-अरविंद गं वैद्य

आपके पाँव बहुत हसीन हैं, इन्हें जमीं पर मत उतारिएगा, हा राजकुमारचा ‘पाकीजा’ चित्रपटातील संवाद रसिकांच्या काळजावर कायमचा कोरला गेला आहे. निव्वळ संवादफेकीच्या विशिष्ट शैलीवर प्रेक्षकांना थिएटरात गुंतवून ठेवणारा राजकुमार (Actor Raaj Kumar) हा सोहराब मोदी यांच्यानंतरचा दुसरा अभिनेता होय. राजकुमारला मृत्यूनेही तो निद्रेत असताना गाठले. कदाचित तो जागा असताना यमदूत त्याच्याकडे गेले असते, तर तो त्यांनाही म्हणाला असता, ‘जानी हम तुमसे नही डरते, हम तो कब के तैयार है’. राजकुमारचे नाव निघाले की, त्याची ‘वक्त’मधील राजाची भूमिका आठवते. चिनॉयसेठ बनलेल्या रहेमानसमवेतची त्याची जुगलबंदी आठवते. ‘चिनॉय सेठ, जिनका अपना घर शिशें का हो, वो दुसरों पर पत्थर नहीं फेका करते’ हा संवाद त्याच्या मुखातून निघताच चित्रगृहात टाळ्यांचा कडकडाट होत असे. ‘राजा के गम में किराये के रोनेवालों की जरूरत नहीं’ हा त्याने चिनॉयसेठला दिलेला प्रतिटोलाही अशीच रसिकांची दाद घेऊन जायचा. (Remembering hindi film actor Raaj Kumar) 

आजकाल नटाच्या चेहऱ्याभोवती कॅमेरा कायम रुंजी घालत असतो; परंतु राज कुमार हाच एक नट असा होता की, चोपडांनी ‘वक्त’ मध्ये त्याच्या ‘एन्ट्री’ला चेहऱ्यावर नव्हे, तर पायावर कॅमेरा केंद्रित केला होता. पांढरे बूट आणि तिरपा पडणारा एक पाय पडद्यावर दृश्यमान होताच राजाची स्वारी आल्याचे ओळखून प्रेक्षक टाळ्या वाजवीत असत हे सांगितले तर काहीना हे खरे वाटणार नाही; परंतु ही वस्तुस्थिती होती. त्याच्यासाठी चित्रपटात खास व्यक्तिरेखा तयार केली जायची. ‘वक्त’ हे त्या काळातले बहुधा पहिले ‘मल्टीस्टार’ असलेले चित्र; परंतु जबरदस्त संवादाच्या बळावर बाजी मारून गेला तो राज कुमारच, राज कुमारच्या चित्रपटांचा गांभीर्याने विचार केला तर त्याच्या वाट्याला आलेल्या जोरकस संवादाचे त्याने कसे सोने केले हे लक्षात येते. मात्र, काही वेळा तो फार शब्दबंबाळ होतो की काय अशी शंका यायची, परंतु त्यापूर्वी त्याच्या संवादफेकीच्या अफलातून शैलीने रसिकांवर गारुड केलेले असल्याने त्यांना विचार करायला तेवढा अवधीही मिळत नसे.

अमाप लोकप्रिय

जुन्या पिढीतील दिलीप राज व देव या त्रिकुटानंतर प्रचंड लोकप्रियता मिळविणारा नट म्हणून त्याचेच नाव घ्यावे लागेल. दिलीप कुमारसमवेत ‘पैगाम मध्ये त्याने त्याच्या मोठ्या भावाची भूमिका केली होती. त्यानंतर तब्बल पस्तीस वर्षाच्या खंडानंतर हे दोघेही बलदंड अभिनेते सुभाष घईच्या ‘सौदागर’ मध्ये एकत्र आले आणि त्यांनी बहार उडवून दिली. ‘इमली का बुटा’ हे या दुकलीने गायलेले गाणेही खूपच गाजले. त्याने सर्व तऱ्हेच्या भूमिका केल्या. ‘दिल अपना और प्रीत पराई’ मधला त्याचा डॉक्टर जसा लक्षात राहतो तसाच श्रीधर दिग्दर्शित ‘दिल एक मंदिर मधील राम हा रुग्णही काळजाला हात घालून जातो. या ‘राम’ला आपण आता थोड्याच दिवसाचे सोबती आहोत हे जाणवते तेव्हा ‘माझ्या मृत्यूनंतर तू माझ्या मित्राशी विवाह कर’ हे तो आपल्या पत्नीला सांगतो. तसेच तिला आपल्याला विसरून जाण्याचेही बजावतो. या सगळ्या काळीज कुरतडणाऱ्या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर मग ते गाणे येते. ‘हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे, और तुम कहते हो के ऐसे प्यार को भूल जावो।’ समोर बलदंड असामी असली की त्यालाही स्फुरण चढत असे. ‘मदर इंडिया’मध्ये त्याने नर्गिसच्या पतीची भूमिका वठविली होती, तर ‘पाकीजा’मध्ये त्याचा सामना अशोक कुमारशी होता. अगदी अलीकडे ‘तिरंगा मध्ये नाना पाटेकरच्या सोबतीने त्याने धमाल केली होती. यापूर्वीही ‘मेरे हुजूर मध्ये त्याने त्या काळात नवथर असलेल्या जितेंद्रसमवेत काम केले होते. ‘लखनों में ऐसी कौन सी फिरदोस है जिसे हम नहीं जानते’ हा त्याचा संवाद आजही रसिक विसरलेले नाहीत. एरव्ही शब्द हे बापुडवाणे वाटतात; परंतु ते उच्चारायला ‘जानी’ असला की त्यांना अंगाराचे स्वरूप येते. त्या शब्दातील आशयाबरहुकूम संवादफेक करण्यात राजकुमारचा हात कोणीही धरू शकणार नाही. त्याला ईश्वरकृपेने आवाजही चांगला लाभला होता. ‘सौदागर’ मध्ये त्याच्या या संवादफेकीच्या तुफानाला तोंड देताना दिलीप कुमारने चक्क ‘अंडरप्ले’ ची कास धरली होती, तर ‘काजल’मध्ये धर्मेन्द्रचा त्याने पार कचरा केला होता.

तऱ्हेवाईक

राज कुमार हा या मायावी दुनियेत अक्षरश: बादशहासारखा जगला. प्रारंभीच्या काळातील कटू अनुभवामुळे की काय त्याने इतरांकडे अतिशय तुच्छतेने पाहिले. या कचकड्याच्या दुनियेत उगवत्याला सलाम करण्याची रीत असली तरी ‘आयाळ’ झडल्यावरही या सिंहाचा रुबाब कमी झालेला नव्हता. प्रत्यक्ष जीवनात कुलभूषण नाथ पंडित या नावाने ओळखला जाणारा राज कुमार कधी काळी माहीम पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षकही होता. त्या काळात गरम डोक्याच्या या वल्लीच्या हातून एकाची हत्या घडली अन् त्या प्रकरणाने होरपळलेल्या राज कुमारला पोलिस खाते सोडावे लागले. त्याने पोलिस खाते सोडले तरी पब्लिकने त्याला नेहमीच डोक्यावर घेतले. अखेरच्या काळातील त्याच्या भूमिका एकारलेल्या असल्या तरी त्याच्या प्रेमापोटी रसिकांनी मरते दम तक, पोलिस पब्लिक हे शिनुमेही पाहिले. ‘दो गुंडे’ सारख्या चित्रपटात तो नायकही होता, तर ‘उजाला’तील त्याने रंगवलेला ‘दादा’ असाच लक्षात राहणारा. त्याच चित्रपटातील अड्डयावरील त्याच्या प्रवेशाच्या वेळचे कुमकुमचे ‘तू आया था मैफिल में उजाला हो गया’ हे गाणे आठवतेय. त्याच्या विविध भूमिकांनी मनात गर्दी केली आहे. संवादाच्या फैरी कानावर पडत आहेत; पण एक जाणीव सातत्याने होते आहे की, आता जानी राहिला नाही. ताठ मानेने जगलेल्या या कलावंताची याद कायम राहील. चित्रपटाच्या सुवर्ण युगातील एक साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

हेही वाचा – अगर मुझसे मोहब्बत है… मदन मोहन

 

Arvind G Vaidya
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.