-© विवेक पुणतांबेकर
‘चल उड जा रे पंछी….’ भाभी मधले हे गाणे कानावर पडले की आठवतात संगीतकार चित्रगुप्त.सिने जगतातले काही गुणी संगीतकार उपेक्षित राहिले. सुरेल संगीत देऊनही प्रथितयश चित्रसंस्था न मिळाल्याने त्यांच्या कलेचे चीज झाले नाही. यातलेच एक चित्रगुप्त श्रीवास्तव. आज त्यांची पुण्यतिथी. या निमित्ताने त्यांच्या आठवणी जागवायचा हा अल्पसा प्रयत्न.
चित्रगुप्त बिहारमधल्या गोपालगंज तालुक्यातल्या करमैनी गावात १६ नोव्हेंबर १९१७ ला जन्मले. लहानपणापासून अभ्यासात हुशार असणारे चित्रगुप्तनी इकाॅनाॅमिक्स आणि जर्नालिझम या दोन्ही विषयात एम.ए.ची डिग्री मिळवली होती. लहानपणापासून शास्रीय संगीताची गोडी असलेल्या चित्रगुप्तवर आपले वडिल बंधू ब्रीज नंदन आझाद यांचा प्रभाव होता. ब्रीज नंदन आझाद निर्भीड पत्रकार होते. स्वातंत्रसंग्रामात १९३० साली तुरुंगात जाऊन आले होते. पटना येथल्या हिंदी आणि इंग्रजी पेपरमध्ये ते लिखाण करत. ते स्वतः उत्कृष्ट तबलापटू होते. चित्रगुप्त यांचा ओढा शास्रीय संगीताकडे होता आणि शास्रीय गायक बनायची सुप्त इच्छा त्यांच्या मनात होती. एम.ए. झाल्यावर काही काळ पटना विश्वविद्यालयात चित्रगुप्तनी काही काळ प्राध्यापकाची नोकरी केली. त्यांचे मित्र सिने छायाचित्रकार आणि दिग्दर्शक मदन सिन्हा यांनी चित्रगुप्तना मुंबईत यायचा सल्ला दिला. त्या प्रमाणे ते मुंबईत आले. या निर्णयामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली.
मुंबईत आले खरे पण ओळखीचे कोणीच नव्हते. दिग्दर्शक नितीन बोस यांनी एका सिनेमात कोरस मध्येगायला संधी दिली. याच सुमारास त्यांची ओळख संगीतकार श्रीनाथ त्रिपाठी यांच्याबरोबर झाली. लवकरच चित्रगुप्त श्रीनाथ त्रिपाठी यांचे सहाय्यक बनले. श्रीनाथ त्रिपाठी पौराणिक सिनेमाचे संगीतकार होते. काही सिनेमे पण त्यांनी दिग्दर्शित केले होते. पार्श्वगायन करत, सवांद लिहीत. लखनौच्या मारीस विद्यालयाचे विद्यार्थी असलेल्या श्रीनाथ त्रिपाठींनी चित्रगुप्त ना खूप मदत केली. त्यांनीच प्रयत्न करुन चित्रगुप्तना पहिला सिनेमा मिळवून दिला. हा सिनेमा होता ‘फायटिंग हिरो’ (१९४६). चित्रगुप्त यांचे करियर बी ग्रेड स्टंट, पौराणिक सिनेमांपासून सुरु झाले. १९५२ साली नानाभाई भट्ट यांच्या ‘सिंदबाद द सेलर’ सिनेमातल्या चित्रगुप्तनी संगीतबध्द केलेल्या सिनेमातले रफी शमशाद बेगम जोडीचे ‘अदासे झुमते हूए’ हे द्वंद्वगीत खूप गाजले. या नंतर १९५३ साली आलेल्या नाग पंचमी सिनेमातले त्यांनी संगीतबध्द केलेले ‘ओ नाग कही ना जा हे’ आशा भोसले यांचे सोलो गाणे पण खूप गाजले. १९५५ साली चित्रगुप्तना मद्रासच्या ए.व्ही.एम.ने ‘भक्त शिव’ या सिनेमाला संगीत द्यायला बोलावले. वास्तविक या सिनेमाला संगीत द्यायला एस.डी. बर्मन ना बोलावले होते. पण पौराणिक सिनेमांना आपण संगीत देत नाही असे सांगून त्यांनी नकार दिला. पण एस.डी.बर्मननीच चित्रगुप्त यांचे नाव सुचवले. या सिनेमात पहिल्यांदाच लतादिदी चित्रगुप्त यांच्याकडे गायल्या. चित्रगुप्त लता या जोडीच्या २४० मधुर गाण्यांची (यातली १५१ सोलो गाणी ) सुरुवात येथून झाली.
यानंतर त्यांना ए.व्ही.एम.चा सिनेमा मिळाला ‘भाभी’. हा परसक्ती या तामिळ सिनेमाचा रिमेक होता. खर्या अर्थाने व्यावसायिक यश चित्रगुप्तना लाभले ‘भाभी’ सिनेमापासून यातले रफि यांनी गायलेले ‘चल उड जा रे पंछी’ आणि रफि-लता जोडीचे ‘चली चली रे पतंग मेरी चली रे’ ही गाणी खूप लोकप्रिय झाली. ‘भाभी’ च्या यशानंतरही काही बी ग्रेड सिनेमांना चित्रगुप्त यांनी संगीत दिले. यानंतर ए.व्ही.एम. च्या ‘बरखा’ (१९५९), ‘मै चूप रहूंगी’ (१९६२), आणि ‘मै भी लडकी हूं’ (१९६४) या सिनेमांना त्यांनी मधुर संगीत दिले. आपल्या कारकिर्दीतला सुखद काळ ए.व्ही.एम. बरोबर होता असे ते नेहमी म्हणत. जाॅनी गोम्स आणि दिलिप ढोलकिया त्यांचे संगीत संयोजक होते. ‘काली टोपी लाल रुमाल’ सिनेमाच्या वेळी पार्श्वसंगीत करण्यासाठी दत्ता डावजेकरांना बोलावले. त्यांचे काम चित्रगुप्तना फार पसंत पडले. तेव्हापासून दत्ता डावजेकर त्यांचे संगीत संयोजक बनले. दत्ता डावजेकरांशी त्यांचे संबंध शेवटपर्यंत घरोब्याचे होते. इतकेच नाही तर चित्रगुप्तची मुले आनंद मिलिंद संगीतकार बनल्यावर दत्ता डावजेकरांनी त्यांच्याकडे पण संगीत संयोजन केले.
सिनेविश्वात स्थिरावल्यावर चित्रगुप्त खार येथल्या १४ व्या रस्त्यावर रहायला गेले. या आधी त्या जागेत संगीतकार मदनमोहन रहात असत. महंमद रफी रोज सकाळी घरी येत. लतादिदी पण कधीकधी येत. किशोर कुमार येत आले की ‘सर्दी का बुखार बुरा, बनियेका उधार बुरा’ हे चित्रगुप्तनी संगीत दिलेल्या ‘मनचला’ (१९५३) सिनेमातले गाणे नेहमी गुणगुणत. याच सिनेमातले चित्रगुप्तनी गायलेले ‘भगवान तुझे मै खत लिखू’ खूप गाजले होते. दिग्दर्शक फणी मुझुमदार येत. चित्रगुप्त आणि त्यांचे सूर जूळले होते. फणी मुझुमदार यांच्या सिनेमाचे संगीत देताना चित्रगुप्त खुश असत कारण ते कधीही त्यांच्या कामात ढवळाढवळ करत नसत. ‘औलाद’ चे संगीत चित्रगुप्त करत होते. यातले गाणे ‘जोडी हमारी कैसे जानी’ या गाण्याची चाल मेहमूदला पसंत नव्हती. अस्वस्थ झालेल्या चित्रगुप्तनी अरुणा इराणी ला चाल ऐकवली. तिने मेहमूद ला समजावले. ‘औलाद’ चे हे गाणे सुपरहिट झाले.
साहीर आणि चित्रगुप्त पहिल्यांदा एकत्र आले १९६८ सालच्या ‘वासना’ सिनेमात. यानंतर १९७१ च्या ‘संसार’ सिनेमात परत हे दोघे एकत्र आले. आपल्या गीतकारांबरोबर त्यांचे संबंध नेहमी मैत्रीपूर्ण असत. शैलेंद्र जवळच रहायचे. ते पण नेहमी चित्रगुप्त यांच्या घरी यायचे. घरी आल्यावर मात्र दोघांचा संवाद भोजपुरी भाषेत चालायचा. शैलेंद्र आणि चित्रगुप्त यांनी फार कमी वेळा एकत्र काम केले. पहिला भोजपुरी सिनेमा ‘गंगा मय्या तोहे पियरी चढाओ’ ला चित्रगुप्त चे संगीत होते आणि शेलेंद्रने अप्रतिम गीते लिहीली. यातले ‘सोनवा के पिंजरे मे’ फार ह्रदयस्पर्शी होते. प्रेमधवन आणि चित्रगुप्त एकत्र काम करताना आरे काॅलनीत फिरायला जात. तिथे त्यांच्या गीतांना चित्रगुप्त चाली लावत.
१९६५ नंतर हिंदी सिनेमाचा ट्रेंड बदलायला सुरुवात झाली. जुने संगीतकार मागे पडायला सुरुवात झाली. लक्ष्मी-प्यारे , आर.डी. यांचे वचर्स्व वाढायला लागले. चित्रगुप्तना त्यांचे संगीत संयोजक बदला असाही सल्ला द्यायला काही लोकांनी सुरुवात केली. चित्रगुप्त नाराज झाले पण आपली शैली न बदलता जिद्दीने ‘उंचे लोग’, ‘आकाशदीप’, ‘वासना’, ‘औलाद’ या सारख्या यशस्वी सिनेमांना मधुर संगीत दिले. १९६८ साली आलेल्या ह्रदयविकाराच्या झटक्यातून सावरल्यावर ‘साज और सनम’, ‘इंतजार’, ‘अंगारे’ या सिनेमांना त्यानी संगीत दिले पण हे सिनेमे अपयशी झाले. १९७४ साली त्यांना अर्धांगवायु चा झटका आला. त्यातून ते ९० टक्के सुधारले. आर्थिक गणित बिघडले. गाडी विकून टाकावी लागली. १९७९ च्या ‘बलम परदेसियां’ या भोजपुरी सिनेमाच्या यशानंतर परत उर्जीतवस्था आली. चित्रगुप्त ८० च्या दशकात भोजपुरी सिनेमातले यशस्वी संगीतकार बनले. काही लो बजेट हिंदी सिनेमांना पण त्यांनी संगीत दिले. कालांतराने दोन्ही मुले आनंद आणि मिलिंद संगीतकार बनले. त्यांच्या ‘कयामत से कयामत तक’ सिनेमाला सर्वोकृष्ट संगीताचे फिल्मफेअर अवाॅर्ड मिळाले. त्या रात्री आनंद मिलिंद उशीरा घरी पोहोचले. वडिलांना झोपेतून उठवून आपले बक्षिस त्यांना दाखवल्यावर त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. जे मला आयुष्यभर जमले नाही ते तुम्ही करुन दाखवले असे त्यांनी मुलांना सांगितले. १९९० डिसेंबरला त्यांच्या मुलाचे मिलिंदचे लग्न झाले आणि महिनाभराने म्हणजे १४ जानेवारी १९९१ ला चित्रगुप्त आपल्यातून गेले.
दिडशे सिनेमांना संगीत देणारे चित्रगुप्त विसरता येत नाहीत. हे एकमेव संगीतकार जे डबल एम.ए. होते. चित्रगुप्तना माझी आदरांजली.
Vivek Puntambekar
Science Graduate from Somayya College in the year 1977.
Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.
Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.
Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.
Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.
Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.