-© नयना पिकळे

 

इंद्राचा दरबार खचाखच भरला होता आणि एकाहून एक लावण्यवती अप्सरांचे नृत्य चालू होते.
जमलेले सारेजण त्या नृत्य – गायनाचा तल्लीन होऊन आस्वाद घेत होते की अचानक कुणी उंचेपुरे, भरदार देहयष्टी असलेले महर्षि तेथे आले. एक अप्सरा त्यांच्यावर भाळली व तिचा तोल ढळला. ती भान विसरून फक्त त्यांच्याच भोवती गिरक्या घेवू लागली.
देवराज इंद्र हे पाहून चिडला व त्याने तिला तत्काळ मृत्युलोकात जाण्याची शिक्षा ठोठावली.
अप्सरा भानावर आली आणि भयभीत होवून दयेची याचना करू लागली.
इंद्राचाही राग आता शमला होता, त्याने अप्सरेला महर्षी भोवती ३६ गिरक्या घेतल्या म्हणून मृत्युलोकात ३६ वर्षे काल व्यतीत केल्यावर तू पुन्हा देवलोकी येशील असा उशाप दिला.
त्यालाही त्याची लाडकी अप्सरा हवीच होती. आणि ….

“अप्सरा आली, इंद्रपुरीतुन खाली
पसरली लाली, रत्नप्रभा तनु ल्याली ” ……
हे घडलं आजच्याच दिवशी १४ फेब्रुवारीला , पण साल होतं १९३३ …..
हीच ती अप्सरा जिने अवघ्या मृत्युलोकाला आपल्या स्वर्गीय सौंदर्याने वेड लावल.
हो …..

तिचंच इथलं , मृत्युलोकातलं नाव होतं ” मधुबाला “
तिचं खरं नाव मुमताज महल पण ‘बॉम्बे टोकीज ‘ च्या देविकाराणी ने तिला ‘ मधुबाला ‘ हे नाव दिलं.
सुरुवातीला काही चित्रपटात बालकलाकार म्हणून तिने काही भूमिका केल्या .
दिग्दर्शक केदार शर्मांनी तिला ‘ नीलकमल ‘ या चित्रपटात राज कपूर बरोबर सर्वप्रथम नायिकेची भूमिका दिली. अवघी १४ वर्षांची होती ती तेव्हा. मुख्य म्हणजे राज कपूरचा ही हा पहिलाच चित्रपट .
जोहराबाई अम्बालेवाली , अमीरबाई कर्नाटकी , राजकुमारी , गीता दत्त अशा अनेक गायिका त्याकाळी मधुबालासाठी गायल्या …..

आणि मग १९४९ मध्ये आला “महल ” ……. ज्यात मधुबाला साठी लता गायली. जगातील सर्वात लोभस सौंदर्य आणि जगातील सर्वोत्कृष्ट आवाज एकत्र आल्यावर ते अपरिहार्य होतं तेच झाल …आज ” the best song of the millenium ” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ” आयेगा आनेवाला ” गाण्याने लता आणि मधुबाला दोघींना आपली स्वतंत्र , खास अशी ओळख मिळवून दिली ….तर अशी ही लावण्यवती सिनेसृष्टीत आली आणि तिने आपल्या सौंदर्याने भल्याभल्यांना वेड लावलं …
यातलं सर्वात महत्वाचं व्यक्तिमत्वं म्हणजे झुल्फिकार अली भुट्टो …..

ही गोष्ट आहे ” मुघल ए आझम ” च्या वेळची ……झुल्फिकार अली भुट्टो फक्त मधुबाला साठी रोज चित्रपटाचं चित्रीकरण पाहायला येत असत …तिच्या पूर्णपणे प्रेमात बुडालेल्या भुट्टो नी तिला लग्नाची मागणी देखील घातली. पण भुट्टो यांचे आधी दोन विवाह झाले आहेत अशी बातमी जेव्हा मधुबालाच्या वडिलांना अताउल्ला खान यांना कळली तेव्हा मधुबालाने लग्नाला नकार दिला. तिला आपल्या प्रेमात कुणीही वाटेकरी नको होते. भुट्टों ची पंचाईत झाली कारण त्याचवेळी ते पाकिस्तानच्या पंतप्रधानपदासाठी उभे होते …. आधीच्या बायकांना तलाक देवून एका हिंदुस्तानी नटीच्या आहारी जावून तिच्याशी विवाह केला असता तर पाकिस्तानी जनता त्यांचा पंतप्रधान म्हणून स्वीकार करणार नाही अशी भीती त्यांना वाटली .
आपल्या महत्वाकांक्षेसाठी त्यांनी आपल्या प्रेमाचा त्याग केला असंच म्हणावं लागेल ….

Madhubala birth anniversary

अगदी सुरुवातीला मधुबाला स्वतः देखील अनेकांच्या प्रेमात पडलिये बरं का ? तिचा स्वभावाच एकदम साधा, सरळ, बालिश होता. आपल्या प्रत्येक सह कलाकाराविषयी तिच्या मनात नाजूक भावना निर्माण व्हायच्या. केदार शर्मा, अशोक कुमार, राजकपूर ( आश्चर्य वाटतंय ना ? ) ….अशोक कुमारला तर तिने एकदा आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाबही दिलेला….
पण या सर्वांनी तिच्या बालिशपणाकडे दुर्लक्ष केलं . त्यांच्यासाठी ती फक्त गोड चिमुरडी ” बेबी ” होती . आणि तिचं वयही असं अल्लड होत की प्रत्येक वेळी नव्या उत्साहाने ती परत प्रेमात पडत असे .

” उनसे प्यार हो गया , उनसे प्यार हो गया
दिल मेरा खो गया , दिल उनका खो गया
दिल दिल से मिल गया
उनसे प्यार हो गया , उनसे प्यार हो गया “
कानांना सुखावणारा लताचा कोवळा , निरागस , कलिजा खल्लास करणारा आवाज ……
आणि डोळ्यांना तृप्त करणारी अल्लड , असामान्य सौंदर्यवती मधुबाला ….
जर असं म्हणू लागली तर तिला पाहून दिवाना न होणारा माणूस विरळा ….प्रेमनाथ असाच तिच्या प्रेमात पडला . प्रेमनाथ तर तिच्या प्रेमात एवढा पागल झाला होता कि शेवटी मधुबाला नाही मिळाली म्हणून तिच्याच सारख्या दिसणाऱ्या बीना रॉयशी लग्न केलं बिचाऱ्याने.

मधुबालाला मात्र आपला साजन अजून सापडलाच नव्हता …..स्वप्नाळू वृत्तीची , प्रेमाची भुकेली मधु आपल्या स्वप्नातील राजकुमारच्या शोधात असायची , कुणीतरी आपल्याही स्वप्नात यावं , कानात प्रेमाच्या गुज गोष्टी कराव्यात म्हणून तळमळत असायची , त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसायची ….चांदण्यात हळूच कुणीतरी आपल्या जवळ यावं , आपल्या केसातून हळुवारपणे हात फिरवावा अस तिला वाटायचं ….
” मेरे सपने में आना रे साजना
वो बात ज़रा मेरे कानों में
फिर से कह जाना रे
मेरे सपने में आना रे”

अशाच एका स्वप्नील क्षणी मधुबालाच्या स्वप्नातला राजकुमार तिच्या आयुष्यात आला …..” तराना ” चित्रपटात दिलीपकुमार बरोबर काम करताना दोघांनाही सूर गवसला . ते एकमेकांच्या सहवासात रमु लागले …मधुबालाचं स्वप्न होतं तिच्या ‘साजन’ बरोबर सुखाने रहायचं, स्वतःचा संसार थाटायचा ….पण तिच्या वडिलांना हे मंजूर नव्हतं, तिच्या प्रसिद्धीचा, सौंदर्याचा त्यांना फायदा होत होता. सोन्याचं अंड घालणारी कोंबडी ते असे सहजासहजी हातातून सोडायला राजी नव्हते. त्यांच्यात आणि दिलीपकुमार मध्ये व्यावसायिक बाबींवरून तेढ निर्माण झाली आणि त्यांनी मधुबालेला, दिलीपकुमारला भेटायची बंदी केली. पूर्णपणे वडिलांच्या नियंत्रणाखाली असलेली मधु त्यांच्या मर्जी विरुद्ध नाही वागू शकली.

ज्याला आपलं मानलं, जीव लावला कधी काळी त्याच्याच विरुद्ध कोर्टात उभं रहाव लागेल अस स्वप्नात तरी आल असेल का तिच्या ? दोघांच्याही प्रेम प्रकरणच्या भर कोर्टात सर्वांसमोर चिंधड्या झाल्या. एकमेकांना प्रेमाच्या आणाभाका दिलेले दोघंही आता रुसले होते, गैरसमज वाढत होते . दोघांच्यातला सूर कुठेतरी हरवला होता.

dilip kumar and madhubala

 

” वो दिन कहाँ गये बता
जब इस नज़र में प्यार था, प्यार था
मैं ने तो कुछ कहा नहीं
जो यूँ निगाहें फेर ली
वो रात याद है यही,
किस्सा हुआ था प्यार का
वो दिन कहाँ गये बता ”
जणू मधुबालाचीच व्यथा गाऱ्हाणं घालत आहे .

दिलीप कुमारने तेढ सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. शेवटी नाईलाजाने त्याला आपलं प्रेम विसरावं लागलं. त्याने माधुबालेला विसरायचा प्रामाणिक प्रयत्न केला. व काही प्रमाणात तो सफलही झाला. नंतर मधुबालाने सुद्धा किशोर कुमारशी लग्न केलं खरं, पण शेवटच्या दिवसात आपले दिलीप कुमार बरोबरचे चित्रपट वारंवार पाहणं हा एकच तिचा विरंगुळा होता …
ती दिलीप कुमारचे चित्रपट पाहते हे बघून किशोर कुमार चिडत असे … मग दोघांमध्ये वाद होत असत …..

यावर मधुबालाच्या बहिणीने एक तोडगा काढला …..किशोर कुमार आला की त्याच्या गाडीचा आवाज ऐकून तिची बहिण तिला निरोप द्यायची . मग ती लगेच दिलीप कुमार चा चित्रपट बंद करत असे किंवा बदलत असे ….खरंच किती खुळ असत ना प्रेम ? …..

मधुबालाने मात्र कधीच कुणाजवळ तक्रार केली नाही की आपल्या प्राक्तनाला दोष दिला नाही ….त्याच्या सलामतीची दुवा मागत राहिली ….आपल्या नशिबी आलेले भोग तिने निमुटपणे स्वीकारले ….पण प्रेम असं विसरता येतं ? मधुबाला तरी नाही विसरू शकली. अगदी शेवट पर्यंत ….मरे पर्यंत त्याचीच वाट पाहत राहिली.
” न शिकवा है कोई न कोई गिला है
सलामत रहे तू ये मेरी दुआ है
मुबारक तुझे हो तेरे दिल की दुनिया
मेरी ज़िंदगी का कोई ग़म न करना
ये सब गर्दिशें हैं नसीबों की प्यारे
न मेरी ख़ता है न तेरी ख़ता है
न शिकवा है कोई ”
पडद्यावर सर्वांसमोर हसतमुखाने हे गाणं गाणाऱ्या मधुबालाच्या मनातली असहाय्यता , निराशा , उद्वेग सारं सारं डोळ्यांसमोर साकारत जातं .

मधुबाला खरंतर ” मुघल ए आझम ” मधली अनारकली …..सलीम वर भाळलेली , त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारी नर्तिका …..
जिच्या प्रेमात वेडा पिसा होवून राजपुत्र सलीम वडिलाविरुध्द बगावत करायला तयार झाला …..सलीमने तिला दिलेलं विवाहाच वचन खोट ठरू नये म्हणून आपल्या प्राणांचा बळी देणारी ….एका रात्रीसाठी सलीमची कायदेशीर बेगम होण्याची बादशाह अकबरला विनंती करणारी व त्या बदल्यात स्वतःला भिंतीत जिवंत चिणून घेणारी अनारकली .

mughal-e-azam film poster

 

” प्यार किया तो डरना क्या जब प्यार किया तो डरना क्या
प्यार किया कोई चोरी नहीं की छुप छुप आहें भरना क्या
जब प्यार किया तो डरना क्या
आज कहेंगे दिल का फ़साना जान भी लेले चाहे ज़माना
मौत वोही जो दुनिया देखे घुट घुट कर यूँ मरना क्या
जब प्यार किया तो डरना क्या “

असं ठणकावून बादशाह अकबरला खुलेआम विचारणारी आणि त्याला आव्हान देणारी अनारकली …मृत्यूलाही न घाबरता सामोर जाणारी आणि आपलं प्रेम निर्भीडपणे जगासमोर ओरडून व्यक्त करणारी अनारकली ….का नाही मधुबाला अनारकली बनू शकली प्रत्यक्षात ?

आपल्या वडिलांविरुद्ध काहीही करायची हिम्मत तिच्यात नव्हती असंच म्हणावं लागेल ….मधुबाला जर स्वभावाने कणखर असती तर ती आणि दिलीपकुमार दोघही खऱ्या आयुष्यात नक्कीच एकत्र येवू शकले असते. कधीतरी दिलीप कुमार तिच्याकडे परत येईल ह्या एका आशेवर शेवटपर्यंत जगत होती ती. आणि तो खरंच आला एक दिवस तिला भेटायला.

तिच्या अगदी शेवटच्या दिवसात भेटले दोघं .
किती जिवाभावाची भेट असेल ती.
दोन अतृप्त जीव ….
त्या भेटीत अखेरीस दोघांच्या तारा जुळल्या असतील का ? …..
की तेव्हाही ? ……
जन्मापासूनच मधुबालाला हृदयाचा विकार होता. आणि ह्याच आजाराने तिचा बळी घेतला होता. वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. असामान्य सौंदर्य लाभलेली ही शापित अप्सरा बरोब्बर ३६ वर्षांनी ठरल्या प्रमाणे स्वर्गात परत निघून गेली होती .

Nayana Pikle
+ posts

सौ नयना सतीश पिकळे

शिक्षण -
बी एस्सी रसायनशास्त्र
एम ए संस्कृत (वेदांत)
मोबाईल - ९९६७०५३९६७

एच एस बी सी बॅन्केत नोकरी (१९९२-२००३)

बी ए संस्कृतच्या खाजगी शिकवण्या .

मराठी विश्वकोशासाठी नोंदी करणे .

यशोवाणी संस्थेतर्फे अंध मुलांसाठी आॅडियो बुक्सचे रेकाॅर्डींग करणे .

सांगितिक कार्यक्रमांसाठी स्क्रीप्ट लिहिणे आणि निवेदन करणे.

सिने-संगीत व सिनेमा विषयक लेखन करणे .

1 Comment

  • Barne Suhas
    On February 14, 2021 7:05 pm 0Likes

    Fabulous information of MADHUBALA. Excellent script.keep it up.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.