© विवेक पुणतांबेकर
राज कपूर नी आर.के. फिल्म व्यतिरिक्त ज्या बाहेरच्या चार सिनेमात अविस्मरणीय अभिनय केला त्यातला पहिला सिनेमा अनाडी. नर्गिस आर.के. फिल्म सोडून गेल्यावर राज कपूर अतिशय निराश झाले होते. काहीच सुचत नसे. आर.के.काॅटेज मध्ये नर्गिस ने अभिनय केलेल्या सिनेमाची रीळे परत परत पहात मद्याच्या आहारी गेले. दोन वर्षे चित्रनिर्मिती बंद पडली. आर.के. स्टुडिओत शंकर जयकिशन, शैलेंद्र हसरत सकट ३२ जण नोकरीला होते. या सर्वांचे कुटुंब आर.के. फिल्मस वर अवलंबून होते. राज कपूरची पत्नी कृष्णाला त्यांचे हाल बघवेनात. ऋषिकेश मुखर्जी यांना राज कपूर फार आवडत. ते नेहमी घरी येत. त्यांनी पण ठरवले राज कपूरना यातून बाहेर काढायलाच हवे.
लेखक इंदरराज आनंद यांच्या कडे एक अप्रतिम कथा होती जी चार्ली चॅप्लीन च्या सिनेमावर आधारलेली होती. हा टेलर मेड रोल होता. या कथेवर सिनेमा निर्माण करायचा निश्चय ऋषिकेश मुखर्जींनी केला. एल.बी. लश्मन हे निर्माते तयार झाले. आर.के. काॅटेज मध्ये या कथेचे वाचन झाले. राज कपूरना कथा आवडली. नायिका निवडायची होती. ऋषिकेश नी नूतन चे नाव सुचवले. राज कपूरनी विचारले तिला चालणार असेल तर माझी तयारी आहे. नूतन ने होकार दिला. मग मिसेस डिसा च्या भुमिकेसाठी ललिता पवारांची निवड अतिशय सार्थ ठरली. मोतिलाल, शुभा खोटे, मुक्री, नाना पळशीकर, विश्व मेहरा या कलाकारांना निवडले. प्रत्येकाने आपल्या भुमिकेत रंग भरले. आर.के. फिल्म चा संच सिनेमा साठी वापरायचा होता. साहजिकच कला दिग्दर्शक मुरलीधर आचरेकर, संगीतकार शंकर जयकिशन, शैलेंद्र, हसरत, मेकअप मन माधव पै ध्वनिमुद्रक अल्लाद्दिन खान कुरेशी यांचा निर्मितीत सहभाग असणार होता. कॅमेरामन म्हणून राज कपूरनी जयवंत पाठारे यांचे नाव सुचवले. जयवंत पाठारे आर.के. फिल्मस मध्ये सहाय्यक कॅमेरामन होते आणि ‘आह’ सिनेमाचे छायाचित्रण त्यांनी स्वतंत्रपणे केलेले होते. ऋषिकेश ना सुरुवातीला जयवंत पाठारेंची निवड फारशी आवडली नव्हती. पण चित्रण सुरु झाल्यावर मात्र दोघांचे सूर जुळले. नंतर जयवंत पाठारे आर.के. फिल्म सोडून ऋषिकेश मुखर्जींचे कॅमेरामन म्हणून काम करु लागले.
ऋषिकेश नी राज कपूरना प्रेमळपणे दम भरला वेळेवर सेट वर यावेच लागेल आणि नेहमीचा रोमॅन्टीक अभिनय चालणार नाही. राज कपूर कबूल झाले. अनाडी ची निर्मिती सुरु झाली. शंकर जयकिशन कडे काही काळ सिनेमे नव्हते. पण ते स्वस्थ बसले नव्हते. त्यांचा एकही वादक त्यांना सोडून गेला नाही. रोज नवीन चाली तयार करत. त्यातल्याच सर्वोकृष्ट चाली निवडल्या गेल्या. थीम साॅन्ग तयार झाले. रेकाॅर्ड झाले त्या रात्री अतिशय उत्साहात शैलेंद्र च्या घरी राज कपूर गेल्याची आठवण शैलेंद्र चे सुपुत्र दिनेश सांगतात. ‘श्री ४२०’ च्या एका पार्श्वसंगीतातल्या तुकड्यावर तयार केलेल्या धून वर शैलेंद्र नी लिहीले ‘किसी की मुस्कुराहटोपे हो निसार’. ‘तेरा जाना’ गाण्याच्या रेकाॅर्डिंग ला सी. रामचंद्र हजर होते. यातल्या एका ठिकाणी असलेल्या व्हायोलिन च्या सोलो पीस ऐवजी लतादिदींचा आलाप घेण्याची त्यांची सूचना शंकर जयकिशन ना पसंत पडली. त्यामुळे हे गाणे फार परिणामकारक झाले. ‘ये चांद खिला ये तारे हसे’ गाण्याचे चित्रण संपताक्षणी राज कपूरनी एक मोठी सुरई ऋषिकेश मुखर्जींना भेट दिली. ऋषिकेश गोंधळले राज कपूरनी गमतीत सांगितले आज पहिल्यांदा नायिकेच्या हाताला स्पर्श करुन दिलात ना म्हणून.
मोतिलाल ने साकार केलेला ओषधी कंपनीचा मालक आणि काका अप्रतिम होता. हाॅटेलमध्ये पैश्याचे पाकीट परत करायला गेलेल्या राजकुमार ला मोतिलाल सांगतो ‘जान ते हो यहां आये हुए लोग कौन है?ये वही लोग है जिनको बटुवे मिले और उन्होने वापस नही किये’. कोर्टात जायच्या आधी नूतन सांगते ‘चाचाजी आज जब एक निरपराधी को फांसी की सजा होगी तब तुम्हारी आंखोमे मै खुशी देखूंगी’. त्यावर मोतीलाल सांगतो ‘मैने जिंदगी मे कभी हार नही मानी और वो भी एक अनाडीसे’ त्यावेळचा त्याचा अभिनय लाजबाब होता. ‘भगवान करे ऐसी बिमारी हर बार आये’ असे सांगणारा नाना पळशीकर पण जबरदस्त होता. राज कपूर आणि ललिता पवार यांच्या अभिनयाच्या जुगलबंदीने डोळे पाणावतात. यात वकिलाच्या भेटीचा प्रसंग चित्रित करायचा होता. शेवटी ललिता पवार काचेच्या दरवाज्यावर आपटतात आणि बेशुध्द पडतात हा प्रसंग दोन भागात आणि डमी वापरुन घेऊया असे ऋषिकेश मुखर्जींचे सांगणे ललिता पवारना पसंत पडले नाही. जिद्दीने डमी न घेता एकाच टेक मध्ये हट्टाने सीन करायला त्या तयार झाल्या. पण काचेवर जोरात आपटल्या आणि खरोखर बेशुध्द झाल्या. कॅमेरा सुरु राहिल्याने हे दृश्य फार परिणामकारक झाले. मिसेस डिसा मरते या प्रसंगात जयवंत पाठारे यांनी केलेली प्रकाश योजना फार प्रभावी होती. मिसेस डिसा गेल्यावर राज कपूरनी केलेला आक्रोश काळजाला हात घालतो.
अनाडीच्या यशाने राजकपूर यांचा गेलेला आत्मविश्वास परतला. त्यांची चित्रनिर्मिती सुरु झाली. शंकर जयकिशनकडे निर्मात्यांचा ओघ सुरु झाला. यात दाखविल्यासारखाच ललिता पवारांचा मृत्यु झाला. ‘तुमको मालूम है आज हमने इतना पैसा कमाया’ सांगणारा अनाडी, ‘हम ने तुम्हारे जैसा एक भी देखा नही’ सांगणारी मिसेस डिसा आणि शेवटी राज कपूर खोलीला कुलूप लावून निघत असताना ‘मैने मिसेस डिसा को वचन दिया है, मै राजकुमारकी देखभाल करुंगी’ असे सांगणारी नूतन या व्यक्तिरेखा विसरता येत नाहीत. हा सिनेमा मनात कायम रेंगाळत रहातो.
Vivek Puntambekar
Science Graduate from Somayya College in the year 1977.
Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.
Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.
Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.
Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.
Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.