– डॉ. राजू पाटोदकर

इंग्रजी नववर्षाच्या प्रारंभी येणारा महत्वाचा सण म्हणजे मकरसंक्रांत. संक्रांत काही ठिकाणी पोंगल म्हणून साजरी केली जाते. तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत सर्वजण पतंगबाजीचा शौक पुरा करण्यात गुंतलेले असतात. उंच निळ्याशार आभाळात विविध रंगांचे, विविध आकाराचे पतंग जेव्हा वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करु लागतात तेव्हा आपल मनही त्या पतंगासमवेत खुल्या आसमानात मुक्त संचार करते. हिंदी, मराठी चित्रपटांतून या पतंगाच्या संदर्भात खुप छान गाणी चित्रीत करण्यात आली आहेत. ती लोकप्रिय देखील आहेत. चला तर मग पाहुयात अशीच काही पतंगाची मजा लुटणारी गाणी… चली ‘चली रे पतंग, मेरी चली रे’ ते ‘बाई मी पतंग उडवीत होते..’

पतंगबाजीचा छंदच मुळी आगळावेगळा आहे. मध्यंतरीच्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या नवनविन मनोरंजनाच्या गराड्यात थोडासा हा छंद मागे पडल्यासारखा वाटतो. त्यामुळे आताच्या काळात पतंगावरची गाणी थोडी कमी झालेली आहे मात्र ‘हम दिल चुके सनम’ सारख्या अपवादात्मक चित्रपटात ती प्रामुख्याने आल्याने जरा बरे वाटले. ब्लॅक अँन्ड व्हाईटच्या जमान्यात मात्र निर्मात्यांचा पतंगबाजीवरच जोर होता.. ..

chali chali re patang meri song from bhabhi

चली चली रे पतंग
‘भाभी’ हा 1957 या वर्षी प्रदर्शित झालेला अत्यंत सुंदर चित्रपट. या चित्रपटातील “चली चली रे पतंग, मेरी चली रे” हे जगदीप या कलावंतावर चित्रीत झालेले एक गीत. गीतकारांनी पतंगाच्या रुपातून एक मनमौजी तरुणाच्या मनाची स्पंदने शब्दबध्द केली आहेत. तारुण्यात जगदीपसारख्या विनोदी अभिनेत्याला हे गीत गातांना आता पहायला खुप वेगळे वाटते. हा चित्रपट ब्लॅक ऍ़न्ड व्हाईट जरी असला तरी तो नजरेला सुखद वाटतो. गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार चित्रगुप्त, गायक मोहम्मद रफी, लता मंगेशकर. दिग्दर्शक क्रिशन पंजू आणि कलाकार बलराज सहानी, नंदा, ओम प्रकाश, दुर्गा खोटे. हे आहेत. हे गीत बरेच लोकप्रिय आहे.

 

ये दुनिया पतंग
‘पतंग’ या नावाचाच एक चित्रपट 1960 या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील “ये दुनिया पतंग, नित बदले ये रंग, कोई जाने ना, उडाने वाला कौन है” हे रफी साहेबांच्या आवाजातील हे एक गीत. जगदीप प्रमाणेच ओमप्रकाश या विनोदी कलावंतावर हे गीत चित्रीत करण्यात आलेले आहे. चित्रपट ब्लॅक ऍ़न्ड व्हाईट आहे. या गीतातून जगरहाटीचा सखोल अर्थ सांगण्यात गीतकार यशस्वी झाले आहेत. गीताच्या एका कडव्यात ते म्हणतात “सब अपनी उडाये, यह जाने ना पाये, कब किसकी चढे, किसकी कट जाये” अत्यंत साध्या, सोप्या शब्दात जीवनसत्य सांगण्याचा उत्तम प्रयत्न या गीतात आहे. छानसे चित्रीकरण, ओमप्रकाश यांचा त्यास साजेसा असा अभिनय, बालगोपाळांचा जल्लोश आणि पतंगबाजी असलेले ही गीत आहे. या गीताचे सॅड आणि हॅपी असे दोन व्हर्जन आहेत. गीत राजेंद्र कृष्ण यांचे तर संगीत चित्रगुप्त यांचे आहे.

Patang 1960 film poster

मेरी प्यारी पतंग
शमशाद बेगम आणि उमा देवी म्हणजे टुनटुन यांच्या आवाजातील एक सुरेख गीत 1949 या वर्षी प्रदर्शित झालेल्या दिल्लगी या चित्रपटात आहे. नायिका आपल्या मैत्रिणीसह खुल्या मैदानात पतंगबाजीचा शौक पूर्ण करतांना हे गाणे चित्रीत केलेले आहे. या गाण्याचे बोल “मेरी प्यारी पतंग, चली बादल के संग, जरा धिरे धिरे हो जरा होले होले, दे ढिल दे ढिल ओ री सखी”, असे आहेत. आपल्या मैत्रिणीला ती सांगते की, माझा पतंग हा आसमानात भरारी घेत आहे आणि तु थोडी ढिल दे. दिग्दर्शक ए.आर.कारदार यांच्या या चित्रपटातील गीत पाहतांना त्यातील तत्कालीन चित्रीकरणाचे तंत्र, तसेच वेगळ्या लकबी सहजतेने लक्षात येऊ शकतात. जुन्या गाण्याचा आनंद घेण्यासाठी पतंगबाजीवरचे हे एक सुरेख गीत आहे. या गीताचे गीतकार शकील बदायुनी हे असून संगीतकार नौशादजी आहेत.

पतंग मेरी छोड दे
साधारणत: 50 ते 70 च्या दशकामध्ये जे चित्रपट प्रदर्शित झाले त्या चित्रपटात विविध सणासुदीवर आधारीत गाणीही होती. अगदी प्रत्यक्षात तो सण नसला तरी त्या सणाचे महत्व अथवा वर्णन गाण्यातून येत. अशीच काही गाणी पतंगाच्या बाबतीतही आहे. आता हेच पहा ना! 1954 या वर्षी प्रदर्शित झालेला नागिन हा चित्रपट. हेंमत कुमार आणि लता दिदींच्या आवाजातील एक कर्णमधूर असे गीत “अरे छोड दे सजनियॉ छोड दे पतंग मेरी छोड दे, ऐसे छोडु ना बलमा नैनवा के डोर पहले छोड दे” या चित्रपटात आहे. प्रत्यक्षात पतंगबाजी नसली तरी संपूर्ण गाण्यात पतंगासंदर्भातील वर्णन सांगण्यात गीतकार राजेंद्र कृष्णजी यशस्वी झालेले आहेत. प्रदिप कुमार, वैजंयतीमाला यांच्यावर चित्रीत झालेले हे गीत असून रंगमंचावर हे गीत सादर झालेले आहे. मात्र हे पाहतांना आणि ऐकतांना पतंगबाजीची मजा येते.

पिया मै हु पतंग
अशाच प्रकारचे एक गीत 1958 या वर्षी प्रदर्शित झालेल्या रागिणी या अशोक कुमार, किशोर कुमार, पद्मिनी यांच्या चित्रपटात आहे. किशोर कुमार कलावंत म्हणून पाहतांना जी मजा येते ती शब्दात वर्णन न करता येण्यासारखी आहे. आशा दिदींसोबत किशोरदांनी गायलेले “पिया मै हु पतंग तु है डोर मै उडती चारो और मेरा दिल ये जवॉ रहे बस मे कहा जब छाये घटा घनघोर” हे ते गीत. जान निसार अख्तर यांच्या शब्दरचनेला संगीताचा साज ओ.पी.नय्यरजींनी खुपच सुरेखरित्या दिलेला आहे. हे गीत पाहतांना असे लक्षात येते की, हे रोमॅन्टिक आणि छेडछाडीचे वर्णन केलेले गीत आहे. आकाशात स्वच्छंदपणे उडणाऱ्या पतंगाचे आणि पतंगाच्या दोरीचे जसे नाते असते तसे आपले नाते असल्याचे प्रेयसी आपल्या प्रियकराला गीताच्या माध्यमातून सांगतांना दिसते. एकदा पहाच.. ..

Kati Patang movie poster

तर चक्क कटी पतंग नावाचा देखील एक प्रसिध्द असा चित्रपट आहे. सुपरस्टार राजेश खन्ना व आशा पारेख अभिनीत या चित्रपटातील “ना कोई उमंग है, ना कोई तरंग है, मेरी जिंदगी है क्या, एक कटी पतंग है” हे एक गीत खुपच लोकप्रिय आहे. प्रत्यक्षात या गाण्याच्या वेळी पतंगबाजी वगैरे काही नाही. एक सॅड साँग आहे. लता दिदींचा आवाजातील हे गीत आनंद बक्षी यांनी रचले असून संगीतकार आर.डी.बर्मन हे आहेत. चित्रपटातील सिच्युवेशननूसार एका तरुण विधवा महिलेच्या जीवनातील घडलेल्या प्रसंगांवर काहीसे आधारित असलेले हे गीत आहे. 1971 या वर्षी निर्माता दिग्दर्शक शक्ती सामंता यांनी हा चित्रपट प्रदर्शित केला होता. चित्रपट व यातील गाणी प्रचंड लोकप्रिय झाली.

पतंग को ढिल दे रे भैया
अगदी अलिकडच्या काळात एक भन्नाट असे पतंगबाजीवरचे गीत सलमान खान, ऐश्वर्या रॉय, अजय देवगण अशा दिग्गज कलावंतांचा सुपरहिट ‘हम दिल चुके सनम’या चित्रपटात होते. दिग्दर्शक संजय लिला भन्साली यांनी 1999 या वर्षी प्रदर्शित केला होता. या चित्रपटातील पतंगबाजीवरचे ” ये ढिल दे ढिल दे दे रे भैय्या, उस पतंग को ढिल दे रे भैया, उस पतंग को ढिल दे” हे गीत खुपच गाजले. अगदी पतंगबाजीचे खास गीत म्हणूनही याचा उल्लेख करता येईल असेच हे गीत आहे. राजस्थानच्या राजमहलाच्या गच्चीवर सामुहिक पतंगबाजी करतांनाचे हे गीत पाहतांना तसेच ऐकतानाही आनंद मिळतो. लोकसंगीताचे उत्तम मिश्रण यात ऐकावयास मिळेल. उत्कृष्ट चित्रीकरण, कलाकारांचा उत्तम अभिनय, गीत-संगीताची अचूक ठेव आणि अतिउत्कृष्ट असे नृत्य दिग्दर्शन असे सर्वच काही या गीतात जुळून आले आहे. मेहबूब यांनी रचलेल्या या गीताला संगीताचा साज चढविला आहे इस्माईल दरबार यांनी. शंकर महादेवन, के.के., दमयंती बरदाई, ज्योत्स्ना हार्डीकर आदि दिग्गज गायकांच्या आवाजातील हे गीत आजही लोकप्रिय आहे.

dhil de song from hum dil de chuke sanam

बाई मी पतंग उडवित
मराठी चित्रपटसृष्टीचाही पतंगबाजीच्या बाबत अपवाद नाही. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर असे सांगता येईल की, सिध्दहस्तलेखक ग.दि.माडगुळकर म्हणजेच ग.दि.मा. यांच्या लेखनीतून साकारलेली एक लावणी ‘लाखात अशी देखणी’ या चित्रपटात आहे. लावणीचे बोल “चढा ओढीने चढवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते” असे आहेत. जयश्री गडकर यांच्यावर चित्रीत झालेली ही लावणी पाहतांना लावणीचे सौदंर्य अनुभवता येते. लावणीचे शब्द, त्याला मिळालेले संगीत आणि कलावंतानी सादर केलेली अदाकारी जेव्हा जुळून येते तेव्हा लोकप्रियतेचा मुकुट आपोआपच त्या गीतावर चढला जातो. असेच काहीसे या लावणीबद्दल झालेले आहे. मराठीतील काही गाजलेल्या लावण्यापैकी ही लावणी असून संगीत सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे आहे.

bai mi patang udvit hote song

ही काही प्रातिनिधीक गाणी संक्रांतीच्या निमित्ताने खास वाचकांसाठी आहेत. तेव्हा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.. आणि हो कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळा.
……………………………….

raju patodkar
Dr Raju Patodkar
+ posts

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई येथे वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती) (वर्ग-1) या पदावर कार्यरत.

शिक्षण- पीएच.डी, एम.ए., (जर्नालिझम), एम.ए., (मराठी), एम.ए., (राज्यशास्त्र), एम.ए., (समाजशास्त्र), बॅचलर इन ड्रामा, हिंदी (पंडित), जीडीसीए, बी.कॉम, बी.जे., जवळपास दोनशे मराठी, हिंदी मालिका तसेच 25 मराठी चित्रपटात अभिनय. राज्यातील विविध वर्तमान पत्रातून लेखन. जवळपास 5 हजार लेख-मुलाखती प्रकाशित.

पी.एच.डी. विषय श्री. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील सामाजिक वास्तवाचा संवाद एक चिकित्सक अभ्यास. (1975 ते 2005)

भ्रमणध्वनी क्र.- 9892108365.

Leave a comment