व्हॅलेन्टाईन्स डे स्पेशल …साठच्या दशकातील हिंदी सिनेमाचा रोमँटिझमचा अध्याय

-धनंजय कुलकर्णी, पुणे

 

हिंदी सिनेमाच्या इतिहासात साठचे  दशक हे सप्त रंगाप्रमाणे रोमँटिक चित्रपटांसाठी देखील आठवले जाते. पन्नासच्या दशकात चित्रपट रसिकांच्या मनावर दिलीप देव आणि राज या त्रिकुटाने आपला ठसा उमटवला होता. संगीतकार, गीतकार ,अभिनय करणारे कलावंत , गायक कलावंत सर्वच जण आपल्यातील सर्वोत्कृष्ट असा परफॉर्मन्स देत होते. त्या मुळेच हा काळ सिनेमाचा गोल्डन इरा समजला जातो. त्याचेच एक्स्टेन्शन पुढच्या दशकात होते.  साठच्या दशकात हिंदी सिनेमा मध्ये रंगाचे  आगमन झाले आणि संपूर्ण रुपेरी पडदा सप्तरंगात न्हाऊन निघाला आणि रोमँटिक सिनेमा आणखी भावस्पर्शी आणि देखणा बनू लागला. आज १४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ या निमित्ताने या साठच्या दशकातील काही रोमँटिक चित्रपटांची आठवण आपण करूयात. यातील पहिलाच चित्रपट रुपेरी पडद्यावरील सर्वांगसुंदर नायिका मधुबाला हिचा आहे!  योगायोगाने आजच तिचा जन्मदिवस देखील आहे .

मुघल-ए-आझम: भारतातील सर्वात भव्य आणि दिव्य असा हा चित्रपट. हिंदुस्थानच्या राजपुत्राची हीसलीम अनारकली ची अधुरी प्रेम कहाणी पडद्यावर दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी रंगवली असली तरी चित्रपटाचा खरा नायक होता शहेनशहा अकबर म्हणजेच पृथ्वीराज कपूर . या चित्रपटात दिलीप आणि मधुबाला यांच्यातील प्रणय प्रसंग अतिशय उत्कटतेने आणि कलात्मक रीतीने दिग्दर्शक के असिफ यांनी चित्रित केले होते . या प्रणय दृश्याच्या पार्श्वभूमीवर चक्क त्या काळचे ख्यातकीर्त शास्त्रीय संगीताचे गायक बडे गुलाम अली खाँ यांनी पार्श्वगायन केले होते. प्रेम जोगन बनके’  आणि ‘शुभ दिन आयो’ ही भारतीय रुपेरी पडद्यावरील अतिशय सुरेख आणि सुरेल अशी प्रेमकाव्य आहेत. दिलीप मधुबालाच्या चेहऱ्यावर हळुवार पणे मोरपीस फिरवतो त्या वेळी तिचं लाजून शहारून जाणं अगदी ‘जानलेवा ‘  असं होतं. संगीतकार नौशाद , गीतकार शकील बदायुनी यांच्या या गाण्यांनी प्रचंड लोकप्रियता हासील  केली. गंमत म्हणजे रुपेरी पडद्यावरील हि  जोडी प्रत्यक्षात मात्र त्याकाळात एकमेकांशी अबोला धरुन होती पण त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील कटूता त्यांनी रुपेरी पडद्यावर दिसू दिली नाही.

mughal-e-azam film poster

 

चौदहवी का चांद : गुरुदत्त यांनी त्यांच्या ‘प्यासा’ आणि ‘कागज के फूल’ नंतर हा चित्रपट बनविला. मुस्लीम सोशल असलेल्या या सिनेमा तील प्रेमकथा निराळी होती. गुरु , वहिदा आणि रहमान असा प्रेमाचा त्रिकोण होता. वहिदा चे सौंदर्य यातील शीर्षक गीतात खूप खुलून दिसले. रवि यांचे अप्रतिम संगीत सिनेमाला लाभले होते. चित्रपटाला एम सादिक यांचे दिग्दर्शन लाभले होते.

Guru Dutt, Wahida Rehman in Chaudhavi Ka chand
Guru Dutt, Wahida Rehman in Chaudhavi Ka Chand

 

जंगली : अभिनेता शम्मी कपूर याच्या सुपरहिट सिनेमाचा सिलसिला  पन्नास  च्या दशकात सुरू झाला होता आणि साठ च्या दशकात त्याच्या लोकप्रियतेने कहर केला. शम्मी कपूरची स्टाईल, नायिकांसोबतच त्याचं वागणं, प्रेमाचा धसमुसळेपणा यामुळे हिंदी सिनेमाची साचेबद्ध रोमँटिक चित्रपटाच्या नायकाची  चौकट शम्मी कपूरने पार बदलवून टाकली आणि या बदलाचा साक्षीदार मोठा होता सुबोध मुखर्जी यांचा जंगली हा चित्रपट. ‘जंगली’ हा भारतातील पहिला सप्तरंगातील सुपरहिट सिनेमा ठरला. या सिनेमाने व्यावसायिक यशाची गणित बदलत केली आणि प्रेमाची भाषादेखील बदलून गेली. सायरा बानो या यांचा हिचा हा पहिलाच चित्रपट. शंकर-जयकिशन यांचा संगीत आणि काश्मीरच्या नयनरम्य अशा लोकेशन्स  वरील चित्रीकरण रसिकांनी  डोळे भरून पाहिले, यातील शम्मीचा  अभिनयाचा अंदाज रसिकांना आवडून गेला ‘अहसान तेरा होगा मुझ पर’ हे यातील प्रेमाची आळवणी करणारे गीत त्या वर्षीचे बिनाका टॉपचे गाणे ठरले. ‘चाहे कोई मुझे जंगली कहे’,’ दिन सारा गुजारा तेरे अंगना’,’ काश्मीर की कली हू’,’ अयय्या सुकू सुकू ‘ या गाण्यांनी फार मोठी लोकप्रियता मिळवली.कोवळी देखणी सायरा रसिकांच्या दिलात बसली.

Shammi Kapoor and Saira Bano in Junglee
Shammi Kapoor and Saira Bano in Junglee

असली-नकली: ऋषिकेश मुखर्जी यांनी रुपेरी पडद्यावर वरच्या श्रेणीच्या अभिनेत्यांना घेऊन त्यांच्याकडून साधी-सोपी कथा पडद्यावर दाखवण्याचे धाडस दाखवले.  असली-नकली या चित्रपटात देव आनंद  आणि साधना यांचा अतिशय अप्रतिम अभिनय होता. चित्रपटाचे कथानक अगदी साधे निम्न वर्गातील  प्रेमप्रकरण होते.  चित्रपटाला संगीत शंकर-जयकिशन यांचे होते ‘एक बुत बनाऊँगा तेरा और पूजा करूँगा ‘,’ तेरा मेरा प्यार अमर फिर क्यू ‘ ,’ तुझे जीवन की डोर से बांध लिया है’ ही अतिशय सुंदर अशी प्रेमगीत या चित्रपटात होती. प्रेमातील उत्कटता ऋषिकेश मुखर्जी यांच्या चित्रपटातून अतिशय सभ्यपणे आणि भारतीय संस्कृतीला अनुकूल अशी असायची याचं यथार्थ दर्शन ‘असली-नकली’ या चित्रपटात होते.

Asli Naqli movie poster

मेरे मेहबूब:  राजेंद्र कुमार आणि साधना या जोडीचा आणि नौशाद यांनी संगीतबद्ध केलेला ‘मेरे मेहबूब’ हा चित्रपट 1१९६३ प्रदर्शित झाला होता. लखनौच्या नवाबी वातावरणात फुललेली ही प्रेमकहाणी अतिशय अप्रतिम रित्या पडद्यावर साकारली होती.  आजच्या पिढीला कदाचित आश्चर्य वाटेल, कारण या चित्रपटात मध्यंतरापर्यंत नायक नायिका प्रत्यक्ष  भेटत देखील नाहीत. पण त्यांच्यातील प्रेमाचा गोडवा इतका सुंदर आहे की रसिक आजही हा चित्रपट पाहताना हरखून जातात. मुस्लिम सोशल सिनेमातील अतिशय वरच्या दर्जाची ही प्रेमकथा होती. ‘मेरे मेहबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम’, ऐ  हुस्न जरा जाग तुझे इश्क पुकारे’,’ याद मे तेरी जाग जाग के हम रात भर करवटे बदलते रहे ‘ शकील बदायुनी यांची गाणी रफी आणि लता यांनी फार मधुर स्वरात गायली होती. साधना चे  आरस्पानी सौंदर्य आजही पाहतांना रसिक आजही घायाळ होतात.

Rajendra Kumar and Sadhna in Mere Mehboob
Rajendra Kumar and Sadhna in Mere Mehboob

गुमराह :  खरं तर हा सिनेमा बी आर चोप्रा यांनी भारतीय नारी च्या मर्यादेला दर्शवणारा चित्रपट होता. या  सिनेमात एक विवाहबाह्य असा angle  होता .अशोक कुमार, माला सिन्हा ,सुनील दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला संगीत रवी यांचे होते. सुनील दत्त आणि माला सिन्हा यांचे परस्परांवर जीवापाड प्रेम असताना काही विचित्र परिस्थितीत तिला अशोक कुमार सोबत लग्न करावे लागते परंतु तिच्या आयुष्यात पुन्हा तिचा जुना प्रियकर म्हणजे सुनील दत्त येतो आणि हा प्रेमाचा त्रिकोण सुरू होतो. यातली गाणी अतिशय सुंदर होती. महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी ती गायली होती. साहिर लुधियानवी यांची अप्रतिम काव्यरचना या चित्रपटाला लाभलेली होती.’ आप  आये तो  खयाले दिले नाशाद आया’ ‘, ‘ये हवा ये हवा है उदास जैसे मेरा मन’, ‘इन हवाओ मे इन फिझाओ मे ‘ या गाण्यांनी रसिक बेहद खूश झाले होते . ही वेगळी रोमँटिक कथा प्रत्येक रसिकाने आवर्जुन पहावी अशीच आहे .

Gumrah movie poster

 

दिल एक मंदिर : हा चित्रपट देखील एक प्रेम कथाच होता. यातील प्रणयी त्रिकोणा मध्ये  राजेंद्रकुमार मीनाकुमारी आणि राजकुमार होते. शंकर-जयकिशन यांची मधुर संगीत हे चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य. पती ला झालेला कॅन्सर आणि त्याच्या उपचारासाठी उपस्थित असलेला डॉक्टर म्हणजे तिचा जुना प्रियकर अशा विचित्र कोंडीत सापडलेली हि प्रणयी त्रिकोणाची कथा श्रीधर यांनी दिग्दर्शित केली होती . यातील टायटल सॉंग सोबतच ‘हम तेरे प्यार मे सारा आलम खो बैठे’,’ रुक जा रात ठहर जा रे चंदा’,’ याद ना जाये बीते दिनो की ही’ गाणी खूप गाजली.

dil ek mandir poster

तेरे घर के सामने:  हा क्लासिक रोमांटिक चित्रपट विजय आनंद तथा गोल्डी  यांनी दिग्दर्शित केला होता या चित्रपटात देव आनंद आणि  नूतन प्रमुख भूमिकेत होते. अतिशय साधे हलके फुलके  कथानक असलेल्या या चित्रपटातील गाणी अतिशय गाजली .देवानंद आणि नूतन यांच्यातील प्रणय हा डोळ्यांना सुखावणारा असा होता . ‘तू कहा ये बता इस नशीली रात मे ‘, ‘दिल का भंवर करे पुकार’,’ इक घर बनाऊंगा तेरे घर के सामने’,’ देखो रुठा ना करो ‘,’ सुन ले तू दिल की सदा’ ही प्रेमाची गाथा सांगणारी गाणी रसिकांच्या हृदयात आजही ताजी आहेत. देव आनंद आणि नूतन यांचे रुपेरी पडद्यावरील केमेस्ट्री रसिकांना आवडून गेली.

Dev Anand and Nutan in Tere Ghar Ke Samne
Dev Anand and Nutan in Tere Ghar Ke Samne

फिर वही दिल लाया हूं :  नासिर हुसेन यांच्या चित्रपटाचा फार्मूला ठराविक असला तरी रसिकांना तो कायम आवडायचा. काश्मीरच्या पार्श्वभूमीवरील हा चित्रपट जॉय मुखर्जी आणि आशा पारेख यांच्या अभिनयाने हा चित्रपट सजला होता . संगीतकार ओ पी नय्यर यांच्या भन्नाट संगीताने  या चित्रपटाला सुपरहिट असे यश मिळाले. ‘लाखो है निगाहो मे’,’ आंचल मे सजा लेना कलिया’ ,’ जुल्फ  की छाव मे चेहरे का ‘,’ हमदम मेरे मान भी जाओ’ , ‘आखो से जो उतरी है दिल में’, ‘ बंदा परवर थाम लो जिगर’ या गीतांनी चित्रपट रसरशीत झाला होता.

Joy Mukherjee and Asha Parekh in Phir Wahi Dil Laya Hoon
Joy Mukherjee and Asha Parekh in Phir Wahi Dil Laya Hoon

संगम:  आर के फिल्म चा हा पहिला रंगीत चित्रपट होता . या चित्रपटात राज कपूर ,वैजयंती माला आणि राजेंद्र कुमार असा प्रणयाचा त्रिकोण  होता. या चित्रपटाला भारतातच नाही तर परदेशात देखील फार मोठी लोकप्रियता लाभली. यात प्रेम आणि त्याग याची चढाओढ पाहायला मिळाली . ‘ये मेरा प्रेम पत्र पढकर तुम नाराज न होना ‘,’ हर दिल जो प्यार करेगा वो गाना गायेगा’,’ बोल राधा बोल संगम होगा की नही’,’ दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा हू’ ओ मेरे सनम ओ मेरे सनम ‘या गाण्याने सिनेमाला उदंड यश मिळाले. शंकर-जयकिशन यांचे  संगीत आणि परदेशातील नयनरम्य लोकेशन्सवर वर चित्रीकरण या मुळे सिनेमाला  फार मोठे व्यावसायिक यश लाभले आणि या सिनेमा नंतर भारतीय सिनेमा परदेशात मोठ्या प्रमाणावर चित्रित होऊ लागला.

sangam movie poster

 

गाईड : प्रख्यात कादंबरीकार आर के नारायण यांच्या साहित्य अकादमी विजेत्या गाईड या कादंबरीवरील देवानंद यांनी बनवलेला हा चित्रपट १९६५ साली  प्रदर्शित झाला . वहिदा रेहमान आणि देवानंद या जोडीच्या या  चित्रपटाला  संगीत सचिन देव बर्मन यांचे होते. तसं बघितलं तर या चित्रपटातील नायिका ही विवाहित असते ; विवाहित असून देखील ती परपुरुषाच्या प्रेमात पडते हा एक सांस्कृतिक धक्का असताना देखील दिग्दर्शक विजय आनंद यांनी अतिशय खुबीने हा चित्रपट बनवला. यातील नायिकेला खल नायिका होणार नाही याची काळजी घेतली.  अतिशय सुंदर अशी रोमँटिक गाणी या चित्रपटात होती. ‘तेरे मेरे सपने अब एक ही रंग है ‘,’ काटो से खीच के आंचल,’ वहां कौन है तेरा ‘,’ दिन ढल जाये हाय रात न जाये’,’ मोसे छल किये जा’,’ पिया तोसे नैना लागे रे’ यातील प्रेमकथा रूढार्थाने प्रेमकथा म्हणता येणार नाही पण दिग्दर्शकाच्या कौशल्याने हा चित्रपट अतिशय वरच्या श्रेणीचा आणि देव आनंद च्या  संपूर्ण कारकीर्दीतील क्लासिक असा हा चित्रपट बनला.

Dev Anand and Waheeda Rehman in Guide
Dev Anand and Waheeda Rehman in Guide

 

अनुपमा:  ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित हि हळुवार प्रेमकथा रुपेरी पडद्यावर १९६६ साली  आली. धर्मेंद्र आणि शर्मिला टागोर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात होत्या . आयुष्यभर पित्याच्या प्रेमापासून वंचित राहिल्याल्या अनुपमा ची अबोल अव्यक्त व्यक्तीरेखा शर्मिलाने अतिशय सुंदर रीतीने साकारली होती .  तसेच  धर्मेंद्र याने साकारलेला कविमनाचा प्रियकर रसिकांना पुन्हा कधी पाहता आला नाही. या दोघांमधील मुग्ध प्रेम पाहताना आजही प्रेमाच्या भावनेला किती उदात्त रीतीने साकारता येते याचा प्रत्यय येतो. ‘धीरे धीरे मचल ए दिले बेकरार’ ,’  या दिल की सुनो ददुनिया वालो या मुझको अभी चुप रहने दो ‘, ‘ कुछ दिल ने कहा’ हि  हेमंत कुमार यांनी स्वरबद्ध केलेली गाणी या चित्रपटात होटी. आदर्श प्रेमाचा वस्तुपाठ पाहायचा असेल तर अनुपमा या सिनेमाला पर्याय नाही.

Dharmendra and Sharmila Tagore in Anupama
Dharmendra and Sharmila Tagore in Anupama

मिलन : दक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक सुब्बाराव यांनी सुनील दत्त आणि नूतन यांना घेऊन पुनर्जन्मावर आधारित चित्रपट बनवला ‘मिलन’. यात लता आणि मुकेश यांनी गायलेली प्रेमगीते आजही लोकप्रिय आहेत. सावन का महीना पवन करे सोर, हम तुम युग युग के ये गीत मिलन के गाते रहेंगे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी स्वरबद्ध केलेली गाणी चित्रपटाचे यशाला हातभार लावणारी अशी होती.

Milan movie poster

 

आराधना : साठच्या दशकाच्या अखेरच्या वर्षात आलेला ‘आराधना’ तमाम प्रेमी युगुलांचा आदर्श चित्रपट ठरला.शक्ती सामंत दिग्दर्शित शर्मिला आणि राजेश खन्ना यांच्या प्रेमकहानी ने सिनेमाच्या यशाची परिभाषा बदलवून टाकली. रूप तेरा मस्ताना, कोरा कागज था ये मन मेरा , गुनगुना रहे है भंवर , बागो में बहार है या गाण्यांनी अभूतपूर्व अशी लोकप्रियता मिळविली.  ‘आराधना’त गालावर सुंदर खळ्या पाडत राजेश सोबत प्रेमगीते गाणारी हि जोडी पुढे हिंदी सिनेमाची गाजलेली रोमांटिकक जोडी ठरली. अमर प्रेम, अविष्कार, दाग, सफर,राजा रानी,मालिक असे त्यांचे अनेक सिनेमे आले.आराधना ने राजेश खन्ना यांच्या यशाचा मार्ग प्रशस्त केला.

Rajesh Khanna-Sharmila Tagore in Aradhana
Rajesh Khanna-Sharmila Tagore in Aradhana. Courtesy-Rediff

 

साठचे दशक खऱ्या अर्थाने सप्तरंगात न्हालेल्या रुपेरी पडद्यावर प्रेमाचे यक्षगान करणारे होते. वर उल्लेख केलेले चित्रपट म्हणजे एक झलक आहे.आपण यात हवी तितकी भर टाकू शकता. आज जागतिक प्रेम दिनाच्या निमित्ताने साठच्या दशकातील या प्रेमपटाची आठवण!

 

 

 

 

Dhananjay Kulkarni
+ posts

1 Comment

  • Barne Suhas
    On February 14, 2021 7:22 pm 0Likes

    An Excellent information. Keep it up

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.