आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Remembering Veteran Character Actor of Hindi Cinema Late A.K. Hangal. अनेकवेळा आपण एखाद्या नायकाचे अथवा नायिकेचे जितके सिनेमे बघितले नसतील त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळा चरित्र अभिनेत्यांना आपण सिनेमांमधून बघितलेले असते. असेच एक नाव म्हणजे ए.के. हंगल ज्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत १९७० व ८० च्या दशकात त्यांनी साकारलेल्या असंख्य चरित्र भूमिकांमुळे अतिशय आदराने बघितले जात होते. एखाद्या लँडमार्क/माईलस्टोन सिनेमातील भूमिका गाजली म्हणजे ती त्या अभिनेत्याची परमनंट ओळख बनून जाते. आजही ए.के. हंगल म्हटले कि कित्येक रसिकांना शोले मधील “इतना सन्नाटा क्यों है भाई?” म्हणणारे इमाम साहब आठवतात. आज हंगल साहेबांचा नववा स्मृतिदिन आहे. 

अवतार किशन हंगल यांचे आयुष्य खूपच खडतर म्हणावे लागेल. १ फेब्रुवारी १९१४ रोजीचा सियालकोट, पंजाब येथील जन्म. वडील कश्मिरी पंडीत. बालपण पेशावर, पाकिस्तानात गेले. लहानपणापासूनच रंगभूमीवर अभिनयास सुरुवात केली. घरच्या परिस्थितीमुळे तरुणवयात सुरुवातीला टेलरिंगचा व्यवसाय केला. मग स्वातंत्र्यसैनिक म्हणून वयाच्या १५ व्या वर्षीच स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. कित्येकदा तुरुंगवासही भोगला. १९४६-४७ च्या सुमारास मार्क्सवादी विचारांचे अभिनेते बलराज साहनी तसेच कवी कैफी आझमी यांच्या सोबत रंगभूमीवर काम करत असतांना कम्युनिस्ट विचारांशी ओळख झाली. पण या कम्युनिस्ट विचारसरणीला दोषी ठरवत १९४७ ते १९४९ ही तीन वर्षे त्यांना कराची, पाकिस्तानात तुरुंगात काढावी लागली. जेलमधून बाहेर आल्यावर ते मुंबईत येऊन स्थायिक झाले व १९६५ पर्यंत त्यांनी अनेक नाटकात कामे केली.

ए.के. हंगल यांचा हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश फारच उशिरा झाला. वयाच्या ५२ व्या वर्षी. १९६६ साली. चित्रपट होता बासू भट्टाचार्य दिग्दर्शित ‘तिसरी कसम’ ज्यात त्यांनी राज कपूर यांच्या मोठ्या भावाची भूमिका केली होती. मग आला शागीर्द, हीर रांझा, गुड्डी, बावर्ची, परिचय असे एकानंतर एक नामांकित दिग्दर्शकांसोबत त्यांनी कामे केली. दिग्दर्शक ह्रिषीकेश मुखर्जी यांचे ते फार आवडीचे कलाकार होते. ह्रिषीदांच्या गुड्डी, बावर्ची, अभिमान नंतर ‘नमक हराम’ मधील त्यांची बिपिनलाल पांडे ही व्यक्तिरेखा खूपच प्रभावी झाली होती. त्यानंतर गाजले ते ‘शोले’ चे इमाम साहब उर्फ रहीम चाचा. त्यानंतर १९७७ सालची ‘आईना’ चित्रपटातील राम शास्त्री हि भूमिका. त्यांच्या करिअरमधील ही एक अतिशय महत्वाची ही भूमिका होय. १९७९ चा अमिताभ बच्चन अभिनीत ‘मंझिल’ व त्याच वर्षीचा रामानंद सागर दिग्दर्शित ‘प्रेम बंधन’ मध्ये त्यांची नकारात्मक भूमिका होती. १९८२ सालच्या बासू चॅटर्जींच्या ‘शौकीन’ चित्रपटातील त्यांची तीन पैकी एका ‘इंदर सेन’ ही एका रंगेल म्हाताऱ्याची भूमिका सुद्धा प्रेक्षक व समीक्षकांना आवडली होती.

८० च्या दशका अखेर व ९० च्या दशकात वयोमानाप्रमाणे त्यांनी काम कमी केले होते पण तरीही टेलिव्हिजन मधून ते कार्यरत होते. शेवटच्या दिवसांमध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. विजय हंगल या त्यांच्या मुलाने कॅमेरामन म्हणून बरीच वर्षे काम केले पण ते सुद्धा वयाच्या पंचाहत्तरीला आले होते व त्यांच्या हातात काही काम नव्हते. हंगल साहेबांचे वय नव्वदीच्या आसपास असतांना अनेक गंभीर दुखण्यांनी डोके वर काढले होते. औषधोपचाराला सुद्धा पैसे नव्हते तेंव्हा प्रसार माध्यमांमधून आलेल्या बातम्यांनी आणि अनेक राजकारण्यांनी केलेल्या अपील मुळे अनेक लोकांनी हंगल साहेबांसाठी मदतीचे हात पुढे केले. २००५ सालच्या अमोल पालकरांच्या, शाहरुख खान अभिनीत, ‘पहेली’ या सिनेमात ते शेवटचे दिसले. आजच्या दिवशी २०१२ साली, वयाच्या ९८ व्या वर्षी हंगल साहेबांनी जगाचा निरोप घेतला.

डॉक्टर, प्रोफेसर, मास्टरजी, इन्स्पेक्टर, पंडितजी, प्रिन्सिपल, सेवक अशा मिळेल त्या सर्व भूमिका हंगल साहेबांनी इमानदारीने रंगविल्या. अगदी शोले मधील त्या अंध इमाम साहेबांच्या इमानदारीने जो आपला मुलगा मेल्यावरही मस्जिदीच्या अजान च्या आवाजाने मस्जिद गाठतो आणि अल्लाकडे दुवा करतो कि मला अजून एक मुलगा का नाही दिला शहीद होण्यासाठी म्हणून! त्या इमाम इतकाच पाक होता हंगल साहेबांचा अभिनय.

हॅट्स ऑफ ए.के. हंगल साहेब आपणास.

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment