-धनंजय कुलकर्णी, पुणे

निर्माते-दिग्दर्शक  एस एम नायडू यांनी १९५४ साली ’मल्लई कल्लन’ हा सिनेमा तमिळ भाषेत त्यांच्या स्वत:च्या स्टुडिओत बनविला. एम जी रामचंद्रन व पी भानुमती अशी जोडी असलेला हा सिनेमा तूफानी लोकप्रिय ठरला. या सिनेमा साठी दोनच सेट वापरले होते. नाय़डू साहेबांच्या डोक्यात एक कल्पना आली सेट तयार आहे कथानक तयार आहे, हिंदी कलाकारांना घेवून याच स्टोरी वर इथेच हिंदी सिनेमा काढला तर? ते झपाट्याने कामाला लागले.

मुख्य भूमिकेत दिलीपकुमार व मीना कुमारीला घेतले. सिनेमा संगीत प्रधान होता. दिलीप कुमार नायक असल्याने संगीत नौशाद हे ठरलेलंच होत. नाय़डू नौशाद यांना भेटले व संगीता करीता १ लाख रूपये देण्याचे कबूल केले अट फक्त एकच घातली सिनेमाची सर्व गाणी पुढच्या १५ दिवसात तयार झाली पाहिजे. नौशाद साहेब एकेका गाण्याला महिना महिना मेहनत घेत असत त्यांना हि अट मान्य होणं शक्यच नव्हत. त्यावर नायडूंनी दुसर्‍या एखाद्या संगीतकारचे नाव सुचवायला त्यांना सांगितले. तो काळ निकोप स्पर्धेचा होता. त्यांनी  सी रामचंद्र तथा अण्णा  यांच नाव सुचविलं. खुद्द नौशाद यांनी शिफारस केल्याने नायडू तडक अण्णांना भेटले. अण्णांनी होकार दिला पण एक अट घातली. ’आपण म्हणता त्या पध्दतीने मी १५ दिवसात तुम्हाला हव्या त्या क्वालीटीची गाणी बनवून देतो फक्त मला नौशाद साहेबांना देत असलेल्या मानधनापेक्षा एक रूपया जास्त मानधन द्या.’ अलबेला, अनारकली सारखे सिनेमे नायकांच्या  जोरावर नाही तर संगीतकाराच्या करिष्म्याने चालले हे नायडूंना माहित होतं त्यांनी तात्काळ या सिनेमाच्या संगीता साठी अण्णांना करारबध्द केलं.

Mohd Rafi, Naushad, C Ramchandra and Talat Mehmood
Mohd Rafi, Naushad, C Ramchandra and Talat Mehmood

मग सुरू झाला अण्णांचा झपाटा. राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेली तब्बल ९ गाणी त्यांनी पुढच्या १५ दिवसात रेकॉर्ड केली. यात लताची ५ गाणी होती. ’राधा ना बोले ना बोले ,ना बोले रे’, ’जारी जारी ओ कारी बदरीया’, ’देखो जी बहार आयी’, ’कितनी जवां रात है’ आणि ’कभी खामोश’ यातील ’अपलम चपलम’हे लता-ऊषाचे गाणे तर अफाट गाजले. लताच्या बागेश्री रागावर आधारीत ’राधा ना बोले ना बोले , ना बोले रे’ या गाण्यावर तर अगणित मुलींनी शाळेत असताना आपला पहिला डान्स परफोरमन्स दिला असेल. यातील एका गाण्याने सर्वात भन्नाट बहार आणली. हे युगल गीत होत. दिलीपला या गाण्यासाठी तलतचा स्वर हवा होता. पण तलत नेमका त्या वेळी उपलब्ध नव्हता. नाय़डू साहेबांचे फोन वर फोन सुरू होते. सगळी गाणी झाली होती फक्त हेच युगल गीत बाकी होत. प्रसंग बाका होता. कुठल्याही परीस्थितीत ते गाणं रेकॉर्ड होणं आवश्यक होतं. पण हरतील ते अण्णा कसे? त्यांनी धाडस केलं. ते गाणं तलतच्या ऐवजी त्यांनी स्वत:च गायले. आवाज इतका सॉफ्ट आणि मॅच्युअर्ड काढला की भल्या भल्यांना तो आवाज तलतचाच वाटला. याला दिलीप कुमार देखील अपवाद नव्हता. गाणं होतं ’ कितना हंसी हैं मौसम कितना हंसी सफर है साथी है खूबसूरत ये मौसम किसे खबर हैं..’ गाणं बरोब्बर पंधराव्या दिवसी रेकॉर्ड झालं आणि संध्याकाळच्या विमानाने कोइम्बतूरला पाठवूनही दिलं. नायडू साहेब खूष झाले. पुढे हाच सिनेमा सिंहली भाषेत बनवला त्याला देखील संगीत अण्णांचेच होते.

आज १२ जानेवारी अण्णा तथा सी रामचंद्र यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने नव्या पिढीला त्यांच्या कर्तृत्ववान शैलीची ओळख व्हावी म्हणून हा किस्सा !

Dhananjay Kulkarni
+ posts

3 Comments

  • नेहमीप्रमाणे अप्रतिम
    On January 12, 2021 8:07 am 0Likes

    खूप छान लेख

  • Anil Boralkar
    On January 12, 2021 9:26 am 0Likes

    अलबेला व अनारकली नंतर आझाद १९५५ साली आला व *अ* अक्षर अण्णांना परत यश देऊन गेल…सुंदर माहीती एका महान मराठी संगीतकाराची🙏

  • Nice Kissa and proud of Aanna!
    On January 12, 2021 1:19 pm 0Likes

    thankyou!!

Leave a comment