– © स्वप्निल पोरे

 

हिंदी चित्रपट आणि चित्रपट संगीत यांच्या सुवर्णकाळाच्या पटावर असंख्य नावे कायमची कोरली गेली. अभिनेत्री नर्गिस (Nargis) त्यापैकी महत्वाचे नाव. 1967 नंतर ज्या अभिनेत्रीचे पडद्यावर दर्शन झाले नाही त्या नर्गिसची आठवण आज सुमारे 53 वर्षांनंतरही काढली जाते, हेच तिचे वेगळेपण! अवघ्या बावन्न वर्षांचे आयुष्य. पण पडद्यावरच नव्हे तर खर्‍या आयुष्यात देखील नर्गिस अविस्मरणीय भूमिका जगली. (Remembering Iconic Hindi Film Actress Nargis on her Birth Anniversary )

——————————————————————

उत्तमचंद मोहनचंद उर्फ अब्दुल रशिद आणि जद्दनबाई यांची ती कन्या. संगीत मैफली गाजविणार्‍या जद्दनबाई पुढे हिंदी चित्रपटात नायिकेची भूमिका करु लागल्या. जद्दनबाई हिकमती होत्या. आधी कोठ्यावर मैफली, नंतर चित्रपटात काम, पुढे स्वतःची चित्रपट कंपनी असा जिद्दीचा प्रवास. त्यांच्याच संगीत फिल्म कंपनीतर्फे निर्मित ‘तलाश ए हक’ या चित्रपटातून नर्गिसचं रुपेरी पडद्यावर पदार्पण झालं. फातिमा रशीद हे नर्गिसचं खरं नाव. चित्रपटासाठी तिचं नामकरण झालं- बेबी रानी! बेबी रानीच्या अभिनयाचं कौतुक झालं. चित्रपट क्षेत्रात प्रवास सुरु झाला खरा, पण नर्गिसला यात कारकीर्द करायची नव्हती. तिला डॉक्टर व्हायचं होतं. पण पुढे मेहबूब खान यांच्यामुळे चित्रपटसृष्टी हेच तिचं जीवन बनलं.©

तेरा – चौदा वर्षांची नर्गिस मेहबूब खान यांच्या ‘तकदीर’ चित्रपटाची नायिका बनली. नर्गिस हे नामकरण मेहबूब यांनीच केलं. मोतीलाल, चंद्रमोहन अशा मातब्बर अभिनेत्यांसमोर नर्गिस आत्मविश्वासानं उभी राहिली. त्यानंतरच्या चित्रपटांपैकी हूमायूँ, नर्गिस हे चित्रपट बर्‍यापैकी चालले. ©

‘आग’ चित्रपटाने नर्गिसच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं. निगार सुल्ताना आणि कामिनी कौशल यांच्या सोबत तिसरी नायिका म्हणून नर्गिसचा आरके फिल्म्समध्ये प्रवेश झाला. तो 1948 चा चित्रपट. त्याचवर्षी अनोखा प्यार, मेला हे नर्गिसचे दिलीपकुमारबरोबरचे चित्रपट प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटातील नर्गिसच्या कामाची प्रशंसा झाली. खरेतर ‘अनोखा प्यार’मध्ये नलिनी जयवंतची भूमिका प्रेक्षकांची सहानुभूती मिळवणारी होती, मात्र नर्गिसची भूमिका सुद्धा छाप पाडणारी ठरली. हे दोन्ही चित्रपट आज त्यातील गाण्यांमुळे आठवले जातात. मेहबूब खान यांचा ‘अंदाज’ चित्रपट नर्गिसच्या अभिनय क्षमतेची पावती होता. एकतर्फी प्रेमातून झालेली कोंडी, हत्येचा डाग अशी सारी मानसिक आंदोलने नर्मिसने समर्थपणे व्यक्त केली.
©

‘बरसात’च्या यशाने आरकेची पताका फडकू लागली आणि राज कपूर- नर्गिस या जोडीची प्रेक्षकांवर जादू पसरु लागली. दोघांमधील वाढती जवळीक नर्गिसच्या आईला मान्य नव्हती. 1949 मध्ये जद्दनबाई गेल्या आणि नर्गिससाठी राज कपूर हा आधार ठरला! ‘बरसात’ त्याच वर्षी पडद्यावर आला. आरके फिल्मस्ची नायिका केवळ नर्गिस हे समीकरण बनले. आवारा, आह, श्री 420 असे सरस चित्रपट आले. राज कपूरचे चित्रपट नायक केंद्रीत असले तरी त्यात नर्गिस शोभेची बाहुली नव्हती. विषेशतः श्री 420 मधली तिची साध्या- सरळ तरुणीची भूमिका विसरली गेली नाही. त्या दरम्यान, आरके बाहेरच्या अनेक निर्मात्यांनी नर्गिस- राज कपूर जोडीला घेऊन चित्रपट केले. जान- पहचान, प्यार, अंबर, अनहोनी, आशियाना अशी यादी मोठी आहे. चोरी- चोरी हा या जोडीचा सदाबहार आणि शेवटचा चित्रपट. यानंतर दोघे नायक- नायिका म्हणून एकत्र आले नाहीत. ‘जागते रहो’मध्ये नर्गिस पाहुणी कलाकार होती. राज कपूर- नर्गिस यांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा झाली, उलट- सुलट बोलले गेले. ‘सोने की चिडिया’ चित्रपटाची कथा त्यावरच बेतली गेल्याचे बोलले गेले.©

अभिनय क्षमता असलेल्या कलाकारांना त्या ताकदीच्या भूमिका मिळाव्या लागतात. तो योग नर्गिसच्या वाट्याला कितीदा आला, हा प्रश्नच आहे! ‘जोगन’मधील तिची भूमिका चांगली होती. सोबत अभिनयाचा बादशहा दिलीपकुमार. पण रणजीतची ही निर्मिती व्यावसायिक यश मिळवू शकली नाही. अदालत, लाजवंती या चित्रपटात इतर चित्रपटातील भूमिकांप्रमाणेच नर्गिसनं आपल्या भूमिकांना न्याय दिला, पण चित्रपट फार उंचीचे नव्हते. ‘बाबूल’सारख्या चित्रपटामधील खेड्यातील अवखळ तरुणी, मोकळ्या श्वासासाठी आसुसलेली ‘चोरीचोरी’मधील नायिका अशा अनेक रंगाच्या भूमिका नर्गिसनं केल्या. पण नर्गिस म्हणजे ‘मदर इंडिया’! ‘रोटी’ चित्रपटाचा तो रिमेक. पण मूळ चित्रपटावर त्यानं मात केली.©

‘मदर इंडिया’तील नर्गिसची राधा अन्याय, शोषण अशा चक्रात वर्षानुवर्षे पिचत असलेल्या, तरीही शील, आत्मप्रतिष्ठा यांना जराही धक्का लागू न देणार्‍या ग्रामीण भागातील महिलांची प्रातिनिधिक कथा होती. ‘मदर इंडिया’ म्हणजे नर्गिसच्या अभिनय जीवनाचे सार, तिच्या चित्रपट कारकीर्दीचं शिखर! कथा, पटकथा, संगीत, कलाकार, दिग्दर्शन अशी प्रत्येक बाजू सामर्थ्यवान होती. तारुण्यापासून वृद्धापकाळापर्यंतचे टप्पे नर्गिसनं सहजतेनं उभे केले. अपार वेदना कवेत घेत जगणारी, सुखाच्या चार क्षणांनाही महाग झालेली, पण जिद्द अभंग असणारी ही राधा म्हणजे एखादी व्यक्तीरेखा नव्हे, ते पडद्यावरचे अमर शोककाव्य होय. अनेक दशके उलटून गेल्यानंतर देखील नर्गिसच्या राधेचे पिढ्या न पिढ्यांतील चित्रपटप्रेमींवर असलेले गारुड कायम राहिले आहे! ©

nargis with sunil dutt

सुनील दत्तसारखी समंजस व्यक्ती पती म्हणून लाभणे हा नर्गिसच्या जीवनातील भाग्ययोग. ‘रात और दिन’नंतर नर्गिसनं चित्रपट संन्यास घेतला. सामाजिक कामाला वाहून घेतलं. राज्यसभेचं सदस्यत्व भूषविण्याची संधी तिला मिळाली. चित्रपटसृष्टीचे प्रश्न मांडत या क्षेत्राला प्रतिष्ठा मिळवून देण्यात नर्गिसनं वाटा उचलला. कर्करोगाने तिचा अकाली बळी घेतला. आणखी आयुष्य मिळालं असतं तर कदाचित अभिनयाचा कस पाहणार्‍या चरित्र भूमिका स्विकारण्याचा निर्णय तिनं केलाही असता. पण ते होणे नव्हते. रुपेरी पडद्यावरच्या या फुलाचा सुगंध अद्याप दरवळत आहे हा चमत्कार नव्हे, ते पडद्यावरील नर्गिसच्या जिवंत आणि रसरशीत भूमिकांचे कर्तृत्व आहे.

Swapnil Pore
+ posts

Leave a comment