अजय पुरोहित 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

सी. रामचंद्र, ओ.पी.नय्यर आणि आर.डी.बर्मन (Music Director R.D. Burman) या तीन संगीतकारांमध्ये एक समान दुवा आहे असं मी म्हटलं तर फार आश्चर्य वाटायला नको. कारण जुन्या म्हणजे 1955-56 पूर्वीच्या आणि त्या नंतरच्या संगीतकारांमध्ये हे तिघंच असे आहेत की ज्यांच्या तारा आजच्या पिढीच्या संगीत रसिकांशी छान जुळतात. त्यातही पहिल्या दोघांची गाणी आजच्या पिढीतल्या सामान्य रसिकाला माहित असतात, भलेही गाण्याबरोबर या संगीतकारांची नावं त्यांना आठवत नसतील पण गाणी ओठावर खेळत असतात. आश्चर्य वाटतं ते तिसऱ्याचं, आर.डी. बर्मन उर्फ पंचमचं. (Remembering Music Director R.D. Burman)

1961 च्या छोटे नवाबनी आपली कारकीर्द सुरू करणारा आरडी 04 जानेवारी 1994 लाच आटोपला परंतु आपलं विश्व जसं दिवसेंदिवस प्रसरण पावत चाललय म्हणतात तसं आरडीच्या अफलातून संगीत रचनांचं मायाजाल दिवसेंदिवस पसरतच चाललय. तसं माझी आणि आरडीची एंट्री एकाच वर्षीची, म्हणजे 1961 ची. पंचमची स्वतंत्र संगीतकार म्हणून आणि माझी आईची नाळ तोडून स्वतंत्र जीव म्हणून या जगात. योगायोग असा की, पंचमशी माझं जे नातं जुळलं ते त्याच्या 1994 च्या एक्झिटनंतरही तुटलं नाही. दिवसेंदिवस बंध घट्टच होत गेले. पंचमचा माझा पहिला संबंध आला तो 1969 मधल्या कुशोरकुमारच्या तुम बीन जाऊं कहां आणि लता-रफी यांच्या निसुलताना रे या गीतांच्या माध्यमातून. तुम बीन जाऊं कहां कित्ती कित्ती ऐकावं असं व्हायचं पण त्या काळी अशी कुठलीही सोय नव्हती. आप ही के गीत आणि बिनाका हे दोन महामार्ग उपलब्ध होते पंचम पर्यंत पोहोचायला. तो पडद्यावर पाहून मोहरून जात होतो. शशी कपूर आणि आशा पारेख यांचा पडद्यावर जो कुरघोडीचा खेळ दिसतो तो अगदी परफेक्टली निसुल्ताना रे मध्ये आरडीनं सुरांच्या साह्याने रंगवला होता. गंमत वाटायची हे गीत ऐकताना. लगेच वर्षभरात कटी पतंग पाहण्यात आला. माझ्या पाचवीच्या परिक्षेच्या आदल्या दिवशी हा चित्रपट मी माझ्या आई-बाबांसोबत पाहिला होता. असं वळण लावल्यावर कारटं बिघडायचं ते बिघडलंच आणि आजपर्यंत सुधरलं नाही. प्यार दिवाना होता है, ये जो मुहब्बत है, ये शाम मस्तानी ही गाणी थक्क होऊन ऐकली आणि पाहिली. एक तर राजेश खन्ना आणि त्यात आरडीची अफलातून गाणी आणि किशोरकुमारचा भारदस्त आवाज. गाण्यात शीळ प्रथमच ऐकली ती ये शाम मधे. हा काळ होता लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या गीतांनी धुमाकूळ घातल्याचा. 

R.D. Burman with Asha Bhosle
R.D. Burman with Asha Bhosle

1966 च्या तिसरी मंझिल मधल्या पाश्चात्य संगितावर आधारित भन्नाट गीतांनी आरडी म्हणजे वेस्टर्नवाला असा एक भ्रम निर्माण झाला होता. परंतु माझा आजही दावा आहे की आरडीचा मूळ स्वभाव मेलडीचाच होता. तिसरी मंझिलच्या मेरे सोना रे, तुमने मुझे देखा आणि दिवाना मुझसा नही या गोण्यातला गोडवा कसा विसरता येईल पण जास्त कौतुक झालं ते आजा आजा मै हूं प्यार तेरा आणि ओ हसिना जुल्फोंवाली या गीतांचा. कारण त्या काळी अशी छप्परफाड गाणी रसिकांनी प्रथमच ऐकली होती. कटी पतंग, मेरे जीवन साथी मधील किशोरकुमारची भावपूर्ण गाणी याची साक्ष देतील पण टिकेचं लक्ष झाली ती आओ ना गले लगाओ ना आणि मेरा नाम है शबनम ही गाणी. आज ही गाणी आर.डी.बर्मनच्या कल्पक मेंदूची उपज समजली जातात. काळाचा महिमा दुसरं काय? अनामिकाचं बाहो मे चले आओ आणि आज की रात कोई आने को है ही गाणी अगदी जगावेगळी. मेरा नाम है शबनम, आज की रात कोई आने को है, देख तो क्या है आज की महफील, ये नशीली ये नशीली मेरी आँखें सारखी गाणी कंपोझ करताना पंचमच्या डोक्यात काय चाललं असावं? त्याची गाण्याला मूर्त स्वरूप देण्याची पद्धत काय होती हे कळलं असतं तर बहार आणि असती. याचं कारण मला असं वाटतं की मेलडी बरोबर पाश्चात्य संगिताचं आणि वैचित्र्याचं पंचमला असलेलं प्रचंड वेड. जे समान्य संगीतकाराला दिसणार नाही असं काही तरी अमूर्त पाहण्याचं वेड. पंचमचं भाग्य असं की, कुणाला दिसणार नाही असं पाहण्याची दृष्टी ईश्वरानं त्याच्या जाड भिंगाच्या मागच्या चक्षूंना दिली होती. ही नजर होती म्हणूनच धन्नो की आँखों में सारखं अफलातून गीत जन्माला येतं. 

R.D. Burman with Lata Mangeshkar, Kishore Kumar and Asha Bhosle
R.D. Burman with Lata Mangeshkar, Kishore Kumar and Asha Bhosle

1961-1969 या काळात अवघ्या 11 चित्रपटांना संगीत देणाऱ्या आरडीने 1970 मध्ये 5 तर 1971 मध्ये चक्क डझनभर चित्रपट केले. याच म्हणजे 1970 नंतरच्या काळात कल्यणजी आनंदजी वर्षाला 10-12 चित्रपट करत तर लक्ष्मीकांत प्यारेलाल 15 ते 20. याच स्पर्धेत आरडी पण उतरला. गाण्यांचा दर्जा, संगितातलं वैविध्य आणि वैचित्र्य या बाबत आरडी चोखंदळ होता. पण हे सर्व द्यायला वेळ मिळाला पाहिजे की. सरळ साध्या संगितानं बांधलेल्या एलपींची गाणी लगेच लोकप्रीय होत, पण ती कालातीत नव्हती. आरडीची गाणी पचायला थोडा वेळ लागायचा पण ती आजच्या पिढीच्याही ओठांवर खेळताना आढळतील. कारवां सारखं चतुरस्त्र संगीत प्रत्येक चित्रपटांना अल्पावधीत देणे कसं शक्य होईल. त्यामुळेच 1980 नंतरच्या काळात स्पर्धेत टिकून राहताना आरडीची दमछाक होऊ लागल्याचं दिसून येतं. त्यात 1972 च्या परिचय पासून गुलझारशी त्याची गट्टी जमली. गुलझारच्या अर्थवाही काव्याला पारंपारिक फिल्मी संगीत अर्थ प्रदान करू शकत नाही हे आरडीच्या ध्यानात आलं असावं. मुसाफिर हूं यारो, बिती ना बिताई रैना या गीतांमधून गुलझारच्या गीतांना सुशोभित करणारं कोंदण आरडीनं दिलं होतं. गुलझार यांच्या आंधी, घर, खुशबू, किनारा, मासूम, किताब, इजाजत, नामुमकीन, लिबास, अंगूर या चित्रपटातील गीतांना आरडीच्या संगितानं अर्थ प्राप्त करून दिला. दुसरीकडे आरडीचं मजरूह सुल्तानपुरी आणि आनंद बक्षी यांच्याशी देखिल असोसिएशन होतं. आनंद बक्षी यांच्या बरोबर आरडीने खूप हिट चित्रपट दिले असतील पण मला त्याची मजरूह सोबतची गाणी जास्त आवडतात. कारण संख्या वाढली की बक्षींचा दर्जा घसरत होता. मजरूह सुल्तानपुरींसारखं दर्जा आणि संख्या हा ताळमेळ बसवणं अत्यंत कठीण असतं. त्यामुळे यादों की बारात आणि हम किसीसे कम नहीं सारख्या चित्रपटांमधील पाश्चात्य सुरावटींची गाणी ऐकून पहा, मजरूहचे शब्द पहा. एक कमीत कमी पातळी ठरवूनच मजरूह साहेब गीत लिहित असावेत. त्या खाली ते कधी जात नसत. पण अमर प्रेम, आप की कसमचा दर्जा दर वेळी टिकवून ठेवणं आनंद बक्षींना जड जात असे. पुढच्या काळात आरडीनं अंजान, योगेश अशा गीतकारां सोबतही काम केलं आणि छान छान गाणी दिली. ©

1984 ते 90 काळातील आरडीचे चित्रपट आणि त्यातील गाणी रसिकांच्या पसंतीस उतरली नाहीत. आरडीचं मार्केट डबघाईला आलं. मी यापूर्वी म्हटलं त्याप्रमाणे आरडीची या स्पर्धेत दमछाक होऊ लागल्याचं स्पष्ट दिसून येतं. ज्याप्रमाणे सचिनदांनी त्यांच्या शेवटच्या 5-6 वर्षांमध्ये मोजकेच चित्रपट केले आणि मोजकीच पण गोड गाणी दिली त्याचप्रमाणे आरडीनं या स्पर्धेतून बाहेर व्हायला पाहिजे होतं. त्याचा दर्जा वादातीतच आहे. त्यालाही दर्जेदार गाणी देता आली असती पण दर्जा पाहिजे असल्यास तितका वेळही द्यावा लागतो. अगदी शेवटपर्यंत दर्जा टिकवून ठेवणारे संगीतकार म्हणजे सचिनदा आणि मदन मोहन. पंचमनंही असंच करायला पाहिजे होतं. शेवटी चित्रपट मिळत नसताना विधु विनोद चोप्रानं 1942 अ लव्ह स्टोरी हा चित्रपट आरडीला दिला. त्यावेळी नैराश्यानं ग्रासलेल्या आरडीकडे भरपूर वेळ होता. विधु विनोद चोप्रानं आरडीला हवा असलेला मानसिक आधारही दिला आणि 1994 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या गीतांनी इतिहास घडवला. अत्यंत सुमधूर गीतांची बरसात केली आरडीनं, पण ते पाहायला तो नव्हता. 4 जानेवारी 1994 ला पंचम या जगातून गेला आणि 15 एप्रिल 1994 रोजी 1942 अ लव्ह स्टोरी प्रदर्शित झाला. या चित्रपटातील गाण्यांच्या यशाचं टॉनिक पंचमला चाखायला मिळालं असतं तर तो अजून जोमानं कामाला लागला असता. त्याच्या कल्पनांना नवे धुमारे फुटले असते. रसिकांना खूप काही नवनवीन, छानछान ऐकायला मिळालं असतं.

R.D. Burman

चित्रपट सृष्टीतल्या 1970 नंतरच्या गळेकापू स्पर्धेनं घेतलेला हा बळी होता असं मी म्हणेल. पंचम बरोबर संगीताच्या सुवर्णयुगाशी नातं सांगणारी उरलेली एक सोनेरी तार खंडली. पण पंचम संपला नाही. नवीन पिढीच्या रोज येणाऱ्या प्रतिनिधींशी त्याची गीतं नातं जोडत राहिली. त्याचं संगीत अमूर्ताचं कवच फोडून इत्र तत्र सर्वत्र पसरलं. आजच्या पिढीला पंचमच्या गाण्यांमधील जे बारकावे माहित आहेत ते त्या काळी गाणी ऐकणाऱ्यांनाही माहित नसतात. रहमान, नदीम-श्रवण, अनु मलिक, प्रितम यांच्या गाण्यांवर पोसलेली नवी पिढी आश्चर्यकारकरित्या पंचमच्या गाण्यांशी सलगी करते आणि त्याचं नाव घेताना कानाची पाळी धरते. त्यामुळे पंचमची सर्व गाणी विशेषत: 1980 नंतरची गाणी मला पुन्हा ऐकायची आहेत. मला विश्वास आहे की, शिंपल्यातून मोती निघतात त्याप्रमाणे पंचमच्या या काळातल्या संगितातून काही तरी वेगळं नक्की ऐकायला मिळेल. कारण या काळी संगिताचा दर्जा इतका घसरला होता की, लोक चित्रपट पाहात पण गाणी ही ऐकण्यासाठी असतात यावरचा त्यांचा विश्वासच उडाला होता. या लाटेत पंचमच्या काही रचनाही वाहून गेल्या असण्याची शक्यता आहे. गव्हाबरोबर किडेही रगडले जातात हा तर निसर्गनियमच आहे. 

हिंदी चित्रपट संगीताच्या गोल्डन इरा काळातील दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

ajay purohit
Ajay Purohit
+ posts

Leave a comment