-धनंजय कुलकर्णी

भारतीय सिनेसृष्टीचा विषय निघतो, तेव्हा तिचे आद्य जनक दादासाहेब फाळके यांच्याइतकेच आदराने बाबूराव पेंटर (Baburao Painter) यांचे नाव घेतले जाते. लाकूडकाम, मूर्तिकला आणि चित्रकलेत असामान्य कौशल्य असलेले पेंटर एक चतुरस्त्र कलाकार होते. ३ जून १८९० साली त्यांचा कोल्हापुरात जन्म झाला. त्यांचे मूळ नाव बाबुराव कृष्णराव मेस्त्री असे होते. चित्रकला व शिल्पकला  यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. कोल्हापूर येथील बाबुराव पेंटर यांच्या वडिलांचा व्यवसाय  सुतारकाम,  लोहारकाम करणे हा होता. त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच शिल्पकला, चित्रकला या कलांचे ज्ञान मिळत गेले.

या कामात आनंदराव पेंटर या त्यांच्या आतेभावाचीदेखील त्यांना सोबत मिळाली. चित्रकला, शिल्पकला, चित्रपट अशा तीनही कलांमध्ये त्यांनी स्वतःचे असामान्य कौशल्य सिद्ध कले. शिल्पकलेच्या कामासाठी त्यांनी स्वतःची फॅक्टरी देखील सुरू केली होती. शिल्पकलेतील मातीचे असो वा धातूचे ओतकाम असो, बाबुराव स्वतः ही कामे करत. महात्मा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांनी तयार केलेली शिल्पे कोल्हापूरमध्ये आजही पाहण्यास मिळतात. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली.चित्रपटनिर्मितीसाठी लागणा-या मूलभूत सुविधा, यंत्रसामग्रीही उपलब्ध नसलेल्या काळात त्यांनी चित्रपटनिर्मितीचे साहस केले. ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ स्थापून २६ चित्रपटांची निर्मिती केली. सतत कलेचा ध्यास आणि नावीन्याचा शोध घेण्यात आपली हयात घालवणारे बाबूराव ख-या अर्थाने कलामहर्षी होते.

Baburao Painter
Baburao Painter

दादासाहेब फाळके यांनी सिनेमाकलेला जन्म दिला. पण त्या कलेचे संगोपन करून ती फुलवली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी! बाबुराव पेंटर यांनी जिद्द व परिश्रमाने स्वतः प्रोजेक्टर व स्वदेशी कॅमेरा तयार केला. त्याचबरोबर छपाई यंत्र, डेव्हलपिंग स्पिडोमीटरही तयार केला. दि. १ डिसेंबर, १९१८ साली त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. स्त्री पात्रे असलेला पहिलाच चित्रपट त्यांनी निर्माण केला, तो म्हणजे ‘सैरंध्री’. ७ फेब्रुवारी १९२० रोजी पुण्याच्या आर्यन सिनेमागृहात सैरंध्री प्रदर्शित झाला होता व लो. टिळकांनी सैरंध्री पाहून (८ फेब्रुवारी १९२०) बाबूरांवाना ‘सिनेमा केसरी’ या उपाधीने गौरविले होते.यातील भीम व कीचक यांच्या द्वंद्वयुद्धाचे दृश्य पाहून प्रेक्षक बेशुद्ध पडले होते, इतके ते दृश्य-कोणतेही ट्रिक सीन्स नसतांनाही-जिवंत चित्रित झाले होते.बाबूरावांचा असे सिनेमे काढण्याचा ‘हेतू’ ब्रिटीशांच्या लक्षात आला.( यातून कीचक म्हणजे ब्रिटीश सरकार आणि भीम म्हणजे स्वातंत्र सैनिक ! असा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोचत होता. ) यावरूनच ब्रिटिश सरकारने सेन्सॉर पद्धत सुरू केली, जी आजही सुरू आहे.

महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून बाबुराव पेंटर यांनी फ्लॅशबॅक पद्धत प्रथमच वापरून १९२५ साली ‘सावकारी पाश’ हा सामाजिक मूकपट तयार केला. परदेशात चित्रपट प्रदर्शनात पाठविलेला हा भारतातील पहिला चित्रपट ठरला. प्रेक्षक  सिनेमाचे पोस्टर, फोटो पाहूनच आपले आगामी सिनेमाविषयीचे मत बनवणार, हे गृहीत धरून बाबूरावांनी आपल्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’च्या ‘सिंहगड’ (१९२३) या चित्रपटाची लक्षवेधक पोस्टर्स तयार करून ग्रँट रोडचे ‘नॉव्हेल्टी थिएटर’ असे काही सजवले-नटवले की, त्या काळी अर्धी मुंबई खास ‘नॉव्हेल्टी’ पाहायला तिथे लोटली होती. त्या गर्दीमध्ये ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’चे प्राचार्य सोलोमनही होते. त्यांनी बाबूरावांना जवळ बोलावून सांगितले, ‘‘बाबूराव ही तुझी पोस्टर्स उघडयावर थंडी वा-यात, पाऊसपाण्यात खराब होण्यासाठी जन्माला आलेली नाहीत.

Baburao Painter with his self-made ‘Swadeshi’ camera in Kolhapur, pc_ author’s collection___583x480
Baburao Painter with his self-made ‘Swadeshi’ camera in Kolhapur, pc_ author’s collection

व्यक्तिचित्रणकलेचा अप्रतिम नमुना म्हणून मी ही पोस्टर्स जे. जे. स्कूलच्या कलादालनात नेऊन लावणार आहे.’’ ‘जे. जे. स्कूल..’ने बाबूरावांचा खास सत्कार समारंभ आयोजित केला होता.बाबूराव हे स्वत: उत्तम इंजिनीअर व संकलक होते. आपल्याला चित्रीकरणासाठी लागणारा हवा तसा कॅमेरा त्यांनी स्वत: बनवून घेतला होता. कृत्रिम प्रकाशयोजना, कॅमे-यासाठी ट्रॉली, त्रिमितीतील नेपथ्य, कपडेपट, रंगीत पडदे, थिएटर सजावट आदी प्रकार त्यांनीच चित्रपट उद्योगात आणले. त्यांच्या कंपनीमधून मद्रासचे एच. एम. रेड्डी, नागी रेड्डी, व महाराष्ट्रातील व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल, धायबर, बाबुराव पेंढारकर, मा. विनायक, नानासाहेब सरपोतदार यांसारखे कलाकार तयार झाले. मूकपटांतून रुबी मायर्स, मा. विठ्ठल, पृथ्वीराज कपूर, झेबुन्निसा, ललिता पवार असे कलावंत तयार झाले. कल्पकता, कलात्मकता, वास्तववाद आणि सामाजिक प्रबोधन ही गुणवैशिष्ट्ये बाबुरावांसारख्या श्रेष्ठ गुरूने भारतीय चित्रपटसृष्टीला दिली.

आज १६ जानेवारी. याच दिवशी १९५४ साली बाबुरावांचे निधन झाले. त्या निमित्ताने या महान कलावंताचे स्मरण!

 

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment