-धनंजय कुलकर्णी

भारतीय सिनेमाच्या संगीत सुवर्णकाळात दिलीप कुमार- देव आनंद आणि राज कपूर या त्रिकुटाने रसिकांच्या भावविश्वाचा एक कप्पा व्यापला आहे. या मॅटीनी आयडॉल्स ने पुढच्या दोन पिढ्यांना देखील आपलेसे केले. या तिघांचे गायक आणि संगीतकार देखील ठरलेले असायचे. दिलीप साठी रफी, देव करीता किशोर तर राज साठी मुकेश हे कॉम्बिनेशन अलिखित कराराप्रमाणे ठरलं होतं. तलत महमूद, हेमंत कुमार, महेंद्र कपूर यांचा स्वर गोल्डन इरा मध्ये ऐकू येवू लागला होता. तलत महमूद (Talat Mahmood) याने स्वत: काही सिनेमात अभिनय देखील केला होता. आज ९ मे ! पार्श्वगायक तलत महमूद यांचा स्मृती दिन! त्या निमित्ताने या सदाबहार त्रिकुटासोबतचा या स्वराचा प्रवास आपण आज पाहूयात. तीनही अभिनेत्यांचे पार्श्वगायक ठरलेले असले तरी तलतचा मखमली स्वर त्यानी काही सिनेमात वापरला. त्याचाच हा थोडक्यात धांडोळा. (Remembering Talat Mahmood)

तलत मेहमूद आणि दिलीप कुमार हे कॉम्बिनेशन १९५० च्या दशकामध्ये खूप लोकप्रिय ठरलं होतं. मूळात तलत मेहमूद हिंदी सिनेमात पहिल्यांदा गायला तो दिलीप कुमार यांच्या  साठीच चित्रपट होता आरजू आणि या चित्रपटाचे संगीतकार होते अनिल विश्वास. या चित्रपटात ‘ऐ दिल मुझे ऐसी जगाह ले चलजहां कोई नही हो…’ खरं तर आयुष्याच्या शेवटी जे गाणं गायला हवं होतं ते तर आयुष्याच्या सुरुवातीला तलत गायला! दिलीप कुमार त्यावेळी ‘शोकात्म भूमिकांचा राजा’ ही इमेज जपणारा कलाकार होता आणि अशा संवेदनशील भूमिकेसाठी खरं तर तलत महमूद यांचा स्वर अतिशय योग्य असा होता. ‘तराना’ हा चित्रपट १९५१ साली रुपेरी पडद्यावर आला. यात दिलीप कुमारची नायिका होती मधुबाला. या दोघांवर चित्रीत दोन नितांत सुंदर युगल गीते तलत आणि लताच्या स्वरात होती. जी आज देखील खूप लोकप्रिय आहेत. त्यापैकी एक होतं ‘सीनेमे सुलगते है अरमान आंखोमे उदासी छाई है ये आज तेरी दुनियासे हमे तकदीर कहां ले आई है …’ या गाण्याने मनाला दिलेला’ हसीन दर्द’ इतका मोठा आहे की आज  पन्नास साठ वर्षानंतर देखील हे गाणे रसिक विसरू शकलेले नाहीत.

तलतचा भावस्पर्शी हळवा मखमली स्वर आणि लताचा कोवळा स्वर काय परफेक्ट गाणं बनलं होतं! ‘नैन मिले नैन हुए बावरे’ या  लाईट मूडच्या गाण्यात देखील तलत चा स्वर विलक्षण खुलला होता. हि दोन्ही गाणी प्रेम धवन यांनी लिहिली होती. संगीतकार सज्जाद हुसेन यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘संगदिल’ (१९५२)  या चित्रपटात तलत मेहमूद यांनी पुन्हा दिलीप साठी पार्श्वगायन केले. या चित्रपटातील ‘ये हवा ये रात ये चांदनी तेरी इक अदा पे निसार है’हि  गझल इतकी सुंदर होती की या धूनवर पुढे काही वर्षांनी मदन मोहन यांनी ‘तुझे क्या सूनाऊ मै दिलरुबा तेरे सामने मेरा हाल है’(आखरी दाव) हे गाणं स्वरबद्ध केलं होतं.

या चित्रपटात लता मंगेशकर आणि तलत मेहमूद यांच्या स्वरात ‘दिल मे समा गये सजन फुल खिले चमन चमन’ हे मनाला प्रसन्न करणारे अतिशय सुंदर युगल गीत होतं. ते दिलीप कुमार आणि मधुबालावर चित्रित झालं होतं. या गाण्याचा एक किस्सा म्हणजे सुरुवातीला ज्यांना ‘मराठीतले तलत महमूद’ म्हणून ओळखले जायचे ते अरुण दाते आणि लता मंगेशकर यांचं एकच युगलगीत आहे. जे हृदयनाथ  मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलं आहे आणि या गाण्यावर तलत लताच्या या गाण्याचा जबरदस्त प्रभाव दिसून येतो. गंगाधर महाम्बरे यांच्या लेखणीतून उतरलेलं ते गीत होतं ‘संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा’(गमंत म्हणजे हे मराठी गीत सुरुवातीला तलत महमूद च गाणार होते. लता सोबत तलतच्या या गाण्याच्या रिहर्सल देखील एच एम व्ही स्टुडिओत झाल्या होत्या अशी भावस्पर्शी आठवण कवी गंगाधर महाम्बरे यांनी मला एका मुलाखतीत दिली होती!)

 

दिलीप कुमार च्या अभिनयाचा सर्वोत्कृष्ट अविष्कार ठरलेल्या ‘देवदास ‘ (१९५५) या चित्रपटात ‘लगी रे ये कैसी आग’ आणि ‘किसको खबर थी’ हि अतिशय अप्रतिम अशी गाणी तलत यांनी दिलीप साठी गायली होती. १९५४ साली आलेल्या ‘फूटपाथ’  मधील ‘शाम –ए – गम की कसम आज गमगी है हम आभी जा आभी जा आज मेरे सनम….’ हे गाणं दिलीप कुमार चित्रीत होतं. या गीताने तर तमाम तलत प्रेमी निहायत खुश झाले. तलतच्या  गीतातून वारंवार डोकावणारी ‘शाम’ इथे खूप घायाळ करते. खय्याम यांनी हे गीत स्वरबध्द केले होते. तलत च्या ब्ल्यू मूड मधील या गाण्याने रसिकांच्या गळ्यातील तो ताईत बनला होता.  यात दिलीप ची नायिका  मीना कुमारी होती. दिलीप कुमार – नलिनी जयवंत यांच्या ‘शिकस्त’(१९५३) या चित्रपटात ‘जब जब फुल खिले तुझे याद किया हमने ‘ हे अवीट गोडीचे  गाणं तलत ने गायलं होतं. हे गाणं शंकर-जयकिशन यांनी स्वरबद्ध केलं होतं . शैलेंद्र यांच्या लेखणीतून हे गीत उतरले होते. पुढे  शैलेंद्र यांच्या कविता संग्रहाला त्यांनी  नाव देखील ‘जब जब फुल खिले ‘हेच दिले होते.

संगीतकार बुलो सी  रानी  हे यांनी ‘जोगन’ हा चित्रपट १९५० स्वरबद्ध केला होता . यात ‘सुंदरता के सभी शिकारी’ हे दर्द भरे गीत तलत मेहमूद यांनी गायले होते जे दिलीप कुमार यांच्यावर चित्रित झाले होते.संगीतकार नौशाद  ,दिलीप कुमार आणि तलत मेहमूद हा त्रिवेणी संगम जुळून आला होता १९५० सालच्या ‘बाबुल’ या चित्रपटात!  या चित्रपटात नौशाद अली यांचा तलत वर  एवढा विश्वास बसला होता की त्यांनी एका गाण्यांमध्ये रफीला चक्क कोरसमध्ये घ्यायला लावले होते.(नदी किनारे साथ हमारे..) या चित्रपटात तलत ची सर्वच गाणी सुंदर होती. आणि ‘मेरा जीवन साथी बिछड गया’ या सोलो सोबतच ‘मिलते हैआंखे दिल हुआ दिवाना किसीका ‘, ‘दुनिया बदल गई मेरी दुनिया बदल गई’ हि दोन्ही गाणी शमशाद  सोबतच गायली होती.  दिलीप कुमारचा आणखी एक यशस्वी सिनेमा म्हणजे अमिया चक्रवर्ती यांचा ‘ दाग’ (१९५२)  या चित्रपटाला संगीत शंकर-जयकशन यांचेहोते. या चित्रपटात दिलीप ची नायिका निम्मी होती ‘ऐ मेरे दिल कही और चल’,‘कोई नही मेरा इस दुनिया मे’,’ हम दर्द के मारो का’हि तलतची त्या काळी खूप गाजली होती.

देव करीता तलत महमूद यांचा स्वर पहिल्यांदा १९५१ साली ‘नादान’ या चित्रपटात ऐकू आला. यात देवची नायिका होती भूलोकीची अप्सरा मधुबाला. संगीत चिक चॉकलेट यांचे होते. ‘आ तेरी तस्वीर बना लू मै अपनी तकदीर बना लू’ तलतच्या कंप युक्त  स्वरात हे गीत ऐकायला आजही खूप गोड वाटते. यानंतर हा स्वर  ‘अमिया चक्रवर्ती यांच्या पतिता (१९५३) या चित्रपटात ऐकू आला. या चित्रपटाला  शंकर जयकिशन यांचे संगीत होते.त्यांनी देखील त्यांचे नेहमीचे रफी, मन्नाडे आणि मुकेश हे गायक टाळून तलत ला यात तीन गाणी दिली. यात सर्वात अप्रतिम गीत होते ‘है सबसे मधुर वो गीत जिसे हम दर्द के सूर में गाते है‘‘Our sweetest songs are those that tell of saddest thought ’ प्रख्यात कवी शेले यांच्या या विचारांची स्पष्ट छाया शैलेंद्रच्या या गीतावर दिसते.देव सोबत उषा किरण यात होती. यात तलतची आणखी दोन अप्रतीम गाणी होती पण हि दोन्ही गाणी मात्र आगा या नटावर  चित्रित होतं गीताचे बोल होते ’ तुझे अपने पास बुलाती है तेरी दुनिया’ आणि दुसरं गाणं होतं ‘अंधे जहांके अंधे रास्ते जाये तो जाये कहां..’ तलतची तीनही गाणी आजही ‘भुलाये न बने’ प्रकारात मोडणारी आहेत. देवची त्या काळातली हळवी रोमॅंटीक इमेज आणि त्याला साजेसा तलतचा भावोत्कट स्वर मस्त जमून आले होते.

१९५४ साली नवकेतनचा ‘टॅक्सी ड्रायव्हर ‘ आला यात देवची नायिका कल्पना कार्तिक होती. याच सिनेमाच्या सेट वर दोघांनी लग्न केले करून सर्वांना धक्का दिला होता. संगीत सचिनदा यांचे होते. ‘जाये तो जाये कहां समझे ना कौन यहां दर्द भरे दिल कि जुबान’ या तलतच्या गीताने अफाट लोकप्रियता मिळवली. १९५४ सालच्या बिनाका गीता मालाचे ते टॉप चे गीत बनले. वस्तुत: हे टॅंडम  सॉंग (एकच गीत दोघांनी स्वतंत्र रित्या गायलेले ) होते. पण लताच्या गीतापेक्षा ते वरचढ ठरले.१९५६ साली देव आणि गीताबालीचा ‘पॉकेट्मार’ हा चित्रपट आला होता. यात देव ला तलतचा स्वर फक्त एका युगल गीतापुरता लाभला होता . मदन मोहनच्या सुरावटीतील हे गीत आजही मनाला सुखद आठवणी जागं करून देणारं होतं. ‘ये नई नई प्रीत है तुही तो मेरा मीत है’. यानंतर तलतच्या स्वरात देव चा गाजलेला चित्रपट म्हणजे वहिदा सोबतचा ‘रूप की रानी चोरोंका राजा’ (१९६३) संगीत शंकर जयकिशन.यात शीर्षक गीतासोबातच ‘तुम तो दिल के तार छेडकर हो गये बेखबर ‘ हि अप्रतिम  रचना होती. यात ‘सुनो भाई हमने पीली है थोडी ‘ हे शराबी सोंग देखील होते. दुर्दैवाने या दुकलीचा (देव-तलत) हा शेवटचा सिनेमा ठरला. काही तुलनेने अप्रसिद्ध गाणी (अरमान, इंसानियात, हमसफर या चित्रपटातील) देखील या जोडीवर चित्रित आहेत.

त्यामानाने राज कपूर आणि तलत महमूद हा योग तसा कमी जुळून आला तबलावादक झाकीर हुसेन यांचे वडील अल्लारखा कुरेशी यांनी ‘ बेवफा’(१९५२) या चित्रपटाला संगीत देताना तलतच्या  स्वरात काही गाणे गाऊन घेतली जी चित्रपटात राज कपूर वर चित्रीत झाली होती ‘दिल मतवाला लाख संभाला’,’ तुमको फुरसत हो मेरी जान’ १९५० साली ‘ जान पहचान’ हा चित्रपट संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी संगीतबद्ध केला होता ज्यात तलत आणि गीता दत्त यांच्या स्वरातील ‘अरमान भरे दिल की लगन तेरे लिये’ हे नितांत सुंदर गाणे यामध्ये होते. तसेच मदन मोहन यांनी ‘आशियाना’ या राज कपूर नर्गिस यांच्या चित्रपटातील काही गाणी तलत च्या स्वरात गाऊन घेतली होती आणि ती खूप लोकप्रिय देखील झाली होती. ‘मैं’ पागल मेरा मनवा पागल’,’ मेरा करार लेजा ‘ १९५२ सालच्या रोशन यांनी संगीत दिलेल्या ‘अनहोनी’ या चित्रपटात पुन्हा राज नर्गीस हीच जोडी होती. यातील पियानो चा अप्रतिम वापर केलेलं ’मैं दिलहूं एक अरमान भरा तू आके मुझे पहचान जरा ‘ हे  गाणे रसिक विसरू म्हटलं तरी विसरू शकत नाही.

 

 

 

 

 

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment