– अरविंद गं. वैद्य, औरंगाबाद. 

 

आज वऱ्हाडकार लक्ष्मण देशपांडे यांचा जन्मदिन. ‘वर्‍हाड’कार प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे जगाच्या रंगभूमीवरून गमन झाले आहे हे मानायला मन अजूनही तयार होत नाही. एखादा सुहृद जीवनाच्या वाटेवरून जेव्हा अचानक अदृश्य होतो तेव्हा मन सैरभैर होते. लक्ष्मणचा विचार करताना त्याच्या जीवनाचा पट असाच झरझर डोळ्यांसमोरून सरकायला लागला. प्रथम डोळ्यांसमोर आले ते मेळे. ही मूर्ती सर्वात आधी नजरेत भरली ती या मेळ्यांतच. हा काळ तब्बल पंचावन्न वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळी औरंगाबाद शहरही छोटे होते. पैठण गेटच्या पुढे अजिबात वस्ती नव्हती. सार्वजनिक वाहतुकीसाठी घोड्यांचे टांगे हेच एकमेव साधन होते. शहरात चारचाकी मोटारींची संख्या तर दहाच्या आतच असावी. अगदी नाव घेऊन सांगायचे तर राय छोटे लाल, मुरलीधर टाकसाली, हणमंतराव वैष्णव, डॉ. गणपतराव वैद्य, डॉ. श्रॉफ, डॉ. ख्रिश्चन, राजारामपंत पोळ, काझी हमीदुद्दीन (प्रख्यात शायर काझी सलीम यांचे वडील) स्टेट टॉकीजचे मालक सिकंदर खाँ व मोहन टॉकीजचे मालक मोहनशेठ एवढ्या मंडळींकडेच मोटारी होत्या. गुलजार, मोहन व स्टेट ही तीनच चत्रपटगृहे होती. माझी आठवण चुकत नसेल, तर 1953 साली त्यात ‘सादिया’ या चित्रगृहाची भर पडली. दिलीप कुमार – उषाकिरण जोडीच्या ‘दाग’ने हे ‘सादिया’ ाुरू झाल्याचे स्मरते. हे अशासाठी नमूद केले की, करमणुकीची साधने फारशी नव्हती. रेडिओ हा श्रीमंत घरातील दिवाणखान्यातच विसावलेला असे. कनिष्ठ वा मध्यम वर्गाला रेडिओ ऐकण्याची इच्छा झाली तर एखाद्या हॉटेलसमोर रेंगाळावे लागे. अशा काळात गणेश उत्सवातील मेळे म्हणजे सामान्यांसाठी करमणुकीची परमावधीच अन् याच मेळ्यांचा केंद्रबिंदू होता लक्ष्मण.

 

गुलमंडीच्या घड्याळाखाली तेव्हा एक मोठा हौद होता. त्यावर फळ्या टाकून मेळ्यांसाठीचा मंच तयार होत असे. शहागंजात म. गांधी यांचया पुतळ्यासमोरही असाच मंच असे. राजाबाजारातही असे. मुरलीधर गोलटगावकर, दिगंबर खाडे, तबलजी खंडेराव, गौतमराव आहेर ही मेळ्यांची रंगत वाढवणारी मंडळी. त्या दहा दिवसांत शहर अगदी झपाटलेले असे. पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत हे मेळे चालत. जनताही तुफान गर्दी करून त्याचा आस्वाद घेई. या मेळ्यातील सर्वांत कौतुकाचा हक्कदार असे तो लक्ष्मण. आठ ते दहा वर्षांचे हे पोर जेव्हा टांगेवाल्याचे गाणे सादर करी तेव्हा तर पब्लिक अगदी जाम खुश होऊन जाई. ‘अय्या गडे, इश्श्य गडे, काय सांगू पुढे, गुलाबाचा रंग माझ्या गालावर चढे’ हे गाणे लक्ष्मणने सुरू केल्यावर टाळ्या व शिष्ट्यांचा जो पाऊस पडायचा त्याचा आवाज अजूनही कानात घुमतो आहे. त्याची ही सगळी अदाकारी गर्दीत कुठेतरी कोपर्‍यात उभे राहून आम्ही पाहायचो. त्याच्यावर गाण्यानंतर बक्षिसांचाही अस्साच वर्षाव व्हायचा. त्याचा मेळा संपल्यानंतर स्वारीला कोणी तरी कडेवर वा खांद्यावर अन्य कार्यक्रम स्थळाकडे नेत. वाटेत मेवाड, अमृत भांडार वा वतनी हॉटेलात या महाशयांना पेढा, गुलाबजामून द्या. बर्फीही खिलवली जायची. त्याच्या या भाग्याचा त्या काळात नाही म्हटले तरी थोडा हेवा वाटायचाच. या माणसावर रंगदेवता अशी तेव्हापासून प्रसन्न होती. साक्षात नटसम्राट नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्वांनी त्याचे कौतुक केले होते. त्याकाळी चांदीचे बंदे रुपये या पठ्ठ्याने त्यांच्याकडून बक्षीस मिळविले होते रंगदेवतेने नटसम्राटाच्या हस्ते दिलेला हा ‘प्रसाद’ त्याच्या पुढील वाटचालीची प्रसाद चिन्हेच ठरला. छोटा लक्ष्मण तेव्हा संतरामच्या वाड्यात राहायचा. तो पदवीधर झाला अन् पुढील शिक्षणाच्या निमित्ताने धडपडू लागला. याच काळात विद्याधर सदावर्ते, गोपाळ साक्रीकर यांच्याबरोबरीने तो ‘दैनिक अजिंठा’ या त्या काळातील एकमेव दैनिकात दिसायला लागला. स्वारी तेथे अर्धवेळ नोकरीसाठी चिकटली होती. एम. ए. झाल्यावर मौलाना आझाद व सरस्वती भुवन या दोन्ही ठिकाणी हा काम करायचा. सरस्वती भुवन संस्थेने नाट्यशास्त्र विभाग सुरू केला अन् मग लक्ष्मण तेथे रमला. मराठवाडा विद्यापीठानेही नाट्यशास्त्र विभाग सुरू केला. अलकाजींचे शिष्य असलेले कमलाकर सोनटक्के यांनी या विभागाला ‘रंग व रूप’ दिले. पुढे याच विभागाचा लक्ष्मण प्रमुख बनला. या विभागाने अनेक कलावंत चित्र-नाट्यसृष्टीला दिले. मात्र प्रसंग येताच या विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामाही लक्ष्मणने तेवढ्यच बाणेदारपणे दिला.

 

त्याचं ‘वर्‍हाड’ एव्हाना सर्वत्र संचार करीत होतं. लंडन, अमेरिका, अबुधाबी अशी सफर करून आले. त्याच्या ‘वर्‍हाड’चा हजारावा प्रयोग 16 डिसेंबर 1989 ला मुंबईत शिवाजी मंदिरला झाला. त्या प्रयोगासाठी लक्ष्मणने मला आग्रहाने नेले होते. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार प्रमुख पाहुणे व ख्यातनाम साहित्यिक कै. विजय तेंडुलकर, कविवर्य ना. धों. महानोर हे हजर होते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी आम्ही दाराशी उभे होतो. तेवढ्यात ख्यातनाम अभिनेत्री कै. ललिता पवार माझ्याजवळ आल्या. मी त्यांना नाट्यगृहात आसनस्थ व्हा, अशी विनंती केली असता मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला मी तुमच्यासमवेत येथे उभी राहू का? अशी विचारणा त्यांनी माझ्याकडे केली. बाईचा हा मनाचा निर्मळपणा काळजाचा ठाव घेऊन गेला. एक मात्र केले. त्यांना चटकन म्हणालो, ‘तुम्ही भेटलात खूप आनंद झाला. ‘अनाडी’ चित्रपटातील तुम्ही साकारलेली ‘मिसेस डिसोझा’ आम्ही आयुष्यभर विसरणार नाही.’ बाईंच्या पाणावलेल्या डोळ्यांतील चमक आणि एक डोळा बारीक करीत चेहर्‍यावर उमटलेले हसू खूप काही सांगून गेले.

 

या हजाराव्या प्रयोगाचा वृत्तांत लिहिताना मी ‘लोकमत’मध्ये एक लेख लिहिला. त्यात ‘वर्‍हाड’ची लक्ष्मणरेषा कधी ओलांडणार? असा सवाल केला होता. माझ्या त्या लेखाने लक्ष्मण तेव्हा काहीसा दुखावला गेला होता. बरेच दिवस त्याने अबोला धरला होता. पुढे मग पुन्हा ‘उपरणे’ झटकावे तसा त्याने अबोलाही सोडला. माझ्याशी संवाद साधताना त्याने आपली ‘वर्‍हाडी’ संवादशैली कधीही सोडली नाही. माणसे वाचण्याच्या छंदातून कदाचित असे होत असावे. नट म्हणून लक्ष्मणचा तो अभ्यासाचाच विषय होता, तर माणूस वाचण्याचा माझाही छंद आहे.

 

‘वर्‍हाड’बद्दल एक गोष्ट मुद्दाम नमूद करावी लागेल ती म्हणजे, त्याचे उगमस्थान प्रा. कमलाकर सोनटक्के यांचे लग्नाचे वर्‍हाड प्रत्यक्षात फुलंब्रीहून मुंबईला गेले. त्यात लक्ष्मण ‘वर्‍हाडी’ म्हणून हजर होताच. त्याची निरीक्षण शक्ती व इतरांच्या लकबी आत्मसात करण्याची हातोटी ही तेवढीच जबर. कल्पनाशक्तीला थोडे स्वैर सोडून त्याने हे ‘वर्‍हाड’ लंडनला नेले अन् पाहता पाहता ते गिनीज बुकात जाऊन विसावले. या वर्‍हाडात तब्बल बावन्न पात्रे आहेत. त्यापैकी बबन्या, काशीनाथ, बाप्पा, जॉनराव, वन्सं असं बरंच मोठं खटलं. हा अफलातून रंगकर्मी केवळ आपल्या कायिक, वाचिक अभनयाद्वारे व उपरण्याच्या काठाचा पदर धरून अशी झोकात उभी करायची की, पाहणार्‍यांच्या मुखातून ‘क्या बात है’ अशी दाद आपसूकच बाहेर पडत असे. त्याचे हे ‘उपरणे’ही मोठे गमतीदार होते. ते उलटे केले की, लुगड्याचा काठ नजरेस पडे. ही ‘उपरणे’ बदलण्याची क्रिया तो रंगमंचावर ज्या सहजतेने करी तेवढ्याच अकृत्रिमपणे तो भूमिकेचा सांधाही बदलत असे.  अगदी प्रारंभीच्या काळात निमंत्रितांसाठी सरस्वती भुवनच्या प्रांगणात केलेला प्रयोग व हजारावा प्रयोग या दोन्ही घटनांचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले आहे. नट लक्ष्मण कसा विकसित व प्रगल्भ होत गेला, हे मी पाहिले ओ. त्याची आवाजावरची विलक्षण हुकूमत तर ‘वर्‍हाड’ला सोनेरी वर्ख चढवून जायची. दोन स्त्रियांतील संवाद असो वा त्यांच्यातील परस्परांविषयीचा राग असो ते सगळे फणकारे तो हुबेहूब दाखवायचा. ख्यातनाम साहित्यिक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी लग्नघरातला ‘नारायण’ मराठी वाङ्मयात अजरामर करून ठेवला आहे, तर लक्ष्मण देशपांडेने अख्खे बावन्न पात्रांचे ‘वर्‍हाड’च चिरंजीव करून ठेवले आहे. हा बावन्न पात्रांच्या पत्त्यांचा कॅट त्याच्या हाती असे. रंगमंचावर आल्यावर वेळेबरहुकूम ते ते पात्र त्याच्याच रूपात ‘कॅट वॉक’ करू लागे. हे सगळे विभ्रम डोळे विस्फारून पाहायचे अन् आवाजाद्वारे त्याने उभे केलेले पात्रांचे हे गारूड केवळ अनुभवायचे, एवढेच काम रसिकप्रेक्षकांना उतर असे. मागे एकदा नटसम्राट दिलीपकुमार याच्याबद्दल लिहिताना मी नमूद केले होते की, त्याच्या ‘देवदास’ची आंधळ्यांनाही आस्वादता येऊ शकेल एवढी प्रभावी संवादफेक त्याने केली आहे. अगदी अशीच किमया लक्ष्मणनेही साधली याचा सार्थ अभिमान वाटतो. त्याचा लंडनमधला ‘वर्‍हाड’चा प्रयोग मँचेस्टरस्थित श्री. रामदास गोठीवरेकर यांनी ऐकला अन् आपली प्रतिक्रिया त्याला 1984 साली कॅसेटवर नोंदवून पाठविली. हे गृहस्थ अंध आहेत. ‘वर्‍हाड’ने आपल्याला अपूर्व आनंद दिला, असे त्यांनी नमूद केले आहे. अंध व्यक्तीलाही ‘वर्‍हाड’ने सुखावले ही लक्ष्मणच्या आवाजाची किमया आहे, हे निराळे सांगण्याची गरज नसावी. हिन्दी साहित्यातील पं. चंद्रधर शर्मा गुलेरी यांची ‘उसने कहा था’ ही एकच कथा खूप गाजली होती. लक्ष्मणचे ‘वर्‍हाड’ही तसेच एकमेवाद्वितीय आहे. त्याने नंतर द्विपात्री ‘नटसम्राट’चा प्रयोगही केला. शिरवाडकरांचा ‘नटसम्राट’ जातिवंत नटाला नेहमीच खुणावत असतो. लक्ष्मणही त्याला अपवाद नव्हता; पण अखेरीस ‘वर्‍हाड’ ते वर्‍हाडच! त्याचाच तो केंद्रबिंदू होता.

 

 

लक्ष्मणने या जगाचा निरोप घेतला त्याच्या आधल्याच दिवशी मी व माझे स्नेही अशोक उजळंबकर इस्पितळात जाऊन त्याला भेटून आलो. भेटून म्हणण्यापेक्षा पाहून आलो असे म्हणणेच जास्त उचित होईल. हा ‘वर्‍हाड’काराचा शेवटचा प्रवेश आहे, याची जाणीव त्याला पाहताच झाली. तोंडात प्राणायूचा मास्क लावलेला. मी त्याच्या खाटेजवळ जाऊन उभा राहिलो. उजळंबकरांना तर ते पाहणेही अशक्य झाले ते चटकन खोलीबाहेर निघून गेले. मी मात्र एका नटसम्राटाची शेवटची अदाकारी पाहत मूक उभा होतो. त्याच्या डोळ्यात मला पाहताच एक चमक दिसली. ओळख पटल्याची ती खूण होती. तो मात्र त्याच्याभोवती असलेल्या आप्त महिलाना ‘मला घरी घेऊन चला’ असे सारखे म्हणत होता. मनात आले ‘नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकर ‘घर देता का घर’ असे म्हणत असतात आणि एक हा ‘नटसम्राट’ ‘घरी घेऊन चला’ असे म्हणतो आहे. तो घरी म्हणाला खरे, पण त्याला निजधामास जाण्याची ओढ लागली आहे, जे जाणवत होते. घरी परतलो; पण मन कशातच लागत नव्हते. दुसर्‍या दिवशी सकाळी ‘सकाळ’ हाती घेतला, तर लक्ष्मणरावांचे ‘वर्‍हाड’ वैकुंठाला गेल्याचे समजले. ईश्वराच्या इच्छेपुढे कोणाचे काय चालते. कदाचित त्या जगनियंत्यालाही ‘वर्‍हाड’ पाहण्याची इच्छा झाली असेल. लक्ष्मणराव तुम्ही गेलात अन् सगळं ‘वर्‍हाड’च निवालं.

 

 

जीवनाची लक्ष्मणरेषा ओलांडून तुम्ही ‘वर्‍हाडा’सह वैकुंठ गमन केलंत खरं; पण आता इथला रंगमंच रिक्त झाला, त्याचे काय? नियतीच्या खेळापुढे आपण काय बोलणार?

 

Arvind G Vaidya
+ posts

Leave a comment