-© नयना पिकळे

दुर्गा खोटे म्हणजेच बॉलीवूड मधल्या अनेक दिग्गज अभिनेत्यांची लाडली “माँ”.
दुर्गा खोटे म्हणजे “आयोध्येचा राजा” मधली राणी तारामती ….
दुर्गा खोटे म्हणजे “मुघल ए आझम” मधली महाराणी जोधाबाई …..
दुर्गा खोटे म्हणजे “बॉबी” मधली प्रेमळ आजी मिसेस ब्रिगेंझा …..
पण दुर्गा खोटेंची केवळ इतकीच ओळख नाहीये . ह्या व्यतिरिक्त देखील त्या खूप काही होत्या
म्हणूनच आज त्यांच्या जन्मदिवशी जाणून घेऊया बॉलीवूडच्या ह्या लाडक्या माँ विषयी ..

आजपासून ११६ वर्षांपूर्वी एका अत्यंत कर्मठ पारंपरिक ब्राह्मण कुटुंबात १४ जानेवारी १९०५ रोजी दुर्गा खोटे यांचा जन्म झाला. मूळ गोव्याच्या असलेल्या दुर्गा खोटेंचं त्या काळी म्हणजे शंभर वर्षांपूर्वी बी ए पर्यन्तचं शिक्षण झालेलं होतं. वयाच्या १८ व्या वर्षी शिक्षण सुरू असतानाच त्यांचा विवाह विश्वनाथ खोटे ह्या मेकॅनिकल इंजिनीयर असलेल्या एका सधन प्रतिष्ठित कुटुंबातील उमद्या तरुणा बरोबर झाला. दोन गोजिरवाणी मूल झाली. अगदी दृष्ट लागेल असाच त्यांचा संसार होता. आणि खरंच कुणाचीतरी दृष्टच लागली जणू. वयाच्या अवघ्या सव्विसाव्या वर्षी दुर्गा खोटेंच्या पतीचे दुर्दैवी निधन झाले आणि त्यांच्या नशिबी वैधव्य आले. शिवाय पदरी २ लहान मुले.

Durga Khote

सुरुवातीला काही काळ मुलांना घेऊन त्या सासरी राहिल्या. पण नंतर त्यांना आपल्या मुलांचे शिक्षण आणि योग्य पालनपोषणासाठी स्वत: कमावणं गरजेचं वाटलं आणि त्यासाठी त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. १९३० चा तो काळही असा होता की स्त्रियांच्या भूमिकासुद्धा त्याकाळी पुरुषांनी करायची पद्धत होती. नाटक सिनेमात स्त्रियांनी काम करण कमीपणाचं मानल जाई, त्यांच्याकडे तिरस्कृत नजरेने पाहिलं जाई. तर मग विचार करा की सुमारे १०० वर्षांपूर्वी त्यांच्या ह्या निर्णयाने काय गदारोळ माजवला असेल. पण दुर्गा ताई अजिबात डगमगल्या नाहीत. आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या ओळखींच्या आधारे दुर्गा खोटेंनी नुकत्याच सुरू झालेल्या चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळवला.
१९३१ सालचा प्रभात फिल्म्सचा मुकपट “फरेबी जाल” हा त्यांचा पहिला हिन्दी चित्रपट. १९३२ साली हिन्दी व मराठी अशा दोन्ही भाषेतून बनलेल्या व्ही शांताराम ह्यांच्या प्रभातनेच दिग्दर्शित केलेल्या “अयोध्येचा राजा” चित्रपटात दुर्गा खोटेंना राणी तरामतीची भूमिका मिळाली. ही भूमिका अजरामर करून दुर्गाताईंनी मिळालेल्या संधीच सोनं केलं. हा चित्रपट मराठीतील पहिला बोलपट मानला जातो.

Durga Khote in Ayodhyecha Raja
Durga Khote in Ayodhyecha Raja

 

 

त्यानंतर आले
“ माया मच्छीन्द्र” (१९३२) ह्या चित्रपटाची खासियत म्हणजे ह्यात एक चित्ता दुर्गा खोटेंचा पाळीव प्राणी होता.
“राजरानी मीरा” (१९३३) ह्या चित्रपटामुळे अभिनेता पृथ्वीराज कपूर ( राज कपूरचे वडील) ह्यांना अभिनेता म्हणून सर्वप्रथम प्रसिद्धी मिळाली असे मानले जाते.
“सीता” (बंगाली बोलपट – १९३४) आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात पाठवण्यात आलेला हा पहीला भारतीय बोलपट होता . ह्या चित्रपटाला व्हेनीस आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात हॉनररी डिप्लोमा पुरस्कार मिळाला .
“अमर ज्योति” (१९३६) व्ही शांताराम ह्यांनी दिग्दर्शित केलेला हा त्याकाळचा अत्यंत गाजलेला थ्रिलर चित्रपट . ह्यात दुर्गा खोटे ह्यांनी एका बंडखोर स्त्री समुद्री चाची (pirate) ची अगदी अनोखी भूमिका केली होती.
दुर्गा खोटेंनी साकारलेल्या अशा ऐतिहासिक , सामाजिक व काहीशा अनोख्या भूमिकांमुळे त्यांना रासिकांचे उदंड प्रेम व प्रतिसाद मिळाला . त्यांनी आपल्या भूमिकां मार्फत स्वतःचा असा काही ठसा निर्माण केला की लोकांचा चित्रपटातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू लागला.

ज्यावेळी दुर्गा खोटेंनी चित्रपटात भूमिका करायला सुरुवात केली त्याकाळी बहुतेक कलाकार कोणत्यातरी एका विशिष्ट स्टूडियोत ठराविक पगारावर काम करायचे . पण स्वतंत्र वृत्तीच्या दुर्गा खोटेंनी मात्र स्वत:ला असं कोणत्याही एका स्टुडिओशी बांधून घेणं नाकारलं . त्यांनी प्रभात फिल्मस बरोबरच न्यू थियेटर्स, ईस्ट इंडिया फिल्म कंपनी, प्रकाश पिक्चर्स अशा इतर चित्रपट निर्मात्यांसाठी देखील काम केलं. दुर्गा खोटेंना मराठी चित्रपटातील पहिली नायिका म्हणून तर मान दिला जातोच . पण केवळ चित्रपटातील भूमिका करून त्या थांबल्या नाहीत तर १९३७ साली “साथी” नावाचा चित्रपट निर्माण व दिग्दर्शित करून पहिली महिला निर्माती व दिग्दर्शिका व्हायचा मान देखील त्यांनी पटकावला.

त्याकाळी केवळ राजेशाही लोकांचे वाहन मानल्या जाणाऱ्या व अगदी मोजक्या लोकांना परवडणाऱ्या मर्सिडिज बेन्जच्या १९३० च्या जाहिरातीतही दुर्गा खोटेंनी मॉडेल म्हणून काम केलं आहे. दुर्गा खोटे यांनी मराठी रंगभूमीवरही आपली छाप पाडली आहे . शेक्सपीयर लिखित मॅकबेथवर आधारीत “राजमुकूट” हे त्यांचे गाजलेले नाटक. तसेच “भाऊबंदकी” नाटकातली त्यांनी साकारलेली आनंदीबाई पेशवे ह्यांची भूमिकाही विशेष वाखाणली गेली. अत्यंत सोज्वळ , सात्विक सौंदर्य आणि जोडीला अपार कष्ट व प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ह्यांच्या जोरावर दुर्गा खोटेनी चित्रपट सृष्टीत स्वत:च असं एक अढळ स्थान बनवलं.

Durga Khote with Dilip Kumar in Mughal-E-Azam
Durga Khote with Dilip Kumar in Mughal-E-Azam

१९३१ (फरेबी जाल) पासून १९८० (कर्ज) पर्यन्त जवळ जवळ ५ दशक त्यांनी अनेक चित्रपटात भूमिका केल्या. ह्या त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक अविस्मरणीय भूमिका केल्या. त्यांच्या नायिकेच्या भूमिकाइतक्याच त्यांच्या चरित्र भूमिका देखील गाजल्या. “मुघल ए आझम” (१९६०) मधील कर्तव्यदक्ष पत्नी आणि प्रेमळ आई ह्यांच्या कात्रीत सापडलेली जोधाबाईची अजरामर भूमिका
बॉबी – १९७३ मधली बॉबीची आजी ,
अभिमान – १९७३ मधली दुर्गा मौसी
ह्या त्यांच्या भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहेत .

त्याच बरोबर मुसाफिर- १९५७, मनमौजी – १९६२, अनुपमा – १९६६, खिलौना – १९७०, बावरची – १९७२, बिदाई – १९७४, जानेमन – १९७६, कर्ज – १९८० अशा इतर अनेक चित्रपटातून त्यांनी सुरेख भूमिका केल्या.

ह्याच दरम्यान आणखी एक दुर्दैवी घटना घडली. अनेक दिग्गज अभिनेत्यांची माँ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गा खोटेंच्या स्वतःच्या मुलाचा ( हरिन चा ) मृत्यू झाला. हा मानसिक आघात पचवणं त्यांना खूपच जड गेलं. पण मनावर दगड ठेऊन त्यांनी ह्यावर देखील मात केली आणि नंतर मात्र त्या समस्त हिन्दी सिनेसृष्टीच्याच जणू माँ बनल्या. डोळ्यातून वात्सल्य ओसंडून वाहणारी, चेहऱ्यावर ओतप्रोत माया दाटलेलं हास्य आणि वेळप्रसंगी आपल्याच मुलाच्या विरुद्ध जाऊन त्याला योग्य रस्ता दाखवायची हिम्मत दाखवणारी बाणेदार तेजस्वी माँ. त्याकाळी साकारल्या गेलेल्या इतर अनेक अभिनेत्रींच्या असहाय्य मुळूमुळु रडणाऱ्या माँ पेक्षा ही मायाळू प्रेमळ पण तितकीच खंबीर कणखर माँ रसिक प्रेक्षकांना मनापासून भावली .

दुर्गा खोटेंना आपल्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले.
“चरणो की दासी” – सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार (१९४२) , “भरत मिलाप” – सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार (१९४३), बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन पुरस्कार (१९४३) , संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (१९५८) , पद्मश्री पुरस्कार (१९६८) , “बिदाई” – बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचा फिल्म फेअर पुरस्कार (१९७४) . ह्या व्यतिरिक्त १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार ह्या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलं .

इंडिया टुडे च्या मिलेनियम इयर २००० च्या विशेष आवृत्तीत “100 people who shaped India” ह्या यादीत त्यांचा समावेश केला गेला. तसेच ३ मे २०१९ रोजी भारतीय टपाल खात्याने त्यांच्या नावाचे तिकिट जारी केले.

Durga Khote Autobiography

दुर्गा खोटेंनी मराठी भाषेत “मी दुर्गा खोटे” हे आत्मचरित्र लिहिले ज्याचा “I , Durga Khote” हा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला.
समोर आलेल्या संकटांचा सामना करत , परिस्थितीशी झुंजत , स्वतःच्या आयुष्यांचे शक्य तितके सार्थक करणाऱ्या दुर्गा खोटेंचे वयाच्या ८६ व्या वर्षी २२ सप्टेंबर १९९१ रोजी निधन झाले .

अशा ह्या प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानणाऱ्या, कोणत्याही संकटात न डगमगणाऱ्या आणि आलेल्या प्रत्येक प्रसंगावर धैर्याने मात करणाऱ्या कर्तबगार अभिनेत्री दुर्गा खोटे ह्यांच्या ११६ व्या जन्मदिना निमित्त आज ही त्यांना वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली .

Nayana Pikle
+ posts

सौ नयना सतीश पिकळे

शिक्षण -
बी एस्सी रसायनशास्त्र
एम ए संस्कृत (वेदांत)
मोबाईल - ९९६७०५३९६७

एच एस बी सी बॅन्केत नोकरी (१९९२-२००३)

बी ए संस्कृतच्या खाजगी शिकवण्या .

मराठी विश्वकोशासाठी नोंदी करणे .

यशोवाणी संस्थेतर्फे अंध मुलांसाठी आॅडियो बुक्सचे रेकाॅर्डींग करणे .

सांगितिक कार्यक्रमांसाठी स्क्रीप्ट लिहिणे आणि निवेदन करणे.

सिने-संगीत व सिनेमा विषयक लेखन करणे .

Leave a comment