– © रामदास कृष्णा कामत, हैदराबाद

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

चित्रपटांचा ‘मौसम’ कोणताही असो, अगदी ‘आँधी’ जरी आली तरी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर प्रत्येक भूमिका म्हणजे अगदी ‘नया दिन नयी रात’ ह्या भावनेतून त्याने साकारली. आपल्या उत्तुंग अभिनयाचा दर्जा टिकवण्याची ‘कोशिश’ सातत्याने करताना त्याने भूमिका मिळावी म्हणून कुणा निर्मात्याच्या दारावर ‘दस्तक’ दिली नाही कि स्वत:चा ‘खिलौना’ होवु दिला नाही. उलट ‘यही है जिंदगी’ म्हणत त्याला सामोरे जाताना कधी वो ‘मनचली’ कहाँ चली म्हणत रोमॅन्टिक अंदाज़ दाखवला, कधी ‘अर्जुन पंडित’ ची सात्विकता दाखवली तर कधी ठाकुरी अंदाजात आपल्या अभिनयाचे ‘शोले’ भड़कवत ठेवले. रसिकांचे ‘मनोरंजन’ करण्याचे ‘ईमान’ शेवटपर्यंत अबाधित ठेवले. हा चतुरस्त्र अभिनेता होता हरिहर जेठालाल जरीवाला म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका ‘संजीव कुमार’ (Actor Sanjeev Kumar). आज त्याची त्र्यांशीवी जयंती . त्यनिमित्ताने ह्या अभिनेत्याला आदरांजली देण्याचा हा छोटासा प्रयत्न. (Remembering Talented Actor of Hindi cinema Sanjeev Kumar)

‘आनंद’ चित्रपटात एक सुंदर डायलॉग आहे, ‘बाबूमोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं’. आपल्याला लंबी उम्र नाही हयाची कल्पना त्याला आधीपासूनच असावी म्हणूनच तो लंबी जिंदगी न जगता बड़ी जिंदगी जगला. एकदा गुलज़ारने त्याला विचारले होते, की ‘इतनी कम उम्र में, भरी जवानी मे तुम बुढ़ापे के रोल क्यों कर रहे हो, ऐसे रोल के लिए पूरी ज़िंदगी पड़ी है’. तेंव्हा आपले मन मोकळे करताना तो म्हणाला होता, ‘हमारे परिवार मे कोई भी पचास उम्र से ज्यादा जिया नहीं। मेरे पिताजी पचास उम्र के थे तब चल बसे। मेरे भैया अड़तालीस की उम्र मे भगवान को प्यारे हो गए। हो सकता है कि मेरी जिंदगी में भी बुढ़ापा आएगाही नहीं । तो तब तक इंतज़ार क्यों करू, और कोई भी रोल आखिर रोल होता है. त्यावेळी कोणाला वाटले होते कि भविष्यात तसेच काहीसे होईल.

गुजरातमधील सूरत येथील हा हरिभाई मुंबईला आला ते एक्टर बनायचे हे ध्येय समोर ठेऊनच. मुंबईच्या इप्टा, फिल्मालय आणि नंतर इंडियन नेशनल थिएटर मधून अभिनयचे शिक्षण घेत असताना त्याला पहिली भूमिका मिळाली ती सुद्धा वयोवृद्ध व्यक्तिची. त्याच्या बावीस वर्षे वयाच्या मानाने कितीतरी वयस्कर म्हणजे साठ वर्षाच्या व्यक्तिची ती भूमिका होती, जो सहा मुलांचा बाप होता. शबाना आजमीची आई शौकत आज़मीने त्याच्या पत्नीची भूमिका केली होती. नाटक होते ‘डमरू’ जे आर्थर मिल्लरच्या ‘ऑल माय सन्स’ ह्या नाटकावार बेतलेले होते आणि त्याचे दिग्दर्शक होते ए. के. हंगल. खरे तर संजीवकुमारला मुख्य नायकाची भूमिका हवी होती. पण हंगल म्हणाले, तू इतका देखणा आहेस की हीरोची भूमिका तुला केंव्हाही आणि सहज मिळेल कारण हीरो तर तू दिसतोच आहेस. पण आपण जसे दिसत नाही तशी भूमिका करणे जास्त आव्हानात्मक असते. त्यामुळे त्याच्या अभिनय क्षेत्राची सुरुवातच चरित्र अभिनेता म्हणून झाली. हंगल यांची तीच शिकवण त्याने पुढे जोपासली. त्याच्या ह्या भूमिकेने खुद्द पृथ्वीराज कपूरही प्रभावित झाले होते.

संजीकुमारचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण झाले ते ‘हम हिंदुस्तानी’ ह्या चित्रपटाने. राम मुखर्जी दिग्दर्शित चित्रपटात सुनील दत्त, आशा पारेख, प्रेम चोपड़ा अशी तगड़ी स्टारकास्ट असूनही चित्रपट यथातथाच चालला. पुढे त्याला ‘निशान’ ह्या चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली. पण हा चित्रपटही त्याला आवश्यक ते यश देऊ शकला नाही. चित्रपट म्हणावे तसे यशस्वी झाले नाही तरी दोन्ही हिन्दी चित्रपटात त्याचा अभिनय लक्षणीय होता. त्यामुळे गुजराती फिल्म इंडस्ट्रीचे लक्ष त्याच्याकडे जाणे साहजिक होते. त्याने त्यादरम्यान दोन गुजराती चित्रपटात भूमिका केल्या. एक होता कवि कलापीच्या जीवनावरील ‘कलापी’ तर दूसरा होता ‘मेरे जावून पेले पार’. दोन्ही चित्रपटात त्याच्या सोबत मुख्य भूमिकेत होती अरुणा ईराणी. ©

पण खर्या अर्थाने त्याला प्रसिद्धि मिळाली ती ‘खिलौना’ चित्रपटातील वेड्याच्या भूमिकेने. पुढे ‘अनहोनी’ चित्रपटातील खूनी वेड्याची भूमिका करताना त्याला हयाचा उपयोग झाला. ‘खिलौना’ मधील शीर्षक गीत जीतके प्रेक्षकांच्या मनाला भिडले तीतकाच किंबहुना जास्तच त्याचा अभिनय लोकांना भावला. त्यानंतर आलेला ‘सुबह ओ शाम’ हा चित्रपट त्याच्यासाठी लकी ठरला कारण ह्या चित्रपटातील भूमिका पाहून गुलजार यांनी त्याला हेरले. गुलजारशी झालेल्या ओळखिने त्याच्या अभिनय क्षेत्राला एक सशक्त आणि सुरेख वळन लागले. ‘परिचय’, ‘कोशिश’, ‘मौसम’, ‘आँधी’, ‘अंगूर’, ‘नमकीन’ असे एकाहून एक दर्जेदार असे नऊ चित्रपट गुलजारसोबत करण्याची संधी त्याला मिळाली ज्याचे त्याने सोने केले. अंगूर मधील अशोक आणि नमकीन मधील ट्रक ड्राईवर ह्या अगदी दोन भिन्न टोकाच्या भूमिका होत्या. पुन्हा यातील परिचय, आँधी, मौसम चित्रपटात त्याने चरित्र अभिनेत्याचीच भूमिका केली. चरित्र भूमिका करताना आवाजाला विशिष्ट बेस देवून संवाद फेकण्याची त्याची शैली त्याकाळातील अनेक ऑर्केस्ट्रामधील नकलाकारांचा आवडता आवाज होता.

‘आँधी’ साठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा फिल्म फेयर अवार्डही मिळाला. वेश्येच्या जीवनावर आधारित ‘दस्तक’ मधील त्याच्या भूमिकेला नेशनल अवार्ड मिळाले. रेहाना सुलतान ह्या नवोदित अभिनेत्रीने वेश्येची भूमिका केली होती. ‘शतरंज के खिलाडी’ मधीलही त्याची भूमिका अविस्मरणीय ठरली. ज्या काळात त्याचे समवयस्क अभिनेते अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, शशि कपूर, जितेंद्र वगैरे हिरोची भूमिका करीत होते त्या काळात त्यांच्यासोबतच संजीवकुमारने चरित्र भूमिका केल्या मग तो परिचय असो, शोले असो किंवा त्रिशूल. ज्या ताकतीने तो अमिताभ समोर उभा राहिला तितक्याच ताकतीने ‘विधाता’ मधील आबुबाबाने समशेरसिंह उर्फ शोभराज दिलीप कुमार आणि गुरबक्ष शम्मी कपूरला टक्कर दिली. ‘आप की कसम’ मध्ये राजेश खन्नाचे स्टारडम त्याला डावे ठरवु शकले नाही की तत्कालीन सुपर स्टार समोर त्याचा अभिनय झाकोळला नाही. दाक्षिणात्य निर्मात्यांचा तर तो लाडका अभिनेता होता. संजीवकुमारला घेतले की पिक्चर हिट होणार अशी त्यांची धारणा होती. आणि ‘स्वयंवर’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘स्वर्ग नरक’, ‘यही है जिंदगी’ असे अनेक चित्रपट हिट करून त्याने आपली निवड सार्थ ठरवली.

संजीव कुमार म्हटला की नजरेसमोर येतो एक तरणाबांड, हसरा, देखणा चेहरा. त्याच्या लोभसवाण्या रूपाने तो प्रेक्षकांच्या, खासकरुन महिलावर्गाच्या मनात घर करायचा. ‘अनहोनी’ मध्ये ‘मै तो एक पागल, पागल क्या दिल बहलाएगा’ असे म्हणणार्या ह्या गुणी कलाकाराने अनेकाना वेड लावले होते. चतुरस्त्र अभिनयाचे त्याच्याइतके उतम उदाहरण होवुच शकत नाही. ‘हवा के साथ साथ, घटा के संग संग’ असे म्हणत स्वप्नसुंदरीचा हात हातात घेऊन गाणारा रोमांटिक संजीवकुमार पाहीला की हाच तो खिलौनातील वेडा, नया दिन नयी रात मधील कुष्ठरोगी यावर विश्वास बसत नाही. लेडीज टेलर, अंगूर, पति पत्नी और वो इत्यादि मधील विनोदी भूमिका असो, खलनायकी भूमिका असो, रोमांटिक हीरो असो किंवा चरित्र अभिनेता, त्याने प्रत्येक भूमिकेत आपला दर्जा सिद्ध केला. ‘संघर्ष’ मध्ये दिलीप कुमारच्या कुशीत मरतानाचा त्याचा अभिनय दस्तूर्खुद्द दिलीप कुमारला थक्क करुन गेला. जया भादुरी ह्या एकाच नायिकेबरोबर त्याने विविध भूमिका केल्या. परिचयमध्ये जया भादुरीच्या पित्याची भूमिका केली, नौकर मध्ये तिच्याच सोबत रोमैन्स केला, ‘कोशिश’ मध्ये पति-पत्नीच्या भूमिकेत ते दिसले तर शोलेमध्ये सासरा आणि सुन हे नाते निभावले. एका मुलाखतीत त्याने गमतीने म्हटले सुद्धा की अब ऐसे फिल्म का इंतजार है जिसमें मैं जया के बेटे का रोल करू और वो मेरी माँ बने. तात्पर्य काय, तर भूमिका कुठलीही असो, आपल्या प्रामाणिक प्रयत्नाने, मेहनतीने त्याला योग्य न्याय देऊन त्याचे सोने करायचे हे जणू त्याच्या रक्तातच होते. ©

आपल्या भूमिकेचा ठसा प्रेक्षकांवर ठसवण्यासाठी तड़फदार संवाद असावेत, भरजरी पेहराव आणि मेकअपचे गिमिक्स असावे, हे जरूरी नाही. संवादाशिवायही केवळ डोळे आणि चेहरयावरील हावभावाने भूमिका जीवंत करता येते हे त्याने ‘कोशिश’ मध्ये मुक्याची भूमिका करून सिद्ध केले. खासकरून ह्या चित्रपटातील शेवटचा पिता पुत्राचा सीन प्रेक्षकाना अस्वस्थ करून टाकायचा. ह्या भूमीकेबद्दल त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. शिवाजी गणेशनने ‘नवरात्री’ चित्रपटात केलेल्या नऊ भूमिकानी प्रभावित झालेल्या भीमसिंघ यांना ‘नया दिन नयी रात’ मधील नऊ भूमिकांसाठी संजीव कुमारच योग्य वाटला. हा चित्रपट संजीव कुमारच्या जीवनातील एक लैंडमार्क चित्रपट ठरला. ह्या चित्रपटात त्याने आपल्या अभिनय कौशल्याचे नवरंग असे उधळले की कोणती भूमिका सरस आहे हे ठरवणे कठिण व्हावे. यातील प्रत्येक भूमिकेचे वेगळेपण जपत त्याने त्याची सरमिसळ होवु दिली नाही. खासकरुन नाच्याची आणि कुष्ठरोग्याची भूमिका ही कस लावणारी होती. संजीवकुमार वरील लेख लिहिताना ‘नया दिन नयी रात’चा उल्लेख नाही झाला तर तो लेख अपूर्णच वाटेल. अर्थात, संजीव कुमार बरोबरच त्याचा मेकअपमन सरोश मोदी याचाही मोठा वाटा होता आणि संजीवकुमारने प्रत्येक मुलाखतीत त्याला श्रेय दिले होते.

संजीव कुमार दिसायला जितका देखणा होता तितकाच मनानेही निर्मळ होता. सर्वांशी त्याचे संबंध मित्रत्वाचे होते. अनेक तरुणींच्या दिलाची धडकन असणार्या ह्या कलाकाराचा दिल का कमरा मात्र रिकामीच राहिला. ‘सीता और गीता’ मधील भूमिकेमुळे त्याला हेमा मालिनी विषयी आकर्षण वाटायला लागले होते. ड्रीमगर्ल हेमा मालिनीशी विवाह करण्याची त्याची खूप इच्छा होती पण ती धर्मेंद्रमध्ये गुंतलेली होती. शोलेच्या सेटवर त्याने हेमा मालिनीला मागणी घातली हे जेंव्हा धर्मेंद्रला कळले तेंव्हा तो खूप चिडला आणि त्या दोघांचे एकत्र एकही दृश्य चित्रपटात असू नये असा हट्टच त्याने दिग्दर्शक रमेश सिप्पीकड़े धरला. त्यामुलेच शोलेमध्ये संजीव कुमार व हेमा मालिनी हयांच्यावर एकही सीन नाही अशी वदंता आहे. इतकेच नाही तर संपूर्ण चित्रपटात ठाकुर बलदेव सिंग एकदाही बसंतीचा उल्लेख करत नाही. ठाकुरची भूमिका धर्मेंद्रच करणार हे निश्चित झाले होते. पण तसे झाले तर वीरुचि भूमिका संजीवकुमारकड़े येणार आणि पुन्हा सीता गीता प्रमाणे त्याची आणि हेमा मालिनीची जोड़ी जमणार हे धर्मेंद्रला मान्य नव्हते म्हणून रोल बदलले गेले, असेही काहींचे म्हणणे आहे. काहीही असो, हरिभाईने अनेकांवर प्रेम केले तसेच चाहत्यानीही त्याच्यावर जीव ओवाळून टाकला. अभिनेत्री सुलक्षणा पंडित ‘उलझन’ चित्रपटाच्या दरम्यान त्याच्या प्रेमात पडली. पुढे ’अपनापन’, ‘दो वक्त की रोटी’, ‘वक्त और दीवार’, चेहरे पे चेहरा’ अशा काही चित्रपटातुन त्यांचा रोमांस फुलत गेला. त्याच्याशी लग्न करण्याची तिची फार इच्छाही होती. पण हेमामालिनीच्या नकारामुळे दुखावलेल्या संजीवकुमारने ज्योतिषाच्या सांगण्याप्रमाणे आपले आयुष्य फार नाही हे कारण सांगून नकार दिला. त्याच्यावरील प्रेमामुळेच सुलक्षणाही आयुष्यभर अविवाहित राहिली. हेमा मालिनी काय किंवा सुलक्षणा पंडित काय, योग जुळून आला असता तर सिनेसृष्टीला एक देखणे कलाकार दाम्पत्य जरूर मिळाले असते. होमी वाडियाच्या ‘अलीबाबा आणि चालीस चोर’ ह्या चित्रपटाच्यावेळी त्याची मैत्री तबस्सुमशी झाली. दोघांचीही जन्मतारीख एकच, नऊ जुलै. त्यानंतर बहुतांश वाढदिवस त्यानी एकत्रच साजरे केले. आपल्या प्रिय हरिभाईच्या निधनानंतर तबस्सुमने आपला वाढदिवस कधीही साजरा केला नाही. ©

असा हा रसिकांचा लाडका संजीवकुमार नंतर नंतर मात्र अगदी एकाकी पडला. हाडाचा खवय्या असल्याने खाण्यावर नियंत्रण राहिले नाही. तब्येतीची हेळसांड केली. परिणामी, शरीर बेढब होवु लागले. आपले स्थूल शरीर आणि सुटलेले पोट सांभाळीत जेंव्हा तो हिरोईनसोबत गाताना दिसायचा तेंव्हा त्याचे सळसळते तारुण्य आणि सदाबहारपणा लुप्त झाल्याचे त्याच्या चाहत्याना जाणवायचे. ह्या एकाकीपणाने तो दुरावत चालला आणि सहा नोवेंबर १९८५ साली ह्या जगातून कायमचा दुरावला. खरे तर सत्तेचाळीस हे काही जाण्याचे वय नव्हते. पण दुर्दैवाने ज्योतिषाची वाणी खरी ठरली होती. असंख्य चाहत्यांच्या मनाला चटका लावून ‘गुस्ताखी माफ’ म्हणत हा निघून गेला. त्याच्या दुरावण्यावर चाहत्यांच्या मनात एकच भावना कायम राहिली, ती म्हणजे ….तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही, तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं.

 

हेही वाचा – बिछडे सभी बारी बारी…गुरु दत्त 

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम 

Ramdas Kamat
Ramdas Kamat
+ posts

रामदास कामत यांचा अल्प परिचय

  • भारतीय स्टेट बँक मध्ये सहायक महाप्रबंधक या पदावर कार्यरत. सध्या स्टेट बँक स्टाफ कॉलेज,हैदराबाद येथे फॅकल्टि म्हणून काम पाहत आहेत.
  • वृत्तपत्र लेखन आणि नाटक हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय. विविध मराठी वृत्तपत्रांतून नियमित प्रासंगिक लिखाण ते करतात. दैनिक सकाळ, दैनिक कोकण सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स,महानगर,दैनिक वृत्त मानस,दैनिक सागर (चिपळूण), दैनिक मुक्त संवाद, दैनिक राजवृत्त इत्यादि वर्तमान पत्रांतून नाट्य परीक्षणे आणि लेख प्रकाशित आहेत.
  • दरवर्षी काही दिवाळी अंकातून कथा, कविता आणि लेख ते लिहितात. साहित्य जागर, नवरंग रुपेरी अशा चित्रपट विषयक अंकांसाठी अनेक कलावतांच्या मुलाखती कामत ह्यांनी घेतल्या आहेत.
  • महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण केंद्र नाट्य स्पर्धा, आंतर शालेय नाट्य स्पर्धा यासाठी परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
  • महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या एका भव्यतम सोडतीचा निकाल कामत यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आला.
  • “व्यथा संसाराची” या एकपात्री कार्यक्रमाचे महाराष्ट्रात २५० हून अधिक प्रयोग. आता तर हा कार्यक्रम ‘शादी का लड्डू’ ह्या नावाने ते हिंदीतही सादर करतात.
  • जुन्या नव्या हिन्दी सिनेमांच्या गीतांवर आधारित “वो भुली दास्तान” हा दृकश्राव्य कार्यक्रम ते सादर करतात.
  • ‘हकीकत’ ते ‘ऊरी-द सर्जिकल स्ट्राइक’ ह्या युद्धपटावर आधारीत ‘आज़ादी की जंग-फिल्मों के संग’ हा द्रुकश्राव्य कार्यक्रम १५ औगस्ट व २६ जानेवारीला सादर करतात.

 

  • प्रकाशित पुस्तके: (ही सर्व पुस्तके com येथे उपलब्ध आहेत)

 

  1. फ्लॅशबॅक: (प्रकाशन ज्येष्ठ गायक कलावंत रामदास कामत ह्यांच्या हस्ते) मा. भगवान, महेंद्र कपूर, दारा सिंग, रविंद्र जैन, सुबल सरकार, शोभा गुर्टू, रामदास कामत आणि भालचंद्र पेंढारकर ह्यांची कामत ह्यांनी केलेली आत्मकथने. (पहिली आवृत्ती संपली, दुसरी प्रकाशनाच्या मार्गावर)
  2. परिमार्जन: (‘आशीर्वाद’ पुरस्कार प्राप्त कथासंग्रह- प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी ह्यांच्या हस्ते, प्रस्तावना- ज्येष्ठ साहित्यिक भा. ल. महाबळ))
  3. रामरगाडा: वृत्तपत्रीय सदरातील लेखांचे संकलन, प्रस्तावना ज्येष्ठ साहित्यिका विजया वाड. पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन कवि अशोक नायगावकर ह्यांच्या हस्ते तर दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन ठाणे साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे ह्यांच्या हस्ते.
  4. आमि बी घडलो: (प्रकाशन ज्येष्ठ रंगभूषाकार आणि व्ही. शांताराम पुरस्कार विजेते पंढरीदादा जुकर व अभिनेते सतीश पुळेकर ह्यांच्या हस्ते.) मनोजकुमार, माला सिन्हा, अमिन सायानी, जयंत सावरकर, वसंत कानेटकर, जयवंत कुलकर्णी, प्रमिला दातार, पंढरीदादा जुकर, अजित कडकडे आदि मान्यवरांची आत्मकथने. पुस्तकास प्रा. चंद्रकांत नलगे पुरस्कार (कोल्हापूर) आणि अंकुर साहित्य संघ पुरस्कार (अकोला) हे दोन पुरस्कार प्राप्त.
  5. सूनहरी यादें: जॉनी वॉकर, जगदीप,प्रेम चोप्रा, दारासिंग आदि मान्यवरांची आत्मकथने
  6. कटिबद्ध: (कथासंग्रह- ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ साहित्यिका डॉ. गिरीजा कीर आणि सुप्रसिद्ध नाटककार सुरेश खरे ह्यांच्या उपस्थितीतप्रकाशित.)
  7. पहिला हिन्दी कथा संग्रह ‘रिश्ते’प्रकाशनाच्या वाटेवर

वरील पुरस्कारांव्यतिरिक्त इतर पुरस्कार:

  • दैनिक “कोकणचा कॅलिफोर्निया” तर्फे समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.
  • महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत “एक चॉक्लेट प्रेमाचे” या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा प्रथम पुरस्कार.
  • बालभारत एकांकिका स्पर्धेत दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार
  • सामाजिक कार्याबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार
  • ‘मरे एक त्याचा’ ह्या एकांकिकेसाठी सर्वोत्कृष्ट लेखन व अभिनयासाठी कलाविष्कार पुरस्कार.
  • यूनायटेड बँक ऑफ इंडिया तर्फे आयोजित अखिल भारतीय आंतरबँक हिन्दी हास्य व्यंग कविता स्पर्धेत प्रथम पुरस्कार.
  • भारतीय स्टेट बँकतर्फे आयोजित राज्यस्तरीय हिन्दी हास्य व्यंग कविता स्पर्धेत प्रथम पुरस्कार.
  • विजया बँक आयोजित अखिल भारतीय आंतरबँक हिन्दी निबंध स्पर्धेत पुरस्कार.
  • स्वराज्य साप्ताहिक, पुणे तर्फे आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार.
  • ‘खंत’ ह्या कथेला राज्यस्तरीय साहित्य भास्कर पु. भा. भावे पुरस्कार.
  • याशिवाय अनेक नाट्य आणि साहित्य स्पर्धांमधून अभिनय, लेखन आणि दिग्दर्शनाचे अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत.

 

संपर्क: रामदास कामत, मोबाइल: ९८९०६८५२३५, ईमेल: [email protected]

Leave a comment