-जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘अपनी अद्वितीय सांगीतिक प्रतिभाके कारण राहुल देव बर्मनको (Music Composer R.D. Burman) विश्वके सर्वश्रेष्ठ संगीतकारोंमें एक माना जाता है l आर.डी. हिंदुस्थानी संगीतके साथ पाश्चात्य संगीतका भी मिश्रण करते थे  जिससे भारतीय संगीतको एक अलग पहचान मिली l इसलीए आजके युगके युवा भी उनके संगीतको पसंद करते है l’  ‘पिया तू अब तो आजा’,‘मेरा नाम है शबनम’,‘मेरी जा मैंने कहा’ सारख्या गीतातून गार्गलनाईजच्या जोडीला ज्यांनी श्वास कंपनाचे प्रयोग केले आणि भल्या भल्यांचे श्वास रोखले ते १९६५-७० च्या काळातले आर.डी.बर्मन म्हणजेच पंचम हे संगीत क्षेत्रातील ‘ट्रेंडसेंटर’ म्हणजेच मैलाचा दगड ठरले.(Remembering the Evergreen Music Composer R.D. Burman)

     संगीतकार राहुल देव बर्मन यांचा जन्म २७ जून १९३९ ला कलकत्ता येथे झाला. ते बंगाल व हिंदी चित्रपटसृष्टीतील महान संगीतकार सचिनदेव बर्मन व बंगाली गायिका मीरादेवी बर्मन यांचे सुपुत्र. वडील दादा बर्मन यांच्याबरोबर १९५६-५७ पासून सहाय्यक असलेल्या पंचमना आपोआप संयोजनाचं बाळकडू मिळालं.त्यांचे शिक्षण बालीगंज गव्हर्न्मेंट हायस्कूलमध्ये झाले. मैट्रिक झाल्यावर राहुलना तबला व सरोद शिकण्याची संधी मिळाली. राहुलनी ब्रजेन विश्वास आणि तबलानवाज पं. सामताप्रसाद यांचेकडे तबला व अलीअकबर खां यांच्याकडे सरोदचे धडे घेतले. त्यांना माऊथऑर्गन वाजवण्याचाही शौक होता.

     नवजात राहुल पाच वेगवेगळ्या तऱ्हेने ‘पा’ म्हणाले म्हणून अशोककुमारनी त्यांचं नाव ‘पंचम’ ठेवले. बहुधा पंचम यांच्या रोमारोमांत संगीत होतं नि त्यामुळेच वयाच्या १७ व्या वर्षी ‘फंटूश’ चित्रपटासाठी त्यांनी गाणे बनवले. पंचम वडिलांच्या ऑर्केस्ट्रात हार्मोनियम वाजवायचे. ‘चलती का नाम गाडी, तेरे घर के सामने, बंदिनी, गाईड, तीन देवीयां’ या सर्व चित्रपटांत ते सचिनदांचे सहाय्यक होते.

    ‘पेइंग गेस्ट’ मधील ‘माना जनाब ने पुकारा नहीं’ या गाजलेल्या गाण्याची चाल पंचम यांनी दिली होती. त्याचप्रमाणे ‘सोलवां साल’ चित्रपटातील ‘है अपना दिल तो आवारा’ या गाण्यासाठी ‘माऊथ ऑर्गन’ पंचमनीच वाजवलं होतं. तसंच ‘प्यासा’ सारख्या चित्रपटातलं ‘सर जो तेरा चकराये’ हे गीत प्रत्यक्षात पंचमनीच रचलं होतं. ‘दोस्ती’ चित्रपटातील गाण्यांमध्ये सुद्धा ‘माऊथ ऑर्गन’ पंचमनीच लक्ष्मी-प्यारेंच्या खास दोस्तीसाठी वाजवले होते. या गोष्टी मेहमूद यांना माहित होत्या, म्हणून तर मेहमूद यांनी ‘भूत बंगला’ हा चित्रपट त्यांना संगीत दिग्दर्शनासाठी दिला.  ‘छोटे नबाब’ या चित्रपटातील ‘घर आजा घीर आये’ या अप्रतिम शास्त्रीय गाण्याचा दर्जाच सांगून गेला की, हा ‘छोटे नबाब’ संगीताच्या क्षेत्रात लवकरच भल्या-भल्यांना पाणी पाजणार!

पुढे १९६६ सालच्या ‘तिसरी मंझील’ पासून त्यांनी हिंदी संगीताचा पैटर्न बदलून टाकला. ‘ओ हसीना जुल्फोंवाली, आजा आजा मैं हूं प्यार तेरा, ओ मेरे सोना रे, देखिये साहेबो, तुमने मुझे देखा, दिवाना मुझसा नहीं’ या सर्व गाण्यांनी एकच कहर केला आणि आर.डी. बर्मन एका रात्रीत तरुणांचे संगीतकार बनले. या चित्रपटापासून राहुल देव बर्मन यांचा जमाना सुरु झाला होता.

     ‘बहारों के सपने’ चित्रपटातील ‘आजा पिया तोहे प्यार दूं ,चुनरी संभाल गोरी, क्या जानू सजन ’ ही गाणी लोकप्रिय ठरली. ‘क्या जानू सजन’ या गाण्यात एकोजचा सुंदर वापर केला होता. तसेच चुनरी संभाल या गाण्यात श्वासाचा कस लागणारे अssहा तसेच याडीलिंगमुळे पंचम हे नासीर हुसेन यांचे हुकमी संगीतकार बनले. उदा: ‘कारवां, प्यार का मौसम, यादों की बारात, हम किसीसे कम नही’.

     ‘पडोसन’ ची गाणी बांधताना, शास्त्रीय संगीताचा बाज असणाऱ्या  ‘सांवरिया आओ , एक चतुर नार बडी होशियार, शर्म आती है मगर’ आणि ‘भाई बत्तूर’ या गाण्यात पंचमनी संतूर आणि व्हायोलीनचा सुंदर वापर केला. ‘कहना है, मेरी प्यारी बिंदू’ आणि ‘मेरे सामनेवाली खिडकीमें ’ही गाणी उस्फुर्त होती. ‘मेहबूबा’ मध्ये तर पंचमनी ‘गोरी तोरी पैजनिया, जमुना किनारे आजा, मेरे नैना सावन भादो’ अशा शास्त्रीय संगीताची खैरात केली. ‘कुदरत’ मधील  ‘हमें तुमसे प्यार कितना’ हे गीत प्रख्यात शास्त्रीय गायिका परवीन सुलतान यांच्याकडून गाऊन घेतलंय.

     शक्ती सामंत यांचे चित्रपट पंचममुळे खूप गाजले. ‘कुछ तो लोग कहेंगे’ आणि  ‘चिंगारी कोई भडके’ ही अमर प्रेम मधील गीते गाजली. कटी पतंग मधील ‘ये जो मुहब्बत है, ये शाम मस्तानी, प्यार दिवाना होता है , आज ना छोडेंगे, जिस गली में तेरा घर, ना कोई उमंग है तसेच मेरा नाम है शबनम हे कॅब्रे गीत फारच गाजले. तिथून पुढे आर.डी. यांच्या संगीतातून कॅब्रे अधिक आले. पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा मिलाप करून आर.डी. नी स्वत:ची जी शैली विकसित केली ती अत्यंत ‘ फैंटास्टिक’ होती. बोंगो, कोंगो आणी ड्रमसेटच्या जोडीला गिटार आणि चकचक वाजणारे मोरैकल्स अशा वाद्यमेळाला सिंथेसायझरच्या चित्रविचित्र आवाजाची साथ देऊन आर.डी.नी आपला खास ह्रिदम निर्माण केला. कारवां चित्रपटातील ‘पिया तू अब तो आजा’ आणि अपना देश मधील ‘दुनियामें लोगोंको धोखा’ हा कॅब्रेही गाजला. त्यात मोनिका ओ माय डार्लिंग हा पंचमचा आवाज विलक्षण होता.

     पाश्चात्य संगीताचा पुरेपूर उपयोग करणाऱ्या पंचमना गुलजारांच्या काव्याची साथ मिळताच त्यांच्या पोतडीतून भारतीय संगीताच्या चिजा बाहेर पडल्या. उदा:‘परिचय’. गुलजारांच्या काव्यांना सुरांची महिरप चढविणारे पंचम अगदी वेगळे होते. चिरकाल सुगंध दरवळत राहील अशी गाणी आर.डी.नी दिली ती गुलजार यांच्या साथीनेच. ‘खुशबू, घर, किनारा, आंधी, लिबास, इजाजत, नमकीन’ वगैरे चित्रपटांतील गाणी या गोष्टीची साक्ष देतील.

      ‘आंधी’ चित्रपटातील ‘तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नहीं, इस मोडसे जाते है, तुम आ गये हो नूर आ गया है’  ही द्वंद्वगीते, मासूम मधील ‘तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूं मै’ सारखे धीरगंभीर गाणे, घर मधील ‘आपकी आंखोंमें कुछ महके हुए से ख्वाब है’ सारखे रोमैंटीक प्रणयगीत, इजाजत मधील ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’ यासारखे व्याकूळगीत किंवा मासूम, किताब या चित्रपटातील बालगीते, यातल्या  प्रत्येक गाण्यांचे व्यक्तिमत्व वेगळे जाणवते. अमर प्रेम मधील  ‘रैना बीती जाए’ हे क्लासिक गाणं पंचम यांच्या कारकिर्दीतला मानाचा तुरा म्हंटला जातो.

    ‘शोले’ या सिनेमाच्या श्रेयनामावलीपासूनच पंचमचं पार्श्वसंगीताचं वेगळेपण दिसून येतं. खडकाळ लोकेशन, प्रत्येक प्रसंगाचा मूड ओळखून पंचमनी  विचारपूर्वक पार्श्वसंगीत दिलं आहे. फ्रेंच हॉर्न, तबलातरंग आणि तार शहनाई यांच्या वाद्यमेळातून आर.डी.नी दिलखेचक परिणाम साधलाय. पात्रांच महत्व रसिकांच्या मनावर ठसतं ते या आगळ्यावेगळ्या पार्श्वसंगीतामुळे. पंचम यांचं ‘आरडी’एक्स शोलेतून वेगळं करणं शक्य नाही ते कालातीत आहे.

    लतादीदींच्या ढंगाच्या विरुद्ध जाऊन त्यांना उडती गाणी द्यायची आणि आशा बाईंकडून भजनं गाऊन घ्यायची असा प्रायोगिक नि यशस्वी उपदव्याप पंचमच करू जाणे. ‘बंगले के पीछे’ हे आयटम सॉंग लतादीदींना गायला लावले तर आशाताईंना ‘जब तक रहे तनमें जिया’ हे सोज्वळ भावूक प्रेमगीत गायला लावून वेगळा प्रयोग ‘समाधी’ चित्रपटात केला. ‘हरे राम हरे कृष्ण’ मध्ये ‘दम मारो दम’ पॉप शैलीत तर ‘राम का नाम बदनाम ना करो’ हे भजनही पाश्चिमात्य शैलीत सादर केले. तालाशी खेळणारा ह्रिदमकिंग ही पदवी पंचमना गुलजारांच्या ‘दिल पडोसी है’ या अल्बममुळेच रसिकांनी त्यांना दिली.

     त्यांचं संगीत नुसतं गोड गोड मधाळ नव्हतं, तर ते पॉवरफुल व फोर्सफुल असायचं. हा पाचवा सूर लोकांच्या काळजातून जाता जाऊ शकणार नाही. त्यांचे संगीत मात्र तरुण, उस्फूर्त, सतेज, जोशपूर्ण राहिले आहे. हीच त्यांच्या कर्तृत्वाची सर्वांत मोठी ‘मिळकत’ आहे. त्यांच्या कित्येक ‘चीजा’ कायमस्वरूपी तरुणच राहिल्या म्हणूनच  त्यांना ‘ संगीतका क्रांतीकारी शहनशहा’ म्हणत.

     ५ जानेवारी १९९४ ची सकाळ उजाडली आणि आर.डी.बर्मन या ‘युवा’ संगीतकाराच्या दु:खद निधनाची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. आर.डी.नी ‘१९४२ लव्ह स्टोरी’ या त्यांच्या शेवटच्या  चित्रपटाला संगीत देऊन आपण अजून संपलेलो नाही, जातिवंत कलावंत कधीच संपत नसतो याचा प्रत्यय दिला होता. सलील चौधरी सारख्या महान संगीतकाराने आर.डी.ना ‘ऑल टाईम ही इज अनप्रेडीक्टेबल’ असे सर्टिफिकेट दिले होते. म्हणूनच रसिकांनी त्यांना ‘क्राऊन इन द ज्युवेल’ अशी पदवी स्वखुशीने बहाल केली आहे.

हेही वाचा – आर.डी. बर्मन-तो एक राजपुत्र – पंचम

          

    

jayashree jaishankar danve
Jayashree Jaishankar Danve
+ posts

जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

   (एम.ए. संगीत विशारद) (ज्येष्ठ लेखिका)

*  ताराराणी विद्यापीठात उषाराजे हायस्कूलमध्ये २३ वर्षे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत.

*  निवृत्तीनंतर चरित्रग्रंथ,व्यक्तिचित्रण,कथा संग्रह,ललित लेख अशा विविध विषयांवर आजवर

   ३१ पुस्तके प्रकाशित 

*  ‘कलायात्री’ चरित्रग्रंथाला आजवर १० मान्यवर संस्थांचे पुरस्कार.

*  वैयक्तिक ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ व इतर अनेक पुस्तकांच्या पुरस्काराने पुरस्कृत.

*  नियतकालिके व मासिकातून असंख्य लेख प्रसिद्ध.

*  अनंत माने दिग्दर्शित ‘पाच रंगांची पाच पाखरे’ व ‘पाहुणी’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन.

*  ‘ड्रीम मेकर्स’ व ‘म्युझिकल नाईट’ ऑर्केस्ट्रात गायिका म्हणून सहभाग.

*  शेगांवच्या गजानन महाराजांच्या जीवनावरील भक्तीगीतांचे १०० हून अधिक कार्यक्रम.

*  समूहगीत,नाटक,नृत्य,बालनाट्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिग्दर्शन.

*  गेली ३५ वर्षे ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे’ यांच्या स्मृतीचे जतन तसेच कलायात्री पुरस्काराचे  

   संयोजक म्हणून सहभाग.

Leave a comment