगाईये, मै इन लोगोसे बाते करना चाहता हूं.’

Arvind Vaidya (Right) and Ashok Ujlambkar (Left) with Dilip Kumar
Arvind Vaidya (Right) and Ashok Ujlambkar (Left) with Dilip Kumar

 

Ashok Ujlambkar taking Interview of Dilip Kumar
Ashok Ujlambkar taking Interview of Dilip Kumar

सारेच बदलले

हिंदी चित्रपटसृष्टी आता पाऊणशे वर्षांची झाली आहे. खुद्द मी ४४ वर्षापासून या कचकड्याच्या दुनियेत आहे; पण आज सांस्कृतिक व कलात्मक मूल्ये ढासळत आहेत. पडद्यावरचे व पडद्यामागचे सारे संदर्भ बदलले आहेत. ध्येयवादी चित्रांची निर्मिती करणारी मंडळी केव्हाच बाजूला फेकली गेली आहे. आज जमाना आहे तो बाजारू चित्राचा आता साऱ्याच गोष्टींचा बाजार झाला आहे. नको ती मंडळी या व्यवसायात शिरल्याचाही हा परिपाक आहे हे त्याच्या या मुलाखतीचे सार होते. पंडित प्रकाश, अख्तर, शिरीन, प्रल्हाद केशव अत्रे, झिया सरहदी, मेहबूब व्ही. शांताराम आदी दिग्गज मंडळीचा त्याने त्यावेळी आवर्जून उल्लेख केला होता.

विलक्षण काटेकोर

दिलीपकुमार हा ‘पुलोद’चे शरद पवारांचे सरकार असताना मुंबईचा शेरीफ होता. तेव्हा तो औरंगाबादी आला खरा; परंतु काँग्रेस कार्यकत्यांना स्थाने सुनावले होते. व्यासपीठावर पक्षाचा ध्वज लावता कामा नये. या सर्व अटी मान्य झाल्यावर तो भाषणासाठी आला. अस्खलित उर्दूत त्याने झकास भाषणही ठोकले. मतदान व मतपत्रिकेचे महत्त्व विशद करताना तो म्हणाला होता, ‘ये महज एक कागज का टुकड़ा नहीं, ये हक हासिल करणे के लिये हजारो लोगोने अपना खून बहाया है, ये मत भूलो.’

कर्म (की कर्मा?)

औरंगाबादेत अंजली सिनेमागृहाच्या  उद्घाटनाला आला असतानाचे त्याचे भाषण मला अजूनही आठवते. तो म्हणाला होता, ‘हम आज ये पर्देपर क्या बता रहे हैं ये जरा सोचो पण कोण ऐकणार आणि काय कर्म पाहा (की कर्मा ?) सुभाष घईच्या कर्मात त्याला हाती मशिगन घेऊन ठो-ठो करीत बसावे लागले.

या नटसम्राटाचा उल्लेख तो वयाने माझ्यापेक्षा खूप मोठा असला तरी मी पडद्यावरील त्याच्या प्रतिमेच्या जिव्हाळ्यापोटी सातत्याने एकेरी केला आहे. नाही तरी आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीचा उल्लेख आपण एकेरीच करतो ना! मग औपचारिकपणाची बंधने कशाला? ‘अच्छा तो अब इजाजत हो तो खुदा हाफीज कहूँ!”

(ज्येष्ठ सिने समीक्षक अरविंद गं वैद्य  लिखित व  अजिंक्य प्रकाशन तर्फे २००७ साली प्रकाशित ‘छोड गये बालम’ पुस्तकातून )

Arvind G Vaidya
+ posts

Leave a comment