-© विवेक पुणतांबेकर

आजच्या डाॅल्बी युगात अनेक गायिका विस्मरणात गेल्या. त्यातल्याच एक काळ गाजवलेल्या शमशाद बेगम चा परिचय नव्या पिढीला करुन द्यावा यासाठीच हा लेखन प्रपंच. लाहोरला १४ एप्रिल १९१९ साली मिया हुसैन बश आणि गुलामे फातिमा या दांपत्याच्या कुटुंबात जन्मल्या शमशाद बेगम (Shamshad Begum). एकूण आठ भावंडात शमशाद बेगम तिसर्‍या. त्यांचे वडिल बिल्डिंग काॅन्ट्रॅक्टर होते. संगीताशी कसलाही संबंध नसलेल्या कुटुंबात अशी गायिका जन्मते हा केवळ एक चमत्कार होता. आपला आवाज सुरेल आहे याचा साक्षात्कार त्यांना वयाच्या पाचव्या वर्षी लाहोरच्या म्युनिसिपल प्रायमरी स्कूल मध्ये झाला. त्यांच्या सुरेल आवाजाचा परिचय झाल्यामुळे रोजच्या प्रार्थनेच्या वेळी लाऊडस्पीकर वरुन त्यांना प्रार्थना म्हणायची संधी देत.

हळेहळू मर्सिया (मोहरम मधली प्रार्थना) नाती (भजनं) त्या नातेवाईसमोर म्हणायला लागल्या. आईवडिलांची अजीबात इच्छा नव्हती शमशादनी (Shamshad Begum) संगीताचे शिक्षण घ्यावे. वडिल स्वभावाने कडक पण प्रेमळ होते. अभ्यासात शमशाद हुशार होत्या. त्यांचे एक काका होते अमिहीन. त्यांना गाण्याचा शौक हौता. ते शमशादना जेनोफोन ग्रामोफोन कंपनीत घेऊन गेले. मास्टर हैदर नी शमशादला गायला सांगितले. गाण्याचे शास्रोक्त शिक्षण न घेतल्याने गाण्यातले काहीही कळत नसताना त्या गझल गायल्या. मास्टरजी खेकसले बस करो. शमशाद गांगरुन गेल्या. पण मास्टरजींनी सहाय्यकाला बोलावले आणि बारा आण्याचा करार शमशाद बरोबर केला. परफेक्शनिस्ट असलेल्या गुलाम हैदर (Gulam Haider) नी शमशाद वर अफाट मेहनत घेतली. हळूहळू बारा आण्याचा करार पन्नास गाण्यांपर्यंत वाढवला.  प्रत्येक गाण्यासाठी शमशाद ना बारा रुपये मिळत.

या नंतर संगीतकार श्यामसुंदर यांच्याकडे गाण्याची संधी शमशाद ना मिळाली. सिनेमात प्लेबॅक आला नव्हता. त्यामुळे प्रायवेट रेकाॅर्डस श्रीमंत लोकात लोकप्रिय झाल्या. पेशावर रेडिओ स्टेशनवर शमशाद गाऊ लागल्या. काही दिवसानी लाहोर रेडिओ स्टेशन सुरु झाले. तिथे गायलेल्या ‘एक बार फिर कहो’ गाण्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आणि आघाडीच्या गायिकांमध्ये शमशाद ना स्थान मिळाले. या नादात बी.ए.पर्यंत शिक्षण झालेल्या शमशाद ना पदवीचा नाद सोडावा लागला. रेडिओ स्टेशनवर किंवा प्रायव्हेट रेकाॅर्डिंग साठी त्यांच्या वडिलांची हरकत नव्हती. पण सिनेमात जायला त्यांचा सक्त विरोध होता. त्या काळात सिनेमात जाणे प्रतिष्टेचे मानले जात नसे. अशातच एकदा निर्माते दलसुख पांचोली यांच्याकडे शमशादनी गपचुप स्क्रिन टेस्ट शमशाद नी दिली. दलसुख पांचोली घरी आले आणि ही गोष्ट घरात समजल्यावर हल्लकल्लोळ झाला. रागाच्या भरात वडिलांनी पांचोलींना हाकलून दिले. दीड वर्षानी पांचोली परत आले ते पार्श्वगायनाचा प्रस्ताव घेऊन. तो पर्यंत सिनेमात पार्श्वगायन सुरु झाले होते. वडिलांचा विरोध मावळला. पहिले फिल्मी रेकाॅर्डिंग शमशाद नी ‘यमला जट’ या पंजाबी सिनेमासाठी केले. ( अभिनेता प्राण चा पहिला सिनेमा होता यमला जट ). सहगायिका होती नूरजहां आणि संगीतकार होते गुलाम हैदर. यांतर त्यांना मिळाला हिंदी सिनेमा खजांची. खजांची (Khazanchi) चे संगीत खूप गाजले. या नंतर गुवांडी, जमिनदार या सिनेमांसाठी पण शमशाद नी आवाज दिला. प्रत्येक गाण्यांसाठी त्यांना १५० रुपये मिळत. मग त्यांनी वाढवून ७०० रुपये मागितले. पांचोली तयार झाले. मग दुसर्‍या निर्मात्याने १५०० रुपये दिले. मेहबूब खान यांच्या आग्रहामुळे शमशाद १९४२ साली मुंबईत आल्या.

 

मेहबूब खानच्या ‘तकदीर’ सिनेमासाठी शमशाद नी मुंबईत पहिल्यांदा पार्श्वगायन केले. ‘तकदीर’ (Taqdeer) हा नर्गिस चा नायिका म्हणून पहिला सिनेमा होता. संगीत रफिक गजनवी यांचे होते. सेंट्रल स्टुडिओ शेजारीच मेहबूब खान यांनी शमशाद ची रहाण्याची, खाण्याची, आणि ड्रायव्हर सकट मोटारीची सोय केली. तकदीर नंतर नवयुग चा ‘पन्ना’ सिनेमा शमशाद ना मिळाला. गुलाम हैदर चा भाचा आमिर अली ने ‘पन्ना’ ला संगीत दिले. जेनोफोन कंपनी बरोबर झालेल्या करारामुळे सिनेमात जरी शमशाद गायल्या तरी पन्ना च्या रेकाॅर्डस मात्र राजकुमारी च्या आवाजात तयार झाल्या. ‘पन्ना’ चे काम आटोपून शमशाद लाहोर ला परत गेल्या. ‘शिरी फरहाद’ सिनेमासाठी पांचोली बरोबर करार झाला.

त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात एक हिंदू पंजाबी ब्राम्हण आला. त्याचे नाव गणपतलाल बतो. वकिलीचे शिक्षण घेत असताना गणपतलाल बतो रेकाॅर्डिंग स्टुडिओत येत असत. सालस स्वभावाचे गणपतलाल शमशाद च्या प्रेमात पडले. एके दिवशी हिम्मत करुन ही गोष्ट शमशाद नी वडिलांना सांगितली. वडिलांनी आकांततांडव केले. पण हे दोघे आपल्या निर्णयावर ठाम होते. दोन वर्षे मानसिक संघर्ष केल्यानंतर वडिलांनी परवानगी दिली. लग्नानंतर मी पार्श्वगायन सोडणार नाही अशी अट शमशाद नी गणपतलाल ना घातली. त्यांची काहीच हरकत नव्हती. १९४२ साली त्यांचे लग्न झाले. मुंबईतून पार्श्वगायनाच्या मागण्या वाढू लागल्यावर मुंबईत स्थायिक व्हायचा निर्णय या दोघांनी घेतला. माहिम च्या पॅरेडाईज सिनेमा जवळ घर घेतले. आचार्य अत्रे यांच्या रागिणी सिनेमापासून शमशाद यांची कारकिर्द बहरायला लागली. नौशाद, सी.रामचंद्र, अनिल विश्वास, खेमचंद्र प्रकाश या त्या वेळच्या आघाडीच्या संगीतकारांकडे शमशाद गाऊ लागल्या. सी.रामचंद्र यांच्या १२ सिनेमात शमशाद गायल्या. ‘शहनाई ‘सिनेमातले त्यांनी गायलेले आ ना मेरी जान संडे के संडे आज ही गुणगुणले जाते. फाळणी झाल्यावर भारतात रहायाचा निर्णय शमशाद नी घेतला. गणपतलात वकीली सोडून घंद्यात उतरले. आयुष्यातली पहिली हिलमन गाडी त्यांनी त्याच कालखंडात घेतली. रेकाॅर्डिंग ला जाताना शमशाद खूप साध्या वेशात मेकअप न करता जात. त्यांची मुलगी उषा यावरुन खूप चिडवायची. पण त्या सांगायच्या मी गायला जाते अभिनय करायला नाही. सर्वकाही सुरळीत चालले असताना १९५५ साली गणपतलाल अचानक वारले. शमशाद खूप निराश झाल्या. त्यांनी रेकाॅर्डिंग ला जाणे बंद केले.

एक वर्षानंतर नौशाद त्यांच्या घरी आले. त्यांनी समजावल्यावर शमशाद तयार झाल्या. मदर इंडियातले होळीचे गाणे गायला मोठ्या मुश्किलीने तयार झाल्या. तो पर्यंत सिने विश्वातले वातावरण गढूळ व्हायला सुरुवात झाली होती. घाणेरडे राजकारण, चमचेगिरी, अघोषित दादागिरी सुरु झाली होती. त्यांच्या नंतर आलेल्या गायिकांसकट खेळलेल्या राजकारणामुळे गाणी मिळणे बंद झाले. आरपारच्या वेळी एखादे तरी गाणे गा असे विनवणारे ओ. पी. डोक्यात यश गेल्यावर त्यांना टाळायला लागले. वास्तविक संगीतकार रवि ने सोडलेला सिनेमा ओ.पी.नी स्वीकारल्यामुळे एका गायिकेने वादकांसकट ओ.पीं वर बहिष्कार टाकला तेव्हा शमशाद त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि बहिष्कार मागे घ्यायला लावला. तसाच अनुभव सी.रामचंद्र, मदनमोहन यांच्याबाबतीत आला. आंखे सिनेमाच्या वेळी निर्माता पैसे देत नाही म्हणून फुकट गाणी गायची विनंती मदनमोहन नी केली. शमशाद नी एकही पैसा न घेता गाणी गायली. तोच मदनमोहन ओळख देईनासा झाला. शंकर जयकिशन नी फक्त एक गाणे आवारा मध्ये दिले. सहपुरुष गायक मात्र त्यांच्याशी अदबीने वागले.

पार्श्वगायन बंद केल्यावर १९६८ साली त्यांनी स्टेज शो सुरु केले. ते लोकप्रिय व्हायला लागल्यावर षण्मुखानंद हाॅलच्या व्यवस्थापनावर दबाब आणून एका गायिकेने ते कार्यक्रम बंद करायला लावले. असे असूनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा नव्हता. आपल्या कारकिर्दीत फक्त १६३० गाणी गायलेल्या शमशाद आपले जावई मेजर शहानवाजखान मुली नातवंडांसकट समाधानाने पवईच्” हिरानंदानी काॅम्प्लेक्स मघ्ये रहात असत. मध्यंतरी एकदा चुकून शमशाद गेल्याची बातमी पेपर मध्ये छापून आली होती. (दिलिपकुमार यांची आजे सासू शमशाद बेगम गेल्या होत्या). भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांनी गायलेल्या कभी आर कभी पार आणि संय्या दिल मे आना रे गाण्यांचे रिमिक्स पण खूप लोकप्रिय झाले होते. २३ एप्रिल २०१३ ला त्या आपल्यातून गेल्या.त्यांच्या इच्छेनुसार हिंदू पध्दतीने त्यांचा अंत्यसंस्कार केला गेला.

 

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment