बर्थडे स्पेशल-उदित नारायण यांची पुरस्कार गाथा!

– अजिंक्य उजळंबकर

कुणाच्या गायकीची छाप नाही … ना मो रफी यांची ना किशोर कुमार यांची. स्वतःचा वेगळा आवाज. चिरतरुण व फ्रेश असा आवाज. गायकी अशी की गाणं, त्याची चाल कितीही वरच्या पट्टीतलं असू देत, अगदी सहजतेने त्यावर स्वार होणारी.  ९० च्या दशकात जेंव्हा हिंदी चित्रपट संगीतात मेलडी परतली होती तो काळ ज्यांनी आपल्या दमदार आवाजाने अक्षरशः गाजविला असे ‘उदित नारायण झा’. त्यांचे समकालीन स्पर्धक कुमार सानू व सोनू निगम यांच्या आवाजावर किशोर कुमार व रफी साहेबांच्या गायकीची छाप होती. पण उदित हे नेहमीच ओरिजिनल वाटतात. आजही. वयाच्या पासष्टीला पोहोचले तरीही. आज त्यांचा वाढदिवस. 

असंख्य गाणी गायली आहेत उदित यांनी. परंतु आज त्यांच्या ज्या गीतांना राष्ट्रीय व फिल्मफेअर पुरस्कार मिळाला अशा गीतांचा आढावा आपण घेऊ यात. १९८० साली संगीतकार राजेश रोशन यांनी उदित यांना ‘उन्नीस बीस’ चित्रपटात गाण्याची प्रथम संधी दिली. पहिल्याच गाण्यात सहगायक होते खुद्द रफी साहेब. पाहिलं द्वंद्व गीत त्यांनी गायलं अल्का याग्निक सोबत १९८१ साली. चित्रपट होता ‘सन्नाटा’ व संगीतकार परत एकदा राजेश रोशन. पुढे सात-आठ वर्ष संघर्षाची गेली आणि अखेर १९८८ साल उजाडले ज्याने उदित यांना प्रचंड लोकप्रियता व सोबत पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. ‘कयामत से कयामत तक’ मधील  ‘पापा कहते है’ गाण्याने देशभरातील तरुणाईला वेड लावले. या गाण्यासाठी आयुष्यातील पहिला पुरस्कार घेण्यासाठी उदित फिल्मफेअरच्या व्यासपीठावर गेले. आनंद मिलींद व उदित नारायण ही जोडी जमली याच चित्रपटापासून जिने पुढे एकाहून एका हिट गाणी दिली. यानंतर सिनेमांची, संगीतकारांची, गाण्यांची रीघ लागली. गाणी एकापेक्षा एक होती, लोकप्रिय सुद्धा होत होती मात्र पुरस्कार इतरांना मिळत होते. ८८ नंतर उदित यांना फिल्मफेअर मिळाले ते सात वर्षांनी. ‘मेहंदी लगा के रखना, डोली सजाके रखना’ म्हणत ‘डीडीएलजे’ साठी उदित पुन्हा एकदा फिल्मफेअर चे विजेते ठरले. संगीतकार जतीन ललित जोडीलाही या गाण्याचे तितकेच श्रेय जाते. तिसऱ्या फिल्मफेअरसाठी मात्र उदित यांना काहीच वाट बघावी लागली नाही. १९९६ सालच्या ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमातील ‘परदेसी परदेसी जाना नही, मुझे छोडके’ गाण्याने देशभरात धुमाकूळ घातला. एरवी संगीतकार नदीम श्रवण यांचा नेहमीचा गायक म्हणून कुमार सानू असायचे पण यावेळी मात्र या गाण्यासाठी त्यांनी उदित नारायण यांना संधी दिली. संधीचे सोने करत उदित यांनी या गाण्यात असा काही दर्द ओतला की क्या कहने! यावर्षी ‘घरसे निकलते ही’ (पापा कहते है) व ‘हो नही सकता’ (दिलजले ) या इतर दोन गाण्यांसाठी सुद्धा उदित यांना फिल्मफेअर नामांकन मिळाले होते.

९६ नंतर ४ वर्षांनी म्हणजेच २००० साली उदित यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यावेळी संगीतकार होते इस्माईल दरबार. ‘चांद छुपा बादल में, शर्माके मेरी जाना’ या सलमान-ऐश्वर्या जोडीवर चित्रित ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमातील गाण्यासाठी. या रोमँटिक गाण्यातील उदित यांच्या मखमली आवाजाने रसिक श्रोत्यांवर कमालीची जादू केली. २००१ व २००२ ही दोन वर्षे उदित यांच्यासाठी खूपच महत्वाची ठरली. २००१ साली उदित यांना करिअरमधील पहिला राष्ट्रीय सन्मान मिळाला. तेही एक नव्हे दोन गाण्यांसाठी. ‘जाने क्यों लोग प्यार करते है’ (दिल चाहता है) व ‘सून मितवा, ओ मितवा तुझको क्या डर है रे’ (लगान) या दोन गीतांमधील सुमधुर आवाजासाठी उदित यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘मितवा’ साठी त्यांना फिल्मफेअरसुद्धा मिळाले. ‘लगान’ चे संगीतकार ए.आर. रहेमान होते तर ‘दिल चाहता है’ चे शंकर एहसान लॉय. २००१ झाल्यावर लगेचच २००२ सालीचा उत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय सन्मान पुन्हा उदित यांना मिळाला. ‘जिंदगी खूबसूरत है’ या तब्बू व गुरुदास मान अभिनीत चित्रपटासाठी ज्याचे संगीतकार होते आनंद राज आनंद. ‘छोटे छोटे सपने हो’ या ‘जिंदगी खूबसूरत है’ सिनेमाच्या शीर्षक गीतासाठी उदित यांना हा राष्ट्रीय सन्मान मिळाला. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित व ए.आर. रहेमान यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘स्वदेस’ चित्रपटातील ‘ये तारा वो तारा, हर तारा’ या अतिशय सुश्राव्य गीतासाठीचा, २००४ सालचा राष्ट्रीय सन्मान उदित यांना मिळाला. खरंतर २००४ साली उदित हे वयाच्या पन्नाशी ला पोहोचले होते परंतु आवाजातील जादू काही कमी झाली नव्हती. 

 

ही झाली केवळ पुरस्कार जिंकलेली गाणी पण याशिवाय नामांकनं मिळालेली, इतर पुरस्कार मिळालेली किंवा नामांकन/पुरस्कार ना मिळवता सुद्धा रसिकांना प्रचंड आवडलेली अशी उदित यांची असंख्य गाणी आहेत. पहला नशा, फुलों सा चेहरा तेरा, जादू तेरी नजर, तू चीज बडी है मस्त मस्त, राजा को राणी से प्यार हो गया, दिल तो पागल है, तुम पास आए, दिलने ये कहा है दिलसे, उड़जा काले कावां, मै निकला गड्डी लेके, तेरे नाम, इधर चला मै उधर चला, मै यहां हूँ यहाँ, आजा माहिया, कहो ना प्यार है, वो चांद जैसी लडकी, ताल से ताल मिला, हमको हमी से चुरा लो, युंही चला चल, लाल दुपट्टा इत्यादी काही प्रमुख गाण्यांचा त्यात समावेश करावाच लागेल. अजूनही असंख्य गीते आहेत जी आजही रसिकांच्या मनावर राज्य करीत आहेत. चार दशकांपासून उदित गात आहेत. अगदी २०१३ साली आजच्या तरुणाईला आवडलेले त्यांचे गीत म्हणजे स्टुडंट ऑफ दि इअर चित्रपटातील राधा हे गीत अथवा २०१५ सालच्या एंटरटेनमेंट मधील तेरी महिमा अपरंपार. 

२००९ साली पद्मश्री व २०१६ साली पद्मभूषण देऊन केंद्र सरकारने उदित यांना सन्मानित केले आहे. बैसी, बिहार येथील छोट्याशा खेडेगावातून आलेल्या या मुलाने, अतिशय संघर्षाने, मेहनतीने, जिद्दीने, चिकाटीने आपले करिअर घडविले आहे. कुठल्याही वशिल्याशिवाय केवळ आपल्या चिरतरुण आवाजाच्या मेरीटवर. 

उदित यांना ६५ व्या वाढदिवासाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हॅप्पी बर्थडे उदित जी!

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment