-जयश्री जयशंकर दानवे

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

       ‘ ए जिंदगी गले लगा ले, सुरमयी शाम, चप्पा चप्पा चरखा चले,

         मेघा रे मेघा रे, मैं हूं प्रेमरोगी, ये आंखे देखकर हम सारी दुनिया,

         ओमकार स्वरूपा, माझ्या मना लागे तुझा छंद, विठू माऊली तू माऊली जगाची,

         खेळ कुणाला दैवाचा कळला, दिसं जातील दिसं येतील, दयाघना का तुटले ’  

 कलावंत धुंद होऊन स्वत:शीच रममाण होतो. ते स्वर गळ्यातून वाऱ्याच्या लहरीप्रमाणे लहरत येतात. हार्मोनियम आणि स्वरांवरची ती हुकमत मनाला थक्क करून सोडते. त्या गळ्यातून सुरांची भेंडोळी बाहेर पडतात. ऐकत रहावेसे वाटते. ती तल्लीनता अशीच अक्षय राहू दे असे जाणवत रहाते. एक भावसमाधी लागलेली असते आणि मग सारे काही जमल्याचा आनंद मनावर,पर्यायाने चेहऱ्यावर चांदण्यासारखा पसरतो. त्या स्वरांचा हिंदोळा मनात झुलू लागतो. ज्या गायकाचे असे सूर आणि शब्द मनाला स्पर्शून जातात. ते म्हणजे  सुरेश वाडकर. त्यांची तल्लीनता,एकाग्रता आणि सुरांवरची हुकमत वाखाणण्यासारखी आहे. ज्यांनी गाणं सुरु केलं की समोरचा मंत्रमुग्ध होतो असा मधुर आवाज म्हणजे सुरेश वाडकर यांचा (Singer Suresh Wadkar). कोल्हापूरचा ठसका त्यांच्या गोड गायकीतून रसिकांच्या मनावर ठसलाय. मोजकी पण सुपर हिट गाणी म्हणणारे हे गायक. (Birthday Greetings to Suresh Wadkar One of the Finest Singer in Marathi and Hindi Music) 

     सुरेश वाडकर यांचा जन्म ७ ऑगस्ट १९५५ ला महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे झाला. त्यांना लहानपणापासून गाणे म्हणण्याचा छंद होता. कारण त्यांच्या वडिलांना भजनाची आवड होती. त्यामुळे लहानपणीच वडिलांच्यामुळे चांगले गाणे ऐकण्याचे त्यांना संस्कार मिळाले. ते चार-पाच वर्षांचे असतानाच लहानपणी ‘रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी’ अशी गाणी म्हणायचे. अस्सल कोल्हापूरवासी असलेल्या सुरेशजींचे वास्तव्य नंतर मुंबईतच होते. त्यांचे वडील गिरणगांव येथे सीताराम मिलमध्ये काम करत होते. गिरणगांव मधला हा गजबजलेला परिसर होता. तिथे लोकनाट्य, भारुड, बारसं, लग्न, पडदा लावून सिनेमा असे सांस्कृतिक कार्यक्रम चालत. तेव्हा सुरेशजी बाकड वाजवून गाणं म्हणायचे. एकदा असेच बाहेर एका बाकावर बसून गात असताना पार्श्वनाथ डिग्रजकरांनी त्यांना पाहिले. संगीतकार डिग्रजकर सुरेशजींच्या  घराशेजारी मुलांच्या गाण्याच्या शिकवण्या घ्यायचे. ते शिकवणं बाहेरून ऐकून सुरेशजी गाणं म्हणू लागले. एकदा त्यांनी बाहेरून एक बंदिश ऐकली आणि सरगम, तानासह डिग्रजकरना ऐकवली. तेव्हा ते म्हणाले, बंदिश कुठून ऐकलीस? तेव्हा सुरेशजी म्हणाले, तुम्ही इतरांना शिकवता तेव्हा ऐकली. आपण यालाच का तयार करू नये असे वाटून गुरुजीनी सुरेशजींच्या मधला कलावंत विकसित केला. चार वर्षाच्या सुरेश यांची ही संगीताची समज त्यांनी हेरली. हिऱ्याला पैलू पाडले की तो झळाळून उठतो, तेच सुरेशजींच्या बाबतीत घडले.

भावगीत, भक्तीसंगीताचे छोटे छोटे कार्यक्रम आणि डिग्रजकरांच्या मार्गदर्शनाखाली उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजने यांचे धडे गिरवत पूजा, सत्यनारायण, बारशी, छोटे छोटे सांस्कृतिक कार्यक्रम यात हा बालगायक आपली हजेरी लावू लागला. त्यांनी  ‘कवनोबता’ ही रागातली चीज सुरेशजींना प्रथम शिकवली. त्या भागातला लहान कलाकार म्हणून त्यांना शंभर रुपये मानधन मिळू लागले. छडी लागे छमछम हेदेखील त्यांच्या वाट्याला आले. पण हा गाण्याच्या वेडाने झपाटलेला मुलगा…त्याला ध्यास लागला होता तो संगीताचा. आपल्या भारतीय संस्कृतीत असलेली गुरु-शिष्यपरंपरा सुरेशजी जाणून होते. म्हणूनच पुढील शिक्षणासाठी त्यांचे मन चातकासारखे त्या गुरूच्या शोधासाठी तडफडत होते. या त्यांच्या मनातल्या ध्यासामुळे गुरु-शिष्याची गाठ पडली. त्या थोर कलावंताचे नाव होते पंडित जियालाल वसंत. सुरेशजींनी वयाच्या १० व्या वर्षीच त्यांच्याकडून विधिवत संगीत साधना सुरु केली. जियालाल वसंत हे काश्मीरहून आलेले होते. त्यांच्याकडेच त्यांनी गुरुकुल पद्धतीने संगीत शिक्षण सुरु केले. या गुरुंनी त्यांना मुलाप्रमाणे वागवले. गुरूंची मुलगी प्रेमा वसंत आणि सुरेशजी बहिण-भावाप्रमाणे राहू लागले.

     सुरेशजींचा जगण्याचा संदर्भच बदलला. जे इप्सित ठरवले होते, अंतर्मनात जो झुळझुळता प्रवाह होता तो पुरा करण्यासाठी त्यांच्या स्वप्नांचा शिलेदार त्यांना सापडला होता. सुरेशजींनी ही संधी स्वीकारली. गुरुगृहाचे महात्म्य वेदकालापासून सर्वदूर पसरलेले म्हणूनच वांद्रा येथे गुरूगृही गिरणगावातला सुरेश दाखल झाला. तिथे अपार कष्ट, मेहनत, रियाज आणि स्वरांवरची हुकुमतवाढवण्यासाठी आवश्यक असेलला संगीताचा अभ्यास सुरु झाला. एकीकडे सुरांशी लीलया खेळणे चालू असताना स्वत:च्या जगण्याचा शोध घेण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण पण चालूच होते. संगीत हाच विषय घेऊन सुरेशजींनी पदवी संपादन केली. पतियाळा घराण्याची गायकी त्यांनी त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिकायला प्रारंभ केला. त्यांच्या कलावंत मनाला दिलासा मिळाला. त्यांच्यातला कलावंत घडू लागला.

     सुरेशजींनी २० व्या वर्षीच ‘सूर शृंगार’ या एका संगीत स्पर्धेत भाग घेतला. १९७५-७६ ची ही घटना. जिथे परीक्षक होते जयदेव, रवींद्र जैन तसेच हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके आणि शिव-हरी. सुरेशजींच्या आवाजाने सर्वजण  प्रभावित झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत हरिहरन आणि राणी वर्मा यांनीही भाग घेतला होता. त्यावेळी हरिहरना ‘एस.डी.बर्मन पुरस्कार’, राणी वर्माला ‘वसंत देसाई पुरस्कार’ आणि सुरेशजींना ‘अजहू न आये बालमा’ गाण्यासाठी ‘संगीतकार मदमोहन अवार्ड’ मिळाले. त्यावेळी रवींद्र जैन आणि जयदेव या परीक्षकांनी सुरेशजींना  चित्रपटसृष्टीत गाणे देण्याचे आश्वासन दिले आणि हे आश्वासन पाळलेसुद्धा.

     रवींद्र जैन यांनी ताराचंद बडजात्या यांच्या राजश्री प्रौडक्शनसाठी १९७७ साली  ‘पहेली’ चित्रपटात सुरेशजींना गाण्याची पहिली संधी दिली. यात मा.सत्यजित हिरो होते. त्यातले हे गाणे ….

             ‘ सोना करे झिलमील झिलमील,दृष्टी पडे टापूर टुपूर’

तसेच संगीतकार जयदेवनी त्यांना ‘गमन’चित्रपटासाठी ‘सीनेमें जलन’ गझल गाण्याची संधी दिली.   

             ‘ सीनेमें जलन आंखोमें तूफानसा क्यों है

               इस शहरमें हर शख्स परेशानसा क्यों है’

सुरेशजींना या क्षेत्रात पुढे आणण्यासाठी लक्ष्मीकांत प्यारेलाल या संगीतकारांनी सहकार्याचा हात दिला. लक्ष्मीकांत-प्यारेलालनी त्यांना गाणे दिले. तेही दीदींबरोबरचे ड्यूएट ‘चल चमेली बाग में मेवा खिलाऊंगा’ हे ‘क्रोधी’मधले १९८१चे त्यांचे दिदींबरोबरचे पहिले गाणे. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी या जोडीने द ग्रेट शो मन राजकपूरजींना त्यांचा  आवाज ऐकवला. तोही या गाण्यातला. अशा रीतीने त्यांच्याकडे ‘प्रेमरोग’ ची गाणी आली.

          ‘भंवरे ने खिलाया फूल फूलको ले गया राजकुंवर

           भंवरे तू कहना न भूल फूल तुझे लग जाये मेरी उमर ’

हे लतादीदीबरोबरचे त्यांचे  द्वंद्व गीत खूप गाजले. १९८२ च्या राजकपूर यांच्या ‘प्रेम रोग’ मधील ‘मेरी किस्मत में तू नही शायद आणि मैं हूं प्रेमरोगी’ या गाण्यामुळे सुरेशजीना खूपच लोकप्रियता मिळाली. ही गाणी ऋषीकपूरवर चित्रित झाली होती. सुरेशजींचा आवाज ऋषीकपूरशी मिळताजुळता वाटल्यामुळे पुढे ऋषीकपूरसाठी त्यांचाच आवाज निवडला जाऊ लागला. पुढे त्यांनी  ‘राम तेरी गंगा मैली’ साठी दीदींबरोबरच जे गाणे रेकॉर्ड केले ते अविस्मरणीय झाले.

       ‘हुस्न पहाडों का ओ सायबा, क्या कहना के बारहों महिने, यहां मौसम जाडोंका

        रुत ये सुहानी है, के सर्दी से डर कैसा, संग गरम जवानी है ’

लक्ष्मीकांत प्यारेलालनी  ‘प्यासा सावन’ मध्ये ‘मेघा रे मेघा रे’ गाण्याची संधी त्यांना दिली. खरं तर दीदीबरोबर गाताना त्यांना दडपण यायंच पण दीदी छान सांभाळून घ्यायच्या. त्यांच्याबरोबर गायलेल्या गाण्यांपैकी सुरेशजींचे आवडते गाणे म्हणजे ‘मेघा रे मेघा रे’.

          ‘ मेघा रे मेघा रे मत परदेस जा रे,आज तू प्रेम का संदेस बरसा रे ’

हे गाणं म्हणजे स्वर्गीय आनंद देणारं तरुणाईच गीत. या गीतात तिसऱ्या कडव्यात ‘मन का मयुरा आज मगन हो रहा है’ या वरच्या पट्टीतील सुरेशजींच्या आवाजलगत लतादीदींच्या आवाजात खालच्या पट्टीतील ओळ आहे.. ‘मुझे आज ये क्या सजन हो रहा है’ या ओळी ऐकल्या की हे गाणं काव्यरसाच्या चरमसीमेवर पोचतं. पावसाची जेव्हा चाहूल लागते तेव्हा तापलेल्या धरणीवर पावसाचे टपोरे थेंब पडू लागले की, हे गीत आठवल्याशिवाय राहात नाही.

     ‘ और क्या अहदे वफा होते है, लोग मिलते है जुदा होते हैं ’

      ‘सनी’ चित्रपटातील ही गझल सुरेशजींशिवाय एवढी प्रभावशाली होऊच शकली नसती. संगीतकार आर.डी. बर्मननी ही गझल गाण्यासाठी सुरेशजींची खास निवड केली. तेव्हा त्यांना प्रोड्युसरचा फोन आला की, वाडकरांच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या गायकाला या गझलसाठी बोलवावे तेव्हा आर.डी. फोनवरच म्हणाले, ‘मैने आपकी पिक्चर छोड दी’. या त्यांच्या आग्रहामुळेच सुरेशजींना ही गझल गायला मिळाली.पंचमदांनी सुरेशजींना भूपेंद्रसोबत ‘मासूम’ चित्रपटासाठी सुद्धा एक छान गझल दिली.

       ‘ हुजूर इस कदर भी ना इतराके चलिए, खुले आम आंचलको न लहराके चलिए ’

     सुरेशजीनी आर.डी.बर्मन तसेच गुलजार यांच्या सोबत सिनेगीतांचे अल्बम काढले. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर ‘माचीस’ या गुलजारांच्या चित्रपटात ‘छोड आये हम,चप्पा चप्पा चरखा चले’ ही गीतं त्यांना मिळाली. त्यावेळी सुरेशजी दवाखान्यात आजारी होते. विशाल भारद्वाज आणि गुलजार त्यांना भेटायला दवाखान्यात गेले. त्यांनी सांगितले की, लवकर बरा हो, तुझ्यासाठी दोन छान गाणी तयार आहेत आणि त्यांना ही गीते मिळाली. या गाण्यात गुलजारांचे योगदान फार आहे.त्यानंतर संगीतकार विशाल भारद्वाज सोबत त्यांनी ‘सत्या, ओमकारा, कमीने, हैदर’ चित्रपटासाठी गाणी गायली. संगीतकार उषा खन्नाकडे सुद्धा ते गायले.संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांच्या ‘इमानदार’ चित्रपटात संजय दत्तवर चित्रित गाणेसुद्धा खूप लोकप्रिय झाले.

       ‘ और इस दिलमें क्या रख्खा है, तेरा ही दर्द छुपा रख्खा है ’ 

‘लेकीन’ चित्रपटामध्ये हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेलं सुरेशजींचं गाणं ऐकलं की, असे विचार त्याच पद्धतीने म्हणजेच विचारप्रणव पद्धतीने साकार करणे किती कठीण आहे हे लक्षात येते. ‘लेकीन’ चित्रपटाच्या दीदी निर्मात्या होत्या त्यातील हे गाणे …..

       ‘ सुरमयी शाम किस तरह आये, सांस लेते है जिस तरह साये

         कोई आहट नहीं बदलती कहीं, फिर भी लगता तू यहीं हैं कहीं

         वक्त जाता सुनायी देता है, तेरा साया दिखायी देता है ’

‘सदमा’ चित्रपटासाठी गुलजार यांनी लिहिलेल्या एका गीतात समोर येणारे आयुष्य आहे तसे स्विकारण्याचा भाव सामावला आहे.

       ‘ ए जिंदगी गले लगा ले, हमने भी तेरे हर इक गमको गले लगाया है, है ना….’

१९८३ साली संगीतकार इलिया राजा यांनी सुरेशजींच्या स्वरात ही गोड रचना गाऊन घेतली. त्यातील पुढील ओळी ऐकल्या की,खरोखरच मन भरून येतं.

    ‘ छोटासा साया था, आंखोंमें आया था, हमने दो बुंदोंसे मन भर लिया

      हमको किनारा मिल गया है जिंदगी ’

सकाळ, संध्याकाळ,रात्र अशा तिन्ही  प्रहरात, निसर्गरम्य उटी परिसरात या गाण्याचं चित्रण केलं असून भावनाशील आवाजात सुरेशजींनी हे गाणं अधिक देखणं केलं आहे. आजही त्यातल्या सांगीतिक वैविध्यामुळे हे गाणं कधीही आणि कितीही वेळा ऐकलं तरी प्रत्येकवेळी नव्यानं कळत जातं.

     त्यानंतर सुरेशजीनी खूप मोठमोठ्या संगीतकारांकडे गाणी गायली. उदा : ‘हाथोंकी चंद लकीरोंको (विधाता-कल्याणजी आनंदजी), गोरोंकी ना कालोंकी (डिस्को डान्सर-बप्पी लाहिरी), लगी आज सावनकी फिर वो झडी है (चांदनी-शिव हरी)’ अशी त्यांची गाणी लोकप्रिय झाली.

     सुरेशजीना इंदीवर, गुलजार, योगेश, निदा फाजली, साहीर लुधियानवी या गीतकारांची गाणी गायला मिळाली. त्यांच्या मते उंची शायरी गाण्याची उंची वाढवते. आज लोकप्रियतेसाठी गाण्यात शब्द घालतात त्यामुळे त्या गाण्याचा दर्जा कमी होतो. पण जुन्या गाण्यात ‘जजबातोंको हर शब्द्से न्याय मिलता था’. उदा : हृदयनाथ मंगेशकरांचे साहीरनी लिहिलेले ‘धनवान’ या हिंदी चित्रपटातील लतादीदींबरोबरचे गाणे…

       ‘ये आंखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते हैं’. 

     सुरेशजी हृदयनाथ मंगेशकर, अशोक पत्की, श्रीकांत ठाकरे, बाळ पळसुले, अनिल-अरुण, राम कदम, अजय-अतुल, अवधूत गुप्ते, निलेश मोहरीर या सर्व मराठी संगीतकारांच्याकडे सुद्धा गायले. हृदयनाथ मंगेशकरांची सुरेशजीनी गायलेली मराठी गाणी म्हणजे ‘माजे राणी माजे मोगा (महानंदा), मी काट्यातून चालून थकले, चिंब पावसानं रान झालं आबादानी. अशोक पत्की हे त्यांचे गुरुभाई आहेत. सुरेशजीनी जास्तीत जास्त प्रायव्हेट मराठी अल्बम श्रीधर फडके व अशोक पत्की यांच्यासोबत काढले.   

       ‘ ओमकार स्वरूपा सदगुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुज नमो’

हे श्रीधर फडके यांचे गीत सुपरहिट झाले. या गाण्यातील सुरेशजींचे स्वर म्हणजे वेदनेचा सूर आणि माधुर्याचा ठाव. श्रीधर फडके म्हणजे लिहिणाऱ्याच्या शब्दाला त्याच्या गुणापेक्षा चार पटीने उंचावर नेणारे. तसेच हृदयनाथ मंगेशकरांचे रियाजाशिवाय शहाण्यांनी गाऊ नये असे चमत्कृत गाणं म्हणजे

       ‘ दयाघना का तुटले चिमणे घरटे, उरलो बंदी असा मी…’

हे गाणे रोमांच आणणारे असून हे शब्द आणि स्वर सादर करताना सुरेशजींनी बऱ्याच रिहर्सल केल्या आहेत.

      ‘ हे भास्करा क्षितिजावरी या, उजळावयाला दाही दिशा या’

     अशोक पत्की यांचे ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातील सुरेशजींचे हे गाणे सन्मानास पात्र ठरले.

      ‘ विठू माऊली तू माऊली जगाची,माऊलीत मूर्ती विठ्ठलाची ’

हे सुरेशजींचं जयवंत कुलकर्णी आणि सुधीर फडके यांच्यासोबत असणारं गाणं खूपच लोकप्रिय झालं. 

    संगीताला एक भाषा असते. ती भाषा आशययुक्त असते. सतत श्रवण केल्याने कलाकाराचे घराणे,  त्याचा त्या शैलीवरील अधिकार, कलाकाराच्या लालित्याबद्दल कल्पना, रागांवरील प्रभुत्व, नवनिर्मितीची उत्कंठा यामुळे कलाकाराला एक आव्हानच मिळत असते हे सुरेशजी जाणून होते. आचार्य जियालाल वसंत या आपल्या परमपूज्य गुरुजींकडून संगीताची आराधना करताना सुरेशजीनी हे आव्हान स्वीकारले होते. त्यांनी आपल्यातला कलावंत जपत रसिकांना जे हवे आहे ते भरभरून द्यायला सुरुवात केली; आणि म्हणूनच आपल्या अवघ्या यशाचे श्रेय ते आपल्या गुरूंना कृतज्ञापूर्वक देतात. त्यांच्या संभाषणातून हा कृतज्ञतेचा धागा वारंवार हाती लागतो. आपल्या आयुष्यातलं महत्वाचं स्थान ते गुरुजींना बहाल करतात. पण चित्रपटातल्या मोहमयी दुनियेत त्यांना  ब्रेक देणारे आहेत ते म्हणजे रवींद्र जैन होय. वचन पाळण्यावर प्रचंड विश्वास असलेल्या रवींद्र जैननी त्यांना हात धरून या दुनियेत आणले आणि मग मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

     रवींद्र जैन यांच्या नंतर ते नाव घेतात लाखो रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या लता आणि आशा यांचं. सुरेशजी लता मंगेशकरांच्याबद्दल आपले विचार मांडतात, ‘निश्चित तारीखवार स्मरणात नसल्याने सांगता येणं कठीण आहे; पण १९७७ च्या सुमारास लतादीदींचा आणि माझा अगदी अल्पपरिचय झाला. त्यावेळी मी संगीतकार जयदेव यांच्याकडे सहाय्यक होतो. ‘रिदम सेक्शन’ ची जबाबदारी मी सांभाळयचो. तेव्हा ‘तुम्हारे लिए’ या चित्रपटातील ‘तुम्हे देखती हूं तो लगता है ऐसे’ हे गीत दीदींचे होते. तेव्हा आमची मोघम ओळख झाली. त्यानंतर काही दिवसांनी ‘मेरा रक्षक’ नावाच्या एक चित्रपटाला रवींद्र जैन संगीत देत होते. त्यांच्याच हस्ते मला पूर्वी गायन स्पर्धेत प्रथम क्रमाकांचे पारितोषिक मिळाले असल्यामुळे त्यांच्या दिग्दर्शनात माझी २-३ गाणी आधीच ध्वनिमुद्रित झाली होती. त्यावेळेस जैन साहेबांनी माझा लतादीदींबरोबर खास परिचय करून दिला आणि म्हणाले, ये लडका बहुत अच्छा गाता हैं ये कोल्हापुरका हैं. असं रवींद्रजींनी सांगितल्यावर दिदींनी माझी अधिकच आस्थेनं चौकशी केली. ‘कुठे रहाता ? घरी कोण आहे ? ’ अशी सर्व विचारपूस केली आणि मला घरी बोलावून माझ्या आजपर्यंतच्या रेकॉर्ड्स, गाणी ऐकण्याची तयारी दर्शविली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी माझी आधीची काही गाणी घेऊन त्यांच्याकडे गेलो. त्यांनी गाणी ऐकल्यावर तिथल्या तिथेच लक्ष्मीकांत प्यारेलाल, अनिल मोहिले, कल्याणजी-आनंदजी अशा संगीत दिग्दर्शकांना फोन करून ‘मी एक मुलगा तुमच्याकडे पाठवते. चांगला गातो. त्याच्या आवाजात एखादं गाणं रेकॉर्ड करा.’ असे प्रत्यक्ष सांगितले. त्यानंतर लगेचच पुढे सर्वच संगीतकारांनी माझी गाणी घेतली. लतादीदी परमेश्वराचा दैवी अवतारच आहेत. त्यांच्या उच्च कोटीच्या गाण्यांशी कोणीही बरोबरी करू शकणार नाही. कितीही प्रयत्न केले तरी चंद्र सूर्य हाती लागतील का? मला कुणी विचारले की, गेल्या सहस्त्रकातील सुंदर बाई कोण ? तर उच्चरवाने सर्वांना मी ओरडून सांगेन की लता मंगेशकर, ज्यांचे गाणे हीच दुनियेतील सुंदर गोष्ट आहे. लता-आशा हे संगीताच्या शामियानातले दोन महत्वाचे खांबच. तसेच आशाताईंचा आवाज म्हणजे सुद्धा परमेश्वरी साक्षात्कारच. कोणतेही गाणे असो अगदी रैपपासून नाट्यसंगीतापर्यंत लीलया ते गाणे आशाबाईंच्या गळ्यातून उतरते. एक वेगळाच आनंद मिळतो.’ सुरेशजींनी लता-आशाबद्दलचा व्यक्त केलेला हा आदरभाव अपूर्वच आहे. त्यांनी लता-आशा, मोहम्मद रफी, सुधीर फडके यांच्या क्लासिकल गाण्यांची पारायणे केली असून हे सर्व त्यांचे अप्रत्यक्ष गुरु. लता-आशा यांच्या बरोबर त्यांनी खूप कार्यक्रमही केले आहेत. मंगेशकर घराण्यात सुरेशजीना मुलाचा दर्जा दिला जातो.

     ‘ संगीतकाराचे गाणे त्याच्या शैलीत ; पण आपल्या आवाजाच्या माध्यमातून आणता आले पाहिजे आणि भावना म्हणालं तर  तुमचा सूर सच्चा लागला तरच त्या सच्चेपणात साऱ्या भावना उतरतात.  स्वरांशी एकरूप होणे हीच सर्वोत्तम भावना असते.बाकी भाषेच्या उच्चारणातले फरक हे तांत्रिकच असतात; पण सूर मस्त लागायला हवा.’ हे  दीदींचे सल्ले सुरेशजीना नेहमीच मौलिक वाटतात. लतादीदींच्या प्रत्येक गाण्यात त्या संगीतकाराची शैली तर दिसतेच; पण तरी त्या जेव्हा एखादे गाणे गातात तेव्हा मुखडा, पहिला अंतरा, दुसरा अंतरा गात गाण्यात कुठे तरी एखादी जागा, एखादी मुरकी अशी काही घेतात, की तिथे त्या ठिकाणी दीदी जणू काही आपली सहीच करतात असे सुरेशजी म्हणतात. आजच्या संगीताविषयी सकारत्मकतेने ते म्हणतात की, काळाच्या प्रवाहात जे चिरंतन आहे तेच टिकून राहते. उडत्या चाली कितीही दिल्यात तरी त्या सर्वच लोकांच्या ओठावर खेळत राहतील असे नाही. त्यातले अधुरेपण लोकांना जाणवले की लोकच पटकन त्यांना बाजूला ठेवतात. पण जे अस्सल आहे त्याला उचलून धरण्याची क्षमता रसिकांकडे निश्चित आहेच. कालचे संगीत हे सोन्याच्या मोलाचे होते हे निश्चित. पुन्हा त्या मागे मेहनत, परिश्रम, अभ्यास आणि रियाझ होता.त्याची यथायोग्य सांगड घातली गेल्याने ते रसिकांना पटकन आवडून गेलं. संगीत परंपरा जोपासणाऱ्या तरुण पिढीविषयी सुरेशजी आत्मियतेने बोलतात, कोणताही गायक हा नम्र हवा, आपले गाणे त्याने अंत:करणपूर्वक रसिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यामुळे हे नव्या पिढीने पण लक्षात घेऊन आपली कला रसिकांच्या सहकार्याने कशी फुलवता येईल याकडे विशेषत्वाने लक्ष द्यायला हवे. झाड अथवा शरीर जसे आवश्यक ते जीवनोपयोगी घटक बाह्य वातावरणापासून घेतात तसेच योग्य ते संस्कार घेत कलाकारांनी स्वत:तली कला वाढीस लावायला हवी.

     गायक कलावंताने रागांचा अभ्यास करायलाच हवा यावर सुरेशजी आग्रही आहेत.त्यामुळे सुगम संगीतही अधिक श्रवणीय होऊ शकते.सगळ्या रागांचे मिश्रण सुरातून करताना त्यातला सहजपणा किती टिकून राहिल याचाही ताळमेळ गायकाने घालायला हवा.एका रागातून जो दुसऱ्या रागात नकळत जातो त्याचेच गाणे शाश्वत ठरू शकते असे सुरेशजी वारंवार सांगतात.त्यांना शब्दप्रधान गायकी आवडते. शब्दांचा सुरांशी चाललेला खेळ त्यांना मनभावन वाटतो.त्यांना ‘मेलोडियस’ आनंदीवृत्तीची गाणी म्हणायला विलक्षण आवडतात. त्यांचा देवावर पूर्ण विश्वास आहे. नशिबावर त्यांची श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही. जे संगीत तुम्हाला परमोच्च आनंद देते ते चांगले संगीत ही उत्कृष्ट संगीताची सुरेशजींनी केलेली व्याख्या सर्वांनाच पटेल.

     त्यांचे संख्येकडे लक्ष नसे तर गाण्याच्या क्वालिटीकडे लक्ष असे. संगीत ही दैवी देणगी आहे यावर त्यांचा अपार विश्वास आहे. मनातले हे संगीत अंतर्मनात उमलून यावे लागते.त्याचे भाव चेहऱ्यावर दिसायला हवेत.तल्लीनता जपली जायला हवी. सुरेशजींच्या मते आपली गुणपात्रता आपणच  तपासून पाहणे गरजेचे आहे.आपण गात रहावे.रसिक रुचेल,पचेल,आवडेल ते स्वीकारतील. निखळ, अस्सल दिले तर ते उचलून धरले जाते. नाही आवडले तर आपण आपली कमतरता कशात आहे याचा आत्ममग्न होऊन विचार करावा असं ते म्हणतात. मैफिली गाजविणाऱ्या या अव्वल दर्जाच्या गायकाने गायलेल्या गाण्यांची संख्या थक्क करणारी तर आहेच पण ध्वनीफितींचीही मोजदाद करावी तेवढी थोडी. जे जे चांगले हाताशी लागत गेले ते सुगम संगीत ते गात गेले. आज ध्वनीफितीतून भेटीला येणाऱ्या सुरेशजींना मैफिलीत गायला खूप आवडते. रसिकांच्या पसंतीची गाणी गाताना जो आनंद रसिकांच्या चेहऱ्यावर दिसतो तो आपल्याला खुश करून सोडतो असे ते म्हणतात. त्यांच्या हृदयातच संगीत भिनले असल्यामुळे सुरेशजींनी नुसत्या गाण्यापुरती आपली कला मर्यादित ठेवली नाही. त्यांच्यातल्या संगीतकारालाही त्यांनी जागे केले.

‘दिल चुराया आपने’ चित्रपट तसेच काही मराठी चित्रपटही त्यांनी आपल्या संगीताने नटविले आहेत. प्रत्येक कलावंताला एक तरी ‘godfadar’ हवा असतो. तो त्याला या कलामय विश्वात पुढे जायची प्रेरणा देतो; पण त्याआधी ही कला आत्मसात करण्यासाठी प्रेरणा देणारा, शिकवण देणारा पण कुणी तरी हवा असतो. त्याच्याचमुळे तो कलावंत प्रसिद्धीच्या झोतात येतो. भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्य परंपरेचे महत्व मोठ्या पटीत आहे. द्रोणाचार्य-अर्जुन यांसारखी गुरु-शिष्याची जोडी आपण सर्व जाणतोच. या गुरुचे ऋण हे सहजपणे फिटणारे नसते. मग ज्या गुरूने शिकवून तयार केले, ज्याने आपल्याला कलादान दिले, ते आपण दुसऱ्यांना देऊन गुरु-शिष्य परंपरेच्या संगीतात भर का घालू नये असे सुरेशजींना वाटले. म्हणूनच ‘गुरुकुल’ पद्धत मूर्त स्वरुपात आणण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम केले. जिला सुरेशजी दीदी म्हणून संबोधतात त्या त्यांच्या गुरूंची कन्या प्रेम वसंत यांच्या सहाय्याने त्यांनी गुरुकुल स्थापण्याचे ठरविले.

     गुरुकुल बांधण्यासाठी जागेचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सौजन्याने व सहकार्याने जुहू येथील विद्यापीठाच्या शेजारी १० हजार चौरस मीटरची मोकळी जागा सुरेशजींच्या हाती आली. मुख्यमंत्र्यासारख्या एका रसिकाने केलेल्या या कलेच्या सन्मानामुळेच गुरुजींच्या स्मृतींचा ताजमहाल आकाराला येऊ शकला. आपल्या गुरूंची पालखी सुरेशजींनी आपल्या खांद्यावर घेतली आणि तिचे वैभव मन:पूर्वक जपत त्यांची ही स्मृती अजरामर केली. या संस्थेचे सुटसुटीत नाव ‘आजीवसन’ असे आहे. यामध्ये शास्त्रीय संगीत व नृत्य यांचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले जाते व ते देखील मोफत हे या संस्थेचे विशेष आहे. भारतभरातली कलेची आस व जाण असणाऱ्या निवडक मुलांना इथं ती कला शिकण्यासाठी प्रवेश दिला जातो.

     या चार मजली वास्तूच्या आसपास फिरत असताना कान देऊन लक्षपूर्वक ऐकले तर संगीताच्या रेशीम लहरी कानावर हलकेच पडतात. इथे विद्यार्थी येऊन ही कला आत्मसात करतात. या गुरुगृही पडेल ते काम करतात. ख्याल, गझल, गीत आणि भजने यांच्या माध्यमातून काव्य आणि संगीत यांचा उत्कट मिलाफ ते घडवतात. या ‘आजिवसन’ च्या इमारतीत तुम्हाला भव्य सभागृह दिसेल. या ठिकाणी संगीताशी संबंधित सर्व कार्यक्रम होतात. वरच्या मजल्यावर गीते ध्वनीमुद्रण करणारे अत्याधुनिक स्टुडीओज आहेत. या संस्थेमधून  अनेक गुणी गायक तयार झाले आहेत. आजपर्यंत इंदूर, मॉरीशस, सिंगापूर इथली मुलंही येऊन शिक्षण घेऊन गेली आहेत ज्यांची कीर्ती सातासमुद्रापार पोचली आहे. याचे सर्व श्रेय सुरेशजींना जाते. या आजिवसन मधून नावारूपाला आलेल्या कलाकारांची नामावली फार मोठी आहे. त्यापैकी एक स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते, हृषिकेश रानडे वैशाली सामंत. मी संगीतातले मास्टर्स निर्माण करणार असे गुरु जियालाल वसंत  नेहमी म्हणत असत. हीच परंपरा आज दीदी आणि सुरेशजी पुढे नेत आहेत. गुरूंच्या मनातल्या स्वप्नांची पूर्ती या आजिवसन मध्ये चाललेल्या अनेकविध उपक्रमातून होत आहे.

     अमेरिका वगैरे ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या लोकांच्या आग्रहावरून सुरेशजींनी न्यूजर्सी मध्ये शाखा स्थापन केली. संस्था नीट चालती आहे ना हे पाहण्यासाठी ते प्रत्येक वर्षी तीन महिने तिथे जाऊन राहतात. रोज तीन साडे तीन तास सुरेशजी रियाज करतात. त्यांच्या घरी कधीही तंबोरा शांत नसतो. तसेच रियाज पक्का ठेवला तर कोणतेही पथ्य बाळगावे लागत नाही. तसंच क्लासिकल गाणं हे शिकलंच पाहिजे असं ते म्हणतात. गाणी ही विहीर आहे आणि ती रोज खणल्याशिवाय पाणी मिळत नाही हे त्यांचे विचार सर्वकालिक आहेत.  

     सुरेशजींनी हिंदी, मराठी शिवाय अनेक भोजपुरी, कोंकणी भाषेतही गाणी गायली आहेत. तसेच १९९८ मध्ये ‘शिवगुणगान’, २०१४ मध्ये ‘मंत्रसंग्रह’,२०१६ मध्ये ‘तुलसी के राम’ हे भक्ती अल्बमही केले आहेत. त्यांचा विवाह १९८८ मध्ये पद्मा सोबत झाला. जी स्वत: एक प्रसिद्ध गायिका आहे. त्यांना दोन मुली आहेत जिया आणि अनन्या. त्यांची पत्नी केरळची असून व्यावसायिक स्वरुपात संगीत शिक्षण देते. लोकांचे प्रेम हाच माझा सन्मान असे ते मानतात. तरीही  त्यांचे संगीतक्षेत्रातील विपुल कार्य पाहून त्यांना २००७ मध्ये महाराष्ट्र सरकारने ‘प्राईड अवार्ड’ ने सन्मानित केले. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. २०११ मध्ये मराठी चित्रपट ‘सिंधुताई सपकाळ’ साठी त्यांना ‘ हे भास्करा क्षितीजावरी’ या गाण्यासाठी  सर्वोत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच मध्य प्रदेश सरकारतर्फे प्रतिष्ठित ‘लता मंगेशकर पुरस्कार’ सुद्धा मिळाला आहे.

     आकाशातून सरी कोसळतात अन तप्त माती त्या अंगभर झेलते. तापलेल्या धरतीवर जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा आसमंतात जो गंध भरून राहतो त्याला म्हणतात ‘मृदगंध’. हा मृदगंध म्हणजे साऱ्या सृष्टीचा उत्सव असतो. या मृदगंधात आप, तेज, वायू, पृथ्वी, आकाश ही पाच तत्वं जणू एकमेकांना कडकडून भेटतात आणि त्यातूनच एक पाच कळ्यांचे जे अवकाशपुष्प उमलते त्याचा गंध म्हणजेच हा ‘मृदगंध’. हा भान हरवून टाकणारा नि जीवाची काहिली शांत करणारा असतो. हा जो अनोखा सरमिसळ गंध असतो, त्याला तोड नसते.हा सुगंध खोल खोल श्वासात भरून घेतला तर पुढे कित्येक दिवस त्यातील उर्जा मन आणि शरीर साठवून ठेवते. सुरेशजींची गाणीही अशीच अविस्मरणीय मृदगंधी आहेत. तसेच त्यांची गुरुभक्ती फुलांसारखी निर्मळ, पवित्र असून  त्यांचे संगीत मनातल्या भावनांना उधाण आणणारे आहे. हा सुरांचा ‘ईश’,त्याची अभिजात कला, तिचे सौंदर्य सारे काही नक्षत्रासारखे आजही लखलखते आहे. असा हा मृदगंधी आवाज रसिकांचे कान तृप्त करत राहो ही परमेश्वरचरणी प्रार्थना ! 

हिंदी चित्रपट संगीताशी संबंधित लेखांसाठी क्लिक करा 

मराठी चित्रपट संगीताशी संबंधित लेखांसाठी क्लिक करा 

jayashree jaishankar danve
Jayashree Jaishankar Danve
+ posts

जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

   (एम.ए. संगीत विशारद) (ज्येष्ठ लेखिका)

*  ताराराणी विद्यापीठात उषाराजे हायस्कूलमध्ये २३ वर्षे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत.

*  निवृत्तीनंतर चरित्रग्रंथ,व्यक्तिचित्रण,कथा संग्रह,ललित लेख अशा विविध विषयांवर आजवर

   ३१ पुस्तके प्रकाशित 

*  ‘कलायात्री’ चरित्रग्रंथाला आजवर १० मान्यवर संस्थांचे पुरस्कार.

*  वैयक्तिक ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ व इतर अनेक पुस्तकांच्या पुरस्काराने पुरस्कृत.

*  नियतकालिके व मासिकातून असंख्य लेख प्रसिद्ध.

*  अनंत माने दिग्दर्शित ‘पाच रंगांची पाच पाखरे’ व ‘पाहुणी’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन.

*  ‘ड्रीम मेकर्स’ व ‘म्युझिकल नाईट’ ऑर्केस्ट्रात गायिका म्हणून सहभाग.

*  शेगांवच्या गजानन महाराजांच्या जीवनावरील भक्तीगीतांचे १०० हून अधिक कार्यक्रम.

*  समूहगीत,नाटक,नृत्य,बालनाट्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिग्दर्शन.

*  गेली ३५ वर्षे ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे’ यांच्या स्मृतीचे जतन तसेच कलायात्री पुरस्काराचे  

   संयोजक म्हणून सहभाग.

1 Comment

  • Medhe. P. G.
    On August 8, 2021 8:30 pm 0Likes

    Exce llent write up

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.