————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

रामदास कामत, मुंबई 

ज्येष्ठ अभिनेते व हिंदी सिनेमाचे गाजलेले खलनायक ‘प्रेम चोप्रा’ (Actor Prem Chopra) यांनी वयाची ८६ वर्षे पूर्ण केली आहेत. वयाच्या २५ व्या वर्षीपासून म्हणजेच, १९६० पासून सुरु झालेला त्यांचा फिल्मी सफर अगदी गेल्या वर्षीपर्यंत चालू होता. त्याच्या नावात ‘‘प्रेम’’ जरी असले तरी लोकांनी त्याचा द्वेषच केला; पण तो द्वेषच त्याच्या कामाचे प्रशस्तिपत्रक होते. स्वत:ची ओळख करून देताना त्याने नुसते ‘‘प्रेम नाम है मेरा… प्रेम चोप्रा’’ असे म्हटले तरी प्रेक्षकांच्या कपाळावर भली मोठी आठी पडायची अन् पुढे जाऊन आपल्या परिचयात जेव्हा तो म्हणतो ‘‘मै वो बला हूं जो शिशे से पत्थर को तोडता हूं’’, तेव्हा तर प्रेक्षकांना खरच ती बलाच वाटायची. तर असा हा हिंदी सिनेमातील बदनाम, बेरकी पण आपल्या सशक्त अभिनयाने नावाजलेला बॅड मॅन… प्रेम चोप्रा. तो बॅड मॅन कसा झाला, त्याला बॅड मॅन करण्यात कोणाचा मोठा वाटा होता आणि प्रत्यक्ष जीवनात तो किपत बॅड आहे हे त्याच्याशी दिलखुलास गप्पा मारत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे ‘‘नवरंग रुपेरी’’चे प्रतिनिधी रामदास कामत यांनी… (Exclusive Interview of Veteran Actor and Popular Villain of Hindi Cinema, Prem Chopra)

———————————————–

प्रश्न : चित्रपटात भूमिका करणे हा निर्णय पूर्वनियोजित होता की योगायोग?

प्रेम : छे! छे! योगायोग वगैरे काही नाही. मी स्वत: ठरवूनच या क्षेत्रात आलो. कसा आला ते कळण्यासाठी थोडी कौटुंबिक पार्श्वभूमी सांगतो. माझा जन्म लाहोर येथे एका पंजाबी परिवारात २३ सप्टेंबर १९३५ रोजी झाला. आम्ही सहा भावंडे, पाच भाऊ आणि एक बहीण. मी तिसरा. वडील रणबीरलाल अकाउंट्स ऑफिसर होते. आई रुपरानी घरगृहिस्थी होती. वडिलांची खूप इच्छा होती की, मी एक तर डॉक्टर तरी व्हावे किंवा आयएएस अधिकारी व्हावे. कारण मी अतिशय शांत, अभ्यासू आणि काहीसा लाजाळू होतो. त्यावेळी जर कुणी भाकीत केले असते की, पुढे हा मोठा खलनायक होणार आहे तर कुणीच विश्वास ठेवला नसता.

वडिलांच्या इच्छेप्रमाणे मी मेडिकलला प्रवेश घेतला. तिथल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता, गुद्धिमत्ता आणि प्रचंड आत्मविश्वास पाहून मला मोठे दडपण आले. ते दडपण कमी व्हावे म्हणून मीही त्यांच्यासमवेत वेगवेगळ्या स्पर्धांतून म्हणजे वादविवाद, नाटके वगैरेंमधून भाग घेऊ लागलो. त्यावेळी मी सिनेमाही खूप पहायचो; पण चित्रपटात येण्याचा विचार मनाला शिवला नव्हता. कॉलेजमध्ये अनेक हिंदी, इंग्लिश नाटकांतून मी भूमिका केल्या. त्याचे खूप कौतुक झाले, मला बक्षिसेही खूप मिळाली. माझा आत्मविश्वास वाढला. मी अभिनयाच्या प्रेमात पडलो आणि तेव्हाच निश्चित केले की, यातच करियर करायचं.

——————–

प्रश्न : मग घरून विरोध झाला नाही का? कॉलेजमध्ये नाटके करताना कोणाचा आदर्श नजरेसमोर होता?

प्रेम : माझे वडील अगदी मोठ्या मनाचे होते. त्यामुळे विरोध झाला नाही. फक्त ते एवढेच म्हणाले, ‘‘तुला योग्य वाटेल ते कर; पण त्याआधी निदान ग्रॅज्युएशन तरी पूर्ण कर. एखादी चांगली नोकरी धर आणि मगच अ‍ॅक्टर वगैरे बनण्याचे प्रयत्न कर.’’ फाळणीनंतर आम्ही शिमल्याला स्थायिक झालो होतो. मेडिकल आपल्याला झेपणार नाही आणि आपल्या आवडीला येथे काही स्कोप नाही हे जाणवल्यावर मी सहा महिन्यांतच मेडिकल सोडले आणि आर्ट्स जॉईन केले. चित्रपट भरपूर पहायचो. त्यावेळचे माझे आदर्श होते. हिंदीतील दिलीप कुमार आणि इंग्रजीतील मर्लीन ब्रॅन्डो. त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने मी फार प्रभावित झालो होतो. आपणही तसेच व्हावे असे मनापासून वाटत होते. पदवीधर झाल्याबरोबर मी नोकरी आणि अभिनयातील करियर या दोन्ही गोष्टींसाठी मुंबई गाठली. सुदैवाने मला टाइम्स ऑफ इंडियात वितरण विभागात चांगली नोकरी मिळाली. फिरतीची ड्युटी असल्याचा फायदा असा झाला की, मी नोकरीच्या काळात माझे विविध फोटोज घेऊन मुंबईतील जवळजवळ सर्वच स्टुडिओचे उंबरठे झिजवले; पण कुणीही दाद दिली नाही. बराच काळ माझी धडपड चालू होती.

——————–

प्रश्न : मग पहिली संधी कशी मिळाली?

प्रेम : तेच तर सांगतोय, एकदा लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना एका भल्या माणसाने माझी शरीरयष्टी पाहून मला ‘‘तू सिनेमात काम करशील का?’’ असे विचारले. मी त्वरित होकार दिला. त्या गृहस्थाने मला एका पंजाबी निर्मात्याकडे नेले. त्यांनाही माझी पर्सनॅलिटी आवडली असावी. बहुदा आणि त्यांनी मला लगेच ‘‘चौधरी करनेल सिंग’’ या पंजाबी चित्रपटासाठी हिरो म्हणून निश्चित केले. हा चित्रपट पूर्ण होण्यास जवळजवळ तीन वर्षे लागली. माझे हिरोचे मानधन होते रुपये २५०० फक्त. १९६० साली हा चित्रपट रिलीज झाला आणि माझी कारकीर्द सुरू झाली. हा चित्रपट खूप चालला. या चित्रपटाला आणि मलाही नॅशनल अवॉर्ड मिळाले. पदार्पणातच इतके घवघवीत यश मिळाल्याने माझ्या अपेक्षा फार उंचावल्या. त्याचवर्षी माझे ‘‘हम हिंदुस्तानी’’, ‘‘मूड मूड के ना देख’’, ‘‘मै शादी करने चला’’ असे काही चित्रपट आले. या सर्व चित्रपटांत मी हिरो होतो; पण हे चित्रपट फारसे चालले नाहीत. पंजाबी चित्रपटातूनही भूमिका केल्या; पण पंजाबीचा प्रेक्षकवर्ग अगदीच कमी आणि पैसेही फारसे मिळत नसत. ‘‘मै शादी करने चला’’च्या वेळी सेटवर युनिटमधील एका जाणकार व्यक्तीने मला सुचवले की, ‘‘तुम्ही हिरोपेक्षा व्हीलनचे काम चांगले करू शकाल असे मला वाटते.’’ पण मला काही चॉइस नव्हता. मिळेल ती भूमिका करणे क्रमप्राप्त होते. सुदैवाने मला तशी संधी चालून आली आणि १९६४ साली माझा ‘वह कौन थी’ हा चित्रपट आला. त्यात मनोजकुमार समोर मी निगेटिव्ह भूमिकेत होतो. ती माझी पहिली खलनायकी भूमिका. त्यानंतर ‘पूनम की रात’, ‘निशान’, ‘मेरा साया’, ‘तिसरी मंजिल’ असे चित्रपट आले. तो काळ होता १९६४ ते १९६६. दरम्यान १९६५ साली माझा ‘शहीद’ हा भगतसिंगच्या जीवनावरील चित्रपट आला ज्यात मी सुखदेवची भूमिका केली होती. माझ्या आयुष्यातील काही संस्मरणीय भूमिकांतील ही एक. ‘‘तिसरी मंजिल’’, ‘‘मेरा साया’’, ‘‘शहीद’’ हे सारे चित्रपट तुफान चालले आणि हळूहळू माझे बस्तान बसत चालले.

——————–

प्रश्न : पण मग नोकरीचे काय, ते सांभाळून हे सारे करीत होतात की…?

प्रेम : चित्रपट जरी एकापाठोपाठ येत असले तरी नोकरी सोडण्याची हिम्मत मी करू शकत नव्हतो. कारण पैसे कमी मिळायचे शिवाय हा सगळा बेभरवशाचा कारभार होता. तारेवरची कसरत करावी लागली. ऑफिसमध्ये रजेसाठी थापा माराव्या लागत. एक-दोनदा तर मी माझ्या लग्नाची थाप मारली आणि नंतर रुजू झाल्यावर काहीतरी बिनसले आणि लग्न मोडले, अशी सबब सांगितली. १९६७ साली माझा ‘‘उपकार’’ हा चित्रपट आला, ज्याने मला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. ‘‘उपकार’’नंतर मी मागे वळून कधी पाहिले नाही. जेव्हा नोकरी आणि चित्रपट यामध्ये बरीच ओढाताण होऊ लागली तेव्हा मी नोकरीला कायमचा राम राम ठोकला आणि पूर्णपणे चित्रपटाला वाहून घेतले. त्यादृष्टीने ‘‘उपकार’’ माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.

——————–

प्रश्न : मनोजकुमारला आपण आपला मेंटोर मानता का?

प्रेम : तसे म्हटले तर वावगे होणार नाही. कारण ‘‘वह कौन थी’’मध्ये त्याच्याबरोबर काम केल्यानंतर आमचे ट्यूनिंग मस्त जमले. मनोजकुमारने मला त्याने त्याच्या चित्रपटात ज्या ज्या भूमिका दिल्या त्या सर्व भूमिका आणि ते चित्रपट फार गाजले. ‘‘वह कौन थी’’मधील माझ्या भूमिकेने प्रभावित झाल्याने मला ‘‘शहीद’’मध्ये संधी दिली. त्यानंतर ‘‘उपकार’’, ‘‘पूरब और पश्चिम’’ ते थेट ‘‘क्रांती’’पर्यंत त्याने मला खूप चांगल्या भूमिका दिल्या. स्वत: दिग्दर्शक असल्याने माझ्याकडून त्या चांगल्या करूनही घेतल्या. त्यामुळे माझ्या यशात मनोजकुमारचा वाटा मोठा आहे हे निर्विवाद.

——————–

प्रश्न : तुम्ही ज्यांना आपले आदर्श मानले त्या दिलीपकुमार बरोबरचा अनुभव कसा होता?

प्रेम : फारच छान होता. मी अभिनयामध्ये करिअर करण्यासाठी मुंबईला निघालो तेव्हा वडिलांनी ‘‘दिलीपकुमार जैसे बडे कलाकार बनो’’ असा आशीर्वाद दिला होता. येथे स्टुडिओचे उंबरठे झिजवताना दिलीपकुमार बनणे सोपे नाही, याची जाणीव झाली. जेव्हा दिलीपकुमार साहेबांबरोबर ‘‘दास्तान’’मध्ये पहिली संधी मिळाली तेव्हा मनावर फार दडपण आणि अतिशय आनंद अशा संमिश्र भावना होत्या. त्यांचा सेटवरचा दरारा, अभ्यासू वृत्ती, भूमिका नीट समजेपर्यंत समजून घेणे वगैरे बरेच काही शिकण्यासारखे होते. ‘‘क्रांती’’ आणि इतर काही चित्रपटांतूनही आम्ही एकत्र आलो आणि प्रत्येक वेळी दिलीपसाहेबांकडून काही न काही शिकत गेलो.

——————–

प्रश्न : आपण प्राण, राज कपूर, देव आनंद अशा अनेक दिग्गजांबरोबर काम केले आहे. त्यांचे काही अनुभव?

प्रेम : अनुभव भरपूर आहेत; पण ती तिन्ही मंडळी फार ग्रेट आहेत. त्यांच्यातील समान धागा जर कुठला असेल तर dedicated and disciplined, अतिशय शिस्तबद्ध आणि समर्पित कलाकार होते ते. प्राणजीबरोबर मी शहीद, उपकार, पूरब और पश्चिम, अंजाना अशा जवळजवळ २५/२६ चित्रपटांतून भूमिका केल्या. प्रत्येक भूमिकेत ते स्वत:चे वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करायचे. मुख्य म्हणजे प्राण साहेबांचे डोळेच जास्त बोलत असत. त्यांची नजर नुसती फिरली की, भावना कळायच्या. मग ते कारुण्य असो किंवा खलनायकी नजर. देवसाहेबांबद्दल मी काय बोलणार? त्यांच्यासारखा चिरतारुण्याचे वरदान लाभलेला most energetic कलाकार मी पाहिला नाही. एकदा आमच्या एका चित्रपटाचे शूटिंग उंच पहाडीवर होते. चित्रपट बहुतेक ‘‘देस परदेस’’ असावा; पण त्यावेळी देव साहेबांचे बरेच वय झाले होते. आमचा सगळा शूटिंग ट्रूप धापा टाकत वर पोहोचला. पाहतो, तो काय, त्या वयातही देव साहेब तेथे आधीच पोहोचून त्या जागेची पाहणी करीत होते.

——————–

प्रश्न : आणि राज कपूर साहेब? त्यांचे आणि तुमचे तर कौटुंबिक नाते आहे ना?

प्रेम : हो, नात्याने राज कपूर माझे साडू लागतात म्हणजे त्यांची पत्नी आणि माझी पत्नी सख्ख्या बहिणी. माझे बरेच चित्रपट येत होते, चालत होते तरी माझ्या ‘‘प्रेम चोप्रा’’ या नावाला खरी ओळख मिळवून दिली ती त्यांच्या ‘‘बॉबी’’ या चित्रपटाने.

——————–

प्रश्न : पण सुरुवातीला तुम्ही ती भूमिका नाकारली होती ना? काही कौटुंबिक मतभेद?

प्रेम : छे! छे! मतभेद वगैरे काही नाही. झाले काय की, अमाप पैसा ओतून आणि प्रचंड प्रसिद्धी करूनही राज साहेबांचा ‘‘मेरा नाम जोकर’’ हा चित्रपट फारसा चालला नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती जरा बिकट झाली होती. त्यांनी ‘‘बॉबी’’ चित्रपटाची निर्मिती सुरू केली होती. राज साहेबांबरोबर घनिष्ट संबंध पाहून अनेक कलाकारांनी मानधन न घेता काम करण्याचे मान्य केले होते. त्यात आवर्जून उल्लेख करायचा झाला तर प्राण साहेबांचा. ‘‘बॉबी’’ तुफान चालल्यावर राज साहेबांनी त्यांचा मानधनाचा चेक त्यांना पाठविला होता; पण प्राण साहेबांनी तो परत केला. सिम्प्लि ग्रेट! तर मीही त्या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून काम करावे, अशी राजसाहेबांची इच्छा होती; पण मी त्यांना नकार दिला कारण एक तर ती भूमिका फार छोटी होती. मला त्यात फारसा वाव नव्हता. दुसरे, त्यावेळी मी बर्‍याच चित्रपटांत नायकाबरोबरच समांतर भूमिका करीत होतो. त्यामुळे शक्ती सामंता, प्रमोद चक्रवर्ती, यश चोप्रा अशा दिग्गज निर्मात्यांबरोबर माझे फार चांगले संबंध प्रस्थापित झाले होते. म्हणून मी राज साहेबांना नकार दिला; पाण राज साहेबांची दूरदृष्टी बघा, त्यांनी माझ्याच नावाचा हट्ट धरला. ‘‘बॉबी’’तील डिंपलचे वडील प्रेमनाथ माझे व राज साहेबांचे मेव्हणे. त्यांनी प्रेमनाथकरवी मला निरोप पाठवला. ‘‘त्याला सांग या चित्रपटात त्याला एकच वाक्य म्हणायचे आहे. त्याचे नावच सांगायचे आहे. हा चित्रपट चालला तर तो स्वत:च्या नावाने ओळखला जाईल.’’ शेवटी राज साहेबांनचा हट्ट कोण मोडणार? आणि ‘‘बॉबी’’तील माझ्या एकाच वाक्याने कमाल केली. ‘‘प्रेम नाम है मेरा… प्रेम चोप्रा’’ हे वाक्य प्रचंड गाजले. आज इतक्या वर्षांनंतरही माझे नाव घेतले की, लोकांना माझा हाच डायलॉग आठवतो.

राज साहेब काय किंवा त्यावेळचे इतर निर्माते काय, कथानकांवर अधिक भर द्यायचे. कथानक नक्की करण्यासच बराच वेळ लागायचा. अगदी छोट्या भूमिकांवरही बराच विचार व्हायचा म्हणून चित्रपटातील एखादी भूमिका मग ती कोणाचीही असो, ती संस्मरणीय व्हायची.

अलीकडे तसे होताना दिसत नाही. कथानक नायक किंवा नायिकेभोवती फिरतो. त्यामुळे इतरांना फारसा वाव मिळत नाही.

——————–

प्रश्न : तुम्ही म्हणता ते खरे आहे. पूर्वीच्या सर्वच खलनायकांनी आपल्या वेगळ्या स्वतंत्र शैलीने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. अलीकडे तसे खलनायक का दिसत नाहीत?

प्रेम : याचे कारण अलीकडे स्पर्धा फार आहे आणि आताच मी म्हटल्याप्रमाणे सर्वच भूमिकांचा सखोल विचार हल्ली होत नाही. इतरही कारणे आहेत. जसे, पूर्वी चित्रपटातून जे दाखवले जायचे ते लोकांना खरेच वाटायचे. त्याचा लोकांच्या मनावर खोलवर परिणाम व्हायचा. त्या खलनायकाकडे लोक त्याच नजरेने पहायचे. आताचा प्रेक्षक खूप सुजाण आहे. तो त्या रोलकडे एक भूमिका म्हणून बघतो. व्यक्तिगत जीवनाशी त्याचा संबंध जोडत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हल्ली हिरोच निगेटिव्ह भूमिका करतात. हल्ली एकाच चित्रपटात २-३ हिरो असतात. पैकी एक निगेटिव्ह भूमिका करणार. तिथे वेगळा खलनायक कसा असेल? पूर्वी चित्रपटाचा साचा ठरलेला असे. एक नायक, एक व्हिलन, एक कॉमेडियन, एखादी बिन्दु, हेलेनसारखी व्हॅम्प वगैरे वगैरे. हल्ली त्यांची कसरही हिरोईनच सर्वात कमी कपडे घालून पूर्ण करते. हिरोच कॉमेडी करतो. आमच्या वेळी नायिकेचा पदर जरी ओढला किंवा ब्लाऊज जरी फाडला तरी मोठा गहजब व्हायचा. आत तर पदर हा प्रकारच राहिला नाही आणि हिरोईनचे कपडे मुळातच इतके कमी की त्यापलीकडे जाऊन व्हिलन काय फाडणार हा प्रश्‍न. आमच्या वेळी खलनायकाची एक फळी तयार झाली होती; पण आता तशी खास खलनायकांची फळी राहिली नाही. अलीकडची खलनायकी अभिनयापेक्षा तांत्रिक बाबीतच जास्त अडकले असल्याने प्रेक्षकांच्या मनाला भिडत नाही.

——————–

प्रश्न : समाजात वावरताना तुमच्या खलनायकी भूमिकांचा तुमच्या कुटुंबावर खास करून तुमच्या तिन्ही मुलींवर काही परिणाम झाला का?

प्रेम : सुरुवातीला थोडाफार झाला. एकदा शिमल्याला मी बाबांबरोबर जात असताना मी पाहिले तर घरातील पुरुष मंडळी आपल्या स्त्रियांना घरात ओढून नेत होते. ‘‘चलो अंदर, प्रेम चोप्रा आ रहा है, उसकी नजर बहुत बुरी है…’’ शिमला तसे फार लहान असल्याने बाबांनी त्यांना संध्याकाळी घरी बोलावले आणि प्रेम करतो तो केवळ अभिनय आहे, वास्तवात तो तसा नाही हे समजावून सांगितले. मुलीही सुरुवातीला जरा कुरबूर करायच्या; पण एकदा तिघीनाही जवळ बसवून मी त्यांना नीट समजावून सांगितले की, ‘‘शाळेत शिक्षक शिकवण्याचे काम करतात. त्याचे त्यांना पैसे मिळतात. तसेच माझे हे काम आहे, ज्याचे मला पैसे मिळतात. शाळेच्या गॅदरिंगमध्ये तुम्ही नाटक करता त्यात एखाद्याने वाईट भूमिका केली तर तो वाईट असतो का? तुमच्या शाळेची फी, तुमचं कपडालत्ता, हौसमौज् या पैशांतूनच होते वगैरे वगैरे.’’ त्यानंतर माझ्या मुलींनी कधी लोकांचे बोलणे मनावर घेतले नाही.

——————–

प्रश्न : Personality आणि Talent असूनही हिरो होता आले नाही याचे दु:ख होते का?

प्रेम : मुळीच नाही. कारण सुरुवातीच्या चित्रपटात मी हिरोच होतो ना; पण ते चित्रपट चालले नाहीत याचा अर्थ प्रेक्षकांना मी हिरो म्हणून पसंत पडलो नाही. प्रेक्षकांनी मला ज्या भूमिकेत स्वीकारले त्याच भूमिका करण्यात मी धन्यता मानली आणि आज इथवर पोहोचलो. त्यामुळे खंत मुळीच वाटत नाही.

——————–

प्रश्न : राजेश खन्नाबरोबर तुम्ही सर्वाधिक चित्रपट केलेत. अमिताभबरोबरही तुमचे चित्रपट गाजले. या दोन्ही सुपर स्टार्स बरोबरचा अनुभव कसा होता?

प्रेम : अनुभव खूपच चांगले होते. शेवटी अनुभव हाच सर्वात मोठा गुरू असतो जो बरेच काही शिकवून जातो. राजेश खन्नाबरोबर मी ‘कटी पतंग’, ‘दो रास्ते’, ‘प्रेम नगर’, ‘सौतन’ असे जवळजवळ १९-२० चित्रपट केले ज्यातील १५-१६ सुपर डुपर हीट ठरले. यात राजेश खन्नाचा जेवढा वाटा आहे तेवढाच समांतर भूमिका करणार्‍या माझाही आहे. कारण काळ्या रंगाशिवा पांढरा रंग उठून दिसणार, नाही का?

अमिताभबरोबर ‘दो अंजाने’, ‘त्रिशूल’, ‘काला पत्थर’, ‘ग्रेट गॅम्ब्लर’ असे अनेक चित्रपट मी केले. हे दोन्ही सुपर स्टार्स आपापल्या जागी ग्रेटच आहेत यात वाद नाही. कमीत कमी रिटेकमध्ये बेस्ट सीन देण्यात दोहेही तरबेज; पण दोघांमध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे राजेश खन्ना कायम स्वत:च्या गुर्मीतच असायचा. स्टेटस् सांभाळत बसायचा. सेटवर उशिरा येणे हा त्याचा स्थायीभावच होता. त्याने कधी अ‍ॅडजेस्टमेंट केली नाही. सेटवर त्याची मर्जी सांभाळण्यातच इतरांचा वेळ जायचा. याउलट अमिताभचा वक्तशीरपणा, शांत स्वभाव, सगळ्यांशी सौजन्यपूर्ण वागणे, आदराने बोलणे, युनिटमधील लोकांना जास्त भावले. एखादा ‘अवतार’ सोडला तर राजेश खन्नाने चरित्र भूमिका स्वीकारल्या नाहीत. जाहिरातीही त्याने कधी केल्या नाहीत कारण ते त्याच्या ‘शान के खिलाफ’ होते; पण अमिताभने या सर्व तडजोडी आपल्या उतारवयात केल्या म्हणून आजही तो कार्यरत आहे. अमिताभजी कभी किसी के बारे में ना बुरा बोलते है, ना बुरा सुनते है. राजेश खन्नाला उतारवयात जे नैराश्य आणि एकाकीपण आले याचे महत्त्वाचे कारण त्याच्याकडून दुरावलेली माणसे; पण या दोघांबरोबर काम करताना माझे मैत्रीचे नाते होते आणि ते चिरंतन टिकून राहिले आहे. त्यांच्याबरोबर काम करताना दडपण हे असायचेच; पण ती स्वत:ला सिद्ध करू शकलो यातच मी समाधानी आहे. मला जो एकमेव फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला तो ‘दो अंजाने’मधील सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा. त्यात माझ्यासमोर अमिताभच होता. अमिताभसमोर बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर पुरस्कार मिळणे हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.

——————–

प्रश्न : पुरस्काराचा विषय निघालाच आहे, तर तुमचे त्याविषयीचे मत सांगा. पुरस्कारांना तुमच्या जीवनात किती महत्त्व आहे?

प्रेम : पुरस्काराचे मला कधी अप्रुप वाटले नाही. कारण पुरस्कार देताना ती देणार्‍याची भावना प्रामाणिक असेल तर योग्य आहे; पण पुरस्कारामागे वेगळी गणिते मांडलीजात असतील तर ते योग्य मूल्यमापन होत नाही आणि अशा पद्धतीने पुरस्कार मिळण्याला काहीच अर्थ राहत नाही. म्हणूनच काहीही प्रयत्न न करता मला जेव्हा फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले तेव्हा मला विश्वासच बसला नाही. आजही मला तो पुरस्कार चुकून मिळाला की काय, अशी शंका येते. कारण पुरस्कार मिळवण्यासाठी लोक काय काय प्रयत्न करतात हे मी जवळून पाहिले आहे. ‘द ग्रेट गॅम्ब्लर’च्या शूटिंगच्या वेळी मेकअप करताना शक्ती सामंतांनी मला जेव्हा या अवॉर्डसंबंधी बातमी दिली तेव्हा मला कळेचना की, कोणत्या भूमिकेसाठी मिळाला.

पुरस्काराविषयी मला एवढेच सांगायचे आहे की, तो योग्य वेळीच मिळायला हवा. प्राण साहेबांनाही दादासाहेब फाळके पुरस्कार इतक्या उशिरा मिळाला की, वृद्धत्वाने त्यांचा स्मृतिभ्रंश झाला होता. आपल्याकडे मी समजू शकतो; पण इतर क्षेत्रांत ती व्यक्ती हयात असताना तिला त्याचा आनंद मिळेल. अशा वेळी द्या ना पुरस्कार.

——————–

प्रश्न : तुम्हाला मिळालेल्या इतर पुरस्कारांविषयी?

प्रेम : सुरुवात जरी एका नॅशनल अवॉर्डने झाली असली तरी पुढे एक फिल्म फेअर अवॉर्डशिवाय इतर पुरस्कार फारसे मिळाले नाहीत; पण सत्कार, सन्मान बरेच झाले. लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड, इंदिरा गांधी प्रियदर्शनी अवॉर्ड, लायन्स क्लब अवॉर्ड, अशोका अवॉर्ड, आशीर्वाद अवॉर्ड, पंजाबी कला संगम अवॉर्ड वगैरे वगैरे. आयर्लंड येथे झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्येही मला लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. अगदी आपल्या महाराष्ट्र शासनानेही माझा ‘‘महाराष्ट्र रत्न’’ हा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. १५ ऑगस्ट १९९३ रोजी शिकागो येथे स्वातंत्र्यदिनाच्या परेडमध्ये विशेष गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

——————–

प्रश्न : तुम्हाला विशेष सामाजिक कार्याबद्दल मानाचे मदर टेरेसा अवॉर्डही मिळाले आहे ना, त्या सामाजिक कार्याविषयी काही सांगाल?

प्रेम : आयुष्यभर जरी बॅड मॅन म्हणून वावरलो असलो तरी प्रत्यक्ष जीवनात आम्ही बॅड नसतो. आमच्यातही थोडासा गुडनेस, थोडीशी माणुसकी असते. त्यातूनच थोडेसे सामाजिक कार्य करण्याचा मी प्रयत्न केला ज्याची दखल या पुरस्काराने घेतली. भारतासह विविध देशांत शोज करून तेथील विविध सामाजिक संस्थांना भरपूर निधी मी मिळवून दिला आहे. बहारीनमध्ये एक सुसज्ज शाळा करण्यास मी खूपच मदत केली आहे. आताही एक ट्रस्थ स्थापन करून त्याद्वारे फिल्म इंडस्ट्रितील जुने कलाकार, तंत्रज्ञ यांना त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी, वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक ती आर्थिक मदत मी करतो. समाजाने आपल्याला भरभरून दिले त्याची परतफेड करण्याचा हा छोटाचा प्रयत्न मी करतो इतकाच.

——————–

प्रश्न : अशी एखादी भूमिका आहे का, जी तुमच्याकडून दुसर्याला गेली किंवा दुसर्या कलाकारांकडून तुमच्याकडे आली?

प्रेम : माझ्या बाबतीत या दोन्हीही शक्यता घडल्या आहेत. तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल की, ‘‘उपकार’’मधील माझी भूमिका राजेश खन्ना करणार होता. नेमके त्याच वेळी त्याला प्रोड्यूसर असोसिएशनची मेंबरशिप मिळाली होती. त्या निर्मात्यांनी राजेश खन्नाला सांगितले की, ‘आम्ही तुला हिरो म्हणून प्रोजेक्ट करीत आहोत तर तू ही ग्रे शेडची नकारात्मक भूमिका का करतोयस? त्याचा विपरीत परिणाम तुझ्या इतर चित्रपटांवर होईल.’ राजेशला ते पटले आणि त्याने ‘उपकार’मधील भूमिका करण्यास नकार दिला. ‘वह कौन थी’ आणि ‘शहीद’मुळे मनोजकुमार प्रभावीत झाला होताच. त्याने मला विचारल्यावर मी नाही म्हणण्याचा प्रश्‍न नव्हता. ‘उपकार’ तुफान चालला तेव्हा एका प्रिमियर शोच्या वेळी राजेश खन्नाने मला मिठी मारली आणि म्हणाला, ‘प्रेम, तुमने तो इस रोल को पुरी जस्टीस दी है, काश ये रोल मैने किया होता.’

त्याचप्रमाणे ‘हिम्मतवाला’ या चित्रपटात माझी भूमिका होती. माझे सर्व कपडेही शिवून झाले होते; पण मला ती भूमिका काही खास वाटली नाही. त्यावेळी माझे ‘बेताब’ या चित्रपटाचे शूटिंग चालू होते. तारखांचीही अडचण होतीच. शेवटी मी ‘हिम्मतवाला’मधील भूमिका सोडली आणि ती कादरखानला मिळाली. कादर खानने तो भूमिका फार चांगली केली. भूमिका मिळण्याचे जाण्याचे बरेच किस्से इंडस्ट्रीत आहेत. मी काही त्याला अपवाद नाही.

——————–

प्रश्न : तुमच्या मते उत्कृष्ट बॅड मॅन होण्यासाठी कोणता मोठा गुड पॉइंट असावा लागतो?

प्रेम : सर्वात महत्त्वाचे असतात ते संवाद खलनायकाचे सर्वात महत्त्वाचे काम असते ते समोरच्याला चीड आणणे. संवादात दम असायला हवा. समोरच्याला उद्दिपीत करता यायला हवे. त्यानंतर तुमचे अभिनयकौशल्य, संवादफेक या सर्व गोष्टी जुळून आल्या की, तो खलनायक रंगतोच. त्यात तो कलाकार आपल्या पद्धतीने जे काही वेगळे रंग भरेल ती आणखी जमेची बाजू.

——————–

प्रश्न : अलीकडचे चित्रपट पाहताना त्यातून होणारे अंगप्रदर्शन, गुन्हेगारी जगताचे उदात्तीकरण, त्याअनुषंगाने येणारा हिंसाचार, वास्तवतेच्या नावाखाली येणार्या गलिच्छ, अश्लील शिव्या पाहता सेन्सॉर बोर्डाचा कंट्रोल सुटला आहे, असे वाटते का?

प्रेम : मी फिल्म इंडस्ट्रित अजूनही कार्यरत असल्याने सेन्सॉर बोर्डविषयी बोलणे उचित नाही. आमच्या वेळी सगळे चांगले होते आणि आता सगळे वाईट आहे, असे मी म्हणणार नाही; पण आता प्रत्येक गोष्टीचे विनाकारण उदात्तीकरण होते आहे हे खरे. याला प्रेक्षकांची अभिरूचीही कारणीभूत आहे. शेवटी हा धंदा आहे. ग्राहाकला जे आवडते, रूचते ते देण्याचा प्रयत्न केला जातो; पण याचा अर्थ असा नाही की, याला राजमान्यता ही मिळालीच पाहिजे. तुम्हाला एक किस्सा सांगतो. काही महिन्यांपूर्वी मी सलीम खानसाब म्हणजे सलमान खानचे वडील यांच्या आग्रहावरून ‘दबंग 2’ च्या सेटवर गेलो होतो. तेव्हा मी सलमानला काही कानपिचक्या दिल्या. ‘आजकल बडा नाम सून रहे है तुम्हारा, चुलबुल पांडे क्या, मुन्नी बदनाम क्या, पोस्टर और फेविकॉल क्या वगैरे वगैरे.’ सलमानला हे माझ्यासारख्या बॅड मॅनकडून अपेक्षित नव्हते; पण तरीही माझ्या वडिलकीचा मान राखून त्याने शांतपणे माझी टीका ऐकून घेतली.

अलीकडे सेन्सॉर बोर्ड U/A असे प्रमाणपत्र देते. त्याचा अर्थ काय? तो चित्रपट सर्वांसाठी आहे की, फक्त प्रौढासाठी याचा अर्थबोध न झाल्याने ज्याला जसे वाटेल तसे त्याने अर्थ घ्यावा या उदात्त हेतूने बोर्ड असे सर्टिफिकेट देते का? पूर्वीचे निकष लावले तर कदाचित आजचा प्रत्येक चित्रपट हा फक्त प्रौढांसाठीच असेल इतकी यात चुंबनदृश्ये आणि अंगप्रदर्शन असते. समाजात जे घडते त्याचेच प्रतिबिंब सिनेमातून दिसते हे जरी खरे असले तरी त्याचे उदात्तीकरण होऊ नये असे मला मनापासून वाटते.

——————–

प्रश्न : क्या यही कारण है की आपकी तीनों बेटियों में से कोई भी फिल्मों में नही आयी?

प्रेम : नही, ऐसा नहीं है, बेसिकली मेरी तीनो बेटिया जरासी शाय नेचर की है यह उनके इंट्रेस्ट की बात है, त्यांना मुळातच चित्रपटात काम करण्याची आवड नाही. त्यांनी चित्रपटात यायचे म्हटले असते तरी मी त्यांना विरोध केला नसता. कारण आजची पिढी अगदी हुशार आहे. स्वत:चे निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आज उच्चभ्रू घराण्यातील अतिशिक्षित मुलीही या क्षेत्रात येत आहेत. करिअर करण्यासाठी धडपडत आहेत. तुमच्या प्रश्‍नाचा रोख महिलांचे शोषण (WOMEN’S EXPLOITATION) वर असेल तर मला सांगा शत्रुघ्न सिन्हाने सोनाक्षीला, अनिल कपूरने सोनमला या क्षेत्रात कसे येऊ दिले असते? कुठला बाप आपल्या मुलीला जाणूनबुजून अशा निसरड्या क्षेत्रात बदनाम आणि बरबाद व्हायला पाठविल? अगदी राजकपूरच्या घराण्यातही लग्नानंतर बबीता, नितू सिंग यांनी चित्रपटात काम करणे बंद केले तरी त्यांच्या मुली करीना आणि करिश्मा या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करीत आहेतच ना? तात्पर्य काय, माझ्या मुलींनी या क्षेत्रात यायचे की नाही सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे.

——————–

प्रश्न : मग काय करतात आपल्या मुली?

प्रेम : माझी मोठी मुलगी स्कीता हिने राकेश नंदा जो फार मोठा पब्लिसिटी डिझायनर आहे त्याच्याशी लग्न केले आहे. ती उत्तम लेखिका आहे. माझ्यावर तिने एक पुस्तक लिहिले आहे आणि आता धार्मिक विषयावर / अध्यात्मावर दुसरे पुस्तक लिहित आहे. दुसरी मुलगी पुनिता हिला समाजसेवाची आवड असून ती येथेच इंग्रजी माध्यमाची शाळा चालवीत आहे. तिची शाळा अतिशय उत्तम चालली आहे. विकास भल्ला या गुणी गायक, कलाकार आणि टीव्ही निर्मात्याबरोबर तिने विवाह केला आहे आणि तिसरी प्रेरणा आता मिसेस् शर्मन जोशी झाली आहे. शर्मन जोशीबद्दल मी वेगळे सांगायची गरज नाही. ‘थ्री इडियट्स’, ‘गोलमाल’, ‘फरारी की सवारी’ अशी काही नावे जरी घेतली तरी त्याचा परिचय होईल. प्रेरणा ही उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय आर्ट डायरेक्टर आहे. आपल्या देशातच नव्हे तर परदेशातही म्हणजे दुबई, सिंगापूर येथे ती अनेक प्रदर्शनाचे आयोजन करते. माझ्या तीनही मुली आपापल्या संसारात मजेत असून गुण जावई आणि सहा नातवंडे यांनी माझा परिवार समृद्ध आहे.

——————–

प्रश्न : एवढे सारे फिल्मी क्षेत्राशी निगडीत परिवार सदस्य असताना स्वत:ची चित्रपट निर्मिाती करण्याचा विचार कधी मनात आला नाही का?

प्रेम : नाही, कारण माझो मोठे बंधू कैलाश चोप्रा जे आता हयात नाहीत, त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती केली आहे. जसे ‘नफरत’, ‘शाखाल’, ‘जब अंधेरा होता है’ वगैरे वगैरे… पण यातील कुठलाही चित्रपट नीट चालला नाही आणि त्यांची आर्थिक परिस्थिती जरा हलाखीची झाली. माझी आयुष्यभराची कमाई या जुगारात घालवायची हिम्मत नव्हती, त्यामुळे तो विचारही कधी मनाला शिवला नाही.

——————–

प्रश्न : तुमची कोणी नक्कल केली तर तुम्हाला त्याला राग येतो का?

प्रेम : नक्कल करण्याचा उद्देश्य काय आहे यावर ते अवलंबून आहे. त्याचा उद्देश्य हा चिडवण्यासाठी असेल तर नक्कीच राग येईल; पण जर ती माझ्या अभिनयाला दिलेली दाद असेल तर आनंदच होईल. तसे पाहिले तर अजय देवगणचे नाव ऑल द बेस्ट चित्रपटात प्रेम चोप्रा आहे तर रणबीर कपूरने अजब प्रेम की गजब कहानीमध्ये माझी नक्कल केली आहे; पण मला त्यांचा राग आला नाही, कारण ती माझ्या कलेला दिलेली दाद होती.

——————–

प्रश्न : तुमचा अतिशय गौर वर्ण, उंची, तगडी शरीरयष्टी आणि त्याला शोभेसे टक्कल आणि त्यावर ही टिपिकल कॅप हा गेटअप एखाद्या हॉलिवूड कलाकाराला शोभेल असा आहे. जगभरात तुमचे एवढे फॅन असताना हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी कधी मिळाली का?

प्रेम : अगदी हॉलिवूड नाही; पण सेमी हॉलिवूड चित्रपटात म्हणजे ज्यामध्ये बरेच कलाकार व तंत्रज्ञ परदेसी होते, त्यात महत्त्वाची भूमिका मला मिळाली. किंबहुना त्या भूमिकेची गरज म्हणून मी हे टक्कल केले. घरी पत्नी आणि मुलींची प्रतिक्रिया काय असेल याची चिंता होती; पण त्याना माझे रूप फार आवडले. मला ते छान शोभते असे त्यांचे मत झाले आणि माझा हा गेटअप कायमचा झाला.

——————–

प्रश्न : मग त्या आंतरराष्ट्रीय चित्रपटाबद्दल सांगा ना?

प्रेम : माझी सकारात्मक भूमिका असलेला एक चित्रपट २००५ साली आला होता ‘मैंने गांधी को नही मारा, अनुपम खेरची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट लोकांच्या फारसा लक्षात नसेल; पण या चित्रपटातील माझ्या भूमिकेने मला हा हॉलिवूड चित्रपट मिळवून दिला. त्या चित्रपटाचे नाव होते द थ्रेड म्हणजे धागा. त्याचा संबंध हिंदू ब्राह्मणाच्या जानव्याशी असावा बहुतेक. कारण याचा विषय थोडासा तत्त्वज्ञानावर आधारित होता. स्वत:ला घातलेले एक प्रकारचे संस्काराचे बंधन या चित्रपटात प्रतिकात्मक रूपाने दाखवण्यात आले होते. आपण आपल्या गतकर्मांपासून दूर पळून जाऊ शकत नाही आपण या जन्मात काही गैरकृत्ये केले असेल तर त्याची फळे याच जन्मात भोगावी लागतात, असा या चित्रपटाचा विषय होता.

इंग्रजीतील प्राईड अ‍ॅण्ड प्रेजूडाईस व बेंड इट लाइक बेक हॅम या चित्रपटाचे सहनिर्माते फिलीप वॅन अल्वेनसिल्वन व दीपक नायक मिळून द थ्रेडची निर्मिती करीत होते. त्यावेळी मी माझ्या वैयक्तिक भेटीसाठी लंडनला गेलो होतो. या चित्रपटाचा निर्माता अमेरिकन होता. माझी शरीरयष्टी, उंची अभिनय सर्व बाबी त्यांना पसंत होत्या. चित्रपटाचा विषय थोडा आध्यात्मिक असल्याने स्वामी विवेकानंदांसारखा चेहरा त्यांना हवा होता तो त्यांना माझ्यात दिसला. त्यामुळे मी लंडनला असताना या भल्या गृहस्थाने मला शोधून काढले. दिग्दर्शक महेश मथाई यांना घेऊन तो मला भेटायला आला. त्या दोघांनी मला कथानक ऐकवले. मला ते खूप आवडले आणि मी होकार दिला. या चित्रपटात मी वशिष्ट नावाच्या साधूची भूमिका केली. यात लिनस रोश, सेफ्रन ब्युरो, रोशन सेठ इत्यादी कलाकार होते. यात रोशन सेठनी रामाची भूमिका केली होती. प्रत्येक काम राम वसिष्ट साधूच्या सल्ल्यानुसार करीत होता. या चित्रपटाचे बरेचसे शूटिंग लंडनला झाले होते तर काही शूटिंग आमच्या शिमल्याला झाले. प्रसिद्धीच्या झोतात आल्यावर शिमल्याला शूटिंग करण्याची मजा काही औरच होती. त्यांच्या कामाची पद्धत, वक्तशीरपणा, छोट्या छोट्या गोष्टींचे डिटेलिंग, विचारांचे देवाणघेवाण इत्यादी बाबींनी मी खूपच प्रभावित झालो. एक वेगळाच अनुभव होता तो. आपल्याकडे यशराज फिल्मससारख्या मोजक्याच संस्थेत अशी वैशिष्ट्ये अनुभवायला मिळतात.

——————–

प्रश्न : तुमच्या यशाचे श्रेय तुम्ही कोणाला द्याल?

प्रेम : माझी मेहनत, माझे DEDICATION आणि DETERMINATION. मी कधीच रोलची लांबी बघितली नाही. मला त्यात किती वाव आहे हे पाहिले. प्रत्येक भूमिका ही पहिलीच भूमिका आहे, असे समजून समर्पित भावनेने काम केले. एक गोष्ट मात्र येथे सांगू इच्छितो की, योग्य वेळी संधी मिळणे हाही महत्त्वाचा भाग असतो. माझी जेव्हा या क्षेत्रात एंट्री झाली तेव्हा प्राण साहेब चरित्र भूमिकेकडे वळले होते. कन्हैयालाल, जीवन यांच्या वयाचा आणि संवाद फेकीतील तोच तोचपणा पाहता फिल्म इंडस्ट्री एका नव्या तरुण तडफदार आणि उमद्या व्हिलनच्या शोधात होती. प्राण साहेबांनी भूमिका बदलण्याचा निर्णय घेतल्याने जी पोकळी/जागा निर्माण झाली ती भरण्याचा मी प्रयत्ना केला. अर्थात त्यांची जागा मी कधीच घेऊ शकणार नाही, कारण ते माझे आदर्श आहेत.

——————–

प्रश्न : तुमच्या सर्वात आवडत्या सकारात्मक आणि नकरात्मक भूमिका कोणत्या?

प्रेम : प्रत्येक भूमिका मी समरसूनच केली आहे. काही चालल्या, काही पडल्या. तरीही शहीद, जादूटोणा, प्रेम प्रतिज्ञा, चोरी चोरी चुपके चुपके, अगदी अलीकडे आलेल्या कोई मिल गया, दिल्ली 6, रॉकेट सिंग इत्यादी चित्रपटांतील सकारात्मक भूमिका मला चांगल्या वाटल्या. समाधान देऊन गेल्या. नकारात्मक भूमिकांतून निवड करणे जरा कठीण आहे. कारण त्या भरपूर आहेत. ज्या चित्रपटाने मला नाव मिळवून दिले तो उपकार, दो रास्ते, कटी पतंग, बॉबी, ज्याला पुरस्कार मिळाला तो दो अंजाने, क्रांती, दोस्ताना, फूल बने अंगारे… किती नावे सांगू?

——————–

प्रश्न : तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि सर्वात दु:खाचा क्षण कोणता?

प्रेम : आनंदाचा म्हणाल तर, ‘‘जो मंजिल मैंने तय की वहा तक पहुंचा, मैंने जिंदगी का मकसद पुरा किया, इस बात की सबसे ज्यादा खुशी हे. जिंदगी में बहुत कम लोग है जिन्हे अपनी मंजिल मिल जाती है.’’ सर्वात दु:खाचा प्रसंग म्हणजे माझे प्रेरणास्थान माझे वडील यांचे निधन. त्यावेळी मी शिमल्याला गेलो तेव्हा मला पाहण्यासाठी फार गर्दी झाली होती आणि लोक ‘प्रेम नाम है मेरा… प्रेम चोप्रा’ हा डायलॉग मारीत होते. त्यावेळी मला लोकांची खरेच चीड आली होती. त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे होते. त्यावेळी मला तो डायलॉग नकोसा वाटत होता.

——————–

प्रश्न : पुनर्जन्मावर विश्वास आहे का? असल्यास पुढील जन्मी काय व्हायला आवडेल?

प्रेम : बिलकुल नाही. वह सब कहने सुनने की बात है. जहा इस जनम का ठिकाना नही वहा अगले जनम के बारे में क्या सोचना.

——————–

प्रश्न : अभिनेते झाला नसतात तर काय झाला असतात?

प्रेम : सिम्पल, पिताजी के इच्छानुसार डॉक्टर बन जाता. हातात स्टेथोस्कोप घेऊन लोकांची नाडी तपासत बसलो असतो; पण प्रेक्षकांची नाडी सापडण्याचा जो आनंद मिळाला तो कदाचित तेथे मिळाला नसता.

——————–

प्रश्न : नव्या पिढीला काय सांगू इच्छिता?

प्रेम : नेहमी प्रामाणिक रहा, आपल्या कामाला योग्य न्या द्या. त्यासाठी कठोर मेहनत आणि समर्पित राहा आणि मुख्य म्हणजे आशावादी राहा.माझा एक शेर आहे तो सांगतो आणि आपण इथेच थांबू,

‘‘बुझ जाये शमा तो जल सकती है,

कश्ति हद ए तूफान से निकल सकती है,

अरे मायूस ना होना, इरादा ना बदलना,

तकदीर किसी वक्त भी बदल सकती है…’’

नवरंग रुपेरी च्या अशाच इतर विशेष लेखांसाठी क्लिक करा

Ramdas Kamat
Ramdas Kamat
+ posts

रामदास कामत यांचा अल्प परिचय

 • भारतीय स्टेट बँक मध्ये सहायक महाप्रबंधक या पदावर कार्यरत. सध्या स्टेट बँक स्टाफ कॉलेज,हैदराबाद येथे फॅकल्टि म्हणून काम पाहत आहेत.
 • वृत्तपत्र लेखन आणि नाटक हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय. विविध मराठी वृत्तपत्रांतून नियमित प्रासंगिक लिखाण ते करतात. दैनिक सकाळ, दैनिक कोकण सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स,महानगर,दैनिक वृत्त मानस,दैनिक सागर (चिपळूण), दैनिक मुक्त संवाद, दैनिक राजवृत्त इत्यादि वर्तमान पत्रांतून नाट्य परीक्षणे आणि लेख प्रकाशित आहेत.
 • दरवर्षी काही दिवाळी अंकातून कथा, कविता आणि लेख ते लिहितात. साहित्य जागर, नवरंग रुपेरी अशा चित्रपट विषयक अंकांसाठी अनेक कलावतांच्या मुलाखती कामत ह्यांनी घेतल्या आहेत.
 • महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण केंद्र नाट्य स्पर्धा, आंतर शालेय नाट्य स्पर्धा यासाठी परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
 • महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या एका भव्यतम सोडतीचा निकाल कामत यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आला.
 • “व्यथा संसाराची” या एकपात्री कार्यक्रमाचे महाराष्ट्रात २५० हून अधिक प्रयोग. आता तर हा कार्यक्रम ‘शादी का लड्डू’ ह्या नावाने ते हिंदीतही सादर करतात.
 • जुन्या नव्या हिन्दी सिनेमांच्या गीतांवर आधारित “वो भुली दास्तान” हा दृकश्राव्य कार्यक्रम ते सादर करतात.
 • ‘हकीकत’ ते ‘ऊरी-द सर्जिकल स्ट्राइक’ ह्या युद्धपटावर आधारीत ‘आज़ादी की जंग-फिल्मों के संग’ हा द्रुकश्राव्य कार्यक्रम १५ औगस्ट व २६ जानेवारीला सादर करतात.

 

 • प्रकाशित पुस्तके: (ही सर्व पुस्तके com येथे उपलब्ध आहेत)

 

 1. फ्लॅशबॅक: (प्रकाशन ज्येष्ठ गायक कलावंत रामदास कामत ह्यांच्या हस्ते) मा. भगवान, महेंद्र कपूर, दारा सिंग, रविंद्र जैन, सुबल सरकार, शोभा गुर्टू, रामदास कामत आणि भालचंद्र पेंढारकर ह्यांची कामत ह्यांनी केलेली आत्मकथने. (पहिली आवृत्ती संपली, दुसरी प्रकाशनाच्या मार्गावर)
 2. परिमार्जन: (‘आशीर्वाद’ पुरस्कार प्राप्त कथासंग्रह- प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी ह्यांच्या हस्ते, प्रस्तावना- ज्येष्ठ साहित्यिक भा. ल. महाबळ))
 3. रामरगाडा: वृत्तपत्रीय सदरातील लेखांचे संकलन, प्रस्तावना ज्येष्ठ साहित्यिका विजया वाड. पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन कवि अशोक नायगावकर ह्यांच्या हस्ते तर दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन ठाणे साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे ह्यांच्या हस्ते.
 4. आमि बी घडलो: (प्रकाशन ज्येष्ठ रंगभूषाकार आणि व्ही. शांताराम पुरस्कार विजेते पंढरीदादा जुकर व अभिनेते सतीश पुळेकर ह्यांच्या हस्ते.) मनोजकुमार, माला सिन्हा, अमिन सायानी, जयंत सावरकर, वसंत कानेटकर, जयवंत कुलकर्णी, प्रमिला दातार, पंढरीदादा जुकर, अजित कडकडे आदि मान्यवरांची आत्मकथने. पुस्तकास प्रा. चंद्रकांत नलगे पुरस्कार (कोल्हापूर) आणि अंकुर साहित्य संघ पुरस्कार (अकोला) हे दोन पुरस्कार प्राप्त.
 5. सूनहरी यादें: जॉनी वॉकर, जगदीप,प्रेम चोप्रा, दारासिंग आदि मान्यवरांची आत्मकथने
 6. कटिबद्ध: (कथासंग्रह- ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ साहित्यिका डॉ. गिरीजा कीर आणि सुप्रसिद्ध नाटककार सुरेश खरे ह्यांच्या उपस्थितीतप्रकाशित.)
 7. पहिला हिन्दी कथा संग्रह ‘रिश्ते’प्रकाशनाच्या वाटेवर

वरील पुरस्कारांव्यतिरिक्त इतर पुरस्कार:

 • दैनिक “कोकणचा कॅलिफोर्निया” तर्फे समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.
 • महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत “एक चॉक्लेट प्रेमाचे” या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा प्रथम पुरस्कार.
 • बालभारत एकांकिका स्पर्धेत दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार
 • सामाजिक कार्याबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार
 • ‘मरे एक त्याचा’ ह्या एकांकिकेसाठी सर्वोत्कृष्ट लेखन व अभिनयासाठी कलाविष्कार पुरस्कार.
 • यूनायटेड बँक ऑफ इंडिया तर्फे आयोजित अखिल भारतीय आंतरबँक हिन्दी हास्य व्यंग कविता स्पर्धेत प्रथम पुरस्कार.
 • भारतीय स्टेट बँकतर्फे आयोजित राज्यस्तरीय हिन्दी हास्य व्यंग कविता स्पर्धेत प्रथम पुरस्कार.
 • विजया बँक आयोजित अखिल भारतीय आंतरबँक हिन्दी निबंध स्पर्धेत पुरस्कार.
 • स्वराज्य साप्ताहिक, पुणे तर्फे आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार.
 • ‘खंत’ ह्या कथेला राज्यस्तरीय साहित्य भास्कर पु. भा. भावे पुरस्कार.
 • याशिवाय अनेक नाट्य आणि साहित्य स्पर्धांमधून अभिनय, लेखन आणि दिग्दर्शनाचे अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत.

 

संपर्क: रामदास कामत, मोबाइल: ९८९०६८५२३५, ईमेल: ramdaskamath11@gmail.com

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.