-विजय न्यायाधीश

Birthday Greetings to India’s Renowned Playback Singer Suman Kalyanpur मराठी, हिंदी चित्रपटातील गाणी असो की, भावगीत – भक्तीगीत. प्रत्येक ठिकाणी आपल्या गायकीचा स्वतंत्र असा ठसा उमटविणाऱ्या ज्या गायक कलावंतानी संगीत क्षेत्रात बहुमोल असे योगदान दिलेले आहे त्यामध्ये सुमन कल्याणपूर या गायिकेचा अग्रक्रमाने उल्लेख केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या या गायिकेने जवळपास तीन ते साडेतीन दशके आपल्या मधूर आवाजाने रसिकांच्या मनाला मोहिनी घातलेली होती. मराठी, हिंदी व्यतिरिक्त इतरही भाषांमध्ये शेकडो गाणी सादर करुन त्यांनी आपल्या गायनकलेतील वैविध्याचा अविष्कार रसिकांपुढे ठेवला आहे. आजही सुमनजींची अनेक गाणी रसिकांच्या कानामनात रुंजी घालताना आढळतात. आज २८ जानेवारी रोजी सुमनजी वयाच्या ८४ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.

संगीतक्षेत्रात प्रदिर्घ काळ कार्यरत असलेल्या या प्रतिभावान गायिकेचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात १९३७ साली ढाका येथे झाला होता. स्वातंत्र्यानंतर १९४३ साली आपल्या कुटुंबियासोबत त्या मुंबईत दाखल झाल्या. लहानपणापासून चित्रकला आणि गाण्याची आवड असलेल्या सुमनजींना मुंबईत आल्यावर खऱ्या अर्थाने सूर गवसला. ख्यातनाम संगीतकार केशवराव भोळे यांच्याकडे त्यांनी गायनकलेचा श्रीगणेशा केला. त्यानंतर उस्ताद खान अब्दूल रहेमान खान यांच्याकडे त्यांनी प्रोफेशनल गायिकेचे धडे घेतले. १९५३ साली प्रदर्शित झालेल्या ‘ सुखाची चांदणी ‘ या मराठी चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केले. त्यानंतर लगेचच ‘ मंगू ‘ या हिंदी चित्रपटात त्यांना संधी मिळाली. ‘ पसंत आहे मुलगी ‘ या चित्रपटातील ‘ भातुकलीचा खेळ मांडला ‘ हे सुमनजींचे गाणे हिट झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना मराठी चित्रपटसंगीताची दारे खुली झाली.

singer suman kalyanpur

मराठीसोबतच हिंदी चित्रपटातही त्यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण करण्यास प्रारंभ केला होता. एकल आणि युगल अशा दोन्ही गीत प्रकारात त्यांनी गायलेली गाणी रसिकांच्या कायम स्मरणात आहेत. महंमद रफिसोबतची त्यांची गाणी विशेष गाजली. आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर, ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे, पर्बतो के पेड पर शाम का सवेरा, तुमने पुकारा और हम चले आए, मेरा प्यार भी तू है ये बहार भी तू है अशा त्यांच्या अनेक गाण्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठलेला आहे. ‘ अजहून आये बालमा सावन बिता जाये ‘ हे गाणे शास्त्रीय संगीतावर आधारीत गाण्यांपैकी एक उत्क्रुष्ट गाणे म्हणून ओळखले जाते. रफिसोबत सुमनजींनी जवळपास दिडशे गाणी गायली. मराठी भावगीत आणि भक्तीगीतांमध्येही सुमनजींनी आपला एक रसिकवर्ग निर्माण केलेला आहे.

singer suman kalyanpur

प्रख्यात संगीतकार अशोक पत्की, गीतकार अशोकजी परांजपे आणि सुमन कल्याणपूर या त्रयीने मराठीमध्ये एकापेक्षा एक सुश्राव्य गाणी दिली आहेत. ‘केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर ‘, ‘वाट इथे स्वप्नातील संपली जणू ‘, ‘नाविका रे वारा वाहे रे ‘ ‘ ही काही या त्रयीची गाणी आजही ऐकाविशी वाटतात. या व्यतिरिक्त ‘ केशवा माधवा ‘, ‘ ओंकार प्रधान रुप गणेशाचे ‘ ‘ सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले ‘ या काही गाण्यांनी रसिकांच्या मनावर गारुड करुन राहिलेली आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजाशी साधर्म्य सांगणाऱ्या या प्रतिभावान गायिकेला महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.

अशा ही प्रतिभावान गायिका आज दि. २८ रोजी ८४ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांना संगीतमय हार्दिक शुभेच्छा.

Vijay Nyayadhish
+ posts

Leave a comment