– अजिंक्य उजळंबकर 

जसे कोरोनाने अगदी ‘फीट अँड फाईन’ लोकांनाही सोडले नाही तसेच धोरण या व्हायरसने चित्रपटांच्या बाबतीतही कायम ठेवले. लॉकडाऊन नंतर पहिले अनलॉक झाल्यावर कोरोनाने अशा एका फीट अँड फाईन चित्रपटाचा पहिला बळी घेतला. कारण त्याने सिनेमागृहात प्रदर्शित होण्याची हिम्मत केली. दिवाळीच्या मुहूर्तावर  १५ नोव्हेंबर रोजी रिलीज झालेला ‘सुरज पे मंगल भारी’ हा अनलॉक नंतर थेट सिनेमागृहात प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट. दुर्दैवाने जे अपेक्षित होते तेच झाले. जिथे आमच्यासारखे सिनेमाप्रेमी सिनेसमीक्षक जोखीम घ्यायला तयार नव्हते तिथे सामान्य प्रेक्षक थिएटर मध्ये येण्याची कुठून हिम्मत करणार? परिणाम… एक उत्तम तब्येत असलेला चित्रपट कोरोनाने संक्रमित झाला व बॉक्स-ऑफिसवर आपटला. थोडक्यात कोरोनाने “रिपोर्ट पॉझिटिव्ह” असलेल्या सिनेमाचा घेतलेला थेट बळी…. ज्याची इम्युनिटी अर्थात प्रतिकारशक्ती खूप व्यवस्थित होती तरीही. सिनेमा पे कोरोना भारी. दोन दिवसांपूर्वी (१५ जानेवारी) सिनेमाचे निर्माते म्हणजे झी-स्टुडिओज ने अखेर ‘सुरज पे मंगल भारी’ त्यांच्या झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केल्याची घोषणा केल्यापासून सिनेमा बघण्याची उत्सुकता होती जिला अखेर आजचा मुहूर्त लाभला. खरंतर ‘दोन महिन्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाबद्दल लिहिण्यास आता काय अर्थ?’ असे वाटत होते परंतु बहुतांश प्रेक्षकांनी अजूनही हा सिनेमा पाहिलेला नसल्याने व हा या सिनेमावर झालेला दुर्दैवी अन्याय सहन न झाल्याने हा उशिरा का होईना पण करावा वाटलेला लेखनप्रपंच. 

Manoj Bajpayee and Diljit Dosanjh in Suraj Pe Mangal Bhari
Manoj Bajpayee and Diljit Dosanjh in Suraj Pe Mangal Bhari

‘सुरज पे’ च्या कथानकाचा काळ आहे १९९५ सालचा. रोहन शंकर याने लिहिलेले कथानक तसे अगदी साधे आहे व त्यातली पात्रे पण अगदी सामान्य आहेत. मुंबईतील चाळीत राहणारी. मधू मंगल राणे (मनोज बाजपाई) आपली बहीण तुळशी राणे (फातिमा साना शेख) व आई रेखा (सुप्रिया पिळगांवकर) व शांताराम काका (अन्नू कपूर) यांच्यासोबत मुंबईतील एका चाळीत राहणारा साधारण पन्नाशीच्या जवळ पोहोचलेला मनुष्य. स्वतःचा प्रेमविवाह होऊ न शकल्याने व स्वतःच्या प्रेयसीला चांगला नवरा न मिळाल्याने आता या मधु मंगल राणे ने ही शपथ घेतली आहे की कुठल्याही मुलीसोबत यापुढे असा अन्याय होता कामा नये म्हणून मंगल आता लग्न ठरलेल्या मुलांचे कॅरेक्टर कसे आहे हे शोधण्याचा डिटेक्टिव्हगिरीचा धंदा करीत असतो. त्याच्या हातून या कार्यात अनेक मुलांची ठरलेली अथवा ठरत आलेली लग्ने मोडतात..ज्यात एके दिवशी लग्नासाठी आसुसलेल्या सुरज सिंग ढिल्लो (दिलजीत दोसांज ) या पंजाब्याचा नंबर लागतो. सुरजच्या वडिलांचा (मनोज पहावा) मुंबईत दूध, दही, तुपाचा मोठा व्यवसाय आहे. स्वतःचे लग्न मोडल्यामुळे मंगल चा बदला घेण्यासाठी गेलेल्या सुरजच्या मंगलची बहीण तुळशी सोबत तारा जुळतात व दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. सुरज आपला बदला घेण्यात यशस्वी होतो खरा परंतु त्यामुळे मंगल आणि सुरज मध्ये वैर निर्माण होते. यापुढे एकमेकांवर कुरघोडी करतांना कथानकात अनेक ट्विस्ट येतात जी आता तुम्हाला मोठ्या नाही तर छोट्या पडद्यावर पाहता येतील. 

Manoj Bajpayee and Diljit Dosanjh and Fatima Sana Sheikh in Suraj Pe Mangal Bhari
Manoj Bajpayee, Diljit Dosanjh and Fatima Sana Sheikh

२०१० साली ‘तेरे बिन लादेन’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पहिले पाऊल टाकलेल्या अभिषेक शर्मा चा ‘सुरज पे मंगल भारी’ हा दिग्दर्शक म्हणून सहावा चित्रपट आहे. तेरे बिन लादेन ही निखळ विनोदी करमणूक होती जिचे प्रेक्षक व समीक्षक दोघांनीही स्वागत केले होते. बासू चॅटर्जी यांच्या १९८२ सालच्या शौकीन सिनेमाच्या आलेल्या ‘दि शौकिन्स’ या रिमेकचे २०१४ साली अभिषेकने दिग्दर्शन केले होते. या दोन सिनेमांमुळे अभिषेक वर ह्रिषीकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी टाईप सिनेमांचा प्रभाव आहे ही बाब लक्षात आली होती. परंतु जॉन अब्राहम अभिनीत परमाणु चे यशस्वी दिग्दर्शन करून अभिषेकने मध्येच आपला मार्ग बदलला होता. मात्र आता सुरज पे पाहिल्यावर त्याने परत एकवार ह्रिषीकेश मुखर्जी टाईप क्लीन, फिल्मी न वाटणाऱ्या निखळ विनोदी व करमणूकप्रधान सिनेमांची आठवण करून दिली. अशात रिऍलिस्टिक कथानक दाखविण्याच्या नादात अति-डार्क सिनेमे येत असल्यामुळे असे निखळ विनोदी सिनेमे बघण्याची सवय तुटल्यात जमा आहे.

Suraj Pe Mangal Bhari Movie

पण दिग्दर्शक अभिषेक शर्मा व पटकथाकार रोहन शंकर यांचे स्टार्ट टू एंड एक निरागस, स्वच्छ, मजेदार, उत्कंठावर्धक विनोदी सिनेमा बनविल्याबद्दल मनापासून अभिनंदन करावयास हवे. खूप दिवसानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर संपूर्ण कुटुंबाला सोबत बसून ज्याची मजा घेता येईल असा सिनेमा आला आहे सुरज पे मंगल भारी. सिनेमाचा खरा विनर ज्याप्रमाणे कथा-पटकथा व दिग्दर्शन आहे, तेवढेच विजयाचे हकदार सिनेमातील मजेदार संवाद आहेत. अफलातून संवाद लिहिले आहेत रोहन शंकर यांनीच. कथानकात एकानंतर एक येणाऱ्या मजेदार वळणांना भन्नाट विनोदी संवादांची फोडणी आणखीनच खमंग बनविते. त्यात दिलजीत दोसांज व मनोज बाजपाई यांचा अफलातून अभिनय. दिलजीतने तर कमाल केली आहे. अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स आहे त्याचा. मनोजचे तर क्या कहने. त्याच्या अभिनय क्षमतेसमोर ही अतिशय साधी वाटणारी व्यक्तिरेखा आहे जी त्याने तितक्याच सहजतेने साकारली आहे. फातिमा सना शेखने तुळशी राणे ही चाळीत राहणारी मराठी मुलगी अतिशय सुंदर साकारली आहे व त्यात ती खुपच निरागस दिसली आहे. अन्नू कपूरचा काका व सुप्रिया पिळगावकर यांची आई, विजय राज ने साकारलेला चिन्मय गोडबोले, सीमा व मनोज पहावा ने रंगविलेले सुरजचे आई-वडील हे सर्व सुद्धा तितकेच मजेदार. कथानकात येणाऱ्या गंभीर वळणांना सुद्धा दिग्दर्शक अभिषेक शर्माने सुरुवातीपासून विनोदी अँगलने सादर केल्यामुळे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कितीही ट्विस्ट आले तरीही प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर सातत्याने हसू कायम राहते व प्रेक्षक कुठेही फारसे लॉजिक लावत बसत नाही. कथानकाला असलेल्या मराठी पार्श्वभूमीचा सुद्धा विनोद निर्मितीसाठी सुरेख उपयोग करून घेतलाय. छायाचित्रण, पार्श्वसंगीत व गीत-संगीत या डिपार्टमेंट मध्येही सिनेमा विशेष प्राविण्यासह पास होतो. 

Director Abhishek Sharma with Manoj Bajpayee, Diljit and Fatima Sana Sheikh
Director Abhishek Sharma with Manoj Bajpayee, Diljit and Fatima Sana Sheikh

 

‘सुरज पे मंगल भारी’ वर सिनेमागृहात कोरोना भारी पडला परंतु आता हा सिनेमा झी-5 वर येऊनही तुम्ही पहिला नाहीत तर तुमचे दुर्दैव भारी असे म्हणायची वेळ येईल. जरूर बघाच. 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment