त्या वर्षी आजच्या दिवशी-एका पतंगाची पन्नाशी

-अजिंक्य उजळंबकर 

 

साल १९७१. आज सत्तरी गाठलेली पिढी तेंव्हा २०-२१ ची होती. तारुण्य फॉर्मात असण्याचे वय. सायकल हा तेंव्हा रुबाब होता. कॉलेज जवळच्या चहा-सुट्ट्याच्या अड्ड्यावर, कट चहाचे फुरके मारत व सिगारेट्स चे गोलाकार धूर सोडत, त्याच हॉटेलातील रेडिओवर बिनाका गीतमालाची गाणी मित्रांसोबत ऐकणे हा ७० च्या तरुणाईचा खास टाईमपास. सत्तरच्या अखेरीस जन्मलेली माझी पिढी जेंव्हा ९० च्या मध्यात कॉलेजात पोहोचली तेंव्हा या पिढीला आपल्या बापलोकांनी स्वतःच्या तरुणाईचे खास किस्से ऐकवायला सुरुवात केली. म्हणजे आमचे तीन खान फॉर्मात आल्याचे पाहून त्यांना त्यांचा कॉलेजच्या दिवसातला खन्ना आठवला. जादू या शब्दाचा समानार्थी शब्द तेंव्हा राजेश खन्ना हा होता. जळी, स्थळी, काष्ठी त्याला शोधणारी साल १९७०-७१ ची तरुणी, आपला प्रियकर, नवरा असावा तर तो केवळ राजेश खन्ना सारखाच असावा ही प्रार्थना देवाजवळ खरंच करत होती का नाही याची खात्री नसेल तर त्याची खातरजमा प्रत्येकाने घरातील आपल्या आधीच्या पिढीला विचारून करून घ्यावी. 

१९६६ साली हिंदी सिनेसृष्टीत आलेल्या राजेश खन्ना नावाच्या वाऱ्याने हळू हळू वेग वाढवत १९६९ ते १९७२ या चार वर्षात तर चक्रीवादळाचे रूप धारण केले होते. सलग १५ सुपरहिट देत हिंदी सिनेमाला राजेश खन्ना नावाचा पहिला सुपरस्टार मिळाला होता. २५ ते ३० यशस्वी चित्रपट दिलेल्या १९७० सालच्या बॉक्स-ऑफिसवरील पहिल्या टॉप पाच सिनेमांत ३ सिनेमे काका अर्थात राजेश खन्नाचे होते. सच्चा झूठा, आन मिलो सजना व सफर ही ती तीन नावे. अशा एकंदर काकामय वातावरणात १९७१ साल उजाडले. १९७१ सालच्या पहिल्याच म्हणजे जानेवारी महिन्यातील संक्रांतीला हिंदी सिनेसृष्टीच्या आसमंतात राजेश खन्ना नावाचा जेंव्हा केवळ एकच पतंग उंचीवर डौलाने उडत होता तेंव्हाच नेमका आला कटी पतंग! 

Rajesh khanna and Asha Parekh in Kati Patang
Rajesh khanna and Asha Parekh in Kati Patang

एखाद्या व्यावसायिक सिनेमातील नायिका चित्रपटभर पांढऱ्या साडीत वावरत असेल तर अशा सिनेमाला त्याकाळी वितरक हात लावण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु कटी पतंग द्वारे ही जोखीम उचलली ती निर्माता शक्ती सामंता यांनी. कारण त्यांना दिग्दर्शक शक्ती सामंता यांच्यावर पूर्ण विश्वास होता. याआधी एकाहून एक अप्रतिम सिनेमे देत आलेल्या शक्ती सामंतांचादिग्दर्शक म्हणून कटी पतंग हा  १८ वा सिनेमा होता. कटी पतंगच्या जस्ट आधी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या राजेश खन्ना-शर्मिला टागोर जोडीचा ‘आराधना’ इतका मोठा हिट होता की ‘कटी पतंग’ येवोस्तर कित्येक ठिकाणी ‘आराधना’ किमान एक शोमध्ये तरी चालूच होता. ‘आराधना’ मध्ये एस.डी. बर्मन यांच्या संगीताने जादू केली होती व त्यात त्यांचे सहाय्यक होते त्यांचे छोटे नवाब आर.डी. बर्मन. शक्तीदांनी ‘कटी पतंग’ची जबाबदारी मात्र मुलाच्या म्हणजे आर.डी. च्या हातात दिली. हा शक्तीदांचा आर.डी सोबत पहिला व राजेश खन्ना सोबत दुसरा प्रोजेक्ट होता. संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पणानंतर भूत बंगला, तिसरी मंझिल व पडोसन नंतर आर.डी. बीग ब्रेकच्या शोधात होते. नवनवे प्रयोग करण्यासाठी आसुसलेल्या आर.डी. यांचे तेंव्हा वय होते केवळ ३० वर्षांचे.  १९७० सालचे इन मीन तीन सिनेमे या तरुणाला संगीतकार म्हणून मिळाले होते व तीनही सपशेल आपटले होते. आता शक्तीदांनी दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरत मिळालेल्या संधीचे सोने करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे तो ३० वर्षांचा तरुण जाणून होता.वडिलांचे नाव इतके मोठे की त्याचे दडपण वेगळे. अशा दडपणात हा तरुण कामाला लागला. झपाटून कामाला लागला. आराधना नंतर शक्तीदांनी गीतलेखनाची जबाबदारी पुन्हा एकदा आनंद बक्षींनाच दिली. 

Asha Parekh, Prem Chopra and Rajesh khanna in Kati Patang
Asha Parekh, Prem Chopra and Rajesh khanna in Kati Patang

१९४८ साली आलेली कर्नल वुलरीच लिखित लोकप्रिय इंग्रजी कादंबरी “आय मॅरीड अ डेड मॅन” वरून घेतलेल्या कथानकाच्या पटकथेची जबाबदारी शक्तीदांनी गुलशन नंदा व व्रजेंद्र गौर यांच्यावर टाकली होती जी त्यांनी व्यवस्थितरीत्या पार पाडली. गुलशन नंदा यांनी या कादंबरीवर आधारित कटी पतंग नावाचे पुस्तक लिहिले होते ज्यावर सिनेमाची कथा आधारित होती.  कथा-पटकथा व गीतलेखनानंतर आता शूटिंग सुरु होण्यापूर्वी संगीत दिग्दर्शनाची सर्वात महत्वाची जबाबदारी आर.डी. यांच्यावर होती. कारण पडद्यावर नायक राजेश खन्ना असल्यावर गाणी सुपरहिटच हवी हा एव्हाना अलिखित नियमच झाला होता. थोडक्यात सिनेमाच्या नावात जरी कटी असले तरी कुठला पतंग कटू नये म्हणून असलेली मांजाची जबाबदारी आर.डी. यांच्यावर होती. 

Mera Naam Hai Shabnam...Bindu, Asha parekh and Rajesh Khanna in Kati Patang
Mera Naam Hai Shabnam…Bindu, Asha parekh and Rajesh Khanna in Kati Patang

सचिनदेव बर्मन यांना संगीत दिग्दर्शनाच्या वेळेला पान खाण्याची सवय होती. बर्मनदांनी पान खाऊन दिलेले संगीत खास असायचे. बहुधा आराधना च्या वेळी बर्मनदांनी खूप सारी त्यांच्या आवडीची पाने खाल्ली असावीत. कटी पतंगच्या संगीताच्या वेळी आर.डी. यांनी मात्र काय खाल्ले होते देव जाणे! हा अवलिया माणूस असा काही फॉर्मात आला की बस्स. टोटल सात गाणी. सर्व किशोर कुमार आणि लता मंगेशकर या दोघांच्या आवाजात. मुकेश यांनी गायलेल्या केवळ एका गाण्याचा अपवाद. आणि एक कॅब्रे सॉंग ज्याला आशा भोसले व स्वतःचा आवाज वापरणे आर.डी. यांना अनिवार्य होते. राजेश खन्ना आणि किशोर कुमार म्हणजे जणू मेड फॉर इच आदर. भांग खाल्ल्यावर गोड खाल्ले की भांग चढते असे ऐकिवात आहे. हिंदी सिनेमाच्या संगीत इतिहासातले राजेश खन्ना आणि किशोर कुमार यांचे नाते असेच भांग आणि गोडाचे आहे. किशोरचा आवाज राजेश गातांना तो आणखीनच चढतो. “ये शाम मस्तानी, मदहोश किये जाए”, “प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है”, ” ये जो मोहब्बत है, ये उनका है काम” व  “आज ना छोड़ेंगे” अशा किशोरच्या आवाजातील भांगेत, पडद्यावर राजेश खन्नाने आपल्या स्वतःच्या गोड दिसण्याने, हसण्याने, अदांनी अशी काय नशा ओतली की विचारू नका. त्यात आशा भोसलेंच्या आवाजातले मेरा नाम है शबनम तर एकदम कडक. तुम्हारा नाम क्या है? विचारत जेंव्हा हळू हळू पीच वाढवत नेत  “इना? मीना? अंजु? मंजू?” म्हणत आशाताई जेंव्हा “या ….  मधू?” असे जेंव्हा त्यांच्या खास शैलीत गातात त्याला आज ५० वर्षे झाली तरी तोड नाही. लता मंगेशकर यांच्या आवाजातील शीर्षक गीत “ना कोई उमंग है, ना कोई तरंग है, मेरी जिंदगी है क्या? एक कटी पतंग है” साठी गीतकार आनंद बक्षींना फिल्मफेअर नामांकन मिळालं. राजेश खन्ना यांच्यावर सूट न होणारा आवाज असला तरी  मुकेश यांनी गायलेले “जिस गली में तेरा घर ना हो बालमा” या गाण्याला अपेक्षित दर्द केवळ मुकेशच देऊ शकत होते.

Director Shakti Samanta with Rajesh Khanna and Asha Parekh on the sets of Kati Patang
Director Shakti Samanta with Rajesh Khanna and Asha Parekh on the sets of Kati Patang

‘ये जो मोहब्बत है’ साठी किशोरदांना फिल्मफेअर नामांकन मिळालं. पुरस्कार नाही कारण बाजी मारली होती मन्ना डे यांनी ‘मेरा नाम जोकर’च्या ‘ए भाई जरा देखके चलो’ साठी.  इतर नामांकनात होते दिग्दर्शक शक्ती सामंता, कथाकार गुलशन नंदा व नायक राजेश खन्ना. इथेही अनुक्रमे राज कपूर (मेरा नाम जोकर), ह्रिषीकेश मुखर्जी (आनंद) व राजेश खन्ना (आनंद) यांनी बाजी मारली होती. म्हणजे ‘कटी पतंग’च्या राजेश खन्ना ला मात दिली होती ‘आनंद’च्या राजेश खन्ना ने!! या स्पर्धेत आणखी एक राजेश खन्ना होता. तो होता दुलाल गुहा यांच्या ‘दुश्मन’चा. एकूण सहा नामांकन कटी पतंगला मिळाली पण पुरस्कार घेऊन गेल्या आशा पारेख. आपल्या सुंदर अभिनयासाठी. चित्रपटभर पांढऱ्या साडीत वावरणारी नायिका कशी चालेल ही शंका उपस्थित करणाऱ्या सर्वांची तोंडे आशा पारेख यांनी आपल्या झकास अभिनयाने बंद केली होती. खरंतर याआधी आलेल्या शक्तिदांच्या एन इव्हनिंग इन पॅरिस, कश्मीर की कली, आराधना मध्ये त्यांचे ट्युनिंग शर्मिला टागोर यांच्यासोबत छान जुळले होते व त्यामुळे यातही आशा पारेख यांच्या जागी त्यांनाच संधी मिळण्याची शक्यता जास्त होती. परंतु शक्तिदांनी पगला कहीं का मध्ये आशा पारेख यांचे काम पाहिले होते व या भूमिकेसाठी त्यांना आशा पारेख यांच्यावरच विश्वास होता. आशा पारेख यांच्याकडून पुरस्कार पटकाविण्याइतका चांगला अभिनय काढून घेण्याचे खरे श्रेय शक्तिदांनाच जाते. “मैं जो आग लगाता हूँ उसे बुझाना भी जानता हूँ ” असा खलनायकी संवाद गाजविणारा प्रेम चोप्रा यांनी रंगविलेला कैलाश सुद्धा सिनेमात तितकाच प्रभावी वाटला.

Asha Parekh with other winners of 19th Filmfare Awards
Asha Parekh with other winners of 19th Filmfare Awards

 
काका के तो क्या कहने ! तो म्हणेल ती पूर्व दिशा असा तो कालखंड होता. या वर्षी कटी पतंग सोबत काकाच्या अंदाज, आनंद, दुश्मन, हाथी मेरे साथी, मेहबूब कि मेहंदी, मर्यादा, छोटी बहू या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हो अक्षरशः धुमाकूळ. १९७० व १९७१ या दोन्ही वर्षी बिनाका गीतमाला च्या वार्षिक कार्यक्रमात नंबर १ वर काकाचीच गाणी होती. १९७० साली ‘बिंदिया चमकेगी’ (दो रास्ते) व १९७० साली ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ (अंदाज).  चारों उँगलियाँ घी में और सर कढाई में अशी परिस्थिती या काका हलवाईची तेंव्हा होती. दिसायला गोड, हसायचा गोड, संवादफेक करायचा गोड…त्याच्या एका खास स्टाईलने. कटी पतंगच्या आधी व नंतर काही वर्षे जशी त्याची नशा रसिकांवर चढली तशीच हळुवार व नकळतपणे सुपरस्टार पदाची नशा काकावर चढत गेली. ज्या नशेत आसमंतात उंच, डौलाने उडणारा स्वतःचा पतंग कधी कटला हे काकालाही कळले नाही. असो. पण आज ५० वर्षे झाली तरी त्याच्यासारखा दिमाखात उडणारा पतंग अजूनही हिंदी सिनेमाला सापडला नाही. 

Director Shakti Samanta, RD Burman and Rajesh khanna
Director Shakti Samanta, RD Burman and Rajesh khanna

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment