-अजिंक्य उजळंबकर
१९८० हे साल. सभोवताली बघितले तर सर्वत्र ऍक्शन फिल्म्सचे आलेलं प्रचंड मोठं पीक. स्वतःच्या खात्यात सुद्धा दिग्दर्शक म्हणून असलेले पहिले दोन्ही प्रदर्शित चित्रपटही ऍक्शनच.. तेही एकाच अभिनेत्याला घेऊन. ‘म्हणजे हा दिग्दर्शक म्हणून जरी चांगला असला तरी केवळ ऍक्शन फिल्मच बनवू शकतो व याला संगीताचे काही ज्ञान नाही’ असा जवळपास शिक्का बसलेला. मग या दिग्दर्शकाने स्वतःवर बसू पाहणारा हा शिक्का पुसण्याचे चॅलेंज स्वतःच स्वीकारले. शो-मॅन हे विशेषण लागलेले नव्हते म्हणून या दिग्दर्शकास तेंव्हा केवळ सुभाष घई या नावाने ओळखले जाई. ‘कालिचरण’ व ‘विश्वनाथ’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले होते पण त्यांच्या संगीताची बाजू कच्ची होती. ‘गौतम गोविंदा’ नामक तिसरा चित्रपट सुभाषजींनी हातात घेतला होता व तोही ऍक्शनच होता व पुन्हा शत्रुघ्न सिन्हा सोबतच. मित्र परिवार व मीडिया सुभाष घई यांच्या म्युझिक सेन्सविषयी प्रश्न उपस्थित करत होते. सुभाषजी या प्रश्नांची उत्तरे शोधत होते. त्याचा परिणाम असा झाला कि गौतम गोविंदा तर मार्च १९७९ मध्ये प्रदर्शित झाला पण त्याआधीच ऑक्टोबर १९७८ मध्ये मुक्ता फिल्म्स बॅनरच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा झाली. ज्याचे नाव ठरले ‘कर्ज'(41 Years Of Director Subhash Ghai’s Evergreen Musical Hindi Film ‘Karz’ released in 1980) कर्ज सिनेमाच्या प्रदर्शनाला आज ४१ वर्षे पूर्ण झाली आहेत.
कर्ज हे खऱ्या अर्थाने एका नव्या दमाच्या दिग्दर्शकाने स्वीकारलेलं चॅलेंजच होतं. तो काळ होता जेंव्हा अमिताभ बच्चन नावाच्या वादळाने हिंदी सिनेमाचा पडदा ऍक्शनपटांच्या रूपाने व्यापलेला होता. अशा काळात म्युझिकल चित्रपटाचा विचार सुभाषजी करत होते. नायक म्हणून फायनल केलं होतं ऋषी कपूर यांना. अभिनेता म्हणून मोठे नाव असणे वेगळे पण ऋषी कपूर यांचे यापूर्वी यशस्वी झालेले सिनेमे हे बहुतांश मल्टीस्टारर होते. पण कर्जच्या कथेची मागणी केवळ सिंगल हिरोची होती. इतर कलाकारांमध्ये सिमी गरेवाल व राज किरण या नावांना काहीच वजन नव्हते. टीना मुनीम हि अभिनेत्री नायिका म्हणून घेतली जिचा कर्ज हा तसा पाहता पहिलाच मोठा चित्रपट म्हणावा कारण देस परदेस व बातों बातों में द्वारे हिची काहीच ओळख निर्माण झाली नव्हती. बरं कर्जच्या कथेत या नायिकेला अगदीच नगण्य काम. सिमी यांची भूमिका मोठी होती पण मार्केट व्हॅल्यू शून्य. कर्जच्या कथेचा केंद्र बिंदू होता पुनर्जन्म. ही पण एक रिस्क व त्यात भर म्हणजे नायक हा पुनर्जन्म एका वेगळ्या चेहऱ्यामध्ये घेतो. भारतीय सिनेमात पुनर्जन्म हा त्याच रूपात झाला पाहिजे असा एक अलिखित व व्यवसायपूरक नियम आहे. ज्याला सुभाषजींनी फाटा दिला. सुभाषजींना ही रिस्क मोठी महागात पडली जी त्यांनी बऱ्याचदा कबूलही केली. परंतु घई साहेबांच्या डोक्यात १९७५ साली आलेला हॉलीवूडचा ‘दि रिइन्कारनेशन ऑफ पीटर प्राऊड’ बसलेला होता. ज्यात कथेचा नायक पुनर्जन्म एका वेगळ्या शरीरात व वेगळ्या चेहऱ्याने घेतो. पण सुभाषजींना हे सर्व भारतीय प्रेक्षकांना दाखवायचे होते. नुसते दाखवायचे नव्हते तर त्यांना ते पटेल व करमणूक पण होईल या मार्गाने.
रवी वर्माचे (राज किरण) प्रेम असते कामिनीवर (सिमी गरेवाल) जी सर जुडाह (प्रेमनाथ) साठी काम करत असते. सर जुडा रवीच्या स्वर्गवासी वडिलांचा पार्टनर ज्याचा डोळा रवीच्या उटी येथील अमाप संपत्तीवर आहे. सर जुडा रवी विरुद्ध प्रॉपर्टीची केस हरला आहे. मग सर जुडाहच्या षडयंत्रानुसार कामिनी रवीशी लग्न करते व लगेच त्याची हत्या करून प्रॉपर्टीची मालकीण बनते. रवीची आई व बहीण यांना सुद्धा घरातून हाकलून लावते. दोन दशकानंतर मॉन्टीच्या (ऋषीकपूर) रूपाने रवीचा पुनर्जन्म होतो. मॉन्टी एक मोठा पॉप सिंगर आहे व गतजन्मातील याघटनांच्या आठवणीने त्याला सतत मानसिक त्रास होत असतो. मॉन्टीचे प्रेम असते टिनावर जी उटीत कामिनीच्या घरी कामाला असते. डॉक्टरांच्या सल्ल्याने मॉन्टी आरामासाठी उटीला येतो तेंव्हा घडलेल्या सर्व घटनांची स्थळे त्याच्यासमोर येतात व अखेर समोर येते कामिनी. इथून पुढे मॉन्टी कामिनीचा बदला कसा घेतो हा कथाभाग.
कर्जच्या कथेची ढोबळ रचना सुभाषजींचीच होती. त्याला पटकथेत रूपांतरित केले ज्येष्ठ पटकथाकार सचिन भौमिक यांनी. संवाद लेखनाची जबाबदारी घेतली होती अशाच एका ज्येष्ठ लेखकाने. डॉ राही मासूम रझा. रझा साहेबांनी जबाबदारी घेतली खरी पण त्यांच्या व्यस्ततेमुळे त्यांना पुढे फारसा वेळ देता न आल्याने अखेर बरेचसे संवाद सुभाषजींनीच लिहिले. नृत्य दिग्दर्शनाचे पण असेच. ऋषींच्या एका मुलाखतीत वाचण्यात आले होते. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी ‘दर्दे दिल दर्दे जिगर’ गाण्याचं शूटिंग होणार होतं. ऋषीजींनी डान्स डायरेक्टर कुठे आहे? विचारल्यावर सुभाषजी म्हणाले ‘मी सांगतो त्या स्टेप्स फॉलो कर’. ऋषीजींना हे मान्य नव्हते. त्यांचं म्हणणं होतं कि यासाठी स्पेशल डान्स डायरेक्टर घ्यावा. पण सुभाषजींनी त्यांची समजूत काढली व अखेर ऋषीजी राजी झाले. सुरेश भट्ट यांनी नृत्य दिग्दर्शक म्हणून जबाबदारी जरी सांभाळली असली तरी ज्या स्टेप्स सुभाषजींना अपेक्षित होत्या त्या प्रकारे गाण्यांचे चित्रीकरण करण्यात आलं.
मॉन्टीच्या रोलसाठी सुभाषजींच्या डोक्यात ऋषी कपूर शिवाय इतर कोणतेच नाव नव्हते. त्यांच्या अभिनयात असलेली परिपक्वता व त्यांची लव्हरबॉय व म्युझिकल हिरोची इमेज यासाठी मोठे कारण ठरली. तेंव्हाही व अजूनही सुभाषजी ऋषीजींना भारतातील सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांपैकी एक मानतात. त्यांनीही बाब कित्येक इंटरव्यूह मध्ये व रेकॉर्ड बोलून दाखवली आहे कि मला दिलीपकुमार आणि संजीव कुमार नंतर आवडणारा अभिनेता ऋषी कपूर आहे. किती मोठी कॉम्प्लिमेंट आहे ही! सिमी गरेवाल यांच्यात असलेले ग्लॅमरस लुक्समुळे सुभाषजींनी कामिनी चा रोल त्यांना ऑफर केला. सिमीजी अजिबात तयार नव्हत्या. हेलन, बिंदू, शशिकला यांच्यासारख्या व्हॅम्पचा रोल आहे अशी त्यांची समजूत होती जी नंतर सुभाषजींनी दूरकेली. इतर कलाकारात प्राण यांनीकेलेली कबिराची भूमिका लक्षणीय ठरली होती.
आता सर्वात महत्वाची बाजू व कर्जची मुख्य ओळख. त्याचे संगीत. दि लक्ष्मीकांत प्यारेलाल अर्थात एलपी. हिंदी सिनेसृष्टीतली दिग्गज समजली जाणारी संगीतकार जोडी. वरील सर्व चॅलेंजेससोबतच संगीत हे सर्वात मोठे आवाहन सुभाषजींसमोर होते. कारण त्यांचा कर्जमागचा उद्देशच मुळात हा होता कि स्वतःला संगीताची नुसती जाण नव्हे तर सोबतच प्रेक्षकांना कुठल्या प्रकारचे मधुर संगीत आवडते हे समजणारे कान पण आहेत हे सिद्ध करणे. म्हणूनच कथेच्या नायकाला ठरवून एक पॉप सिंगर दाखविण्यात आले होते. आता प्रश्न हा होता कि पॉप सिंगर म्हणजे पाश्चिमात्य संगीताची शैली हवी. अशी शैली असलेले एकमेव नाव होते आर.डी. बर्मन. आर.डी. बर्मन यांनी ऋषीजींचे यापूर्वी आलेले म्युझिकल्स ‘खेल खेलमें’ व ‘हम किसीसे कम नहीं’ यात अशाच प्रकारच्या संगीताची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली होती. पण सुभाषजींच्या डोक्यातून एलपी काही जाईनात. त्यात एलपी यांची संगीत शैली जरा भारतीय पठडीतली आणि इथे हवे होते पाश्चात्य वाटणारे पॉप संगीत. सर्वात मोठे चॅलेंज. पण सुभाषजींनी पूर्ण विश्वास व पूर्ण फ्री हँड एलपी यांना दिला. एलपींनी कथेतले संगीताचे महत्व, शैली सर्व समजून घेतले. हे एलपींसाठी पण मोठे चॅलेंज होते. या जोडीने सर्वच गाण्यांवर, ट्यून्सवर पचंड मेहनत घेतली. जवळपास २०० पाश्चिमात्य गाण्यांचा अभ्यास एकट्या प्यारेलाल यांनी केला. संगीत असे हवे होते कि जे पाश्चिमात्य वाटेल पण त्याचा गाभा भारतीयच हवा. तरुणांना खासकरून भुरळ घालणारे संगीत हवे. दिवसरात्र घेतलेल्या मेहनतीनंतर एलपी घेऊन आले भारतीय सिनेमातला एक असा एव्हरग्रीन म्युझिक अल्बम जो आजही तितकाच फ्रेश आहे. त्यावर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार तर या जोडीला मिळालाच पण सोबत एचएमव्हीकंपनीची गोल्ड डिस्क सुद्धा.
‘ओम शांती ओम’, ‘पैसा ये पैसा’, ‘दर्दे दिल दर्दे जिगर’, ‘मैं सोलाह बरस कि तू सतराह बरस का’ आणि लास्ट बट नॉट दि लिस्ट ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ अशा एकाहून एका गाण्यांच्या बरसातीने रसिक प्रेक्षकांचे कां तृप्त झाले. ऋषी कपूर यांची म्युझिकल हिरोची इमेज, कथानकात असलेले संगीताचे स्थान व सोबतीला एलपींनी सजवलेली एकाहून एक गाणी असा दुग्ध शर्करा योग जुळून आला होता. सर्वच गाणी किशोर कुमार यांच्या सुमधुर स्वरात सजली होती अपवाद होता केवळ एका गझलचा जी गायली मोहम्मद रफी साहेबांनी. ‘दर्दे दिल दर्दे जिगर’ ही. हो ही ऐकायला जरी गजल वाटली नव्हती पण गीतांच्याबोलांकडे नीट लक्ष दिले तर कळते कि आनंद बक्षी साहेबांनी लिहितांना ही गझल म्हणूनच लिहिली होती. गायिकांच्या आवाजांचा वापर दोनच गाण्यात झाला. एक हसीना थी मध्ये किशोरदां सोबत आशा भोसलेजी होत्या. कर्जच्या वेळी म्हणजे १९८० साली लता दीदी यांचे वय होते ५१ वर्षे. असे असूनही लतादीदींनी ‘मैं सोलाह बरस की’ तितक्याच अल्लडतेने किशोरदां सोबत म्हटले होते. एका गाण्याबाबत मात्र नंतर सुभाषजींनी एका मुलाखतीत खंत बोलून दाखवली. ‘कमाल है कमाल है’ यागाण्याची काही आवश्यकता नव्हती असे त्यांचे व समीक्षकांचे दोघांचेही म्हणणे होते. गाणी जितकी छान रेकॉर्ड झाली तितक्याच आकर्षक व भव्य पद्धतीने या गाण्यांचे चित्रणही करण्यात आले. ओम शांती ओम गाण्यासाठी वापरण्यात आलेली भली मोठी ग्रामोफोन रेकॉर्ड डिस्कही स्क्रीनवर दिसली आकर्षक पण त्यासाठी खर्चही बराच आला. सुभाषजी पहिल्यांदाच निर्माता झाले होते. हे असे का? तसे का नाही असे प्रश्न कोणी विचारणार नव्हते. म्हणून त्यांना त्यांच्या आवडीनुसार हा चित्रपट बनवायचा होता. पॉप शोज कसे असतात? त्यात स्टेजवर कुठले इफेक्टस वापरले जातात याचा लंडनला जाऊन व स्वतःशोज बघून सुभाषजींनी खूप अभ्यास केला होता. या अभ्यासाचा परिणाम या सर्व गाण्यांच्या आकर्षक चित्रणातून दिसून आला.
तर असा आहे कर्ज. सुभाषजींनी आपल्या पहिल्याच निर्मितीत घेतलेली मोठी रिस्क. बॉक्स ऑफिसवर चित्रात सेमी हिट ठरला. मुंबईत व इतर काही मोठ्या शहरात सिल्व्हर ज्युबिली साजरी झाली पण छोट्या शहरात प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद न मिळण्याचे मुख्य कारण ठरले दुसऱ्या कुणाचा चेहरा घेऊन झालेला पुनर्जन्म. खरंतर आपल्या पुरातन हिंदू धर्मशास्त्रात आत्मा मरत नाही, त्याची कुठली इच्छा पूर्ण झाली नसेल तर तो केवळ शरीर बदलतो व पुनर्जन्म घेतो असे स्पष्ट लिहिले आहे. आता शरीरबदलल्यावर चेहराबदलणे साहजिकचआहे. पण तरीही हाच आपला समाज जेंव्हा प्रेक्षक म्हणून चित्रपट बघायला जातो तेंव्हा त्याची अपेक्षा पुनर्जन्मात तोच चेहरा असावा अशी का आहे हे एक न उलगडलेले कोडे आहे? पण कर्ज काही वर्षांनी मात्र हिंदी सिनेमाच्या ‘क्लासिक’ श्रेणीत जाऊन बसला. रिपीट रन व व्हिडीओ सर्कीटमध्ये त्याची मागणी खूप वाढली. १९८० साली ‘कर्ज’ समोर आलेल्या मोठ्या चित्रपटांची नावे होती कुर्बानी, आशा, राम बलराम, दोस्ताना, शान, दि बर्निंग ट्रेन, अलीबाबा और चालीस चोर, जुदाई इत्यादी. कर्जच्या यशाने प्रभावित होऊन नंतर त्याचा रिमेक कन्नड, तेलगू व तामिळ भाषेतही बनविण्यात आला.
मजेची गोष्ट बघा. कर्जच्या गाण्यावरून आतापर्यंत तब्बल पाच चित्रपटांचे शीर्षक ठरले आहे. पैसा ये पैसा (१९८५), मैं सोलाह बरस की (१९८८), एक हसीना थी (२००४), आशिक बनाया आपने (२००५) व ओम शांती ओम (२००७) हे ते चित्रपट. २००८ साली टी-सिरीज कॅसेट कंपनीने सतीश कौशिक यांना दिग्दर्शनाची जबाबदारी देऊन याच कर्जचा याच नावाने हिंदी रिमेक बनविला. ज्यात ऋषी कपूर यांच्या जागी होता गायक अभिनेता हिमेश रेशमिया व सिमी गरेवाल यांच्या जागी होती उर्मिला मातोंडकर. थोडक्यात जरी जमला नसेल तरी २८ वर्षांनी परत या कर्जचा हिंदी रिमेक बनवावा असे वाटणे हेच कर्जचे एव्हरग्रीन असणे सिद्ध करते.
थँक्स सुभाषजी. थँक्स एलपीजी. थँक्स ऋषीजी. आपण दिलेल्या या कर्जाचे नियमित हफ्ते आम्ही वेळोवेळी सिनेमा पाहून व गीते ऐकून आजही भरत आहोत.
वुई लव्ह यु ऑल!!
हेही वाचा – ‘मेरा गाव मेरा देश’ झाला पन्नास वर्षाचा!