-अशोक उजळंबकर

अनिल विश्‍वास यांच्या पाठोपाठ येथे दाखल झाले ते नौशाद. लखनौ या शहराने चित्रपटसृष्टीला अनेक मौल्यवान हिरे दिले, त्या पैकी एक म्हणजे नौशाद (Naushad). लखनौ शहराला संगिताची पार्श्‍वभूमी आहे व संगितावर नौशाद साहेबांचं लहानपणापासूनच प्रेम होतं. त्यांच्या कुटुंबात धार्मिक वातावरण होतं. लखनौ येथील एक वाद्याच्या दुकानात काम करता करता ते पेटी वाजवायला शिकले. त्या दुकानाच्या मालकाने ती पेटी त्यांना भेट म्हणून देऊन टाकली. ज्या दुकानात झाडलोट करण्याचे काम ते करीत असत तेथील सतारवादक युसूफ खान यांनी त्यांना शास्त्रीय संगीत शिकवलं. ज्या गोष्टींची लहानपणापासून आवड होती त्या सर्व सहजासहजी करता आल्या. (Remembering the Legendary Naushad)

      लहान सहान ऑर्केस्ट्रांमधून काम करीत पैसे कमवायला त्यांनी सुरुवात केली. त्या काळी प्रसिद्ध असलेल्या संगीतकारांचे सहाय्यक म्हणून त्यांनी आपल्या गुणवत्तेवर प्रवेश मिळवला. झंडेखान या संगीत दिग्दर्शकाचे सहाय्यक म्हणून ते काही काळ चमकले. त्यानंतर रणजीत स्टुडिओत वादक म्हणून 75 रुपये पगारावर काम सुरू केले. ‘रणजीत’मध्ये प्रसिद्ध गीतकार दीनानाथ मधोक यांची ओळख झाली व त्यांना ‘कंचन’ या चित्रपटाला संगीत देण्याची संधी मिळाली. परंतु या क्षेत्रातले डावपेच अजून पचनी न पडल्यामुळे त्यांना ही संधी गमवावी लागली. ‘रणजीत’मधून त्यांनी आपला पाय काढून घेतला तेव्हा भवनानी प्रॉडक्शनच्या ‘प्रेमनगर’करिता संगीत देण्याची संधी मिळाली. गीतकार मधोक व नौशाद यांची मैत्री चांगली जमल्याने ‘प्रेमनगर’ची गाणी बरी गाजली. पुढे विजय भट्ट यांच्या प्रकाश पिक्चर्सचे बरेच चित्रपट नौशाद साहेबांना मिळाले. याच प्रकाश पिक्चर्सचा ‘स्टेशन मास्तर’ हा चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरला. जी एम. दुराणीचा गायक म्हणून तो पहिला चित्रपट होता.

      प्रकाश पिक्चर्सकडे बऱ्यापैकी भट्टी जमलेली असताना कारदार यांच्या निमंत्रणावरून त्यांनी त्यांचे चित्रपट स्वीकारले. इतकेच नव्हे तर त्यातील गाणी लोकप्रिय करून दाखवली. सुरैयाचा आवाज ‘शारदा’ मध्ये मेहताब या नायिकेकरिता वापरून त्यांनी ‘पंछी जा, पिछे रहा है बचपन मेरा’ हे गाणं लोकप्रिय करून दाखवलं. वयाच्या 13व्या वर्षी सुरैयाचा आवाज मेहताबसारख्या टॉपवरच्या नायिकेकरिता फिट बसला होता. 1944 साली प्रदर्शित झालेल्या ‘रतन’ या चित्रपटाने नौशाद साहेबांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं. अमीरबाई कर्नाटकीच्या आवाजातील ‘मिल के बिछड गयी, अँखियाँ हाये रामा’, ‘आयी दिवाली आयी’ सारखी गाणी जनतेच्या ओठावर खेळू लागली. करण दिवाणच्या आवाजातील ‘जब तुम ही चले परदेस लगाकर ठेस’ या गाण्याने तर प्रचंड लोकप्रियता मिळवली. ‘रतन’ पाठोपाठ ‘अनमोल घडी’ आला. नूरजहाँचा आवाज खरा बहरला तो ‘अनमोल घडी’मध्येच. ‘अनमोल घडी’मधील ‘आवाज दे कहाँ है, दुनिया मेरी जवाँ है’ हे गाणं तर आजही लोकप्रिय आहे. नूरजहाँ प्रमाणेच नामवंत गायक कुंदनलाल सहगल व नौशाद हे एकाच चित्रपटात एकत्र आले. सहगल यांच्याकडून नौशाद साहेबांनी उत्कृष्ट गाऊन घेतलं. ‘जब दिल ही टूट गया, हम जीके क्या करेंगे’, ‘गम दिये मुस्तकिल कितना नाजूक है दिल’, ‘ऐ दिले बेकरार झूम’ ही गाणी सहगल यांनीच गायिली होती.

      नौशाद यांना संगीतकार म्हणून येथे संधी मिळवून देण्यात डी.एन. मधोक यांचा महत्त्वाचा सहभाग होता. गीतकार मधोक यांच्यानंतर गीतकार मजरूह सुलतानपुरी नौशाद यांच्याकडे गीतलेखन करू लागले. पुढे यांचं नातं निर्माण झालं. शकील बदायूनी नौशाद यांच्याकडे आले ते साधारण 1947 सालच्या सुमारास. उमादेवीच्या ‘दर्द’ मधील सर्वच गाणी शकील साहेबांची होती. ‘दर्द’ सामान्य रसिकांच्या लक्षात राहिला तो उमादेवीच्या आवाजातील ‘अफसाना लिख रही हूँ, दिल बेकरार का’ या गाण्यामुळे. युवामनांच्या भावनांना स्पर्श करून जाणारं हे गाणं होतं. ‘दर्द’ नंतर ‘मेला’ची गाणी खूप गाजली. शमशाद, मुकेश, रफी यांच्या आवाजात ‘मेला’ मध्ये 11 गाणी होती. ‘ये जिंदगी के मेले, दुनिया मे कम न होंगे’ या रफीच्या गाण्याने कमालीची लोकप्रियता मिळवली. ‘मेला’ या चित्रपटाचे कथानक नौशाद यांनी लिहिलं होतं. कथालेखक व गीतकार हा त्यांचा छंद होता, परंतु माझं खरं प्रेम केवळ संगीतावर आहे, यामुळं मी संगीतकार म्हणूनच येथे राहणार असे ते म्हणत. राज कपूरच्या ‘बरसात’ या चित्रपटाने एक इतिहासच घडविला तर ‘राज – दिलीप – नर्गिस’ यांच्या ‘अंदाज’ या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत त्रिकोणाचे एक वेगळे पर्व सुरू केले. दिलीप कुमारकरिता मुकेशचा आवाज तर रफीचा आवाज राज कपूरकरिता हा प्रयोग नौशाद यांनी यशस्वी करून दाखवला. ‘अंदाज’नंतर ‘दिल्लगी’, ‘दुलारी’, ‘बाबूल’ या चित्रपटातील गाणी यशस्वी ठरली होती. ‘बाबूल’ चित्रपटाचे कथानक नौशाद यांनीच सुचविले होते. नर्गिस, दिलीप, मुनव्वर सुल्ताना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘बाबुल’मध्ये उमादेवी उर्फ टुनटुनने प्रथमच विनोदी भूमिका सादर केली होती. लता, तलत, शमशाद व रफी यांच्या आवाजातील गाणी यात होती, परंतु सर्वात लक्षात राहिले ते शमशाद, तलत यांच्या आवाजातील ‘मिलते ही आँखे दिल हुवा दिवाना किसीका’ हे गाणं. ‘बाबुल’ चित्रपटाचा विषय थोडासा गंभीर होता, परंतु हा चित्रपट त्यावेळी चालला तो गाण्यांमुळे.

      नौशाद यांची चढती कमान चालू होती. एखाद दुसरा अपवाद वगळता सर्वत्र त्यांना यशच मिळत होतं. अशोककुमार, नर्गिस, दिलीप, निम्मी अशी बडी मंडळी असलेल्या ‘दीदार’ ला त्यांचच संगीत होतं. शमशाद व लता यांच्या आवाजातील ‘बचपन के दिन भुला न देना, आज हसे कल रूला न देना’ व रफीच्या आवाजातील तिन्ही गझला अगदी सुरेख जमल्या होत्या. ‘दीदार’नंतर लक्षात राहिला तो ‘दिवाना’मधील रफीचा ‘तस्वीर बनाता हूँ तेरी खुने जिगर से’ हा स्वर. मेहबूब खान यांचा ‘आन’ हा पहिलाच टेक्निकलर चित्रपट. ‘आग लगी तन मन मे, दिल को पडा थामना, राम जाने कब होगा सैंयाजी का सामना’ हे शमशादच्या आवाजातील गाणं तर रफीच्या आवाजातील ‘दिल में छुपाके प्यार का तुफान ले चले’, ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

      नौशाद साहेबांनी आपली कारकीर्द ज्या प्रकाश पिक्चर्सकडे सुरू केली होती ती कंपनी नंतर बंद पडावयास आली होती. त्यांच्या उतरत्या काळात ‘बैजु बावरा’ सारखा सुपरहिट म्युझिकल चित्रपट देऊन नौशादसाहेबांनी त्यांना सावरलं. भैरवी, मालकंस, दरबारी व इतर अनेक रागांचा सुरेख उपयोग त्यांनी ‘बैजु बावरा’च्या गाण्यांत केला. ‘बैजु बावरा’च्या संगिताने प्रकाश पिक्चर्सच्या डुबती नैय्याला सहारा मिळाला. ‘आन’ नंतर मेहबूब प्रॉडक्शनचा ‘अमर’ हा ‘माला’ या जुन्याच चित्रपटाची आवृत्ती होती. ‘अमर’मध्ये आशा भोसलेच्या आवाजाचा उपयोग नौशाद यांनी केला. ‘जानेवालेसे मुलाकात न होने पायी, न मिलता गम तो बरबादी के अफसाने कहाँ जाते, न शिकवा है न कोई गिला है, तेरे सदके बलम’ यासारखी गाणी लताने ‘अमर’ मध्ये गाऊन अमर करून ठेवली आहेत.

      ‘आझाद’ स्टाईलवर दिलीपकुमार, निम्मी यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘उडन खटोला’ ही फॅन्टसी गाजली. ‘मोरे सैंयाजी उतरेंगे पार, हमारे दिल से न जाना, मुहब्बत की राहों मे चलना सँभालके, न तुफाँ से खेलो’, ही रफी, लता यांच्या आवाजातील गाणी गाजली. सामान्य रसिकाला देखील वेडावून सोडतील अशी गाणी देणं हा नौशाद यांचा हातखंडा होता. ‘औरत’ या जुन्या चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘मदर इंडिया’ चित्रपटाला नौशाद यांचंचं संगीत होतं. ‘मदर इंडिया’ मधील शमशादच्या आवाजाने सुरू होणारे होळीचं गाणं ‘होली आयी रे कन्हाई’, जोशपूर्ण होतं. हिंदी चित्रपट गीतात लोकगीतांचा सुरेख वापर त्यांनी केल्याचे दिसून येते.

‘अनारकली’चा रिमेक म्हणता येत नसला तरी ‘मुगले आजम’ तेच कथानक घेऊन आला होता. ‘मुगले आजम’ म्हणजे नौशाद यांच्या शिरपेचातील मानाचा तुरा म्हणावा लागेल. ‘बैजु बावरा’ व ‘मुगले आजम’मध्ये घडलेल्या घटना अकबराच्याच दरबारातील होत्या. ‘आज कहेंगे दिल का फसाना, जान भी ले ले चाहे जमाना’ म्हणत अंगार ओकणारी अनारकली मधुबाला दृष्टीआड करणे शक्यच नाही. कित्येक दिवस शकील बदायुनी व नौशाद यांनी ‘मुगले आजम’च्या संगीताबाबत प्राथमिक चर्चा केली होती. तेव्हाच इतके दर्जदार, कर्णमधुर संगीत असलेला चित्रपट तयार होऊ शकला.

‘मुगले आजम’ नंतर ‘गंगा-जमुना’ व ‘मेरे महबूब’ची गाणी गाजली. ‘गंगा जमुना’ हा चित्रपट भोजपुरी छाप असलेला होता. ‘मेरे महबूब’च्या गाण्यांनी साऱ्या तरुणाईला वेडावून टाकलं. रफीच्या आवाजातील ‘ए हुस्न जरा जाग तुझे इष्क जगाए’ हे ही गाणं हेोते. ‘आज है प्यार का फैसला ऐ सनम, आज मेरा मुकद्दर बदल जाएगा’, हा लताचा आवाज ऐकायला मिळाला तो ‘लीडर’मध्ये. ‘दिल दिया दर्द लिया’ व ‘लीडर’ हे दोन्ही चित्रपट उत्कृष्ट गाणी असूनदेखील म्हणावे तसा धंदा करू शकले नव्हते. शकीलची गजल ‘फिर तेरी कहानी याद आयी, फिर तेरा फसाना याद आया’ ऐकू आली ती लताच्या आवाजात ‘दिल दिया दर्द लिया’मध्येच. दिलीपच्या जवळपास सर्वच चित्रपटांना नौशाद साहेबांनीच संगीत दिलं होतं. ‘कोहिनूर’मध्ये एकापेक्षा एक सरस गाणी दिली होती. रफीच्या आवाजातील ‘मधुबन मे राधिका नाचे’ हे रागदारीवर आधारित गाणं सुपरहिट ठरलं होते. ‘कोई सागर दिल को बहलाता नही’, हे गाणं रफीने ‘दिल दिया दर्द लिया’ करिता सर्वस्व ओतून म्हटलं होतं. नौशाद यांनी संगीत दिलेल्या व राजेंद्रकुमारची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मेरे महबूब’ला जे यश मिळाले ते ‘पालकी’ व ‘साथी’ या चित्रपटांना मिळालं नाही.

      खरं तर ‘अंदाज’ नंतर मुकेश ‘साथी’ मध्येच नौशाद यांच्याकडे गायला होता. तसं ‘अंदाज’नंतर गीतकार म्हणून मजरूह सुलतानपुरी नौशादबरोबर ‘साथी’मध्येच दिसले, परंतु 1970 नंतर येथे पाश्‍चिमात्य संगिताची लाट आली होती व त्यामुळे भारतीय संगीत वापरणाऱ्या नौशाद मियाँना कोणी विचारायला तयार नव्हते. ‘साथी’, ‘अंदाज’ची बरोबरी करू शकला नव्हता. ‘राम और शाम’, ‘संघर्ष’, ‘आदमी’, या तिन्हीत दिलीपकुमार होता यापैकी ‘राम और शाम’ वगळता ‘संघर्ष’ व ‘आदमी’ला व्यावसायिक यश मिळू शकलं नव्हतं. ‘आदमी’नंतर नौशादसाहेबांनी बोटावर मोजता येतील इतक्याच चित्रपटांना संगीत दिलं.

      आपल्या संपूर्ण कारकीर्दीत नौशाद यांनी भारतीय संगितावर निष्ठा ठेवूनच काम केलं. भारतीय संगिताच्या चौकटीत राहून सामान्य रसिकांना आवडतील अशीच गाणी त्यांनी दिली, परंतु सर्वांना हवा होता तो बदल करण्याची त्यांची इच्छा नव्हती व ते मागे पडले. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व लोकसंगीत हे नौशादच्या यशस्वी संगीताचं वैशिष्ट्य होतं. हेच वैशिष्ट्य बदलत्या काळात त्यांच्या संगीताचा अवगुण ठरलं. बदलत्या काळाबरोबर ते बदलू शकले नाहीत.

      हिंदी चित्रपट संगीतात रफीच्या आवाजाचा नौशाद यांनी सुरेख उपयोग करून घेतला व कित्येक वेळा लताऐवजी सुमन कल्याणपूरच्या आवाजाचा उपयोग करून घेतला. शकील बदायुनी यांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली. नौशाद साहेबांच्या आठवणी येतात तेव्हा ओठावर अलगद येतात, “मोहे भूल गये सावरियाँ’चे स्वर.

      हिंदी चित्रपटसृष्टीतील या दिग्गज संगीतकाराचा 5 मे 2006 रोजी मृत्यू झाला. त्यांनी संगीत  दिलेला शेवटचा चित्रपट होता अकबरखानचा ‘ताजमहल’.

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.